चहा किंवा कॉफीशिवाय राहूच न शकणारे काहीजण असतात, तसेच चहा- कॉफी म्हणजे ‘अ‍ॅसिडिटी’ किंवा ‘निद्रानाश’ असा शिक्का मारून या पेयांना दूर ठेवणारेही बहुतेक जण आहेत. चहा- कॉफी चांगली की वाईट, ही पेये किती प्रमाणात प्यावीत, त्यातून काय- काय मिळतं, याविषयी सांगताहेत डॉ. वैशाली जोशी

चहा किंवा कॉफी ही दोन्ही पेयं मुळीच वाईट नाहीत. कारण या दोन्ही पेयांमध्ये ‘अँटिऑक्सिडंट’चे प्रमाण चांगले असते. चहातल्या ‘फ्लॅव्हेनॉइड’ या घटकातून ‘कॅटेचिन’ हे अँटिऑक्सिडंट मिळते, तर कॉफीत ‘क्लोरोजेनिक अ‍ॅसिड’ हे अँटिऑक्सिडंट असते. अँटिऑक्सिडंट शरीरातील पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच काही प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, वय वाढण्याशी संबंधित समस्या, अल्झायमर अशा आजारांना प्रतिबंध करतात. त्यामुळे त्या दृष्टीने ही पेये उत्तमच.     
चहा आणि कॉफीची महत्त्वाची समस्या म्हणजे या दोन्ही पेयांमध्ये साखर असते. कॅपेचिनोसारख्या कॉफीमध्ये क्रीमही असते. त्यामुळे सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात. या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. हा मुद्दा लक्षात घेतला तर चहा- कॉफी दोन्हीही कमी साखरेचे किंवा साखर न घातलेले घ्यावे. शक्यतो त्यात दूधही न घातलेले चांगले. दूध न घालण्याचे कारणही समजून घेणे गरजेचे आहे. दुधात ‘केसिन’ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन चहा- कॉफीतील अँटिऑक्सिडंटस्चा प्रभाव कमी करते. पण मग कोऱ्या चहा-कॉफीने ‘अ‍ॅसिडिटी’ होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्यांना चहा-कॉफीने अ‍ॅसिडिटी होते त्यांनी या पेयांमध्ये थोडेसे दूध घातले तर हरकत नाही. अन्यथा दूध किंवा क्रीम घालणे टाळावेच. त्यामुळे ‘ब्लॅक टी’ किंवा ‘ब्लॅक कॉफी’ चांगली. दूध घातल्याशिवाय चहा- कॉफी पिणे शक्यच नाही, अशी परिस्थिती असेल तर त्यात म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध घालणे चांगले. कारण गाईच्या दुधात स्निग्धांश कमी असतो. ‘आइस टी’ म्हणजे थंड चहा हेदेखील उत्तम पेय आहे. पण त्यातही भरपूर साखर असल्यामुळे कमी साखर घालून तो प्यायल्यास बरे.   
दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ कप चहा किंवा कॉफी प्यायली तर चालू शकेल. त्यापेक्षा अधिक प्रमाणात आणि वारंवार ही पेये पिणे मात्र टाळावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी ४ ते ६ तास चहा- कॉफी पिऊच नये. अगदी प्यायचीच असेल तर या काळात ‘डीकॅफिनेटेड कॉफी’ पिता येईल. अगदी कमी कॅफिन असलेली ही कॉफी हल्ली बाजारात मिळते. त्यात प्रतिकप १० मिलिग्रॅमइतकेच कॅफिन असते. चहा किंवा कॉफी पिऊन लगेच झोपणे मात्र चुकीचेच. काही जणांना रात्री उशिरापर्यंत किंवा अतिताणाचे काम करण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. असे करणे बरोबर नाही हे कळून देखील ही मंडळी ते टाळू शकत नाहीत. चहा- कॉफीमधून कॅफिन पोटात गेले की तरतरी येते हे जरी खरे असले तरी त्याला एक पर्याय आहे. उशिरापर्यंत सातत्याने काम करावे लागणाऱ्यांनी दर दोन तासांनी काहीतरी खाल्ले तर शरीरातील शक्ती टिकून राहील.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

पांढरा आणि हिरवा चहा चांगला!
चहाचे ‘व्हाइट’, ‘ग्रीन’ आणि ‘ब्लॅक’ असे तीन प्रकार आहेत. यातील पांढऱ्या चहात अँटिऑक्सिडंट सर्वाधिक मिळतात. त्याखालोखाल हिरव्या आणि मग काळ्या चहाचा क्रमांक लागतो. त्यामुळे पांढरा आणि हिरवा चहा चांगलाच. काळा चहादेखील चांगला आहे, पण तो कोरा आणि कमी साखरेचा असावा. हल्ली ‘हर्बल टी’च्या नावाखाली गुलाब किंवा जास्वंदीच्या फुलांचा महागडा चहा बाजारात मिळतो. अशा चहात गुलाबाच्या पाकळ्या असतीलही कदाचित, पण त्यात अनेकदा चहाची पानेच नसतात! त्यामुळे तुम्ही चहा म्हणून हे पेय पिणार असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. ही हर्बल पेये चांगली असली तरी त्यातून ‘अँटिऑक्सिडंट’ मिळतीलच असे नाही.       

13चहा- कॉफी आणि ‘कॅफिन’
चहा- कॉफीतील कॅफिनचे साधारण प्रमाण
* काळा चहा- ४७ ते ६० मिलिग्रॅम कॅफिन प्रतिकप
* हिरवा चहा (ग्रीन टी)- २५ मिलिग्रॅम प्रतिकप
* एक्स्प्रेसो कॉफी- ८० मिलिग्रॅम प्रतिकप
* स्ट्राँग ड्रिप कॉफी- १४० मिलिग्रॅम प्रतिकप
* इन्स्टंट कॉफी- २ चहाचे चमचे कॉफी पावडरमध्ये ६० मिलिग्रॅम.
* मोठय़ा माणसांनी प्रतिदिवशी कॅफिन असलेल्या पेयांमधून जास्तीत जास्त ३०० ते ४०० मिलिग्रॅम कॅफिन घेतलेले चालू शकते. पण एकावेळी २५० मिलिग्रॅम कॅफिनचे सेवन नको.
* कॅफिनला संवेदनशील असलेल्यांना १०० ते १२० मिलिगॅ्रम एवढे कॅफिन पोटात गेल्यानंतरही त्याचा झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
* पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी कॅफिनची मर्यादा एका दिवसात १०० मिलिग्रॅम अशी तर गर्भावस्थेतील स्त्रियांसाठी ती प्रतिदिवशी २०० मिलिग्रॅम आहे. या मर्यादेपेक्षा कमीच कॅफिन पोटात गेलेले बरे.

कॅफिनच्या अतिसेवनाचे परिणाम
निद्रानाश.
नैराश्य.
अस्वस्थता.
हृदयाचे ठोके वाढणे.
रक्तदाब वाढणे.
वारंवार लघवीला जावे लागणे.
डोकेदुखी.