‘‘हे बघा, शिस्त लावण्याचे काम तुम्हा आई-वडिलांचे, आम्ही आजी-आजोबा त्याला प्रेम आणि लाड हेच देऊ शकतो. नातवंडे म्हणजे काय? तर दूध नाही, दुधावरची साय!.’’ बहुतेक घरांमध्ये अशा प्रकारचे संभाषण ऐकायला मिळते. आजी-आजोबा आणि नातवंडे हे नातेच असे असते. इंग्रजीमध्ये तर या नात्याचा रुबाब दाखविण्यासाठी ‘ग्रॅण्ड’ हा उपसर्ग जोडला जातो. या हळव्या नात्यातील संबंधांविषयी..
आजी-आजोबांसोबत राहण्याचा आनंद
आजी-आजोबा जवळ असतील तर  मुलांना पालक नोकरी करत असले तरी एकटेपणा जाणवत नाही. मुलांना कुटुंबाचे संस्कार-पद्धतीची जाणीव होते आणि इतर नातेवाइकांशी संपर्क राहतो. वाढताना जर आजी- आजोबांशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर त्यांचा दृष्टिकोन जाणून, कुठल्याही विषयातले अनेक दृष्टिकोन असतात हा समज निर्माण होतो. आपल्या आई-वडिलांना आजी-आजोबांच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तरीही ते प्रेमाने आणि मानाने त्यांच्याशी वागतात, हे बघून मुलांना ‘लव्ह इच अदर डिस्पाइट डिसअ‍ॅग्रीमेंट’चे संस्कार मिळतात. त्यामुळे मुलांचा सर्वागीण बौद्धिक आणि भावनिक विकास होतो.
काही वैशिष्टय़े
सहसा आईकडच्या आजी-आजोबांचे नातवंडांकडे जास्त जाणे-येणे होत असल्याने त्यांच्याबरोबर जास्त जवळीक होते. आजोबांपेक्षा आजी जास्त वेळ देत असल्यामुळे मुलांना आजीचा लळा लागतो. किशोरवयीन मुले सांगतात की, आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबा त्यांचे शांतपणे ऐकतात आणि समजावून सांगतात. आजी-आजोबांना गमावणे हा बहुतेक व्यक्तीमधला मृत्यूशी पहिला अनुभव असतो.
नवीन युगातले आव्हान
नातवंडे म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर एक छोटेसे तीन-पाच वर्षांचे मूलच येते आणि आजी-आजोबा म्हणजे निवृत्त झालेले, रिकामटेकडे वयस्क व्यक्तीच असावी, असे वाटते. खरे तर वैद्यकीय सुधारांमुळे ज्येष्ठांचे आरोग्य सुधारले आहे आणि आयुष्यही वाढले आहे. त्याशिवाय उशिरा होणारी तसेच कमी मुले असल्याने प्रत्येक कुटुंबात हे नाते वेगळ्या पद्धतीने मांडलेले दिसते. नात-आजी एकत्र पार्लरला, आजोबा-नातू पबमध्ये आणि आजी-आजोबांबरोबर युरोप टूरला नातवंडे जाणे हे नवल वाटण्यासारखे राहिलेले नाही.
हल्लीच्या काळात नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते, आजी-आजोबांचे घर लांब असते. त्यामुळे भेट होणे कठीण होऊ शकते. आजी-आजोबा निवृत्तीनंतरही काही ना काही उद्योग करत असतात, त्यामुळे त्यांना नातवंडांसाठी वेळ मिळेलच, असे नाही. जर त्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्यांना नातवंडांबरोबर राहणे- त्यांची देखरेख करणे शक्य होत नाही. वाढणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण, नवरा-बायको वेगळे होणे, परदेशी राहणारे, नोकरी करणारे नवरा-बायको, इत्यादी संदर्भात आजी-आजोबाच मुलांची काळजी घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुनर्वविाह घडत असल्यामुळे, नातवंडांना नवीन आजी किंवा आजोबांची सवय करून घ्यावी लागते.
मोठय़ांची भूमिका
आजी-आजोबांचे आणि नातवंडांच्या संपर्कात आई-वडिलांची मध्यस्थी असल्यामुळे, आई-वडिल आणि आजी-आजोबांमध्ये सामंजस्य नसल्यास नातवंडांना त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण जाते. नातवंडांचे आजी-आजोबांबरोबर जमवून घेणे हे सर्व कुटुंबासाठी चांगले आहे, हे धोरण असले तरच हे नाते बनू शकते. या संदर्भात, ‘आमचे जमले नाही तरी नात-ज्येष्ठांचे जमू शकते’, हे लक्षात घेऊन मोठय़ांनी वागले पाहिजे. संपर्कातूनच नाते बनत असल्याने आजी-आजोबांनी नातवंडांना जमेल तितके भेटण्याचे, त्यांना वेळ देण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. मुलाला कोण जास्त आवडते, हे दाखवून देण्यासाठी मोठय़ांना एकमेकांशी इर्षां किंवा स्पर्धा करावीशी वाटू शकते, या भावनेत वाहून जाऊ नये. कुठल्याही आई-बाबांना आपल्या मुलांबद्दल मालकी वाटते, अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांना न विचारता किंवा त्यांनी सांगितल्याच्या उलट नातवंडांविषयीचे निर्णय घेऊ नयेत. आजी-आजोबांनीही आई-बाबांशी नीट वागावे, कारण त्यांचे गरवर्तन असेल तर नातवंडांचे त्यांच्यावरचे प्रेम टिकणार नाही. छोटय़ांना पाळणाघर आणि ज्येष्ठांना वृद्धाश्रम, प्रौढांनी ऑफिसमध्ये जाणे आणि सर्वानी एकटेपणा अनुभवणे- यापेक्षा सर्वानी एकमेकांना समजून, प्रेमाने एकत्र राहणे जास्त चांगले. हे साधण्यासाठी पिधींमध्ये प्रेमाचे सेतू बांधणे हाच मार्ग आहे.