मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ पाहता वृत्तपत्रे, टीव्ही यामधून या आजाराविषयी बहुतेक सर्वच लोकांना माहिती झाली असेल. मात्र अनेकदा या माहितीमुळे जनजागृतीसोबतच भीतीही पसरते. वास्तविक डेंग्यू हा आजार विषाणूंमुळे पसरत असून तो स्वनियंत्रित आहे. म्हणजे योग्य आहार, द्रवपदार्थ व आराम या त्रिसूत्रीचा उपयोग केल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे या आजाराची भीती न बाळगता योग्य प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांची अधिक गरज आहे.

लागण कशी होते?
स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा ‘एडीस इजिप्ती’ हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळय़ानंतर तापमानात होत असलेल्या चढउतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की डेंग्यूची लागण होते.

लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणूसंसर्गाप्रमाणेच असतात. मात्र काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की असह्य़ डोकेदुखी होऊ लागते, उलटय़ा होतात, अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, अंगावर चट्टेही उठतात.

उपचार
या आजाराचे निदान जेवढय़ा लवकर होईल, तेवढे चांगले. डेंग्यूवर परिपूर्ण उपचार सापडलेले नाहीत. मात्र डेंग्यूच्या लक्षणांवर उपचार केले जातात. या आजारादरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाणी, फळांचे रस यातून दिवसातून दोन ते अडीच लिटर द्रवपदार्थ शरीरात जाणे आवश्यक आहे.

आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास रक्तदाब कमी होतो. रुग्णांना आयव्ही फ्लुइड (सलाइन) आणि प्लेटलेट्स द्याव्या लागतात. बहुतांश वेळा डेंग्यू बरा होत असला तरी त्यातील हेमोरेजिक प्रकार मात्र प्राणघातक आहे. या प्रकारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने घसरते. अंतर्गत रक्तस्राव होऊन अवयव निकामी होतात. डेंग्यूच्या या प्रकाराचे प्रमाण कमी आहे. त्यातच उपचार करण्यास उशीर किंवा हयगय झाल्यास प्रकृती गंभीर होते.

प्रतिबंधात्मक उपाय
डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. घरात व परिसरात पाणी साचू न देणे, फुलदाण्या, फेंगश्युईची रोपे, नारळाला कोंब यावा म्हणून ठेवलेले पाणी यातही डेंग्यूच्या अळ्या सापडतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवेत.