दुपारी किंवा रात्री टीव्ही पाहताना वजन कमी करण्यासाठीच्या तासन्तास चालणाऱ्या जाहिराती पाहिल्यात का कधी? घाम आणणारा किंवा व्हायब्रेट होणारा बेल्ट लावा आणि चरबी कमी करा, एखादी विशिष्ट पावडर खाऊन, औषधी चहा पिऊन बारीक व्हा, जेल लावून वजन घटवा असे आकर्षक दावे या जाहिराती करतात. हे दावे कितपत खरे आहेत याचा विचारही न करता अनेक जण ही उत्पादने खरेदीही करतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मात्र अशा चमत्कार घडवण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांना कोणताही शास्त्रीय आधार नाही; किंबहुना त्यात ग्राहकांची फसवणूकच अधिक होते.  
बहुतेक वेळा या उत्पादनांचे विक्रेते ‘बेल्ट’ किंवा ‘जेल’ वापरण्याबरोबर रुग्णाने आणखी कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात याचीही एक यादी शिताफीने ग्राहकांच्या हाती ठेवतात आणि ‘बेल्ट’मुळे नव्हे तर या इतर गोष्टी पाळल्यामुळेच वजन कमी झालेले दिसते. बॅरिएट्रिक सर्जन डॉ. श्रीहरी ढोरे- पाटील म्हणाले, ‘‘बेल्ट लावण्याच्या आधी किंवा पावडर घेतल्यानंतर अर्धा-एक तास चालावे किंवा जेवणात अमुक पथ्ये पाळावीत, अशा गोष्टी ग्राहकांना सांगितल्या जातात. त्यामुळे ही उत्पादने वापरल्यावर वजन कमी झाले तरी त्याचे श्रेय उत्पादनांना नव्हे तर व्यायामाला आणि आहारात केलेल्या बदलांना जाते. वजन कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘जेल’चेही काहीसे असेच आहे. हे जेल त्वचेवर लावले की तिथली त्वचा डिंक लावल्यासारखी आकसते. हा परिणाम २-३ दिवस टिकतो आणि तेवढय़ापुरती चरबी कमी झाल्यासारखे वाटते. पण त्यानंतर ती पूर्ववत होते. काही जण पाटर्य़ाना जाताना तेवढय़ापुरते बारीक दिसता यावे यासाठी अशी जेल वापरतात. पण वजन कमी करण्यासाठी यातल्या कोणत्याही उत्पादनाला शास्त्रीय आधार नाही. जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे हाच वजन कमी करण्याचा योग्य मार्ग आहे.
जीवनशैलीत सकारात्मक बदल कसे घडवावेत याचे उत्तर प्रत्येकाच्या मते वेगवेगळे असू शकते. वजन कमी करण्याचे डोक्यात घेतले की काही जण वेगवेगळ्या जिमची पत्रके जमा करायला सुरुवात करतात. काहीजण आहारतज्ज्ञांचे पत्ते शोधू लागतात. तर काही सकाळी पाचचा गजर लावून घराजवळच्या बागेत तासभर फिरून येण्याचे ‘प्लॅन’ आखतात. पण यातल्या अनेक गोष्टी सपशेल फसतात. काही दिवस उत्साहाने जिमला गेल्यानंतर त्यातला नियमितपणा कमी होऊ लागतो. आहारावर घातलेली कठोर बंधने गुलाबजाम किंवा आइस्क्रीमच्या दर्शनाने वारंवार ढासळू लागतात आणि सकाळी पाच वाजताच्या वातावरणाचा अनुभव घेण्याचा योग कधी जुळतच नाही! पण एकदम अशा मोठय़ा ढांगा न टाकतादेखील जीवनशैली बदलायला हळूहळू सुरुवात करता येते.’’
डॉ. ढोरे- पाटील म्हणाले, ‘‘दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करण्यातूनही व्यायामाला सुरुवात होऊ शकते. ऑफिसमध्ये वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी लिफ्टचा वापर टाळणे किंवा ऑफिसपासून अध्र्या किलोमीटर अंतरावर गाडी लावून तिथून ऑफिसला चालत जाणे, घराजवळच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी न वापरणे यातून शरीराला हालचालीची सवय होऊ लागते. गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी आठवडय़ातून एकदाच खाणे, मद्यपान कमी करणे हे जीवनशैलीतील बदलांचे छोटे छोटे टप्पे असतात. जीवनशैली अशी टप्प्याटप्प्याने आरोग्यदायी बनवली तरी वजनात फरक पडलेला दिसतो.’’
 ‘अब्डॉमिनल गर्थ रिडक्शन’ तज्ज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन म्हणाले, ‘‘वजन कमी करण्यासाठीची ‘चमत्कारी’ उत्पादने रुग्णांची फसवणूक करतात. अचानक वजन कमी करण्यासाठी सुरू केलेले ‘हिरोईक एफर्टस्’देखील हमखास फोल ठरतात. बाहेरगावी जाऊन वजन घटवण्यासाठी एखादे ‘वर्कशॉप’ केले की तेवढय़ापुरते वजन कमी होते हे खरे आहे, पण पुन्हा मूळ वातावरणात परत आल्यावर ते वाढते. आपण रोज ज्या वातावरणात, ज्या जीवनशैलीत राहतो, त्यातच बदल करत जाणे हाच खरा मार्ग आहे. अचाट प्रयत्न न करताही साध्या उपायांनी रुग्णाच्या प्रकृतीनुसार एका वर्षांत पोटाचा घेर  ५ ते १२ सेंमी कमी होऊ शकतो असे निरीक्षण आहे.’’
आहारातील बदल आणि नियमित व्यायामाशिवाय वजन कमी करणे शक्य नाही, असे मत डॉ. वैशाली जोशी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘जीवनशैलीत आहार आणि व्यायाम या दोन्हींचे संतुलन असेल तरच योग्य प्रकारे वजन कमी होऊ शकते आणि कमी झालेले वजन पुन्हा न वाढता टिकते. खाल्लेल्या आहाराचे ऊर्जेत रूपांतर होण्याचा दर म्हणजे ‘बेसल मेटॅबोलिक रेट.’ हा रेट वाढवण्यासाठी व्यायामाची मदत होते. वजन कमी करताना प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याचा आहार ठरवावा लागतो. काही लोक एखादाच पदार्थ खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण शरीराला आहारातील सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते. त्यामुळे कोणतेही ‘फॅड डाएट’देखील योग्य नाही. अन्नघटक संतुलित प्रमाणात न मिळाल्यामुळे शरीराला त्याचा अपाय होण्याचीच शक्यता अधिक असते.’’
वजन कमी करण्यासाठीचे ‘शॉर्टकट’ कितीही आकर्षक वाटले तरी त्यात फारसे तथ्य नसल्याचेच या गोष्टींवरून समोर येते. त्यामुळे कोणत्याही फसवणुकीला बळी न पडणे आपल्याच हातात आहे. जीवनशैलीत बदल करून ‘झटपट’ बारीक होता येणार नाही हे खरे आहे. पण तोच खरा आणि योग्य मार्ग आहे यात शंका नको!  
मेद कमी करण्यासाठी योगासने-
योगासनांचा मेद कमी करण्याशी संबंध नसतो हा समज चुकीचा आहे, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पोटावर झोपून करण्याची विशिष्ट योगासने शरीरातील ‘लिंफॅटिक सिस्टीम’ला (लासिका संस्था) चालना देण्यासाठी फायदेशीर ठरतात. लिंफॅटिक सिस्टीमला चालना मिळाली की शरीरातील मेद कमी होऊ लागतो. प्राणायाम आणि ओंकाराचे उच्चारण या गोष्टी अति खा खा सुटणे थांबवण्यासाठी फायदेशीर ठरतात.’’

लठ्ठपणाची शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय!
‘लठ्ठपणा वाढला तरी काय झाले बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून घेता येईल की,’ असाही एक समज मतप्रवाह असतो. तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे डॉ. ढोरे-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘लठ्ठपणावरील बॅरिएट्रिक सर्जरी ही एक मोठी आणि ‘लाइफ सेव्हिंग’ शस्त्रक्रिया आहे. जीवनशैलीत आणि आहारात बदल करणे, व्यायाम करणे असे सर्व उपाय नियमित करूनदेखील काही व्यक्तींचा लठ्ठपणा कमी होत नाही, त्यांना लठ्ठपणाबरोबर इतर आजारही असतात अशा सर्व गोष्टींमुळे लठ्ठपणा त्या व्यक्तीच्या जीवावर बेतला असेल तरच बॅरिएट्रिक सर्जरीचा पर्याय योग्य आहे. त्याआधी ही शस्त्रक्रिया करणे बरोबर नाही.’’

लठ्ठपणा कमी करण्याचे योग्य टप्पे कोणते?
टप्पा १) दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे
टप्पा २) अतिरिक्त आहारावर बंधने आणणे, योग्य प्रमाणात आणि संतुलित आहार घेणे.
टप्पा ३) आपल्या प्रकृतीस झेपेल त्या व्यायामाला सुरुवात करणे, त्यात नियमितता ठेवणे.
टप्पा ४) काही वैद्यकीय तज्ज्ञ योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच औषधे सुचवतात. ही औषधे त्या त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरवली जावीत यासाठी ती तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नयेत. (वजन कमी करण्यासाठी अशी औषधे घेणे हा चौथा टप्पा आहे आणि त्याबरोबर आधीच्या तीनही गोष्टी सुरू ठेवणे अपेक्षित आहे हे मात्र विसरू नये!)
टप्पा ५) लठ्ठपणाची शस्त्रक्रिया. हा टप्पा अर्थातच इतर सर्व उपाय थकल्यानंतरचा आहे.