मधुमेहाबद्दल बोलताना अनेकदा मेटाबॉलिक सिंड्रोम हा शब्द ऐकला असेल किंवा वाचला असेल. बहुतेक लोकांमध्ये मधुमेह एकटा दुकटा येत नाही, सोबत रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्टेरॉल यांसारखे अनेक सोबती घेऊन येतो. शरीराच्या रासायनिक जडणघडणीमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारची उलथापालथ झाल्याने असं होत असतं. अर्थात सगळ्याच्या मुळाशी इन्सुलिनला शरीराच्या पेशींकडून होणारा अवरोध असतो. याला वैद्यकीय भाषेत ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ असं म्हणतात. या प्रकारात शरीरात इन्सुलिन भरपूर बनतं, पण त्याची काम करण्याची क्षमता मात्र खूप कमी असते. इन्सुलिन हा वाढीचा हॉर्मोन आहे. त्याचं प्रमाण वाढलं म्हणजे माणसाचं वजन वाढतं, परंतु इन्सुलिन रक्तातलं ग्लुकोज नीट राखण्याचं स्वत:चं मूळ काम व्यवस्थितपणे करत नाही. त्याने मधुमेह होतो. रक्तातल्या ग्लुकोजसोबत रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलही वाढते. अशा वेळी अनेकांच्या यकृतामध्ये चरबीचं प्रमाण वाढलेलं दिसतं. ‘नॉनअल्कोहोलिक फटी लिव्हर डिसीज’ असं लांबलचक नाव असलेल्या या विकारामुळे यकृतात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मेटाबॉलिक सिंड्रोममुळं काही तरुणींमध्ये मासिक पाळी मागे-पुढे होते. त्यांच्या बीजकोशात छोटय़ा गाठी तयार होतात. ‘पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ हे त्याचं वैद्यकीय नाव. कधी कधी या तरुणींना गर्भधारणा होण्यात अडचण येते.  
हल्ली या मांदियाळीत भर घालण्याची स्पर्धाच लागली आहे. युरिक अ‍ॅसिड वाढतं, ‘ड’ जीवनसत्त्व कमी असतं वगरे वगरे गोष्टी आताशा मेटाबॉलिक सिंड्रोमशी जोडल्या जाऊ लागल्या आहेत. त्या एकमेकांशी खरंच जोडलेल्या आहेत का, हे अजून सिद्ध व्हायचं आहे.
लक्षणे काय?
मुळात आवश्यकतेपेक्षा वजन जास्त असणं हेच सगळ्यात महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. कारण मेटाबॉलिक सिंड्रोमच्या सर्व प्रश्नांमध्ये समान सूत्र आहे ते स्थूलपणामुळे आलेल्या समस्यांचं. जेव्हा यात इन्सुलिन अधिक प्रमाणात बनायला लागतं त्या वेळी मानेच्या आसपास, काखेमध्ये किंवा जांघेमध्ये काळपट रंगाचे चट्टे उठतात. वैद्यकीय भाषेत याला एकांथोसीस नायग्रीकांस असे म्हणतात. शिवाय इन्सुलिन जास्त असल्यामुळं त्वचेला बारीकसे टॅग येतात, त्वचेचा थोडासा भाग लोंबल्यासारखा दिसतो. रित्यापोटी १०० पेक्षा अधिक ग्लुकोज, १५० हून वाढलेलं ट्रायग्लिसराइड, पोटाचा घेर पुरुषांमध्ये ९० आणि स्त्रियांमध्ये ८० सेमीपेक्षा जास्त, रक्तदाब १३०/८५च्या वर आणि एच.डी.एल. कोलेस्टेरॉल  पुरुषांमध्ये ४० आणि स्त्रियांमध्ये ५० पेक्षा कमी अशा पाच लक्षणांपकी कुठलीही तीन दिसली तर मेटाबॉलिक सिंड्रोमचे निदान होते.
आपल्या आयुष्याशी संबंध काय?
खूप मोठा संबंध आहे. कारण हे सगळे वेगवेगळे आजार वाटत असले तरी त्यांचा शेवट एकच असतो. हृदयरोग होण्यात हे सगळे हातभार लावतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा मधुमेह हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा भाग असेल तेव्हा नुसत्या रक्तातल्या ग्लुकोजकडे लक्ष पुरवून चालत नाही. या इतर विकारांनाही नियंत्रणात ठेवावं लागतं. कित्येकदा रुग्णांना वाटत असतं की डॉक्टर उगीचच एवढी औषधं लिहून देताहेत. पण त्यामागे त्यांचा हेतू तुमच्या हृदयाचे आयुष्य वाढवावे हाच असतो.
उपाययोजना काय?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढू न देणं. फलाहार, ताज्या भाज्या, कोिशबिरी यांचा समावेश आहारात असणं आवश्यक आहे. नियमित व्यायामही हवाच. अर्थात ही सवय लहानपणापासून म्हणजे बाल्यावस्थेतच लावणं गरजेचं आहे. शरीरात एकदा रासायनिक गोंधळ सुरू झाला, की मग जागं होण्यात फारसा अर्थ उरत नाही. मुलांच्या आयुष्यात पुढे मागे तब्येतीची कुरकुर नको असेल तर त्यांना आताच ‘कुरकुरे’पासून दूर ठेवलं पाहिजे. टीव्ही, मोबाइल गेम्सपासून लांब ठेवलं पाहिजे एवढं नक्की.
ताणतणाव हेदेखील मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे नियमितपणानं मन प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आíथकदृष्टय़ा कमकुवत वर्गामध्ये ही समस्या आजकाल मोठय़ा प्रमाणात दिसायला लागली आहे. त्यांचा नीट अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या, तरच हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
 डॉ. सतीश नाईक – dr.satishnaik.mumbai@gmail.com