भारतीय उपखंडात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून उत्तरेपर्यंत कुठेही जा- हा भाग आहाराच्या बाबतीत इतका संपन्न आहे की, आपण मॅगीच काय, तर या प्रकारच्या कुठल्याही ‘पॅक फूड’च्या नादी लागण्याचे खरे तर काहीच कारण नाही. पण पॅक फूडने नादावले जायला होते हे खरे.. मोठी नादावतात, त्यात लहानांची काय बिशाद. कारण मुलांसोबत मोठय़ांनीही त्याच्या ‘आहारी’ जावे, अशीच त्यांची ‘बनावट’ असते. यासाठी मुद्दाम काही घटकांचे प्रमाण वाढवले जाते. ते एखाद्या नशिल्या पदार्थासारखे असतात असेही म्हटले तरी वावगे होणार नाही. म्हणजे एकदा का त्याची चटक लागली ती सोडता येत नाही. म्हणूनच एरवी रोजच्या न्याहरीत किंवा जेवणात भारतीय पदार्थाचाच समावेश असावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
‘पॅक फूड कुठल्याही प्रकारचे असो. त्यात मीठ आणि साखर हे नादावणारे अतिप्रमाणात वापरलेले असतात. हे पदार्थ टिकावेत यासाठी त्यावर खूप प्रक्रिया केलेली असते. त्यासाठी मीठ किंवा साखर आवश्यक असते. पण साखर आणि सोडियम यांचे आहारात प्रमाण खूप जास्त झाले की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. कारण या दोन गोष्टी पचण्यासाठी आपल्या शरीरातील कॅल्शियम, आयर्न, बी कॉम्प्लेक्स यांचा शरीरातला साठा वापरतात. त्यातून हे पदार्थ रोजच्या रोज आहारात असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियम, आयर्न, बी कॉम्प्लेक्स या घटकांची उणीव भासू शकते,’ अशा शब्दांत आहारतज्ज्ञ मानसी गोगटे यांनी बाजारात ‘रेडी टू इट’ प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या अतिवापरामुळे होणारे धोके लक्षात आणून दिले.
‘लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर वयाच्या दुसऱ्या वर्षांनंतर मुलांची पचनशक्ती विकसित व्हायला तयार होते. त्यामुळे त्याआधी या प्रकारचे अन्नपदार्थ मुलांना देणे धोक्याचे आहे,’ असे बालरोगज्ज्ञ डॉ. मंदार पवार यांनी सांगितले. दोन वर्षांपुढील मुलांसाठी हे पदार्थ हानीकारक कसे ठरू शकतात हे सांगताना ते म्हणाले की, ‘एरवी मीठ, साखर आणि खाद्यरंग आपण स्वयंपाकात वापरतो. परंतु त्याचे प्रमाण चवीपुरते असते. पण पॅक्ड फूडमध्ये हे घटक विनाकारण जास्त प्रमाणात वापरले जातात. याशिवाय ते रुचकर करण्यासाठी ‘अ‍ॅडेटिव्ह’ टाकले जातात. ते आकर्षक दिसावे यासाठी रंगांचा वापर केला जातो. या सगळ्याचा एकत्रित आणि अतिवापर लहान मुलांना हानी पोहोचवू शकतो.’
‘पॅक्ड फूडमध्ये ग्लुकोज (सर्वसाधारण वापरातील), गॅलॅक्टोज (ही अनेकदा पॅक फूडमध्ये वापरतात) आणि फ्रुक्टोस (फळांमध्ये असलेली) यापैकी कुठली साखर वापरली जाते ते महत्त्वाचे आहे. कारण यापैकी गॅलॅक्टोज काही मुलांसाठी अ‍ॅलर्जिक असू शकते. सॉसमध्ये तर मीठ खूप जास्त असते. त्याची चव मुलांना आवडणारी असली तरी त्यामुळे चरबी वाढणे, किडनीचे विकार अशा आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे मॅगीऐवजी शेवयांचे वेगवेगळे प्रकार आणि टोमॅटो केचपऐवजी मोरंबा, साकरंबा किंवा घरी बनविलेला सॉस लहान मुलांना द्यावे,’ असा सल्ला त्यांनी दिला.
केवळ चवीच्या बाबतीतच नव्हे तर पोषक मूल्यांच्या बाबतीतही भारतीय खाद्यपदार्थ खूप संपन्न आहेत. किंबहुना भारताच्या कुठल्याही प्रांतांत गेलो तरी खाद्यपदार्थाचा संपन्न वारसा आपल्याला लाभल्याचे दिसून येते, असे मानसी गोगटे सांगतात. ‘आपल्याकडे बनणाऱ्या थालीपिठाच्या भाजणीत अनेक प्रकारच्या डाळी, कडधान्यांचा वापर असतो. साधा ठेपला घेतला तरी त्यात गहू-चण्याच्या डाळीच्या पिठाचे मिश्रण, भाज्या वापरून तो अधिक पोषक करता येतो. तोच प्रकार ढोकळ्याचा. रोजचा उपमा, पोहे तर आहेतच, पण न्याहरीत दूध-पोहे, दूध-लाह्य़ा, नाचणीचे सत्त्व असे कितीतरी पर्याय आपल्यासमोर असतात. इडलीदेखील अनेक भाज्या घालून करता येते. सांबारात तर भाज्या असतातच. उत्तरेतील लोकांमध्ये न्याहरीचा महत्त्वाचा भाग असलेल्या पराठय़ात तर अनेक भाज्यांचा समावेश करता येतो. पदार्थाच्या बाबतीत आपण इतके संपन्न असतानाही आपण फास्ट किंवा पॅक्ड फूडच्या आहारी जात असू तर तो आपला करंटेपणा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भारतीय पदार्थाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय नाश्त्याला जगात कुठलाही पर्याय असू शकत नाही, असेही त्यांनी आग्रहाने नमूद केले.
यातूनही कधी पॅक्ड किंवा फास्ट फूड खाण्याची वेळ आलीच तर त्यासोबत एखादे फळ किंवा ग्लासभर दूध पिऊन आपली झालेली हानी भरून काढता येईल, असा मध्यममार्ग त्यांनी सुचविला. अर्थात उपम्यासारखे काही पदार्थ आपल्याला ‘रेडी टू इट’ याप्रमाणे आधीच तयार करता येऊ शकतात. त्यामुळे बाहेरच्या पदार्थाऐवजी याच प्रकारचे पर्याय निवडा, असा सल्ला त्यांनी दिला. थोडक्यात, ‘पॅक्ड फूड’ची जागा कपाटात ज्याप्रमाणे ठेवणीच्या कपडय़ांची असते तशीच स्वयंपाकघरात असावी. अन्यथा हे पदार्थ आपल्यासाठी ‘रेडी टू किल’च ठरण्याची शक्यता जास्त!
 रेश्मा शिवडेकर

Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…