पहिल्या पावसात मनमुराद खेळणाऱ्या लहान मुलांना त्यानंतर दोनच दिवसांत उलटय़ा, जुलाब अशा तक्रारी सुरू होतात. अनेकदा हा विषाणूजन्य ताप असतो. मात्र वेळीच लक्ष दिले नाही, तर मुलांच्या आजारात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यातील आजार लहान-मोठय़ांमध्ये साधारण सारखेच असले तरी लहान मुलांची समज पाहता मोठय़ांनी त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरवून आजारांचा प्रभाव कमी करणे अपेक्षित असते.
दूषित अन्न व पाण्यामुळे होणारे आजार
अतिसार (गॅस्ट्रोएन्ट्रायटिस) हा अन्न किंवा पाण्याच्या मार्गाने होणारा सर्वात महत्त्वाचा आजार. ताप, उलटय़ा व जुलाब ही त्याची मुख्य लक्षणे. लहान मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळेच डिहायड्रेशन किंवा पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका त्यांना जास्त असतो. ८० टक्के अतिसार हा विषाणूमुळे (उदा. रोटाव्हायरस) होतो. इतर कारणे म्हणजे बॅक्टेरिया (उदा. डॉसेंट्री, कॉलरी) आणि प्रोटोझुआ (अजिनियासिस, जियाडियान्सिस). विषाणूंमुळे होणारा आजार हा स्वनियंत्रित असतो व जलसंजीवनी (ओआरएस) हा त्यावरील सर्वात चांगला उपाय. मात्र सतत उलटय़ा, लघवीचे कमी प्रमाण, शौचाला रक्तस्राव अशा प्रकारे आजाराने गंभीर वळण घेतले तर मात्र डॉक्टरांकडे जावे.
विषमज्वर (टायफॉइड) दूषित अन्नातून साल्मोनेला या विषाणूमुळे होतो. आजाराच्या सुरुवातीला लक्षणे संदिग्ध स्वरूपाची असतात. मात्र तीव्र स्वरूपाचा ताप पाच ते सात दिवस सुरू राहिला तर रक्तचाचणीद्वारे याचे निदान केले जाते. योग्य उपचारांनंतरही प्रकृती सुधारायला वेळ लागतो. महिनाभर खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागते.
साथीची कावीळ (व्हायरस हिपॅटायटिस) ही ‘ए’ किंवा ‘बी’ अशा दोन वेगळ्या विषाणूंमुळे होऊ शकते. पोटदुखी, जुलाब, अन्नावरची वासना उडणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे. गडद पिवळी लघवी व डोळे पिवळे होणे ही लक्षणे आठवडय़ाभरानंतर दिसू लागतात. हा आजारही विषाणूंमुळे होत असल्याने स्वनियंत्रित असतो. पथ्य आणि आराम महत्त्वाचा असतो. लहान मुलांमध्ये क्वचितच गुंतागुंत निर्माण होते. सतत उलटय़ा, शौच किंवा उलटीद्वारे रक्तस्राव तसेच सुस्ती येण्यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुलांना पावसात जरूर पाठवावे. मात्र रस्त्यावरील उघडय़ावरचे खाद्यपदार्थ टाळावेत, तसेच न शिजवलेले पदार्थ टाळावेत. सर्वानी बाहेरून आल्यावर, मलविसर्जनानंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत. तसेच जेवणाच्या आधी, मुलांना भरवतानाही हात स्वच्छ धुवावेत. वॉटर प्युरिफायरचे पाणी वापरावे की उकळलेले, असा प्रश्न विचारला जातो. यापैकी कोणतेही पाणी चालेल. मात्र घरात वॉटर प्युरिफायर व बाहेर जाऊन पाणीपुरी असा प्रकार असेल तर न बोललेलेच बरे!
मलेरिया, डेंग्यू – मलेरियामध्ये दर एक दिवसाआड थंडी भरून ताप येतो. परंतु लहान मुलांमध्ये उलटय़ा, जुलाब, रोज एकदा किंवा दोनदा ताप येणे अशा लक्षणांमुळे निदानात संदिग्धता निर्माण होते.
डेंग्यूचा विषाणू एडिस नावाच्या डासामार्फत होतो. तीव्र ताप, हात-पाय मोडून येणे व अंगावर विशिष्ट प्रकारचे पुरळ येणे ही या आजाराची लक्षणे. विषाणूंमुळे होत असल्याने हा आजारही स्वनियंत्रित असतो, मात्र अनेकदा गुंतागुंत होण्याची शक्यता ताप उतरताना असते, म्हणून डॉक्टरमंडळी एकापेक्षा अधिक वेळा रक्तचाचणीचा सल्ला देतात. या दोन्ही आजारांवर प्रतिबंधक लस नाही. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची वाढ होत असल्याने पाणी साठू न देणे हा सर्वात चांगला उपाय. याशिवाय कीटकनाशक औषधांची फवारणी व वैयक्तिक सुरक्षेसाठी मॉस्किटो रिपेलन्ट क्रीम, मच्छरदाणी असे उपाय करावेत. मुलांना पूर्ण बाह्य़ांचे कपडे घालावेत.
लेप्टोस्पायरोसिस हा आजार स्पायरोकेंट या जीवाणूमुळे होतो. उंदराच्या मूत्रविसर्जनातून हा जीवाणू गढूळ पाण्यात शिरतो. या पाण्यातून चालताना पायाला झालेल्या जखमा व छोटय़ा चिरांमधून जंतुसंसर्ग होतो. ताप येणे, डोळे लाल होणे, यकृतदाह, कावीळ व मूत्रपिंडाच्या कामात बाधा येणे ही त्याची लक्षणे. प्रत्येक वेळी मुलांना घराबाहेर पाठवताना गमबूट घालणे शक्य नाही. त्यामुळे गढूळ पाण्यात मुलांना खेळू न देणे, तसेच घरी आल्यावर पाय स्वच्छ धुणे आणि पायांवरील छोटय़ा-मोठय़ा जखमांवर त्वरित औषधोपचार करणे हा लेप्टोच्या प्रतिबंधाचा सोपा उपाय आहे.

हवामान बदलांमुळे होणारे आजार
ऊन-पावसाचा खेळ व त्यामुळे होत असलेला तापमानातील बदल यामुळे विषाणूंची संख्या वाढते. या विषाणूंमुळे अनेकदा गुंतागुंतीचे आजार होतात. असाच एक आजार म्हणजे एन्फ्लुएन्झा. स्वाइन फ्लू हा त्यातीलच एक प्रकार. ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला ही लक्षणे सर्व विषाणूजन्य तापांमध्ये दिसतात. भरपूर पाणी, योग्य आहार व आराम यासोबत तापाच्या साध्या गोळीने हा आजार बरा होतो. या आजाराचा संसर्ग थुंकीतून, श्वासोच्छ्वासातून पसरतो. त्याला आळा घालण्यासाठी शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा, हात स्वच्छ धुवावेत, आजारी मुलांना शाळेत पाठवू नये, गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. औषधांनी ताप उतरल्यावर मूल हसत-खेळत असेल तर काळजी करू नये. ताप लवकर जावा, यासाठी डॉक्टरांवर दडपण आणू नये, गरज नसताना प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायोटिक्स) दिली तर उपयोग तर होत नाहीच शिवाय दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. तापाचे प्रमाण खाली येत नसल्यास मात्र तपासणी करावी.
श्वसनसंस्थेचे विकार – लहान मुलांमध्ये ब्रॉन्कॉयटिस हा आजार पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. तापासोबत श्वासोच्छ्वास वेगात होत असेल तर डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा.
आजारपणांबाबत जागरूकता दाखवली तर आजाराचा प्रभाव कमी करता येईल आणि सर्वानाच पावसाळा ऋतूही निरोगी व आनंददायी जाईल.
– डॉ. गौतम सप्रे –
नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव