‘‘आज शिरा काकांनी केला आहे बरं का, वाणी. ‘स्वयंपाक शिकणे’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आता तर ‘तू ताईच्या बाळंतपणासाठी निर्धास्तपणे लंडनला जा, मी आईला इथे व्यवस्थित सांभाळीन,’ असेही सांगत आहेत.’’ पूर्वी एका मोठय़ा कंपनीच्या मोठय़ा पदावर खूप यश मिळवले, आता निवृत्तीनंतरही आनंदी दिसत आहेत.  ‘‘मला स्वयंपाक आवडतो, आणि मावशीलासुद्धा थोडा आराम मिळेल, म्हणून मी हे शिकायचा ठरवलंय, काय म्हणतेस- चांगला उपक्रम आहे ना? जशी ही गृहिणी, तसाच मी ‘गृहकर’ झालोय’’ काका म्हणाले.
पुरुषांसाठी आपले  काम, नोकरी आणि त्यातील  यश-समाधान खूप महत्त्वाचे  असते. ते मिळाले नाही तर त्यांच्यात उदासीनतेची भावना येऊ शकते. आयुष्याची वष्रे वाढल्यामुळे निवृत्तीनंतरचा काळ वाढलेला आहे, त्यात काय करायचे हा प्रश्न बायकांपेक्षा पुरुषांना त्रासदायी वाटतो.
जमेल तेवढी वष्रे काम केल्याने आरोग्य आणि मन:स्थिती चांगली राहते. पण काय करायचे? हा प्रश्न असतो. आपल्या पूर्वीच्या कामासारखे पूर्ण किंवा अर्धवेळेचे काम मिळाले तर खूप छान. पण असे जमले नाही तर? अशा वेळेस घरातली कामे किंवा एखादी नवीन कला-कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने वेळ चांगला जातो, घरच्यांना मदत होते आणि याशिवाय मेंदूचे आरोग्य खूप चांगले राहते. संशोधनातून कळले आहे की घरातील कामे ज्यांना आपण ‘साधी’ समजतो, ती सातत्याने केल्याने मेंदूला व्यायाम मिळतो आणि मेंदू निरोगी ठेवू शकतो. ‘पुरुषांनी आमची कामे करू नयेत’ असे विचार करण्याऐवजी ‘काहीतरी नवीन शिकायला मिळतंय’ ही प्रवृत्ती ठेवणे जास्त योग्य. या वेळेस घरातील स्त्रियांनीसुद्धा स्वयंपाकघरातील सत्ता पुरुषांबरोबर वाटून घ्यायची तयारी दाखवली पाहिजे.
२० टक्के पुरुषांना पत्नीचे निधन झाल्यामुळे  एकटे जीवन अनुभवावे लागते. हे पुरुषांसाठी खूप त्रासदायी असते. अशा पुरुषांमध्ये सर्व प्रकारचे आजार जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहेत. नाती-गोती, मुले-भावंडे आणि शेजारी-स्नेही यांच्याशी स्त्रियांचे संपर्क जास्त असतात. पुरुषांनीही आपली ओळख केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता इतर लोकांशी ओळखी वाढवण्याचे प्रयत्न करावे. बहुतेक पुरुषांना घरातील सर्व गोष्टी करण्याची सवय नसते. या सर्व कारणांमुळे त्यांना त्रास होतो. आपली कामे आपण करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा.
कुठल्याही वयात अंमली पदार्थाचा वापर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो, जो वृद्धपणी चालू राहतो. काही लोक निवृत्तीनंतर कंटाळा कमी करण्यासाठी, झोप लागण्यासाठी किंवा आजार कमी करण्यासाठी दारू किंवा तंबाखूचा वापर नव्याने सुरू करतात. या पदार्थाचा वापर लवकरात लवकर बंद केला पाहिजे, त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्याला हरकत नाही. अंमली पदार्थाच्या सेवनाचे या वयात फायदे कमी आणि तोटे जास्त असतात. अतिरिक्त सेवनाने मानसिक व शारीरिक आजार होतात.
हृदयविकार, कर्करोग, पाíकन्सन आणि मेंदूविकार हे आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतात. या सर्व आजारांमुळे मेंदूवर विपरीत परिणाम होऊन मानसिक आजार होऊ शकतो. नैराश्यामध्ये स्त्रियांच्या तुलनेने पुरुषांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती जास्त आढळून येते. मानसिक अस्वास्थ्यतेसाठी मदत घेण्याची प्रवृत्ती पुरुषांमध्ये कमी असल्याने, त्यांचे आजार खूप उशिरानेच कळून येतात. म्हणूनच पुरुषांचीदेखील मानसिक त्रासासाठी लवकरात लवकर तपासणी करून घेतली पाहिजे.
जसे माझ्या काकांनी स्वयंपाक शिकून, घर सांभाळून ‘गृहकर’ ही नवीन भूमिका स्वत:साठी शोधून काढली, तसेच आपली मानसिकता सकारात्मक ठेवून, नवीन काही करून आपले आरोग्य आणि मन सांभाळावे. काहीही पहिल्यांदा करून बघण्याची वेळ कधीच गेलेली नसते.