पावसाळा आपल्याबरोबर काही ठरावीक आजार घेऊन येत असतो. घराबाहेर पडायचं म्हटल्यावर थोडं का होईना, पण भिजायला होतंच. मग ओलसर दमट कपडे तसेच अंगावर वाळवले जातात. पायातल्या चपला आणि बूट-मोजेही दमट राहतात. कित्येकदा रस्त्याकडेला साचलेल्या घाण पाण्यामधून चालण्यासही पर्याय नसतो. या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्या त्वचेला होत असतो. या ऋतूत शरीरात पित्ताचा प्रकोप होत असतो. या पित्तामुळेही त्वचा आजारी पडते. पावसाळ्यातले त्वचेचे आजार आणि त्यावरचे उपाय यासंबंधी जाणून घेऊया-
पावसाळ्यातले त्वचेचे आजार
 बुरशीचा संसर्ग
सततच्या दमट आणि कोंदटलेल्या हवेमुळे त्वचेवर बुरशी चटकन वाढते. शरीराच्या सतत ओलसर राहू शकणाऱ्या अवयवांवर म्हणजे कोपरांच्या आतील बाजू, गुडघ्याच्या मागील भाग, काखा, जांघा या ठिकाणी बुरशीचा संसर्ग होतो आणि लालसर चट्टे उठतात. या चट्टय़ांवर प्रचंड खाज येते, आगही होते.
 नखांना होणारा बुरशीचा संसर्ग
नखांनाही बुरशी आणि जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. असा संसर्ग झाल्यास नखे पातळ होतात, तुटतात, नखांचा रंग, आकार बदलतो. काही वेळा नखांमध्ये वेदनाही होतात.
 अ‍ॅथलीट फूट
पायांच्या बोटांमध्ये किंवा तळपायावरही दमट-ओलसरपणामुळे होणाऱ्या संसर्गाला ‘अ‍ॅथलीट फूट’ असे म्हणतात. या संसर्गामुळे कातडी फाटल्यासारखी होते, त्यावर फोड येतात, पायाला दरुगधीही येते.
इसब
हात, मान, चेहरा, कोपर, पोट या ठिकाणच्या त्वचेला होणारा हा रोग आहे. यात त्वचा खवले पडल्यासारखी होते. त्यातून पाणीसदृश लस किंवा रक्तही येते. त्वचेला खूप खाज सुटते. आधीपासूनच त्वचेला हा रोग झाला असेल तर तो पावसाळ्यात आणखी चिघळतो.
खरूज
बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणीही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यात त्वचेवर पाण्याचे फोड येतात, त्वचेची आग होते, खाजही येते.
घामोळे
उन्हाळ्यात जसे उष्णतेने अंगावर पुरळ उठते तसेच पुरळ पावसाळ्यातही उठते. त्वचेवर बारीक-बारीक लाल रंगाच्या पुळ्या येतात, त्याला खाज सुटते. पावसाळ्यातली कोंदट हवा, ओलावा आणि घामामुळे हा त्रास होतो.
केसातला कोंडा
केस वारंवार पावसात भिजून ओलसर राहिल्यामुळे डोक्यावरच्या त्वचेला बुरशीचा संसर्ग होतो. त्यामुळे केसांत कोंडा होतो आणि डोक्याला खाज येते.
जीवाणू संसर्ग
त्वचा घाण पाण्याच्या संपर्कात आल्यावर पाण्यातील जंतूंचा संसर्ग त्वचेला होतो. त्यामुळे त्वचेवर फोड किंवा गळू होऊ शकतात.

पावसाळ्यातील त्वचारोगांवर  घरगुती उपाय
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून, वाटून त्याची पेस्ट करावी. याचा उपयोग त्वचेवर मलमाप्रमाणे लावण्यासाठी करता येईल.
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट करून ती त्वचेवर मलमासारखी लावता येईल.
गुलाबपाण्यात थोडीशी चंदनाची पावडर घालून त्याचे मलम घामोळ्यांवर लावण्याकरिता वापरावे.
दही आणि मसूर डाळीचे पीठ एकत्र करून केसांना अर्धा तास लावून ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे.
आवळा पावडर, लिंबाचा रस आणि मुलतानी माती असा पॅक तयार करून केसांना अर्धा तास लावून ठेवावा आणि नंतर धुवावा.
टबमध्ये पाणी घेऊन त्यात पाव कप व्हिनेगर घालावे आणि त्यात पाय बुडवून ठेवावेत.
अधिक त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
त्वचेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
 ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आहार पुरेशा प्रमाणात घ्यावा. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, पालेभाज्या, टोमॅटो, मुळा यातून हे जीवनसत्त्व मिळते. मात्र शिजवल्यामुळे ते कमी होत असल्यामुळे या भाज्या आणि फळे न शिजवता खाल्ली तर उत्तम.
 ‘जस्त’ (झिंक) असलेला आहार घ्यावा. शेंगदाणे, तीळ, लाल भोपळा, पालक, जवस, मिरची, मशरूम, अंडी, बदाम यातून जस्त सहजपणे मिळते.
त्वचेला हितकर असणारे ‘ई’ जीवनसत्त्वही पुरेशा प्रमाणात आहारात असायला हवे. सूर्यफुलाचे तेल, बदाम, पिस्ता, जर्दाळू, टोमॅटो अशा पदार्थामध्ये हे जीवनसत्त्व मिळते.
पावसाळ्यात तहान कमी लागत असली तरी पुरेसे पाणी प्यावे.अशी घ्या त्वचेची काळजी
खूप मसालेदार, पित्तकर आहार टाळावा.
त्वचा कोरडी राहील याची काळजी घ्यावी. बुटांऐवजी शक्यतो चप्पल किंवा सँडल वापरावेत.
त्वचा नेहमी स्वच्छ ठेवावी. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात-पाय धुवून कोरडे करावेत.
कडुनिंब घालून पाणी उकळावे आणि ते कोमट झाल्यावर त्याने हात-पाय धुवावेत.
पोट साफ राहण्यासाठी अंजीर किंवा काळ्या मनुकांसारखे नैसर्गिक औषध अवश्य घ्यावे.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा