सर्व सोयी सरकार-पालिका करून देतील, असे म्हणून चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांनी आणि कुटुंबीयांनी पर्याय शोधले पाहिजेत. सर्वानी मिळून विचार केला आणि थोडेसे नियोजन केले तर यासाठी जास्त वेळ किंवा पसा लागत नाही, पण वृद्धांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
झोपेची तक्रार घेऊन माझ्याकडे आलेल्या ६८ वर्षांच्या श्रीयुत अरुण यांना तपासल्यावर झोप न येण्यासारखे कोणतेही आजार आढळले नाहीत. झोपण्याची वेळ अयोग्य असणे आणि व्यायाम-विरंगुळा नसणे, यामुळे त्यांना चांगली झोप लागत नव्हती. त्यांना मी समतोल जीवनशैलीबाबत (बॅलन्स लाइफस्टाइल) सांगितले. वयानुसार आहार, व्यायाम, विरंगुळा आणि आराम असलेला दिनक्रम तयार करून दिला. पण अरुण म्हणाले, ‘‘मी घरातून बाहेर पडायला गेलो तर मोडके फुटपाथ आणि वाहनांची गर्दी यामुळे गेटवरच थांबतो.’’ अशी आव्हाने रोजच आपल्या ज्येष्ठांच्या समोर येतात, मग त्यांनी आरोग्यवर्धक जीवनशैली कशी निर्माण करावी?

कुणाची जबाबदारी आहे?
सर्व सोयी सरकार-पालिका करून देतील असे म्हणून चालणार नाही. शेजारी- समाज यांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. आहे त्या स्थितीत, कमीत कमी खर्चात आणि इतरांची अडचण न करता काहीतरी रचनात्मक (क्रिएटिव्ह) मार्ग काढणे जरुरीचे आहे.

काही उदाहरणे
पुण्याच्या मंजिरी गोखले यांचा मायाकेअर डॉट कॉम (mayacare.com) उपक्रम हे एक उदाहरण आहे. या उपक्रमामार्फत युवक-युवती कार्यकर्ते बनून ज्येष्ठांना विनामूल्य मदत करतात. पाश्चिमात्य देशांमध्ये खास ज्येष्ठांसाठीच घरपोच नाश्ता- जेवणाचा डबा पुरवणाऱ्या संस्था आहेत. आपल्याकडे तयार डबे देणाऱ्या व्यक्तींनी ज्येष्ठांसाठी योग्य आहार कसा बनवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ज्येष्ठांसाठी वाचन करणे, गाणे म्हणणे आणि त्यांना वेळ देण्याची पद्धत पाश्चिमात्य राष्ट्रांत आहे; ती आपण शिकण्यासारखी आहे.

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट- तेव्हा इंटरनेट नव्हते आणि लोकांकडे फारसा पसाही नव्हता. आमच्या ओळखीच्या एका गृहस्थाने एक खूप छान उपक्रम केला. त्यांच्या इमारतीमधील सर्व वृद्धांचा गट केला- साधारण एकाच वयोगटातले होते. शाळकरी मुलांना वार वाटून दिले- वर्तमानपत्र वाचून कॅसेटमध्ये रेकॉर्ड करायचे व ते या गटाला द्यायचे. मुलांचे वाचन होत असे आणि ज्येष्ठांची सोयही. तसेच प्रत्येक आठवडय़ाला एका कुटुंबाने त्यांना कुठे फिरायला न्यायचे किंवा घरीच व्हिडीओवर त्यांच्या आवडीचा चित्रपट दाखवायचा. असे केल्याने ज्येष्ठांचा एकटेपणा आणि कंटाळा कमी झाला तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा किंवा कुटुंबीयांना वेळ नसल्याची समस्याही सोडवता आली.

घरी काय करू शकाल?
बहुतेक वृद्ध बराच वेळ टीव्ही पाहण्यात घालवतात. जसे मुलांना सांगतो तसेच- टीव्ही वाईट नाही, पण त्यात तुम्ही काय पाहताय ते महत्त्वाचे. साधारण सकाळच्या वेळी व्यायामाचे कार्यक्रम असतात, ते पाहून व्यायाम करता येईल. पण जर आपल्याला गुडघेदुखीसारखे आजार असतील तर तयार कार्यक्रम बघण्यापेक्षा, बाजारातून विशिष्ठ व्यायामाची सीडी आणून व्यायाम करता येईल. व्यायाम शिक्षकांनी खास ज्येष्ठांसाठी अशा सीडी करून देण्याची सोय केली तर अधिक चांगले. तसेच काही वृद्ध इंटरनेट वर स्काइप (skype) मधून शिकवण्या घेतात आणि घरी बसल्या-बसल्याच काहीतरी नवीन शिकून घेतात. घरातून बाहेर पडता आले नाही तर हे पर्याय योग्य आहेत.
घरात किंवा आजूबाजूलाच काही मार्ग काढला तर त्यात खूप फायदे आहेत. ज्येष्ठांनी घरापासून लांब जायला नको, खर्च कमी होईल, आणि ते सुरक्षित राहतील. ज्येष्ठांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन आपल्या आजी- आजोबांसाठी मित्र-मत्रिणी शोधले पाहिजे. कुणी नवीन ज्येष्ठ शेजार राहायला आले असतील तर त्यांना चहासाठी बोलावून त्यांची मुद्दामहून ओळख करून घेतली पाहिजे. सर्वानी मिळून विचार केला आणि थोडेसे नियोजन केले तर यासाठी जास्त वेळ किंवा पसा लागत नाही, पण वृद्धांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

विज्ञानाची मदत घ्या
नवीन तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी कुठे तरी कमी पडते असे मला वाटते. ज्येष्ठांना सहजपणे वापरता येतील असे ठळक आकाराचे आणि मोठय़ा बटणांचे मोबाइल हॅण्डसेट बाजारात मिळत नाहीत. जवळपास आपल्यासारखे मत्री करण्यासाठी आणखीन कोण ज्येष्ठ आहेत हे कळण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्सची गरज आहे. रोज सकाळी वर्तमानपत्र जसे येते तसेच बातमी ऐकायला मिळत असेल तर किती छान? बातम्याच काय, तर प्रत्येक मासिकाचे ऑडियो रूप मागवता आले तर वृद्धांसाठी खूप चांगली सोय होईल. विचार केल्यास असे अनेक पर्याय आपल्याला सुचू शकतात.
ज्येष्ठांना कंटाळा येऊ नये, एकटेपणा वाटू नये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक व्यक्तीची आवड- निवड आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांनी आणि कुटुंबीयांनी पर्याय शोधले पाहिजेत. यात जास्त खर्च होत नसल्याने आणि टेलर मेड असल्याने हे पर्याय ज्येष्ठांना जास्त आवडतील.