आमचा प्युरिफायर इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त शुद्ध पाणी देतो, चिखलातील पाणीही शुद्ध करून दाखवतो, पाणी शुद्ध झाले नाही तर पसे परत.. अशा एकापेक्षा एक वरचढ हमी देत जलशुद्धीकरण यंत्र विकणाऱ्या कंपन्या टीव्ही आणि वृतपत्रातून ग्राहकांपर्यंत पोहोचत असतात. वर्षभरच सुरू असलेल्या या जाहिरातींचे प्रमाण पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिकच वाढते आणि याचे कारण म्हणजे पावसासोबत येत असलेली पोटदुखी..
दीड हजारापासून पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या किमतींना मिळणारी ही यंत्रे आणल्यावर दूषित पाण्याच्या सर्व समस्या सुटतील, अशी अपेक्षा वाटते आणि मग ती घरीही आणली जातात. मात्र तरीही पावसासोबत पोटदुखी येतेच. घरी आणि कार्यालयात शुद्ध, निर्मळ पाण्याचे घोट घेऊनही पोटदुखी का होते, याची शंका येत असेल तर जरा विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसात एक-दोन दिवसांसाठी होणारी पोटदुखी ही पाण्यातून होत नाही तर ती होते हवेत वाढलेल्या विषाणूंमुळे. पावसाच्या दमट, उष्ण वातावरणात ‘रोटाव्हायरस’ची संख्या वारेमाप वाढते, हे तर उघडच आहे. या विषाणूंना शरीरात शिरकाव मिळाला आणि त्या वेळी तुमची प्रतिकारक्षमता कमी पडली की झालाच तुम्ही पोटदुखीने हैराण. उलटय़ा, जुलाब आणि एक-दोन दिवसांत यातून बरे झाला नाहीत तर मग तापही.
सध्या येणारे रुग्ण हे रोटाव्हायरसमुळे पोटदुखीने बेजार झालेले आहेत. विषाणूंमुळे होणारी पोटदुखी ही दोन चार दिवसांत स्वत:हून बरी होते. या काळात आहार आणि झोप यांची काळजी मात्र घ्यावी लागते. मात्र दूषित पाण्यातून होणारा अतिसार (डायरिया) जास्त त्रासदायक आणि घातक असतो, असे डॉ. अनिल तलाठी यांनी सांगितले. प्रतिकारक्षमता कमी असेल तर अतिसार होण्याची शक्यता वाढते. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस आजार असल्यास डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला हवेत.
घरात प्युरिफायर असूनही किंवा गाळून, उकळलेले पाणी हातात आणून दिले जात असले तरी अनेकांना वर्षांतून एकदा तरी डायरियाचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याला कारण आहे ते म्हणजे इतर सवयी. पिण्याचे पाणी जरी शुद्ध असले तरी घराबाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरी, भेळपुरीच्या गाडय़ा, डोशांचा वास खुणावतो. या पदार्थासोबतच्या चटण्या करण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, त्याचा अंदाज घेतला तरी तुम्हाला पोटदुखीच्या कारणांचा शोध लागू शकतो. रस्त्याकडेच्या गटारातून वाहत असलेले पाणी, आजूबाजूला होत असलेला चिखल, त्या चिखलावर बसून मग गाडय़ांवरील पदार्थावर बसणाऱ्या माशा, उघडे ठेवलेल पाणी.. हे सर्व वास्तव नजरेआड करू नका. दूषित पाण्याचा स्रोत हा सगळीकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पाऊस पडत असल्याने तहान कमी होत असली तरी पाऊस नसताना मात्र उकाडा वाढतो, घाम बाहेर पडत असल्याने अनेकदा रस्त्यांवरील सरबताच्या गाडय़ांकडे पावले वळतात. त्याचप्रमाणे पोषक आहारासाठी फळांचे रस पिणारेही अनेक आहेत. फळांचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी हे रस तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी किंवा बर्फाचे खडे यांतून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो. प्रत्येकाची प्रतिकारक्षमता वेगळी असते. काहींना याचा लगेच त्रास होतो, काहींना होत नाही. मात्र काळजी सर्वानीच घ्यायला हवी.
बुरशीयुक्त पदार्थ खाऊन अन्नविषाबाधा झालेल्या रुग्णांची संख्या पावसाळ्यात अधिक असते. रुग्ण उपचारांसाठी आल्यावर त्याची पोटदुखी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आहे, त्याचे निदान करून मगच उपाय केले जातात. अतिसार व अन्नविषबाधा जिवावर बेतू शकत असल्याने याबाबत काळजी घ्यायला हवी. स्वच्छता तसेच योग्य आहार घेतल्यास अनेकांचा पोटदुखीचा त्रास वाचेल, असे डॉ. तलाठी म्हणाले.
याचसोबत अन्नपदार्थामुळेही पोटदुखी होते. आधीच पावसाळ्यात अन्नपचनाची प्रक्रिया संथ झालेली असते, त्यामुळे अपचनाचे प्रकार वाढतात. दमट हवेत पदार्थावर चटकन बुरशी येते. त्यामुळे शिळे, उघडे राहिलेले पदार्थ टाळावेत. शाळेतील पाठय़पुस्तकात शिकवलेला धडा आठवावा आणि या पदार्थापासून दूर राहावे.
पोटदुखी का होते आणि त्याला कारणीभूत ठरणारे हे सर्व प्रकार आपल्याला माहिती आहेत, मात्र पोटदुखी बरी झाली की हे सर्व विसरले जाते आणि पुढच्या पोटदुखीला सामोरे जावे लागते. एक महिन्याहून अधिक लांबलेला पाऊस आल्यावर झालेला आनंद पोटदुखीने कमी होऊ देऊ नका. सकस आहार, स्वच्छता आणि पुरेसा आराम या त्रिसूत्रीचा वापर केला तर पोटदुखीच्या कळा कमी येतील..
क्षयरोग, हृदयविकार, मधुमेह अशा जीवघेण्या आजारांमुळे मुंबईत दरवर्षी हजारो जण मृत्युमुखी पडतात. ‘प्रजा फाउंडेशन’कडून मुांईतील संसर्गजन्य तसेच जीवनशैलीशी निगडित आजारांची दर वर्षी पाहणी केली जाते. या पाहणीत अतिसारासंबंधी समोर आलेले वास्तव धक्कादायक आहेत. इतर आजारांच्या रुग्णांची संख्या काही हजारात असताना अतिसाराची तक्रार घेऊन पालिका तसेच सरकारी दवाखाने, रुग्णालयांत आलेल्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. शहरातील सुमारे ६० टक्के नागरिक खासगी दवाखान्यात जात असल्याने ही संख्या दुपटीहून अधिक असू शकते. हा आजार जीवघेणा नाही. मात्र दोन ते तीन दिवस आराम करावा लागल्याने कामाचे तसेच अभ्यासाने दिवस वाया जातात. तसेच वारंवार आजार होत असल्यास प्रकृती गंभीर होऊ शकते.
का होते पोटदुखी?
हवा – दमट आणि उष्ण हवेत वाढलेली विषाणूंची संख्या.
पाणी – दूषित पाण्यावाटे शरीरात प्रवेश करणारे जिवाणू.
अन्न – दमट हवेत पदार्थाना चटकन बुरशी येते. हे अन्न खाल्ल्यावर विषबाधा होते.
उपाय
पाणी – गाळून, उकळलेले पाणी थंड झाल्यावर प्यावे. हे पाणी चार तासांपेक्षा अधिक काळ ठेवू नये.
पदार्थ – उघडय़ावरचे, शिळे पदार्थ टाळावेत. पावसाळ्यात दमट हवेमुळे सर्वच सुक्ष्म जंतूचे प्रमाण वाढलेले असते. माश्यांवाटेही हे जंतू सर्वत्र पसरतात. पदार्थाना बुरशी येते.
सकस आहार – पोळी, भाजी, भात, आमटी, कोिशबीर असा चौरस व सकस आहार घ्यावा. गरजेपेक्षा कमी किंवा अधिक खाऊ नये.
झोप – सकस आहारासोबत पुरेशी विश्रांती, झोप घेतल्यास शरीराची प्रतिकारक्षमता वाढते. आजार होत नाहीत आणि संसर्ग झाल्यास लवकर बरे होता येते.