मातृत्व ही निसर्गाची देणगीच! स्वत:च्या बाळाची अनेक स्वप्ने लग्न झालेल्या जोडप्यांनी रंगविलेली असतात. पण जेव्हा आपण आई होऊ शकत नाही हे जेव्हा त्या स्त्रीच्या लक्षात येते तेव्हा त्या जोडप्याच्या भावविश्वाला धक्का बसतो. अशा वेळी अनेक पर्याय डोळ्यांसमोर येतात. यातील जरा खर्चिक पण सध्या लोकप्रिय होत असलेला पर्याय म्हणजे ‘सरोगसी’चा.
सरोगसी अर्थात उसने मातृत्व. काही वर्षांपूर्वी भारतात या पर्यायाचा फारसा विचार केला जात नसे. मातृत्वासाठी बाहेरून स्त्रीबिज किंवा शुक्राणू घेण्यासारख्या वैद्यकीय उपचारांमध्ये ती गोष्ट जगाला समजण्याची शक्यता नगण्य असते. सरोगसी मात्र जगापासून लपून राहणे अवघड असते. त्यामुळे ‘लोक काय म्हणतील’ ही भीती वाटून जोडपी हा पर्याय टाळतात. परंतु अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दांपत्याने आपल्या बाळासाठी तो स्वीकारल्यावर सरोगसीला भारतातही ग्लॅमर प्राप्त झाले आहे. त्यामुळे ज्यांना त्याचा खर्च परवडू शकतो अशी जोडपी सरोगसीचा पर्याय निवडू लागली आहेत.
तरीही सरोगसी म्हटले की असंख्य प्रश्न जोडप्यांच्या मनात असतात. घरच्या मंडळींना हे उसने मातृत्व रूचेल का, सरोगेट आई माझ्या बाळावर हक्क सांगेल का, गरोदर असताना तिने अचानक आपला निर्णय बदलला तर, अशा प्रश्नांमुळे जोडप्यांना हा निर्णय घेण्यास खूप वेळ लागतो. हीच स्थिती सरोगेट आईची असते. मी दुसऱ्याच्या मुलाला जन्म देणार आहे ही गोष्ट माझ्या नवऱ्याला, घरच्यांना समजून घेता येईल का, नातेवाईक काय म्हणतील, या बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्यात माझा जीव गुंतला तर, अशा प्रश्नांमुळे तीही आपला निर्णय चटकन सांगू शकत नाही. परंतु योग्य समुपदेशन उपलब्ध असल्यास इच्छुकांच्या मनातील प्रश्न लवकर दूर करणे शक्य होते.
सरोगसी कुणासाठी फायदेशीर ठरू शकते हा आणखी एक प्रश्न. स्त्रीला गर्भाषयाचा एखादा आजार असल्यामुळे किंवा तिच्या गर्भाषयाचा आकार निसर्गत:च योग्य नसल्यामुळे तिला गर्भ राहू शकत नसेल, किंवा स्त्रीला दुसरी एखादी वैद्यकीय समस्या असल्यामुळे गर्भ राहण्याने तिच्या आरोग्याला धोका पोहोचू शकेल अशी स्थिती असल्यास अशा स्त्रीसाठी सरोगेट आईच्या शरीरात आपले व आपल्या पतीचे बाळ वाढविणे हा पर्याय योग्य ठरू शकतो. काही स्त्रिया आपल्या करिअरवर मातृत्वामुळे परिणाम होऊ नये किंवा शरीराचा बांधा बिघडू नये यासाठीही सरोगेट आईचा पर्याय पसंत करतात. परंतु अशा स्त्रियांची संख्या तुलनेने कमी आहे. कोणतीतरी वैद्यकीय समस्या असल्यामुळे हा पर्याय स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. समलिंगी दांपत्येही बाळासाठी या पर्यायाकडे वळू लागली आहेत. यातही लेस्बियन दांपत्यांमध्ये कोणत्यातरी एका जोडीदाराचे गर्भाषय प्रयोगशाळेत तयार केलेला गर्भ वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु गे दांपत्यांना ती सोय नसल्यामुळे अशी जोडपी बाळासाठी सरोगेट आईचा विचार करतात.
सरोगसीचा निर्णय पक्का झाला की पहिल्या पायरीत प्रयोगशाळेत स्त्रीबीजात शुक्राणूचा प्रवेश घडवून आणून गर्भ तयार केला जातो. त्यानंतर हा गर्भ सरोगेट आईच्या गर्भाषयात ठेवला जातो. सरोगेट आईची निवड करतानाही अनेक गोष्टींची तपासणी करणे गरजेचे असते. त्या स्त्रीला लैंगिक संसर्गाने पसरणारा कोणताही आजार नसावा, तिला इतर कोणताही आजार नसावा, तिचे गर्भाषय गर्भाच्या निरोगी वाढीसाठी योग्य असावे, तिला स्वत:ची संतती धरून तीनहून अधिक संतती नसाव्यात अशा अनेक मार्गदर्शक तत्वांची कसोटी या निवडीसाठी वापरली जाते. यानंतर सरोगेट आईच्या घरच्या मंडळींना विशेषत: तिचा नवरा, सासू आदिंना सरोगसीची प्रक्रिया सखोलपणे समजावून सांगितली जाते. गर्भारपणाच्या काळात सरोगेट आईला पुष्कळदा तिच्या नवऱ्याच्या आणि घरच्या मंडळींच्या आधाराची गरज भासते. त्या दृष्टीने योग्य ते समुपदेशन करणे ही दुसरी पायरी असते. सरोगेट आई स्वत: त्यासाठी खरोखर तयार आहे ना, हे पाहणे गरजेचे असते. तिने ही गोष्ट खंबीर मनाने स्वीकारली असली तर गर्भारपणात स्वत:ची उत्तम काळजी घेणे, वेळेवर खाणे- पिणे, स्वच्छता पाळणे, सुचविलेली आौषधे वेळेवर घेणे या गोष्टी ती मन लावून करू शकते.
यानंतरचा महत्वाचा मुद्दा असतो मोबदल्याचा. याचवेळी वकिलाकडून सरोगसीचे रीतसर ‘लीगल अ‍ॅग्रीमेंट’ही करून घेणे आवश्यक असते. सरोगसीसाठी सरोगेट आईला दिला जाणार मोबदला किती असावा, तो कशा हफ्त्यांत दिला जावा आदि गोष्टी या वेळी ठरविल्या जातात. सरोगसीसंबंधी कोणताही कायदा अस्तित्वात नसला तरी त्यासाठी ‘आयसीएमआर’ अर्थात ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’ने दिलेली मार्गदर्शक तत्वे आहेत. या सर्व प्रक्रियेत या तत्वांचे काटेकोर पालन केले जाणे आवश्यक आहे.
          

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!