सततच्या आम्लपित्ताला नेहा अगदी कंटाळली होती. पित्त उसळणारसे वाटले तरी अँटासिड औषध घ्यायची तिला सवयच लागली होती. औषध घेतले की तिला तेवढय़ापुरते बरेही वाटे. पण काही दिवसांपासून मात्र पित्त होण्याबरोबरच तिचे पोटही दुखायला लागले, वारंवार उलटय़ा होऊ लागल्या. निदान झाले अल्सरचे. अल्सरबद्दल अर्थात पोटातल्या जखमेबद्दल जाणून घेऊ या-
अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. पण हे नेहमी बघायला मिळणारा अल्सर हा जठर किंवा डय़ुओडेनमला होणारा.

लक्षणे कोणती?
अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सामान्यत: दिसणारी काही लक्षणे अशी-
*पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे
*आम्लपित्त होणे
*सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे
*पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे
*यात अल्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार पित्त होते, भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी होते. बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागते.
*अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते. अशा दुखण्यात बऱ्याचदा खाल्ल्यावर आराम पडल्यासारखे वाटते. मळमळ आणि आम्लपित्त झाल्यानंतर होतात तशा उलटय़ाही होऊ शकतात. आजार आणखी पुढे गेला असेल तर उलटीतून रक्त पडू शकते. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त जाऊ शकते किंवा शौच काळ्या रंगाची होऊ शकते.
*अल्सरचे काही रुग्ण अगदीच गुंतागुंतीच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये अल्सर फुटून आतडय़ाला छिद्र पडलेले असू शकते. या रुग्णांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागणे, उलटय़ा होणे आणि पोट गच्च होऊन फुगणे ही लक्षणे दिसतात. गंभीर स्थितीत आलेल्या काही रुग्णांना रक्ताची उलटी होते किंवा संडासवाटे जोरात रक्त जाते. याउलट काही रुग्णांमध्ये अल्सर भरून आतडय़ाची ती जागा बारीक होते आणि तिथे अडथळा निर्माण होऊन उलटय़ा होतात.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…

अल्सरची कारणे कोणती?
*‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.
*वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.
*धूम्रपान व मद्यपान
*सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे
*अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
*अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण सापडतात.

डॉक्टरांकडे केव्हा जावे?
*आपल्याकडे आम्लपित्ताच्या रुग्णांची संख्याही कमी नाही. त्यातील कित्येकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असतो. या त्रासात देखील रुग्णांना पित्त उसळणे, मळमळ व उलटी होणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यातील प्रत्येक रुग्णाला अल्सर असतो असे नक्कीच नाही. पण असे त्रास सातत्याने व्हायला लागले तर अल्सरची शक्यता पडताळून पाहणे योग्य. अल्सरचे निदान नुसती लक्षणे पाहून करत नाहीत. दुर्बिणीतून तपासणी (एंडोस्कोपी) करून अल्सर आहे की नाही हे सांगता येते.
*पोटाचा कर्करोग असलेल्या काही रुग्णांनाही वर सांगितलेल्यासारखीच लक्षणे दिसू शकतात. परंतु आम्लपित्त समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेणे चांगले. 

अल्सर होऊ नये म्हणून-
*जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय.
*वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.
*रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.
*अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा.

अल्सर आणि शस्त्रक्रिया
*अल्सरचे स्वरुप साधे असेल तर ‘एच पायलोरी’ जंतूंच्या विरोधातील प्रतिजैविके आणि त्याबरोबर ४ ते ८ आठवडय़ांपर्यंत आम्लपित्त कमी होण्यासाठीची औषधेही दिली जातात. अर्थात औषधे घेण्याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
*अल्सरची स्थिती गंभीर असेल किंवा त्यावर औषधांचा म्हणावा तसा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया करून घेण्यास सुचवले जाते.
*अल्सरच्या सर्वच रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे; किंबहुना आता आम्लपित्त कमी करण्यासाठी अधिक गुणकारी औषधे उपलब्ध झाल्यामुळे अल्सरसाठी शस्त्रक्रियेची गरज भासण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

आम्लपित्तनाशक औषधेही वारंवार नकोच!
*आम्लपित्तावर स्वत:च्या मनानेच सारखी- सारखी ‘अँटासिड’ म्हणजे आम्लपित्तनाशक औषधे घेण्याची सवयही कित्येकांना असते. अँटासिडची गोळी किंवा पातळ औषध घेऊन बरे वाटत असले तरी ते तेवढय़ापुरते असते. यात उपचार तर अर्धवट होतातच, पण औषधाने तेवढय़ापुरते बरे वाटू लागल्यामुळे आजाराचे निदान केले जात नाही.
*आम्लपित्तच्या लक्षणांवर अँटासिड औषधे घेताना दुसरीकडे तिखट- मसालेदार खाणे, धूम्रपान किंवा मद्यपानाचे कुपथ्य देखील सुरूच राहण्याची शक्यता अधिक असते. परिणामी आम्लपित्तावर योग्य इलाज होतच नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाने आम्लपित्तावर वरवरचे उपाय करत राहण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवलेले बरे.
– डॉ. संजय कोलते, उदरविकारतज्ज्ञ, sanjaykolte@yahoo.com
 
(शब्दांकन- संपदा सोवनी)