दहावीतून महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरचे दिवसच न्यारे! कट्टय़ा-कट्टय़ांवर चालणाऱ्या ‘गॉसिप’ची मजा न्यारी. अशा नव्या नव्या वातावरणात महाविद्यालयामधल्या आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या स्वप्नातला ‘तो’ किंवा ‘ती’ सापडल्याचं समजलं, आणि आपलं ‘तसं’ अजून कुणीच नसेल तर.. मग उगीच आपणच आपल्याला ‘काकूबाई’ (किंवा ‘काकाबुवा’!) समजायला लागतो. अशी स्वत:ला काकूबाई समजणारी कुणीतरी मग स्वत:वरच नाराज होते..

प्रश्न- मी आत्ताच अकरावीत प्रवेश घेतला. नुकतंच महाविद्यालय सुरू झालंय आणि मित्रमत्रिणीपण मिळाले. या काही दिवसांतल्या गप्पांमधून मला एक गोष्ट जाणवतीय, की माझ्या जवळपास सगळ्या मत्रिणींना आतापर्यंत शाळेत कुठल्या तरी मुलानं ‘प्रपोज’ केलंय, दोघी-तिघींना प्रियकरही आहे. मी पण ‘को-एड’ शाळेत होते. मला मित्र होते, पण त्यांच्यापकी कुणी ‘तसं’ आवडलं नाही. मला अजून कुणी प्रपोज वगरेपण नाहीये केलं. आता महाविद्यालयाच्या मत्रिणींशी बोलताना मला फारच ‘काकूबाई’ असल्याचा फील येतो. मला प्रियकर मिळालाच नाही तर? माझ्यात काही कमी आहे का?..
उत्तर- हॅलो, ताई! तुला ताई म्हटलं म्हणून रागावू नकोस; नाहीतर तुला आधीच काकूबाई असल्यासारखं वाटतंय, अन् मी तुला ताई म्हणतोय. पण तू तुझं नावच लिहिलं नाहीयेस! आहे की नाही गंमत? पण अकरावीचं वर्ष म्हणजे अशाच वेगवेगळ्या गमतीजमतींचं वर्ष, नाही का? शाळेच्या अन् पालकांच्या कचाटय़ातून सुटून एकदाचं मिळालं बुवा स्वातंत्र्य!  धमाल. ‘फ्रीक आउट’ वगरे. त्यातून गप्पा अन् कट्टा हे तर खूप महत्त्वाचे. सगळ्या ‘बातम्या’ अन् ‘गॉसिप’ यांना उधाणच. त्यातच तारुण्य वगरे! म्हणजे आपण लई भारी, हे तर आलंच.मग त्यातनं तुझ्या लक्षात आलंय की ‘काही जणी’ विशेष खुशीत दिसतायत; जास्तच मजा करतायत; आपण जास्तच हुशार अन् सुंदर आहोत, याचा त्यांना साक्षात्कार होतोय, कुणीतरी तसं त्यांना सारखं भासू देतंय किंवा स्पष्टच सांगतंयसुद्धा! अन् आपण मात्र कुठेतरी ओळख हरवून बसलेल्या काकूबाई आहोत. ‘हॅरी पॉटर’च्या जादूच्या वातावरणात जादूच येत नसलेल्याला ‘मगल’ म्हणतात, तसे आपण आहोत! तर मुली, मला तुला सांगू दे की तसं काही नाहीये.म्हणजे ज्यांना प्रियकर वगरे आहेत, किंवा अजून होतील, कदाचित पहिले तुटून नवीनही होतील; अशा मुलींना आपण जोडीदारामध्ये काय शोधतोय, एवढं तरी आत्मज्ञान नक्कीच येईल. तेही सगळ्यांना येतं असा काही नियम नाही. कित्येक जणी पुन्हा पहिलेच पाढे गिरवतानाही दिसतील कदाचित. पण शक्य आहे की या बाबतीत त्या आपल्या पुढे असू शकतील. म्हणजे तू समजा सहा पेपर देत असशील, तर त्या सात देतायत. तुला सातवा नंतर द्यायचाय, हे लक्षात ठेवलंस की झालं. म्हणजे त्यांनाही कमी समजायला नको; आणि आपलंही चाललेल्या सहा पेपर्सकडे दुर्लक्ष व्हायला नको.मधल्या काळात आपण इतरांच्या अनुभवातून शिकू शकतोच की. पण हे लक्षात ठेवलेलं चांगलं की इतर जण किंवा इतर जणी आपला सगळा अनुभव आपल्याशी शेअर करतील असं धरून नको चालू या. त्यातल्या त्यात आपण कसे आहोत, आपल्याला काय आवडतं, काय चालतं, अन् काय नाहीये चालत, याचा अंदाज आला तर या भविष्यातल्या सातव्या पेपरची तयारी ठीक चाललीय म्हणायची.पूर्वीच्या काळी याच्या उलट परिस्थिती असणार बघ. म्हणजे सगळा जमाना काकूबाईंचा;अन् एखादी अगदी असोशीनं सतत वेगळ्या धुंदीत जगणार. ते लपवायचा आटोकाट प्रयत्न करणार. किंवा एकदम धाडसानं आपलं वेगळेपण ठळकपणे मिरवणार. तेव्हा अशा एखादीला खूपच उपेक्षा- तुमच्या भाषेत सांगायचं तर ‘हटाई’ अनुभवायला येणार. म्हणजे अगदी इतरांसारखं नसल्याचं काहीतरी मोल आपण देतच असतो. तेव्हा सारासार विचार करून मर्यादेबाहेर कुढतही राहायचं नाही, अन् घाईघाईनं दुसऱ्यांसारखंही व्हायला जायचा हट्ट करायचा नाही, हे जर तुला पचलं तर भेटू परत पुढच्या टप्प्यावर. अशाच टीप देत राहीन मी तुला, कारण आपण हे पक्कं जाणून आहोत की वेगळं असणं म्हणजे काही आजारी असणं नाही, जरी इतरांनी डिवचलं तरी!