घास गिळताना अडकायला लागला की पहिली शंका मनात येते की, मला घशाचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग तर नसेल ना.. छातीत दुखत आहे असे म्हटले की, मला हृदयविकाराचा झटका आला की काय, या विचारानेच माणूस अर्धमेला होतो. प्रत्येक वेळी ही परिस्थिती खरंच असते का?.. तर अजिबात नाही. आपण स्वत:ला तो आजार आपल्याला झाला आहे, असा विचार करून अस्वस्थ होतो. नक्की या आजारांचे गमक काय, हे पहिले समजून घ्यावे लागेल.
आपल्या छातीमध्ये हृदय आणि फुप्फुसे आहेत, एवढेच साधारणपणे आपण लक्षात घेतो. पण छातीमध्ये अन्ननलिकासुद्धा आहे, याचा आपण विचारच करीत नाही. छातीत दुखत आहे म्हटल्यावर सर्वप्रथम हृदयविकार नाही हे सिद्ध करणे आवश्यक असते. त्यासाठी ईसीजीसह रक्ताच्या काही प्राथमिक चाचण्या कराव्या लागतात. छातीचा एक्स-रे काढावा लागतो. या सर्व तपासण्यांमधून काही निष्पन्न झाले नाही तर पुढची पायरी म्हणजे एन्डोस्कोपी. या तपासात दुर्बिणीद्वारे अन्ननलिका तपासली जाते. अन्ननलिकेला जखमा आहे का, अन्ननलिका व जठर यांमधील जोड अधिक घट्ट किंवा सैल आहे का, जठरामध्ये जखमा किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीचा भाग म्हणजे डय़ुडेनमध्ये अल्सर आहे का, या गोष्टी एन्डोस्कोपीद्वारे समजतात. एन्डोस्कोपीच्या तपासातून काही निष्पन्न झाले नाही तर आजाराचे अंतिम मूळ शोधण्यासाठी पुढील तपासणी करणे आवश्यक असते. यामुळे रोगाचे मूळ आणि मनातील संशय कायमचा दूर होण्यास मदत होते. ती तपासणी म्हणजे एसोफेजिअल मॅनोमेट्री.
एसोफेजिअल मॅनोमेट्री तपासणीमध्ये अन्ननलिकेचा दाब मोजण्यात येतो. अन्ननलिका आणि तिचा जठराबरोबरचा जोड यांचा दाब प्रमाणात असेल तर कोणतेही चिंतेचे कारण नसते. आपण जेव्हा अन्न व पाणी गिळतो, तेव्हा गिळलेला घास अन्ननलिकेतून आपणहून घसरत खाली जात नाही. ही गिळण्याची प्रक्रिया होत असताना अन्ननलिकेमध्ये विशिष्ट मर्यादेत एक दाब तयार होतो. त्याद्वारे हा घास खाली नेण्याचा प्रयत्न केला जातो. हा घास जेव्हा अन्ननलिका आणि जठराच्या जोडाजवळ येतो, तेव्हा एखाद्या झडपेप्रमाणे हा जोड उघडतो आणि हा घास जठरात गेला की पुन्हा बंद होतो.
ही सर्व क्रिया प्रमाणबद्धतेने होते. जेव्हा ही गिळण्याची प्रक्रिया होत नाही म्हणजे घास खाली सरकत असताना विशिष्ट दाब तयार होत नाही, त्या वेळेस घास खाली उतरत नाही. या त्रासाला ‘मोटिलिटी डिसऑर्डर’ असे म्हणतात. म्हणजे अन्ननलिका व तिचा जठराशी असलेला जोड यांच्या हालचालींचा (दाबाशी निगडित) रोग.
या रोगामध्ये अगदी हृदयविकार आल्यासारख्या वेदना रुग्णाला होतात किंवा अन्ननलिकेत जणू कर्करोग झाला आहे, अशा शंका येतात. या रोगाचे निदान झाल्यावर त्यावर तात्काळ चांगले उपाय करता येतात. प्रथम या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान होणे हेही रुग्णाला दिलासा देण्यासारखे असते.

तपासणी कशी?
या रोगाची तपासणी करताना दोन मिलीमीटर जाडीची एक छोटी नळी नाकाद्वारे रुग्णाच्या घशात सोडली जाते. त्या नळीवर सोळा किंवा बत्तीस ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे दाब मोजणारे ट्रान्सडय़ुसर्स असतात. ही नळी घशात सोडली की रुग्णाला दहा वेळा पाच मिलिलिटर एवढे पाणी प्यायला दिले जाते. रुग्ण पाणी पीत असताना अन्ननलिकेतील दाब मोजण्याचे काम सुरू असते. त्यानंतर नळी काढून टाकली जाते. केलेल्या तपासण्यांचा संगणकाच्या साहाय्याने अभ्यास करून रुग्णाला मोटिलिटी डिसऑर्डर आहे का, याची तपासणी केली जाते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

दुसरा विकार
नागरिकांना होणारा दुसरा अतिशय सामान्य त्रास म्हणजे ‘गॅस्ट्रोइसोफेजिअल रिफ्लक्स डिसीझ’. समाजातील पंधरा ते वीस टक्के लोकांना हा त्रास असतो. या आजारात खाल्लेले अन्न छातीवर येणे, तोंडाला लाळ सुटणे, आंबट पाणी येणे, छातीत जळजळणे, रात्रीच्या वेळेत अचानक श्वास बंद झाल्यासारखे वाटून भीतीने जागे होणे, अशा प्रकारचे त्रास होतात. या आजारात त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे सुरू करावीत. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एन्डोस्कोपी करावी. अन्न व जठर यांच्यामधील जोड कमकुवत होतो. त्यामुळे जठरातील अ‍ॅसिड व अन्न छातीवर येते. त्यामुळे हा त्रास होतो. हा त्रास विकोपाला गेल्यास हा जोड घट्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

– डॉ. अभय उपासनी
upasani1@gmail.com