स्वयंपाकघरातील अगदी साध्या पदार्थापासून शाही मेजवानीपर्यंतच्या जवळजवळ प्रत्येक पदार्थात आपल्याला मसाल्यांची गरज भासते. जिरं-मोहरीपासून गोड पदार्थातल्या वेलची-जायफळापर्यंतचे हे मसाले त्या त्या पदार्थात का वापरले जातात यामागे शास्त्र आहे. आरोग्याच्या दृष्टीने मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म जाणून घेतल्यास त्यांचा वापर अधिक सजगपणे करता येईल.

मोहरी- भाजी, आमटी, उसळ्या रोजच्या पदार्थामध्ये मोहरीची फोडणी घातली नाही असे सहसा होत नाही. मोहरी तडतडताना होणारा आवाज जिव्हालालसा वाढवणारी. वात-कफनाशक मोहरीत सूजनाशक व वेदनाशामक गुण आहेत. अ,ब, क, ई ही जीवनसत्त्वे, फॉलिक आम्ल, लोह, कॅल्शियम आक्षि मॅग्नेशिअमदेखील मोहरीत असते. मोहरीची पूड काही औषधात वापरतात. मोहरीला मोड आणूनसुद्धा त्याचा औषधी उपयोग करता येतो. मोहरी पचनसंस्थेच्या स्नायूंची हालचाल योग्य रीतीने वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे अन्न योग्य प्रकारे पुढे सरकते. त्यामुळे पचनाच्या दृष्टीने मोहरी हितकारक. त्यातील अ जीवनसत्त्व आपल्या डोळ्यांसाठी चांगले. जेवणात विविध पदार्थामध्ये मोहरीची डाळही वापरता येते. त्वचेची काळजी घेणारे ई-जीवनसत्वही त्यातून मिळते.
जिरे- उपवासाच्या पदार्थामध्ये मोहरीची जागा जिरे घेते. कित्येक पदार्थामध्ये एरवीही जिरेपूड आवडीने वापरली जाते. पचनाच्या दृष्टीने जिरेही चांगले. त्वचाविकार, श्वसनविकार, प्रतिकारशक्तीची कमतरता आणि गॅसेसवर जिरे खूप उपयुक्त ठरते. त्यात अ, ब, क, ई, के ही जीवनसत्त्वे असून जस्त (िझक) , फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, थोडी साखर आणि प्रथिने असतात. जिरे पाचक आणि शीतल असल्यामुळे उष्णतेच्या व पित्ताच्या विकारांवर ते गुणकारी आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थामुळे होणारे पित्त टाळण्यासाठी त्यात पुरेसे जिरे जरूर वापरावे. एरवीही गॅसेस व आम्लपित्ताच्या त्रासावर अर्धा चमचा जिरेपूड पाणी किंवा ताकाबरोबर घेता येईल. दम्याचा त्रास असलेल्यांना जिरे पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्यास फायदा होतो. पंडुरोग व ऑस्टिओपोरोसिसवरील प्राथमिक उपाय म्हणून किंवा औषधांना जोड म्हणूनही जिरे घेता येते. तारुण्यपीटिका, त्वचेवरील डाग व त्वचेच्या इतर तक्रारी दूर होण्यासाठीही रोज किंचित जिरेपूड घेण्याचा फायदा होतो.
हळद- अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा रोजच्या स्वयंपाकातील वापर महत्त्वाचा. यकृतामधून पित्तरसाचे पुरेशा प्रमाणात स्रवण होण्यास हळद मदत करते. अन्नातील स्निग्ध पदार्थाचे पूर्णपणे पचन होण्यास यामुळे फायदा होतो. जेवणानंतर येणारे जडत्व, पोटात होणारी जळजळ, गॅसेस यांवर हळद उत्तम उतारा आहे. जेवणातील हळदीचे प्रमाण थोडे वाढवल्यास वा जेवणानंतर अर्धा चमचा हळद कोमट पाण्याबरोबर घेतल्यास या तक्रारी कमी होण्यास मदत होते. हळद जंतूविरोधी असल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर (त्वचा, घसा, तारुण्यपीटिका इ.) हळद उपयोगी पडते. त्यातील कर्कुमिन नावाचे तत्त्व आपला कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. हळद बुरशीनाशक तसेच सूजनाशक आहे. त्यातही ब, क, ई ही जीवनसत्त्वे असून लोह, कॅल्शियम, तांबे, पोटँशियम, जस्त व मॅग्नेशियमही आहे.
हिंग- हिंग गरम तेलाच्या फोडणीतच सहसा घातला जातो. पण काही वेळा ताक, सूप, वरण यात बिगरफोडणी नुसती हिंगपूड देखील घातली जाते. गॅस पोटात साठून पचनसंस्थेच्या मांसपेशींवर ताणतणाव निर्माण होतो आणि पोटात कळा येतात. अशा वेळी पाव चमचा सुंठ, दोन चिमूट हिंग व काळे मीठ असे मिश्रण घ्यावे. त्यामुळे अन्न पुढे सरकते व वायू सरतो. मांसपेशी शिथिल होऊन पोटाचा फुगारा कमी होतो आणि बरे वाटते. अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळीही असेच पोटात दुखते. तेव्हाही वरीप्रमाणे प्रयोग करावा. दर दोन तासांनी वरील मिश्रण घेता येईल. त्यामुळे गर्भाशय व ओटीपोटातील मांसपेशी शिथिल होऊन बरे वाटते. हिंगात हाडांना उपयुक्त असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि अ व ब जीवनसत्त्व असते. तसेच लोह, जस्त व तांबेही असते.
लसूण- काहीजण लसूण हा मसाल्याच्या पदार्थामध्ये गृहीत धरत नाहीत. पण ज्या वेळी आपण ओले वाटणे लावून भाज्यांसारखे पदार्थ करतो तेव्हा लसूण प्रामुख्याने वापरला जातो. आले-लसणाची पेस्ट तसेच फोडणीत लसूण चिरून वा ठेचून घातला जातो. लसूण उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक असतो. पित्ताचा त्रास असलेल्यांनी एका वेळी फार लसूण खाऊ नये. पोटात गॅसेस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करतो. तो हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यात असणारे पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यायोगे बुरशीचा संसर्ग व जीवाणू व विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते. अगदी आजारपणातही लसूण वापरात ठेवल्यास आजारपण लवकर बरे होण्यास फायदा होतो.

– डॉ. संजीवनी राजवाडे
dr.sanjeevani@gmail.com