काही विशिष्ट रोगांमध्ये मसालेदार पदार्थ वज्र्य सांगितले जातात किंवा अल्प प्रमाणात वापर करावयास सांगितला जातो. अशा खास वेळा सोडल्यास इतर वेळी मसाल्याच्या विशिष्ट पदार्थाचा माफक वापर सयुक्तिक ठरतो. पचनास मदत करणे हा जरी मसाल्यांचा प्रमुख गुणधर्म असला तरी त्याचे इतरही काही औषधी गुणधर्म असतात. या लेखात नेहमीच्या वापरातल्या आणखी काही मसाल्यांविषयी जाणून घेऊ या-

काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो. मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. पित्ताची तक्रार असलेल्यांनी मात्र मिरे जपून वापरावेत. मिरे कफ विलयनकर म्हणजे ‘म्यूकोलिप्टिक’ आहेत. सायनसमध्ये साठलेला कफ, दम्यात छातीत साठलेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ७-८ मिरे ठेचून १ ग्लास पाण्यात उकळून त्यांचा काढा करावा. गरम काढय़ात थोडा गूळ घालून हा काढा घ्यावा. रोजच्या डाळी-उसळीत वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात पुरेसे मिरे घालावेत. अन्नपचनासाठी त्याचा उपयोग होईल. मिऱ्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ई’ ही जीवनसत्त्वे असतात व त्यांचा शरीराला अँटीऑक्सिडंट म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून हृदय, मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा अशा अवयवांचे रक्षण करण्यासाठी ते मदत करतात. मिऱ्यात सूजनाशक व जंतूनाशक गुणधर्म देखील आहेत.
लवंग- लवंगांची डबी उघडली की एक विशिष्ट सुगंध येतो. हा सुगंध त्यातील तैलीय तत्त्वांमुळे असतो. ‘युजेनॉल’ नावाचे हे तत्त्व असते. त्यात लवंगेचे बरेच औषधी गुण सामावलेले असतात. हे तेल जंतुनाशक, सूजनाशक व वेदनाशामक असते. त्याचमुळे लवंगेचे तेल दाढदुखीवर वापरले जाते. किडलेल्या दाताच्या फटीत लवंग तेलात बुडवलेला लहान कापसाचा बोळा घालून ठेवला जातो. सर्दी, खोकला, घशाचा संसर्ग यातही लवंग वापरावी. सूप, सांबार, डाळीचे किंवा भाताचे कढण यात थोडी लवंग पावडर घालून गरम-गरम प्यावे. एखाद्या स्पंजमध्ये २०-२५ लवंगा खोचून ठेवून झोपताना हा स्पंज आजूबाजूस ठेवावा. जेवणातला काळा मसाला किंवा गरम मसाल्यात पुरेशा प्रमाणात लवंगेचे चूर्ण असावे. जड पदार्थामध्ये फोडणीत लवंगा जरूर घालाव्यात. यामुळे अन्न योग्य वेळी पुढे सरकते व पचन चांगले होते.
वेलची/वेलदोडा- या ठिकाणी आपण छोटी वेलची विचारात घेणार आहोत. गोड पदार्थ किंवा बिर्याणीसारखे जड पदार्थ यात वेलची जरूर वापरली जाते. जड जेवणानंतर गॅसेस होऊन त्यामुळे पोट फुगून छातीवरही दडपण येते. अशा वेळी पाव चमचा (टीस्पून) वेलची चूर्ण मध व आलेरसाबरोबर २-३ वेळा अध्र्या अध्र्या तासाने घेता येऊ शकेल. सततच्या अपचनामुळे काही वेळा अ‍ॅसिडिटी, उलटय़ा व मळमळीचा त्रास होतो. अशा वेळी पाव चमचा वेलची चूर्ण मोरावळ्याच्या पाकातून वा मधातून घ्यावे. गर्भिणींना होणारी उलटीसुद्धा या प्रयोगाने कमी होते. त्यासाठी रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर लगेच हा प्रयोग करावा. हाडे, दात, नखे सुदृढ ठेवणारी उपकारक तत्त्वे (कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे व फॉस्फरस) वेलचीत आहेत. मुखदरुगधी घालवण्यासाठी वेलचीचे दाणे चावून-चघळून खावेत. हिरडय़ांचे रोग व मुखरोगातही वेलची पूड मधातून घेतात.
दालचिनी- चवीला किंचित गोडसर असलेली दालचिनी तिखट व गोड अशा दोन्ही पदार्थामध्ये वापरली जाते. दालचिनी पाचक असल्याने गॅसेस, पोटदुखी, पोटफुगी, मळमळ या अपचनाच्या त्रासांमध्ये ती फायदेशीर ठरते. अशा वेळी दालचिनीचे पाव चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. १-१ तासाने व २ ते ३ वेळा हा प्रयोग करता येईल. सणावाराला गोड पदार्थामध्ये दालचिनी जरूर वापरावी. दालचिनीत उत्तम बुरशीनाशक गुणधर्म आहेत. म्हणूनच त्वचेला जेव्हा बुरशीचा संसर्ग होतो तेव्हा त्या ठिकाणी दालचिनीची पेस्ट करून लावता येते. अर्धा चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा हळद एक ग्लास पाण्यात उकळून काढा तयार करावा. हा काढा गाळून अर्धा कप तीन वेळा पोटात घ्यावा. हृदयाच्या दुर्बलतेवर दालचिनी चांगले काम करते व शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरते. दालचिनीत असलेले ‘कोलिन’ हे द्रव्य स्मरणशक्तीसाठी चांगले आहे. मात्र त्यासाठी लहान वयापासून दालचिनी योग्य प्रमाणात नियमित पोटात गेलेली चांगली.
तमालपत्र/तेजपत्ता- विशिष्ट सुगंध असलेली ही पाने काही जण मुद्दाम तांदळात टाकून ठेवतात. खडा मसाला करताना, पूड करून किंवा काळ्या-गोडय़ा मसाल्यात ही पाने वापरली जातात. पोटाट गॅसेस होणे टाळण्यासाठी जड पदार्थामध्ये ती वापरली जातात. अपचनामुळे पोटात वायू साठून कळा येतात तेव्हा या पानांचे अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. सर्दी, खोकला, घशाच्या तक्रारी, तापाची कणकण यावरही तमालपत्राचा चहा करून घ्यावा किंवा चूर्ण मधातून चाटावे. तमालपत्राचा काढा (३-४ पाने, पेलाभर पाणी) मुखरोगांवरही फायदेशीर ठरतो. हिरडय़ांना येणारी सूज, तोंडात व गालाच्या आतील भागात येणारे फोड, दात व हिरडय़ांचे दुखणे यात या काढय़ाच्या गुळण्या कराव्या. काढा जमेल तेवढा वेळ तोंडात धरून ठेवावा. फायद्यासाठी दिवसातून ४-५ वेळा तरी हा प्रयोग करणे गरजेचे आहे.
साध्या आजारांवर मसाले वापरून घरच्या घरी करण्याचे हे उपाय आपली प्रकृती पाहून करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळ्या प्रकारची असल्यामुळे सर्वाना हे उपाय एकाच प्रमाणात लागू पडतील असे सांगता येत नाही. मात्र प्रत्येक मसाल्याचे असलेले फायदे पाहून रोजच्या जेवणात त्यांचा अधिक समजून घेऊन वापर करावासा नक्कीच वाटेल.

– डॉ. संजीवनी राजवाडे
dr.sanjeevani@gmail.com