ज्यांना अर्धशिशीचा तीव्र आजार असेल त्यांना ‘ब’ जीवनसत्त्व व फॉलिक अ‍ॅसिड पूरके यांचा चांगला उपयोग दिसून येतो, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. ग्रिफिथ विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, अर्धशिशी असलेल्यांना ‘ब’ जीवनसत्त्व व फॉलिक अ‍ॅसिडची योग्य मात्रा दिल्यास त्यांच्यात चांगला परिणाम दिसून येतो. ज्या महिलांना वर्षांतून तीन वेळा अर्धशिशीचा तीव्र त्रास होतो अशा अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांची माहिती गोळा करून त्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वीन्सलँड येथील संशोधक ब्रिगेट माहेर यांनी सांगितले की, ज्या रूग्णांना जनुकीय कारणास्तव अर्धशिशीचा विकार आहे, त्यांच्यात या उपायांचा वीस टक्क्य़ांनी उपयोग होतो. ‘ब’ जीवनसत्त्व तसेच फॉलिक अ‍ॅसिडच्या पूरक मात्रेमुळे अर्धशिशीची तीव्रता कमी होते. अर्धशिशी होण्याची श?यता असलेल्या पाच पैकी एका व्यक्तीत असे वितंचक असते. ते निरोगी व्यक्तीत करते तशा प्रकारे काम करीत नाही. ‘ब’ जीवनसत्त्व तसेच फॉलेटमुळे या वितंचकातील दोष दूर होतो. अर्धशिशी अनेकदा जनुकीय कारणांशी निगडित असते. त्यात मेंदूच्या काही अस्थायी विकारांचा समावेश असतो. डोळ्यासमोर तारे चमकणे, मेंदूत सुया टोचल्यासारखे वाटणे, बधिरता वाटणे अशी लक्षणे यात दिसतात. ग्रिफिथ व त्यांचा चमू आता ब जीवनसत्त्व, तसेच फॉलिक अ‍ॅसिड यांची नेमकी किती मात्रा द्यावी यावर संशोधन करीत आहे. जवळपास बारा टक्के रूग्णात सतत तीन दिवस चालणारी डोकेदुखी असते, त्यांना प्रकाश व आवाजही सहन होत नाही.