कर्करोगात स्तन काढून टाकणे अयोग्य

ज्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर संपूर्ण स्तनच काढून टाकण्याची मास्टेक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते, त्यांच्या

मुंबई | February 2, 2013 6:01 AM

ज्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर संपूर्ण स्तनच काढून टाकण्याची मास्टेक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते, त्यांच्या तुलनेत ज्यांच्यात केवळ गाठ काढून टाकून भागते, त्या स्त्रियांमध्ये वाचण्याची शक्यता अधिक असते, असे दहा वर्षांच्या एका अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
वयाच्या पन्नाशीवरील ज्या स्त्रियांमध्ये गाठ काढून रेडिओथेरपी केली जाते त्यांची वाचण्याची शक्यता ज्या स्त्रियांचे संपूर्ण स्तनच काढून टाकावे लागतात त्यांच्यापेक्षा अधिक असते. अनेकदा स्त्रिया स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतात. संपूर्ण स्तनच काढून टाकल्याने कर्करोग पसरणार नाही असे त्यांना वाटते, प्रत्यक्षात असे घडत नाही. उलट स्तन वाचवण्याच्या शस्त्रक्रियेने अधिक फायदा होतो.  ‘डेलीमेल’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, स्त्रियांच्या स्तनातील कर्करोगाची गाठ काढून नंतर पाच ते सहा आठवडे रेडिओथेरपी केल्यास उर्वरित कर्करोगग्रस्त पेशी मरतात. उत्तर कॅरोलिना येथील डय़ुक विद्यापीठात संशोधकांनी केलेल्या संशोधनात १९९४ ते २००४ दरम्यान ११२,१५४ स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यात ५५ टक्के स्त्रियांमध्ये स्तन वाचवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ४४ टक्के स्त्रियांमध्ये स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात ज्या स्त्रियांमध्ये स्तन वाचवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यापैकी १३ टक्के स्त्रिया कर्करोगमुक्त झाल्या. पन्नाशीवरील १९ टक्के स्त्रिया कर्करोगमुक्त झाल्या. सर्व वयोगटातील स्त्रियांमध्येही स्तन वाचवण्याच्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यूचे प्रमाण कमी असते.
डय़ुक विद्यापीठाचे मुख्य संशोधक डॉ. इ. शेली यांच्या मते पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगात मास्टेक्टॉमीचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी गाठ काढून टाकण्याची लपेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करावी. ‘कॅन्सर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

First Published on February 2, 2013 6:01 am

Web Title: breast removal is incorrect in cancer