24 May 2017

News Flash

तिरळेपणा- गैरसमजावर आधारित, दुर्लक्षित आजार

डोळय़ांचा तिरळेपणा हा लहान वयातील आजार आहे हे खरे आहे. तरी त्यामागे दृष्टिदोष असतो

डॉ. मधुसूदन झंवर, पुणे. (अध्यक्ष-प्रमुख नेत्रतज्ज्ञ, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान) | Updated: January 16, 2013 5:52 AM

डोळय़ांचा तिरळेपणा हा लहान वयातील आजार आहे हे खरे आहे. तरी त्यामागे दृष्टिदोष असतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. सुदैवाने बहुतांशी दुसरा डोळा सुरक्षित असल्याने व त्यावर सर्व कामे सुरळीत पार पडत असल्याने तिरळय़ा डोळय़ाकडे दुर्लक्ष होते. म्हणजे त्याची तपासणी करून कारण, उपाय, मीमांसा करण्याचा साधा प्रयत्न पालकांकडून लहानपणी होत नाही. हे माझ्या ४० वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेले आहे. केवळ वैद्यकीय अपात्रता, ड्रायव्हिंग लायसेन्स, लग्न ठरवताना आलेली बाधा किंवा नोकरीसाठी अडचण, त्या वेळीच त्याच्यावर उपचाराचा विषय निघतो. ज्याच्या घरात लहान मुले-मुली तिरळी आहेत, त्यांनाच त्याचे सामाजिक दुष्परिणाम अनुभवास येतात. हिणवणे, चिडवणे, न्यूनगंड, व्यंगातील कमतरता यांना कायम तोंड द्यावे लागते. शास्त्रीय व सामाजिकदृष्टय़ा या दुर्लक्षाचे व अनास्थेचे महत्त्वाचे कारण हे या विषयीचे अज्ञान, गैरसमज व खात्रीलायक उपायांची मूलभूत कमतरता आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. यासाठी आरोग्य व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन शासन व सेवाभावी संस्थांनी ही तिरळेपणा निर्मूलन चळवळ म्हणून चालविली पाहिजे.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने हे काम गेली २५ वर्षे महाराष्ट्राच्या २० जिल्हय़ांतून १६१ तपासणी शिबिरे, शिबिरांद्वारा १२५ मोफत शस्त्रक्रिया, २५००० च्यावर तिरळय़ा रुग्णांना मार्गदर्शन व ४००० जणांची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. यामध्ये शासनाच्या हॉस्पिटल सोयी व सेवाभावी संस्थांचे आर्थिक साहाय्य या त्रिसूत्री कामावर आधारित होते. ५०च्या वर संस्थांचा सहभाग, ५० नेत्रतज्ज्ञांना प्रशिक्षण, २५ भूलतज्ज्ञांचा समावेश १५०च्या वर लेख व सटीप व्याख्याने तीन वेळा सर्वाधिक शस्त्रक्रिया उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सन्माननीय नोंद ही वैशिष्टय़े, चंद्रपूर, पुसद, शिरपूर, भीमाशंकर या आदिवासी भागांतही शिबिरे यशस्वी झाली. गडचिरोलीत गेली काही वर्षे शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाकडून तिरळी लहान मुले या शिबिरात पाठविण्यात येऊ लागली आहेत. हा देशातील एकमेव यशस्वी प्रयोग आहे.
सामाजिक गैरसमज :- पाळण्यातील खेळण्याकडे बघून, देवाचा कोप, केसाच्या बटेमुळे, दुसऱ्या तिरळय़ा मुलाची नक्कल, अशक्तपणा, तापामुळे झाला असा गैरसमज ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात, तर शहरी भागात चष्मा नको, मुलीची जात आहे, लहान वयात शस्त्रक्रिया किंवा भुलेची भीती, यशस्वीतेबद्दल खात्री नाही अशी कारणे असतात. तर जसे मूल मोठे होईल तसे आपोआप बरा होतो हा सर्वात मोठा गैरसमज वैद्यकीय क्षेत्रातही आहे याचे आश्चर्य वाटते.
वास्तविकता- बालकामध्ये ३-४ टक्के प्रमाण असणारा हा आजार पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्र असणाऱ्या शहरात या रुग्णांची संख्या ३०००च्या आसपास असेल. ग्रामीण भागात १० टक्क्यांनी हे जास्त प्रमाण असणार. अशा मुलाची तपासणी, निदान, उपचार व शस्त्रक्रियेची व्यवस्था कोठे आहे, या विषयातील तज्ज्ञ त्यावर शस्त्रक्रिया करू शकतात. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये अशा व्यवस्था दुर्मिळ व दुर्लक्षित आहेत. खासगीमधील व्यवस्था मोजक्या असून, त्या सामान्यांच्या आवाक्यात नाहीत, त्यामुळे सर्वसाधारण रुग्ण भरकटत फिरत असतो. त्याला नेमका, खात्रीलायक व शेवटचा उपाय देणारी शासकीय संस्था नाही.
१) वस्तुस्थिती अशी आहे, की तिरळय़ा डोळय़ांची दृष्टी
अधु-अपुरी किंवा क्षीण असते हे बहुतेकांना माहीत नाही.
२) लहान वयात उपचार शस्त्रक्रियेविना आणि सहित जास्त उपयोगी व दूरगामी असतात याची खात्रीपूर्वक माहिती नाही.
३) लवकरात लवकर दाखविले तर चष्मा, व्यायाम, औषधे यांनी उपयुक्त उपचार होऊन तिरळेपणा आटोक्यात येऊ शकतो.
४) शस्त्रक्रियेपूर्वी दृष्टी सुधारण्याचे-चष्म्याने व व्यायामाने, पूर्ण प्रयत्न करून मग शस्त्रक्रिया करावी लागते.
५) जरूर असेल तर लहान वयात दीड ते तीन वर्षांपासून या शस्त्रक्रिया यशस्वी होतात.
६) लहान मुलांना दिली जाणारी भूल ही नाकात नळी न घालता व गॅसेस न देता शिरेमधून यशस्वीरीत्या दिली जाते. डोळा बधिर करून हे काम सोपे होते.
७) एकाच वेळी दोन्ही डोळय़ांवर शस्त्रक्रिया करणे जरूर असते. खूप जुना तिरळेपणा, मोठा तिरळेपणा, दोन्ही डोळय़ांत आळीपाळीने दिसणारा तिरळेपणा, सामाजिक कारणासाठी दूर करावयास लागणारा तिरळेपणा, ही शस्त्रक्रियेसाठीची कारणे आहेत.
८) मोठय़ा वयात उशिरा शस्त्रक्रिया केल्यास दृष्टीत मोठी सुधारणा होत नाही. परंतु तिरळेपणा दुरुस्त होऊ शकतो.
९) जन्मजात डोळय़ाची वाढ न झालेल्या डोळय़ातील तिरळेपणा काढणे अशक्य असते.
१०) तिरळेपणासाठी डोळय़ाची सखोल तपासणी करताना डोळय़ातील अंत:पटलावरील जन्मजात आजार, मोतीबिंदू, शिरेचे आजार, अस्थिर डोळे, शिरांचा लकवा, दृष्टिमांद्य, चष्म्याचे नंबर लहान, मोठे यांचा शोध लागतो.
११) लहान वयातील उपचारात दृष्टीची सुधारणा, आतील आजारावरील उपचार, चष्मे यांचा उपयोग चांगला होतो.
१२) सर्वसाधारणपणे १/३ रुग्णांवर विनाशस्त्रक्रिया उपचार करता येतात. १/३ ना शस्त्रक्रियेची जरुरी पडते. काही रुग्णांना निरीक्षणासाठी, तर काहींना संपूर्ण उपचार नसतात.
१३) शस्त्रक्रिया ८० टक्के एका टप्प्यात करता येतात. १०-२० टक्के पुनश्च किंवा २-३ वेळा करावी लागते.
१४) ५-१० वर्षांखालील मुलांना चष्मा आणि व्यायामाचा उपयोग चांगला होतो.
१५) मोठय़ा वयातील २५च्या पुढेही मेंदूचे आजार, शिरांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिवाणूंचे तापाचे आजार यामुळे होतात. त्यांच्या इतर तज्ज्ञांकडून तपासण्या करणे जरुरीचे असते.
सामाजिक परिस्थिती
२५ वर्षांपासून तिरळेपणा दुरुस्त करण्याच्या शिबिराच्या अनुभवावरून हे लक्षात आले आहे, की जेथे शिबिरे नियमित होतात तेथे जागरूकता वाढली आहे. सुरुवातीला लग्नाच्या मुली फक्त ऑपरेशनला (नाईलाज म्हणून) तयार व्हायच्या. आता सहा महिन्यांच्या बालकापासून ते ७-८ वर्षांची मुलेही तपासणी व शस्त्रक्रियेसाठी तयार होऊ लागले आहेत. एक डोळा सरळ झालेला रुग्ण हा ब्रँड अम्बेसेडरचे काम करतो व त्या गावातील अनेक गरीब रुग्ण विश्वासार्हतेने सामील होऊ लागली आहेत. अमरावतीत सतत २१ वर्षे २५ शिबिरे केल्यावर दरवर्षी लग्न झालेल्या मुली पुढील
शिबिरात भेटून आनंद व्यक्त करतात तेव्हा कार्यपूर्वीचे समाधान मिळते.
तिरळेपणा निर्मूलन ही चळवळ दूरगामी व सर्वत्र चालावी यासाठी स्थानिक नेत्रतज्ज्ञांना तसेच शासकीय व सेवाभावी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वानी सहकार्य व आपापला वाटा उचलला तर ही वैयक्तिक, सामाजिक चळवळ यशस्वी होण्यास फारसा वेळ लागणार नाही. अमरावती, बारामती, अहमदनगर, चंद्रपूर, पुणे या जिल्हय़ांनी यात बरेच यश मिळविले आहे. ‘सर्व शिक्षा अभियान’च्या आरोग्य विभागातर्फे हे अधिक जोमाने करणे जरुरीचे आहे. कारण भविष्यातील एक तरुण पिढीचे यात मोठे नुकसान होत आहे. यादृष्टीने याकडे बघायला पाहिजे. मोतीबिंदू निर्मूलनाच्या कार्यक्रमात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शाळेत न जाणाऱ्या मुली व मुले, हरकाम करणारी व शेतकामातील गरीब मुलांचे प्रमाण खूप आहे व कोणत्याही शालेय आरोग्य तपासणीत समाविष्ट होत नाहीत. त्यासाठी मोफत शिबिरांची नितांत गरज आहे.
लवकर, लहान वयात निदान व लवकर उपचार-जरूर लागल्यास शस्त्रक्रिया हाच योग्य उपाय आहे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.

काय करायला पाहिजे?
ल्ल ज्या क्षणी तिरळेपणाची शंका आपल्याला किंवा हितचिंतकांना वाटेल त्यासाठी (तातडीची) तपासणी नेत्रतज्ज्ञांकडून करून घ्यावी. त्या ठिकाणी निदान होऊन लगेच उपचार सुरू करावेत.
ल्ल १ वर्षांच्या मुलाला चष्मा देता येतो हे लक्षात ठेवावे.
ल्ल मुलांच्या दृष्टीमध्ये सुधारणा होईल याचे प्रयत्न चालू केले पाहिजेत.
ल्ल फार मोठा तिरळेपणा, बरेच दिवस सुधारणा नाही, दोन्ही डोळय़ांत आळीपाळीने तिरळेपणा असला तर शस्त्रक्रिया करणे जरूर आहे याचे लक्षण आहे.
ल्ल शस्त्रक्रिया सांगितल्यावर तसे करणाऱ्या तज्ज्ञांचा दुसरा सल्ला घेणे संयुक्त ठरते.
ल्ल लहान वयात व दोन्ही डोळय़ांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया करणे योग्य व जरुरीचे असते. त्याविषयी दुसरे मत घेतले तर उत्तम.
ल्ल अनुवांशिकता काही प्रमाणात शक्य आहे हे लक्षात ठेवावे.
ल्ल सर्वसाधारणपणे ६ महिने चष्मा. व्यायाम, औषधे, उपचार करूनही सुधारणा नसेल तर लहान वयातही शस्त्रक्रिया करणे जरुरीचे असते.
ल्ल शस्त्रक्रियेनंतर चष्मा व व्यायाम लागू शकतो. काही दिवस चालू ठेवावा लागतो.
ल्ल तिरळेपणाची शस्त्रक्रिया ही नंबर कमी करण्याची नाही. त्याने नंबर जातही नाही आणि कमीही होत नाही.

First Published on January 16, 2013 5:52 am

Web Title: cross eyed problem ignored on misunderstanding 2
टॅग Eyes,Health,Health-it
  1. No Comments.