माणसाच्या मेंदूच्या वाढीवर प्लास्टिक व रेझिनमध्ये असलेल्या रसायनांचा खूप वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. डय़ुक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार बिसफेनॉल-ए (बीपीए) या रसायनामुळे चेतापेशींच्या कार्याशी संबंधित जनुकाचे काम बिघडते व परिणामी चेतासंस्थेच्या विकासावर परिणाम होतो. उंदीर व माणसातील कॉर्टिकल न्यूरॉन्सवरही असा परिणाम दिसून आला आहे. आमच्या अभ्यासानुसार बीपीएमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे, असे या संशोधनाचे प्रमुख लेखक वुल्फगँग लिटके यानी म्हटले आहे. ‘बीपीए’ या रेणूमध्ये ऑस्ट्रोजेनची नक्कल असते, त्यामुळे हे रसायन संप्रेरक प्रणालीत हस्तक्षेप करीत राहते.थर्मल प्रिंटर पेपर, प्लास्टिकच्या बाटल्या व मेटल कॅनमध्ये हे रसायन आढळून येते. हे रसायन अन्नात किंवा पेयात मिसळले तर ते पचनसंस्थेत येते. बीपीएमुळे वर्तनात फरक पडत जातो, संप्रेरके व पुनरूत्पादन प्रणाली यात बिघाड होतो; परिणामी लठ्ठपणा, कर्करोग व प्रतिकारशक्तीशी संबंधित रोग होतात. लहान मुले व तरूण मुले हे बीपीएच्या वाईट परिणामांना बळी पडतात असे दिसून आल्याने बेबी बॉटल व कप यात जुलै २०१२ पासून बीपीएचा वापर करण्यास अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. बीपीएमुळे ‘रेट सिंड्रोम’ हा विकार होतो, त्यामुळे स्वमग्नता येते. पण हा स्वमग्नतेचा प्रकार मुलींमध्ये आढळतो, त्यात जनुकीय उत्परिवर्तन हे प्रमुख कारण असते. याबाबतचे संशोधन ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
‘एक्स मेन’सारखे मानव येत्या तीस वर्षांत अस्तित्वात
कॉमिक बुकमध्ये आपल्या कल्पनेपलीकडील गोष्टी करून दाखवणारे सुपरहीरो लवकरच प्रत्यक्षात तयार होणार आहेत. जनुकीय प्रयोगांच्या मदतीने येत्या तीस वषार्र्त असे अचाट सुपरमॅन जन्माला येतील, असा दावा इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
 ‘एक्स मेन’ चित्रपटात जे व्हाल्वरिन, स्टॉर्म व एक्स मेन ही पात्रे दाखवली आहेत, तसे मानव प्रत्यक्षात जन्माला घालता येऊ शकतील असे काही वैज्ञानिकांनी संरक्षण मंत्रालयाच्या वैचारिक गटाला सांगितले. जनुकीय तंत्रज्ञानाने येत्या २०४५ पर्यंत असे वेगळ्या प्रकारचे मानव तयार केले जातील. मानवाची कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी येत्या ३० वर्षांत असे सुपरमॅन तयार करता येतील. यात जनुकीयदृष्टय़ा असमानता निर्माण होऊ शकते. संरक्षण मंत्रालयाच्या डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड डॉक्टरिन सेंटरची बैठक गेल्या उन्हाळ्यात झाली होती, त्यात वेगवेगळी विद्यापीठे, उद्योग व सरकारी तज्ज्ञ यांची बैठक झाली होती. त्यात नेमकी काय माहिती मांडण्यात आली हे अजून बाहेर आलेले नाही, असे ‘द सन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘एक्स मेन’ ही काल्पनिक मानवाची संकल्पना १९६० मध्ये उदयास आली, त्यात ह्य़ूज जॅकमन याने व्हॉल्वरिनची या अतिशय वेगळ्या शक्ती प्राप्त असलेल्या सुपरमॅनच्या पात्राची भूमिका केली होती.
‘दुपारचे जेवण भरपूर, रात्रीचे कमी’ हाच आरोग्याचा मूलमंत्र
राजासारखे दुपारचे भोजन व भिकाऱ्यासारखे (म्हणजे कमी) रात्रीचे जेवण हा शरीर सडपातळ राखण्याचा मूलमंत्र योग्यच आहे असे संशोधकांनी म्हटले आहे. घडय़ाळाच्या विरुद्ध दिनक्रम, रात्री उशिरापर्यंत काम, अयोग्य पदार्थाचे सेवन यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात व त्यात चयापचयाच्या क्रियेवरही परिणाम होतो. ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे, की आपण काय खातो याच्याइतकेच केव्हा खातो हे महत्त्वाचे आहे हे उंदरांवरील प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. चोवीस तासांच्या दैनिक लयीनुसार इन्शुलिनची क्रिया कमी-जास्त होते. जे उंदीर या ना त्या कारणाने खाण्याच्या वेळा पाळत नाहीत ते लठ्ठ होतात. त्यांच्यात इन्शुलिनची क्रिया व्यवस्थित होत नाही.
व्हँडरबिल्ट विद्यापीठाचे कार्ल जॉनसन यांच्या मते दिवसातील प्रत्येक वेळेला शरीरात चयापचयाच्या क्रिया बदलत असते. जॉनसन यांच्या चमूने वेगवेगळ्या वेळांना उंदरांमधील इन्शुलिनचे प्रमाण मोजले. उंदरांमध्ये काही जनुकीय कारणे व सतत प्रकाशाला सामोरे गेल्याने त्यांना खाण्याच्या वेळा पाळता येत नाहीत त्यामुळे त्यांची लय बिघडते परिणामी त्यांचे वनज वाढते. दिवसाच्या प्रत्येक वेळी इन्शुलिनला दिला जाणारा प्रतिसाद बदलत असतो. जॉनसन यांनी असा दावा केला आहे, की उत्क्रांतीमध्येही लय सांभाळणाऱ्या व आंतरिक स्थितीला अनुकूल प्रतिसाद देणाऱ्या प्राणी तसेच वनस्पतींना झुकते माप मिळाले आहे. भूमध्यसागरी आहारात (मेडिटेरिनियन डाएट) मुख्य जेवण हे दिवसाच्या मध्यावर असते व तेच आरोग्याला हितकर असते असे जॉन्सन यांचे मत आहे. रात्रीचे जेवण हलके असावे व त्यानंतर स्नॅक्स खाण्याचे टाळावे. केवळ आहाराचे प्रमाण कमी करून फार फायदा होत नाही तर दुपारचे जेवण पुरेसे व चौरस तर रात्रीचे जेवण माफक हे नियम पाळले तरच आरोग्यावर चांगले परिणाम दिसतात.
भूमध्यसागरी आहारामुळे ह्रदयविकार पक्षाघाताची शक्यता तीस टक्क्य़ांनी कमी
भूमध्यसागरी आहाराचा ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम या विषयावरील संशोधनात हे निष्कर्ष हाती आले आहेत. या आहारात ऑलिव्ह तेल, मासे, फळे, भाज्या, बीन्स यांचा समावेस आहे. या आहारामुळे वजन कमी झाल्याचे दिसले नसले तरी त्यातील बहुतेक लोक स्टॅटिन व रक्तदाब कमी करण्याच्या गोळ्या घेत होते त्यांना ह्रदयविकार आटोक्यात ठेवण्यास मदत झाली व्हर्माट विद्यापीठाच्या न्यूट्रीशन विषयाच्या प्राध्यापक राशेल जॉनसन यांनी सांगितले की, हे निष्कर्ष निश्चितच प्रभावी आहेत. यात ह्रदयविकाराचा झटका, पक्षाघात व मृत्यू हे वेगळे निकष विचारात घेतले आहेत. भूमध्यसागरी देशात ह्रदयविकाराचे प्रमाण कमी आहे व ते आहारामुळे आहे असे मानले जाते त्यामुळे या आहाराचे जास्तीत जास्त संशोधन केले जात आहे. बार्सिलोना विद्यापीठातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ.रॅमन एस्ट्रच व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पेनमधील ७४४७ लोकांची तपासणी करून हे निष्कर्ष काढले आहेत.