वार्धक्याची चिन्हे म्हणजे सुरकुत्या, डोळ्याभोवतीची वर्तुळे दिसू लागली की, आरसा आपला शत्रू बनतो. नकळत आपल्याला संध्याछाया घाबरवून लागतात, पण वार्धक्याची ही प्रक्रियाच मंदावता आली तर फार छान होईल, त्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत. अलीकडच्या संशोधनानुसार तारुण्याच्या संवर्धनासाठी बोटक्स इंजेक्शनची गरज नाही. त्याला आता हायड्रोजन सल्फाइड हा नवीन पर्याय सामोरा आला आहे. हायड्रोजन सल्फाइड म्हणजे एच टू एस हा पूरक म्हणून वापरला तर त्यामुळे वार्धक्याशी निगडित आजार दूर राहतात व वार्धक्याच्या खुणाही तुमच्या वाटेला येत नाहीत असा संशोधकांचा दावा आहे. चीनमधील अभ्यासानुसार हायड्रोजन सल्फाइड हे संयुग वार्धक्यावर अनेक प्रकारे मात करते. हृदय व मेंदूच्या कार्यप्रणालीवर त्याच्या रेणूंचे चांगले परिणाम दिसून आले आहेत, जर्नल मॉलेक्युलर अँड सेल्युलर बायॉलॉजी या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. हायड्रोजन सल्फाइडमुळे मुक्तकणांच्या क्रिया मंदावतात. त्यासाठी एसआयआरटी वन हे वितंचक क्रियाशील केले जाते, परिणामी तुमचे आयुष्य वाढते. या वितंचकाची क्लोथो नावाच्या जनुकाशी जी प्रक्रिया होते त्यावर माणसाचे आयुष्य अवलंबून असते. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यावरून हायड्रोजन सल्फाइड हा पुढील काळात वार्धक्यरोधक औषधातील प्रमुख घटक असणार आहे, असे साउथ चायना युनिव्हर्सिटीचे झी शेंग जियांग यांनी सांगितले. लोकांना हायड्रोजन सल्फाइड हे अन्नाच्या मदतीनेही मिळत असते किंवा पूरक म्हणूनही त्याचा समावेश करता येतो. हायड्रोजन सल्फाइड हे मानवी शरीरात तयार होते. त्याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. हृदयातील एंडोथेलियम स्नायू व स्नायूंच्या पेशी विश्रांत होण्यास त्यामुळे मदत होते. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील अवरोध दूर होतो. ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. वेदना व इतर लक्षणे निर्माण करणाऱ्या जनुकांची आविष्कृती त्यामुळे रोखली जाऊन वार्धक्याला विरोध होतो. ज्या उंदरांमध्ये सीएसइ हे  हायड्रोजन सल्फाइडच्या निर्मितीस कारणीभूत असलेले वितंचक नसते त्यांच्यात हृदयविकार लवकर बळावतो. क्लोथो नावाचे जनुक हे हायड्रोजन सल्फाइडमुळे नियंत्रित होत असते व या जनुकामुळे आयुष्यकाल वाढतो. कारण त्यामुळे शरीरात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट तयार होत असतात.