पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा, साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात. सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.
बिया काढलेल्या खारकेची पूड, किसून मंद भाजलेले सुके खोबरे, बदामाची भरड पूड किंवा काप, भाजून कुटलेली खसखस हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यात थोडी कुटलेली खडीसाखर घातली की पंचखाद्य तयार! हा प्रसाद टिकाऊ असतो, शिवाय थोडा जास्त खाल्ला गेला तरी त्याने सहसा पोट बिघडत नाही. भरपूर पळापळ करणाऱ्या लहान मुलांसाठी किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी पंचखाद्य पौष्टिक आहे. अशा लोकांना ते एरवीही अधूनमधून एखादा चमचा तोंडात टाकता येईल. पंचखाद्यातील सर्व पदार्थाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले गुण पाहूयात-
सुके खोबरे : खोबऱ्यात उष्मांक खूप असतात. १०० ग्रॅम खोबऱ्यात ३५४ उष्मांक आणि ८२ टक्के स्निग्धांश असतात. खोबऱ्यातले स्निग्धपदार्थ संपृक्त (सॅच्युरेटेड) प्रकारचे आहेत. पण त्यातील ‘लॉरिक अ‍ॅसिड’ शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल कोलेस्टेरॉल) वाढवायला मदत करते. खोबऱ्यात तांबे, लोह व मँगेनीज ही खनिजे आणि बरीचशी ‘बी’ जीवनसत्त्वेही आहेत. खोबऱ्यात पोटॅशियमदेखील चांगल्या प्रमाणात असते. साधारणत: १०० ग्रॅम खोबऱ्यातून व्यक्तीची सात दिवसांची पोटॅशियमची गरज भागते. खोबऱ्यात काही चांगल्या गोष्टी असल्या, तरी त्यातील उष्मांक आणि स्निग्धपदार्थ विसरून चालणार नाही. एखाद्याने एक कप खोबरे खाल्ले तर ते जाळायला किती व्यायाम करावा लागेल अशी नुसती कल्पना करून बघू! एक कप खोबऱ्यात साधारणत: ५४७ उष्मांक असतात, एवढे उष्मांक जाळण्यासाठी त्या व्यक्तीस जवळपास १५० मिनिटे चालावे लागेल!
खसखस : खसखशीतही भरपूर स्निग्धांश आहेत, पण त्यात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाणही चांगले आहे. खसखशीतले ‘ऑलिक अ‍ॅसिड’ हे ‘मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड’ आहे. ते शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) कमी करण्यासाठी मदत करते. खसखशीच्या दाण्याच्या वरच्या बाजूच्या आवरणात असलेले तंतुमय पदार्थदेखील एलडीएल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. खसखशीत ‘बी काम्प्लेक्स’ जीवनसत्त्वे भरपूर आहेत, तसेच लोह, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व मँगेनीज हे घटकही त्यात आहेत. खसखस आणि खोबरेही खिरापतीत योग्य प्रमाणातच घालावे.
खारीक : खारकेत जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खजिनाच आहे. त्यात ‘टॅनिन’ हे अँटिऑक्सिडंट आहे. हे अँटिऑक्सिडंट संसर्गरोधक आणि सूज कमी करणारे म्हणून काम करते. खारकेतील ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. लोह, कॅल्शियम, पोटॅशियम हे घटक, ‘बी- कॉम्प्लेक्स’- त्यातही ‘बी-६’ जीवनसत्त्वाचे प्रमाण खारकेत उत्तम आहे. पोटॅशियम हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी व रक्तदाब योग्य राहावा यासाठी मदत करत असल्यामुळे हृदयरोगापासून प्रतिबंध करण्यासाठीही ते उपयुक्त ठरते. खारकेतील ‘बीटा कॅरोटिन’ आणि ‘ल्युटिन’ ही ‘फ्लॅव्हेनॉईड अँटिऑक्सिडंट्स’ शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. खिरापतीत इतर पदार्थापेक्षा खारकेचे प्रमाण वाढवून चालेल.
बदाम : बदामातही स्निग्धोदार्थ भरपूर आहेत. मात्र त्यातले स्निग्धांश ‘मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड’ प्रकारचे आहेत. यात असलेले ‘ओलिक अ‍ॅसिड’ पाल्मिटोलिक अ‍ॅसिड’ वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतात. बदामात ‘ई- व्हिटॅमिन’ चांगल्या प्रमाणात असून ते त्वचा आणि शरीरातील अवयवांचे अस्तर यासाठी उपयुक्त ठरते. १०० ग्रॅम बदामांमध्ये २५ ग्रॅम ई-व्हिटॅमिन मिळते. ‘बी-कॉम्प्लेक्स’, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम हे घटकही त्यात आहेत. तंतुमय पदार्थही बदामात आहेत. मात्र बदाम खाताना त्यातील उष्मांकाचाही विचार करायला हवा. १०० ग्रॅम बदामात जवळपास ५४६ उष्मांक आणि ४७ ग्रॅम स्निग्धांश असल्यामुळे बदाम फार खाणे योग्य नव्हे.
खडीसाखर- खडीसाखर ही पूर्णत: ‘रिफाईन’ केलेली नसल्यामुळे त्यातली मूळची काही खनिजे टिकून राहिलेली असतात. पण तरीही त्यात पिष्टमय पदार्थच (काबरेहायड्रेट्स) भरपूर आहेत. पंचखाद्यात खडीसाखर प्रामुख्याने गोडी वाढवण्यासाठीच घालत असल्यामुळे खिरापत जास्त खाल्ली जाणार असेल, तर त्याचे प्रमाण कमी केलेले चांगले.
डॉ. वैशाली मंदार जोशी – drjoshivaishali@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…