सगळ्यांना घाबरवणारा एक आजार म्हणजे कर्करोग. पण वेळेत योग्य उपचार केले गेले, तर कर्करोगसुद्धा बरा होऊ शकतो. आधी कर्करोग झाल्याचे सत्य स्वीकारायला हवे. मग आपण बरे होणारच आहोत हा आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा म्हणजे कर्करोगाशी मुकाबला करणे सोपे जाते आणि कर्करोगमुक्त होता येते. मात्र, या साऱ्या वाटचालीत योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. असे योग्य मार्गदर्शन करणाऱ्या काही हेल्पलाइन्स आहेत. आज त्यांची माहिती घेऊ या.
कॅन्सर पेशंटस् एड असोसिएशन, मुंबई ही कर्करोगाच्या रुग्णांना आपल्या आजाराचे सर्वागीण व्यवस्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारी संस्था आहे. कर्करुग्णांना लवकर बरे करण्यासाठी योग्य उपचारांबरोबरच त्यांना मानसिक आधार देऊन त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची आवश्यक ती काळजी घेणे, मदत करणे, त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन व मदत करणे, कर्करोगग्रस्तांचे तसेच कर्करोगमुक्तांचे समाजात पुनर्वसन करणे आदी कामे या संस्थेतर्फे केली जातात. त्याचबरोबर कर्करोगाविषयी समाजात जागृती करणे हे महत्त्वाचे काम या संस्थेतर्फे केले जाते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २४९२४०००, ०२२ २४९२८७७५.

इंडियन कॅन्सर असोसिएशन, मुंबई हीसुद्धा असेच कार्य करणारी संस्था आहे. कर्करोगाविषयी समाजात जागृती निर्माण करणे, कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे, बाहेरगावच्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची राहाण्याची सोय करणे, रुग्णांचे आधारगट तयार करणे, शिवाय कर्करोगग्रस्तांची माहिती गोळा करून त्यांची नोंद करणे अशी महत्त्वाची कामे या संस्थेचे स्वयंसेवक करतात. त्याच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २३५१३०२८, ९९६९३२७८३७.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई हे हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे. भारताच्या सर्वच भागांमधून या रुग्णालयात उपचारांसाठी रुग्ण येतात. अत्याधुनिक उपचारांची येथे सोय आहे. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २४१७७०००.
आयुसंजीवनी चिकित्सा, मुंबई या संस्थेतर्फे कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार करून त्या रुग्णांना बरे केले जाते. उपचारांदरम्यान रुग्णांना सर्वतोपरी मदत केली जाते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २५२१२३९०, ९८६९८५११९४.

– शुभांगी पुणतांबेकर