|
|
 शनिवार, १७ ऑक्टोबर २००९ मुकुंद टाकसाळे -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळीच्या फराळाचे बकाणे तोंडात टाकताना वाचावा असा खमंग, कुरकुरीत लेख- मीगेल्या वर्षी व्हीआरएस घेतली आणि नातेसंबंधांना उजाळा देण्याची जंगी मोहीमच हाती घेतली. आपसातील नातेसंबंध टिकवून धरण्यासाठी दिवाळीसारखा सण नाही. एकमेकांकडे फराळाला किंवा जेवायला जायचं आणिनाती टिकवायची, ही आपल्या संस्कृतीतील मोठी मनोहारी परंपरा आहे.
शिळ्या गुलाबाच्या गुच्छावर पाणी मारल्यावर तो जसा टवटवीत होतो, तसं नष्ट झाल्यागत नात्यांवर दिवाळीतील फराळाचा किंवा जेवणाचा शिडकावा केला की नातेसंबंध नव्याने बहरून येतात, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. मी नाते-नूतनीकरणाची मोहीम गेल्या वर्षांपासून हाती घेण्याचं आणखी एक कारण असं होतं की, गेल्या वर्षी आम्ही ‘मारुती अल्टो’ कार घेतली. आता ती बाहेर तरी कधी काढायची? दिवाळीत काढली तर त्यानिमित्ताने चार नातेवाईकांच्या नजरेस पडणार होती. दुसरी गोष्ट- दोन वर्षांपूर्वी आमचा रोहन ‘इन्फोसिस’मध्ये लागला. त्याचा परिणाम म्हणून आम्ही गेल्या वर्षी आमच्या राहत्या फ्लॅटच्या शेजारचाच फ्लॅट विकत घेऊन आतून जोडला. डहाणूकर कॉलनीत सहा खोल्यांचा फ्लॅट म्हणजे नो ज्योक! आमच्या तमाम नातेवाईकांनी या टोलेजंग फ्लॅटला एकदा का होईना भेट द्यावी, अशी माझी आणि माझ्या सुविद्य पत्नीची इच्छा होती. नातेवाईकांना आवर्जून घरी बोलावण्याचं आणखी एक कारण होतं. आमच्या बिल्डिंगमधले चौथ्या मजल्यावर राहणारे घोटीकर वारले आणि आमच्या सुदैवाने त्यांच्या जागी अभ्यंकर नावाच्या बाई राहायला आल्या. त्या पुरणपोळी, गुळाची पोळी, पुलाव, मोदक असे विविध घरगुती पदार्थ ऑर्डरबरहुकूम करून विकायच्या. त्यांच्याकडल्या रेशमासारख्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्यांना जगात तोड नव्हती. अभ्यंकरबाई आल्यापासून आमच्या बिल्डिंगमध्ये पुरणपोळीचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. मला तर कधी कधी त्यामुळे बिल्डिंगचं नाव बदलून ‘पुरणपोळी’ असं ठेवावं असं वाटायचं. शिवाय घरी स्वयंपाक करणं ही आता पूर्वीसारखी कष्टाची गोष्ट राहिली नव्हती. पोळ्या करण्यासाठी आणि वरकामासाठी हाताखाली बाई असायची. ती भाज्या निवडून तयार ठेवायची. त्या नुसत्या फोडणीला देणं, हे घरच्या गृहिणीला अवघड नव्हतं. गंमत म्हणजे व्हीआरएस घेतल्यावर मीही ते कौशल्य आत्मसात केलेलं होतं. तशात मुख्य पक्वान्न (उदाहरणार्थ- चितळ्यांचं आम्रखंड किंवा चितळ्यांनीच नव्याने बाजारात आणलेले चतुर्थीचे मोदक, काका हलवाईकडली शुद्ध तुपातली जिलेबी) सुप्रसिद्ध दुकानांच्या फ्रॅन्चाइजी उपनगरांत झाल्यानं घराजवळ विनासायास मिळू लागले होते. त्यांच्या जोडीला काका हलवाईंची अळूवडी, कोथरूडच्या ‘सुरुची’चे पाकातले चिरोटे, ‘जोशी’ज्मधील कोथिंबीरवडी हेही पदार्थ आता सर्वत्र मिळू लागले होते. मी जेवायला बोलवायचा घाट घातल्यावर आमच्या पुणेरी नातेवाईकांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांनासुद्धा आम्हा साऱ्या नातेवाईकांना बोलावणं भाग पडू लागलं. मनातल्या मनात शिव्या देत देत ते हे करत असले तरी त्यामुळे आपापसातील जिव्हाळा, प्रेम चांगलंच वाढीस लागलं, हे नाकारण्यात अर्थ नव्हता. आमच्या कुटुंबाला जेवायला बोलावणं तर सर्वच जवळच्या-लांबच्या नातेवाईकांना कम्पलसरीच होतं. आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं अशातला भाग नव्हता. खरी गोष्ट अशी होती की, अभ्यंकरबाईंच्या सुग्रणपणाची ख्याती हा-हा म्हणता आमच्या सर्व नातेवाईकांच्यात एव्हाना पसरली होती. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या घरी जेवणाचा घाट घातला की ते त्यांच्या पदार्थाची ऑर्डर आमच्या घरी फोन करूनच नोंदवायचे. मग मी गुडघे दुखत असतानाही चार जिने चढून ती ऑर्डर अभ्यंकरबाईंपर्यंत पोहोचवायचो. गुडघे दुखताहेत म्हणून कुणाचं मन दुखावणं जिवावर यायचं. त्यामुळे आम्ही आल्याखेरीज कुणाकडलीच जेवणं सुरूच व्हायची नाहीत. कायम खाद्यपदार्थाची वाहतूक केल्यानं आमच्या कारमध्ये अन्नाचा वास सदैव भरून असायचा. कॅटरिंगच्या टेम्पोतून प्रवास करतोय, असं वाटायचं. मी व्हीआरएस घेतलेली असल्यानं पुणे उपनगरांतल्या सर्व बहिणींची (राहणार अनुक्रमे बिबवेवाडी, वानवडी आणि खराडी. गमतीनं मी त्यांना ‘डी गँग’ म्हणायचो.) आणि चिंचवड प्राधिकरणात राहणाऱ्या थोरल्या भावाची अपेक्षा मीच ‘गमतीगमतीत’ कार चालवत यावं आणि पुरणपोळीची डिलिव्हरी करावी, अशी असायची. मला तर या ‘नव्या डय़ुटी’पेक्षा पहिली नोकरी अधिक बरी, असं वाटू लागलं. नातेवाईकांकडं डिलिव्हरी दिल्यावर ते श्रमपरिहार म्हणून त्यातलीच एखादी पुरणपोळी मला खायला द्यायचे. अभ्यंकरबाईंची आणखी एक गंमत होती. त्या कमीत कमी पंचवीस पोळ्यांची ऑर्डर घ्यायच्या. त्यामुळे बहुतेक नातेवाईक ‘वरच्या पाच तुमच्याकडे ठेवा,’ असं दरवेळी उदार मनानं म्हणायचे. (त्याशिवाय घरपोच डिलिव्हरी आम्ही देणार नाही, अशी भीती त्यांना वाटत असावी.) परिणाम असा झाला की, आम्ही जवळजवळ रोजच पुरणपोळ्या खाऊ लागलो. काही दिवसांतच माझं पोट गणपतीप्रमाणे गरगरीत दिसू लागलं. (मला डायबेटीस नव्हता म्हणून बरं; नाही तर वाटच लागली असती.) माझ्या बायकोला मात्र तातडीने जीम लावावी लागली. कधी कधी गमतीनं माझ्या मनात विचार यायचा की, आपण खर्ची पडणारा वेळ आणि पेट्रोल आणि रोजचे चार जिने चढा-उतरायचा त्रास या साऱ्यांची भरपाई म्हणून सर्वच नातेवाईकांना दहा-वीस टक्के कमिशन आकारावं. पण हा झाला विनोदाचा भाग! प्रत्यक्षात अशा पद्धतीनं नातेवाईकांकडून कमिशन खाण्याची गोष्ट माझ्या मनाला शिवणंसुद्धा शक्य नव्हतं. यथावकाश प्रत्येक नातेवाईकाकडं कार आल्यानं कारचं अप्रूप संपलं. आता कुणाच्या घरी जेवायला बोलावलं की ते संकट वाटू लागलं. वाहतुकीच्या कोंडय़ा फोडत फोडत दूरवरच्या उपनगरांत जाणं तसं सोपं राहिलं नाही. आमच्या मुलांना तर कोणत्याच नातेवाईकाकडं जायचं म्हटलं की अंगावर काटा येऊ लागला. ‘अरे, एकमेकांकडे गेल्याशिवाय संबंध राहणार आहेत का?’ असं मी कळवळून पोरांना विचारायचो. पण त्यांना ना माणसांत इंटरेस्ट, ना मराठमोळ्या खाद्यपदार्थात. थालीपीठाऐवजी पिझ्झा आणि बटाटेवडय़ाऐवजी बर्गर आणि पोह्य़ाऐवजी मॅगी नूडल्स आवडणारी आणि खऱ्या रिलेटिव्हजपेक्षा ‘फ्रेन्ड्स’ना भेटायला आवडणारी ही पोरं दिवाळीत कुठल्याच नातेवाईकाकडं जाण्याचं नाव काढायची नाहीत. तशात प्रत्येकाच्या घरी एखाद्या तरी मुलाची किंवा मुलीची दहावी किंवा बारावी नातेवाईकांच्या पाचवीला पुजलेली. म्हणजे अगोदरच्या वर्षांपासून क्लासेस सुरू. आणि सलग चार वर्षे घरातल्या साऱ्यांना कुठल्याही नातेवाईकांकडं न फिरकण्याची अधिकृत सूट! पुण्यात शिक्षणाचं एवढं महत्त्व का आहे, ते अशावेळी ध्यानात येतं. आमच्या धाकटय़ा बहिणीचे मिस्टर परागराव महाचतुर. ते ऐन दिवाळीच्या तोंडावरच महाबळेश्वर, माथेरान, माऊंट अबू असं कुठेतरी बायकापोरांसकट पर्यटन काढायचे. कुणाला बोलवायला नको आणि कुणाकडे जायला नको. सुरुवातीच्या काळात ते असेच ठोसेघरला निघाले असताना आई धाकटय़ा बहिणीला ठणकावून म्हणाली, ‘ऐन दिवाळीत आम्हा नातेवाईकांच्या तोंडावर ठोसे मारून आणि स्वत:चं घर सोडून तुम्ही ठोसेघरला जाताहात, हे मला तरी काही प्रशस्त वाटत नाही.’ पण परागरावांनी सासूबाईंना धाब्यावर बसवून दिवाळी पर्यटन पार पाडलंच. या जेवणाच्या गडबडीत आमच्या आयुष्यातलं काही महत्त्वाचं हातून निसटत आहे, हे आम्हा साऱ्यांच्याच लक्षात यायला लागलं. उदाहरणार्थ-‘आयडिया सारेगमप’सारखा कार्यक्रम. जेवायला बोलावणारा यजमान संघ सोडल्यास पाहुण्यांपैकी कुणालाच या दर्जेदार संगीताच्या कार्यक्रमाची मौज लुटता येईना. तो चालू असताना आम्ही सारे प्रवासात असायचो. असे छोटे छोटे आनंद ऐन दिवाळीतच हातून निसटू लागले तर जगण्यातली सारी गंमतच निघून जायची, अशी खंत आम्हाला वाटू लागली. पण ही कोंडी कशी फोडावी, ते आम्हाला काही उमजत नव्हतं. आमचे डॉक्टर असणारे मेहुणे दीपकराव यांनीच ही कोंडी फोडली. आम्ही आमच्या घरी जेवणाचा बेत ठरवला होता. तर ते सडेतोडपणे म्हणाले, ‘अहो, आमच्या अलकनंदाच्या सासरचे यायचेत उद्या जेवायला. तेव्हा नाही जमायचं. आता मुलाबाळांचे नातेवाईक आले आणि आपण कुठं आपापसात जेवणावळी घालत बसायचं?’ हे ‘ते’ म्हणाले म्हणून बरं झालं. आम्ही म्हणालो असतो तर आमचं तोंड दिसलं असतं. पण तरीही मी म्हणालो, ‘तसं नाही- वर्षांतून एकदा आपण जेवायला भेटतो..’ ‘थांबा. काय मेनू आहे तुमच्याकडे?’ दीपकरावांनी एकदम विचारलं. ‘आँ?’ मी गडबडलो. ‘काय बेत आहे, सांगा मला.’ ‘अं.. रोज रोज पुरणपोळ्या खाऊन कंटाळा आलाय. तेव्हा चितळ्यांचं आम्रखंड आणणार आहोत.’ ‘ठीकय. आमच्या कोपऱ्यावरच त्यांची फ्रॅन्चायजी आहे. तिथून मी ते आणतो आज. आणि तुमची आठवण काढून खातो. आणखी काय बेत आहे?’ ‘काका हलवाईकडल्या अळूवडय़ा आहेत.’ ‘आमच्या भागात तेही दुकान आहे. आणतो मी. आणखी?’ ‘लिज्जतचे पापड.’ ‘नो प्रॉब्लेम. आम्ही तेच वापरतो. मी सांगतो हिला तळायला आणि श्रीखंडाबरोबर पोळ्या आहेत की नाही?’ ‘पोळ्या आहेत ना!’ ‘वहिनी करणार आहेत का?’ ‘छे छे! पोळ्यावाल्या बाईकडून करून घेणार आहोत.’ ‘गुड. म्हणजे वहिनीच्या हाताची चवबीव असलं काही नाही. मग आमच्या नावाच्या पोळ्या तिच्याकडून करून घ्या. मी उद्या सकाळी ड्रायव्हरला पाठवतो. त्याच्याबरोबर पाठवून द्या. गरम गरम पुऱ्या त्या बाई करून खायला घालणार असतील तर त्या बाईंनाच गाडीतून पाठवा. आम्ही जेवताना त्यांच्याकडून पुऱ्या करून घेतो आणि नंतर गाडीतून सुखरूप त्यांची पाठवणी करतो.’ हे ऐकून मला हायसे झाले. कारण आम्ही जुनी अल्टो बदलून नवीन ‘ह्य़ुंदाई आय १०’ घेतली होती. तेव्हापासून अभ्यंकरबाईंनी केटरिंग सेवा बंदच करून टाकली होती. प्रत्येकजण त्यांच्याकडला माणूस पाठवून अभ्यंकरबाईंकडून थेटच खाद्यपदार्थ हस्तगत करू लागला होता. येता-जाता आमच्या घरी कुणी डोकावला तर बायकोला किंवा मला चहा करावा लागत होता. पण नातेवाईकांसाठी इतके कष्ट घेणं हा आमच्या आनंदाचाच भाग होता. दीपकराव पुढे म्हणाले, ‘भात-वरण रोज लावतो आम्ही. तो करणार नसाल आणि अभ्यंकरबाईंकडला पुलाव मागवणार असाल तर तोही डब्यातून पाठवून द्या. म्हणजे तुमच्याकडेच जेवल्यासारखे होईल. शिवाय प्रवासाचा वेळ वाचेल. ट्रॅफिक टळेल. आणि शिवाय तुम्ही रात्री ‘आयडिया सारेगमप’ बघायला मोकळे! ती उर्मिला धनगर काय गात्ये म्हणून सांगू!! कळीदार कपुरी पान, कोवळं छान, वर्खाचा विडा.. लल्लला लाल लालला.. अं अं अं अं.. ड ड डा डा घ्या हो मनरमणा..’ व्वा!’ शेवटचं गाणं त्यांनी चाल आणि शब्द चुकवून गाऊन दाखवलं आणि स्वत:लाच ‘व्वा!’ अशी दाद दिली. सध्याच्या दिवाळीत दीपकरावांचा आदर्श समोर ठेवून आम्ही हीच सुटसुटीत प्रथा पाडलेली आहे. ज्याच्याकडे जेवण असेल त्यानं ई-मेलवरून किंवा एसेमेसवरून मेनू कळवायचा. (फोन केला की फालतू गप्पा उगाचच मारल्या जातात.) मग आम्ही ते पदार्थ आमच्या आजूबाजूच्या दुकानांतून आणून स्वत:च्याच घरी जेवायचं. ट्राफिकमध्ये कुठं जायला नको, न यायला नको. प्रत्येकाकडे जेवणात ‘नेहमीच्याच यशस्वी दुकानांतले’ पदार्थ असल्यानं साऱ्यांना एकाच चवीचा स्वैंपाक खाल्ल्याचा आनंद मिळतो. नाही म्हणायला प्रत्येकाच्या घरातल्या वरण-भाताची चव मात्र वेगवेगळी असते. आपापसात बोलण्यासारखं कधीच काही नव्हतं. त्यामुळे या अभिनव जेवणावळीत तोही वेळ वाचतो! मुख्य फायदा म्हणजे परस्पर नातेसंबंध आणि त्यातला जिव्हाळा शंभर टक्के शाबूत राहतो. आणखी काय हवं?
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|
takasaleji, your article is fantastic. thank you very much for writing such article. belated happy diwali
by
bhagyshri