|
|
|
चौथा स्तंभ विकला गेला आहे!
|
|
|
|
बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ अंकुश काकडे संसदीय लोकशाहीत चार स्तंभ अतिशय महत्त्वाचे मानले जातात. पहिला संसद-विधिमंडळे, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि चौथा माध्यमे.हे चारही स्तंभ आपापल्या परीने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आले आहेत. यामध्ये काही वेळा त्यांच्या भूमिकेत, न्याय देण्याबाबत, कमी-अधिकपणा झाला असेल, पण म्हणून त्यांचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही.
यामध्ये अनेक वेळा अनेक वादंग निर्माण झाले, आरोप-प्रत्यारोप केले गेले, पण अजूनही हे चारही स्तंभ बऱ्यापैकी आपली भूमिका बजावत आहेत. या चारही स्तंभांमध्ये चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्रे आणि गेल्या काही वर्षांत त्यात थोडी भर पडलेली इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे. तशी दोघांचीही कामगिरी थोडय़ाफार प्रमाणात एकसारखीच मानावी लागेल. यापैकी वृत्तपत्रस्वातंत्र्यावर अनेक वेळा घाव घालण्याचे प्रयत्न अनेक राजकारण्यांनी केले. काही वेळा ते कायद्याने तर काही वेळा इतर दबावतंत्राने किंवा आमिषाने केले गेले, पण त्याला वृत्तपत्रांनी भीक घातली नाही, हे आपल्या देशाचे सुदैव म्हणावे लागेल. आणीबाणीतही या माध्यमांवर मोठे र्निबध घातले गेले. अनेकांनी नाइलाजास्तव ते स्वीकारले. तरीही काहींनी वेगवेगळय़ा प्रकाराने कायद्याच्या पळवाटा शोधत आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, ही वस्तुस्थिती आपण पाहिली आहे. लोकसभा-राज्यसभा किंवा राज्यांच्या विधानसभा येथे होणारे कामकाज, वादविवाद, चर्चा या तमाम जनतेसमोर आणण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून या दोन्ही माध्यमांकडे आपण पाहात आहोत. विधानसभांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, लोकशाहीचे दाबले जाणारे आवाज, हे वृत्तपत्रात पाहणे, वाचणे हे पूर्वी होत असे, पण आता तर दूरचित्रवाणीवर त्याचे प्रत्यक्ष चित्रण आपण पाहतो आहोत. ही दोन्ही माध्यमे आपली भूमिका बजावत असताना अनेकांनी कित्येक वेळा पक्षपातीपणा केल्याचेही आपण पाहिले आहे. पण लोकशाहीत हे होऊ शकते, आज तरी त्यावर काही उपाय दिसत नाही. गेल्या वर्षी संसदेत अविश्वास ठरावाच्या वेळी पैशाच्या थैल्या सादर केल्या गेल्या. त्या कुणी केल्या, का केल्या, याच्या खोलात जात नाही, पण वृत्तपत्र-प्रसारमाध्यमांनी हे ११० कोटी जनतेसमोर मांडण्याची आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. अर्थात यातून कुणी काही शिकले का, हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण आता मात्र हा महत्त्वाचा स्तंभ आपल्या मूळ भूमिकेशी प्रतारणा करीत आहे, असे चित्र दिसते आहे. ज्याच्यासाठी आपण आहोत त्या भूमिकेपासून तो दूर जात असल्याचे अनेकदा दिसून येत आहे. ही दोन्ही माध्यमे काही वेळा स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी तर काही वेळा आपल्या हितसंबंधांसाठी आपला रामशास्त्री बाणा गुंडाळून ठेवत आहेत, हे आपल्या देशाचे दुर्दैव. अर्थात त्यालाही काही अपवाद आजही टिकून आहेत, पण ते फार कमी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या स्तंभाने आपली लाज वेशीवर टांगून ठेवली होती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. अगदी बोटावर मोजण्याएवढीच वृत्तपत्रे, माध्यमे, त्याला अपवाद होती. वृत्तपत्र हा जरी व्यवसाय असला तरी आपली काही सामाजिक बांधिलकी आहे, याचे भानदेखील ही माध्यमे विसरून गेली होती असेच म्हणावे लागेल. आपण काय करतो आहोत, त्याचे किती विपरीत परिणाम राज्याला, समाजाला भोगावे लागणार आहेत, याकडे या सर्व मंडळींनी हेतुपुरस्सर डोळेझाक केली होती. अगदी निष्पक्षपणाचा टेंभा मिरवणारी वृत्तपत्रे, माध्यमे, आर्थिक बाजू भक्कम असणारी वृत्तपत्रे, माध्यमेदेखील यात सहभागी झाली होती. लोकशाही-विधिमंडळे निकोप, स्वच्छ होण्यासाठी यांनी मदत करण्याची भूमिका सोडून त्यांनी आपलाच बाजार या निवडणुकीत मांडला होता. काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या संपादकीयात काय लिहीत होतो, आपल्या दैनिकाच्या स्फुटामध्ये काय मांडले होते आणि प्रत्यक्ष निवडणुकीत आपली भूमिका काय होती, हे त्यांनी स्वत:शीच तपासून पाहिले पाहिजे. केवळ पैसा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून या माध्यमांनी लोकशाहीची क्रूर चेष्टा केली असेच म्हणावे लागेल. लोकांचे प्रबोधन करणे हे आपले कर्तव्य आहे, हे ही मंडळी केव्हाच विसरून गेली होती. एखाद्या पक्षाचे मुखपत्र असणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचे लांगूलचालन केले तर एकवेळ समजू शकते, पण केवळ पैशासाठी नको नको त्यांचा उदोउदो करणे, त्यांना उजळ माथ्याने समाजात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे वृत्तपत्र क्षेत्राला मारक आहे, याची थोडीदेखील लाज यांना वाटली नाही. एखाद्या चांगल्या उमेदवाराला पुरस्कृत करणे समजू शकते, पण नको त्या उमेदवाराला पुरस्कृत करणे, त्याचे समाजापुढे वेगळे चित्र निर्माण करून समाज-प्रबोधनाच्या आपल्या तत्त्वाला तिलांजली देणे, वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी लाखो रुपयांची पॅकेजेस तयार करून आपल्या मनाला वाटेल त्याचा प्रचार करणे हेच काम केले. यात त्यांना पैसा मिळाला असेल, पण लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे हे मात्र निश्चित! जी जी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे यात होती त्यांनी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ विकला, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
|
|
दिनदर्शिका
मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी. मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल. शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.
|