|
|
बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ येत्या एक-दीड दिवसात महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. विधानसभेवर निवडून येण्यासाठी इरेला पडलेल्या उमेदवारांनी पैशांची केलेली उधळपट्टी ही शरमेने मान खाली जावी, अशी आहे. एकेका मतदारसंघात किमान तीन तीन कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. या हिशेबाने २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण किती पैसे उडवण्यात आले, याचे त्रराशिक मांडले तर तीन हजार कोटींहून अधिक रुपये या तमाशात उधळले गेले आहेत, असे लक्षात येईल.
सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे हे पैसे खर्च झाले, ही वस्तुस्थिती आहे. वाईट याचे वाटते, की या पैशात यंदा मोठय़ा प्रमाणात बहुतेक लहानमोठय़ा प्रसारमाध्यमांनी अत्यंत घृणास्पद अशी भूमिका बजावली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर या भ्रष्ट ‘पॅकेजीकरणा’च्या लाटेवर अनेकजण स्वार झाले होते. अनेक ‘मीडिया’ घराण्यांचे मालक, चालक पैशाच्या अशा व्यवहारात आघाडीवर होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक निधीचा एकतृतीयांशहून अधिक हिस्सा प्रसारमाध्यमांना पुरस्कृत करण्यासाठी राखून ठेवला होता, असे म्हणतात. एकाच वेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले आणि तिथेही ‘त्यांनी इतके दिले, तुम्ही किती देणार’, अशी सौदेबाजी केली गेली. काही मालक स्वत:च पैसे आणायला बाहेरगावी जात होते अशी उघड चर्चा होती. प्रश्न उमेदवाराने राजकीय आखाडय़ात उभे राहून स्वत:ची बोली लावण्याचा होता, ती ते लावत होते. वीस-पंचवीस लाखांच्या आतबाहेर प्रत्येकाचा ‘मीडिया’शी स्वतंत्र व्यवहार ठरत असे, असे सांगितले गेले. अशी ही विक्रीव्यवस्था एकाचवेळी चौघांशी झाल्यास ‘मीडिया’चे ‘पॅकेज’ कोणत्या स्तरावर जात असेल, याचा विचार न करणे उत्तम! अमेरिकेत काही काळापूर्वी ‘चेक-बुक जर्नालिझम’ कुविख्यात होते, पण इथे त्याने ‘आज रोख उद्या उधार’ या तत्त्वाचा डाव मांडला. पत्रकारितेतही पूर्वी काही थोडय़ांना दारू पाजली की पुढे सर्व काम सुरळीत होत असे, असे म्हटले जाई. आता हे सर्व ‘ट्रेड इन कॅश’ पातळीवर पोहोचले आहे. तुमच्यासंबंधात गैर न छापण्यासाठी अमुक इतके, चांगले छापण्यासाठी अमुक इतके आणि प्रतिस्पध्र्याची अडचण करून ठेवणारी बातमी छापायचे अमुक इतके, असा हा सारा व्यवहार! काही पत्रकारांनाही त्यासाठी कामाला लावण्यात आले होते आणि त्यांनीही ही ‘कामगिरी’ बिनबोभाटपणे पार पाडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशा पद्धतीचे व्यवहार झाले, परंतु तेव्हा मतदारसंघ ४८ आणि महत्त्वाच्या उमेदवारांचे प्रमाण त्या मानाने कमी. या खेपेला २८८ मतदारसंघ आणि त्या प्रत्येकाची परिणामकारकता जास्त. स्वाभाविकच ज्यांना निवडून यायचे आहे, अशांनी हा दौलतजादा केला असेल तर नवल नाही. या संतापजनक बाबीची बाजारात चविष्टपणे चर्चा होत असली तरी संबंधित माध्यमांच्या मालक, चालक, पालक यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. ‘पेज थ्री’ संस्कृतीचे हे विकृतीकरण नसानसात भिनल्याचे पाहायला मिळावे, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते? काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पैसे कसे उधळले, याच्या सुरस आणि रंजक कथा अजूनही कानावर येत आहेत. काही मतदारसंघांत स्वयंचलित दुचाकी वाहनांपासून मोटारीपर्यंत अनेक गोष्टींचे वाटप झाले. पुणे शहराचा लौकिक असा, की या शहरातले विद्वान खिशात भजी ठेवून रस्त्याने जाताना वाचन करायचे. आता कुणालाच वाचन करायचे नसल्याने, त्यांच्या खिशात भलत्याच गोष्टी निघतात. खिशात अंगठय़ा बाळगणाऱ्यांनी त्या मतदाराच्या बोटात सरकवल्याची सध्या चर्चा केली जात आहे. कोकणातल्या एका मतदारसंघात एका उमेदवाराच्या जीपमध्ये अगदी अलीकडे एक कोटी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ती जीप चौकशीसाठी ताब्यात घेतली. या जीपमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर नोटांचे एक बंडल, अशी शंभर बंडले मिळाल्याची चर्चा आहे. गंमत अशी, की ही जीप जेव्हा जवळच्या पंपावर नेण्यात आली, तेव्हा या जीपमध्ये मतदारांना वाटण्यासाठी ५० साडय़ा असल्याचे ‘निष्पन्न’ झाले आणि गुन्हा दाखल झाला. आता त्या एक कोटीचे काय झाले, याची खुमासदार माहिती चर्चेचा विषय बनली आहे. या हजार रुपयांच्या नोटा तरी खऱ्या का, असे विचारले जात आहे. याचे कारण असे, की महाराष्ट्रातल्या एका शहरात वाटण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अशा बनावट नोटा चलनात आणायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना शिक्षा अपरिहार्य आहे. ज्याने हे पैसे वाटण्यासाठी दिले, तो कदाचित आता म्हणेल, की मी जेव्हा हे पैसे दिले तेव्हा ते खरे होते, नंतर त्यांचे काय झाले, ते मी कसे सांगणार? सुरस आणि चमत्कारिक अशा या कथांची मालिकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. महानगरांमधील मध्यमवर्गीय वसाहतींनी आपल्या इमारती रंगवून घेतल्या, तर काहींनी आपल्या वसाहतींना पाण्याच्या मोठय़ा नळांचे कनेक्शन जोडून घेतले. काही डोकेबाज व्यवस्थापकांनी आपल्या वसाहतींच्या सर्व केबलजोडची दोन वर्षांची वर्गणी उमेदवाराला भरायला सांगितली आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीने पैसे भरल्याची पावती जेव्हा त्या वसाहतीच्या अध्यक्षांना दाखवली, तेव्हाच त्यांनी संबंधित उमेदवाराला मत द्यायचा फतवा आपल्या सभासदांना उद्देशून काढला, असेही म्हणतात. पूर्वी झोपडपट्टय़ांमध्ये साडय़ा वाटल्याचे आरोप करणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांनी या वेळी अशा व्यवहारांमध्ये खुलेआम स्वत:ला झोकून दिले होते. मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांकडून कोणकोणते डावपेच लढवले गेले, हे ऐकताना एखाद्याची मती खरोखरच गुंग होऊन जाईल. प्रश्न, कुणी काय घेतले किंवा कुणी काय दिले, यापेक्षा या सगळय़ांकडे एवढे पैसे आले कुठून, हा आहे. या उमेदवारांपैकी कदाचित फारच थोडे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असू शकतात, फारच थोडय़ांचे काळे धंदे असू शकतील, त्यापैकी फारच थोडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा बाळगणारे असू शकतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च केला जाऊनही निवडणूक आयोगाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, हा जसा एक भाग आहे, तसा प्राप्तिकर खात्याची मंडळी या काळात डोळय़ांवर पट्टय़ा बांधून स्वस्थचित्त का होती, असा दुसरा प्रश्न आहे. यापैकी काही उमेदवारांची स्विस बँकेत खाती आहेत किंवा काय, याची माहिती तपासण्याची गरज आहे. ज्यांची स्विस बँकेत खाती आहेत, अशांपैकी कुणीतरी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला मदत करायला पुढे आले असण्याची शक्यता आहे. हा उमेदवार निवडून आला, की त्याला दामदुपटीने परतफेड करायला लावायचाही संबंधितांचा डाव असू शकतो. या उमेदवारांपैकी फारच थोडय़ांनी कर्ज काढून निवडणुकीची ही दिवाळी साजरी केली असण्याची शक्यता आहे. कोणतीही बँक उद्योगधंद्यासाठी जसे कर्ज द्यायला तयार होते, तशी ती निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे म्हणून कर्ज द्यायला तयार होत नाही. निवडणूक आयोगाने पैसा खर्च करायची जी मर्यादा ठरवून दिली ती यातल्या प्रत्येकाने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ओलांडली असण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आयोग मत व्यक्त करेल, असे नाही. स्विस बँकेने परवाच, आपण भारताला सर्व खातेदारांची नावे द्यायला तयार आहोत, असे जाहीर केले आहे. तसे घडले तर ज्या भारतीयांचे स्विस बँकेत पैसे आहेत, त्यांची पाचावर धारण बसणार आहे. भारतीयांचे ७० हजार कोटी रुपये स्विस बँकेत आहेत, त्यात यांच्यापैकी कुणी नसेल, अशी शक्यता नाही. शेवटी कुणाच्या तरी वारेमाप पैशाच्या जिवावरच हा सगळा मस्तवालपणा केला गेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी खर्च केलेले पैसे, उतरल्यानंतरचे पैसे आणि निवडून येताच मंत्रिपद लाभावे म्हणून खर्च होणारे पैसे, असे तीन प्रकार सध्या चर्चेत आहेत. त्यात आता सट्टेबाजाराचीही भर पडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात या खेपेला बरेच कोटय़धीश उभे होते, त्याचाही हा परिणाम आहे. सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे.
|
|
दिनदर्शिका
मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी. मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल. शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.
|