मुखपृष्ठ >> दिवाळी अंक २००९ >> वारणानगरची मयसभा
 

स्पर्धेचे नियम व अटी




वारणानगरची मयसभा Bookmark and Share Print E-mail
दिवाळी २००९
शां. मं. गोठोस्कर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतामध्ये ग्रामीण विकासाचा सवरेत्कृष्ट आदर्श कोणता याबाबत कित्येक दावेदार असले तरी बहुसंख्य जाणकार कोल्हापूर जिल्ह्य़ातील वारणानगरचेच नाव घेतात. त्याच्या उभारणीत संस्थापक कै. तात्यासाहेब कोरे यांचे पहिली ४० वर्षे आणि नंतरच्या पिढय़ांचे १५ वर्षे फार मोठे योगदान घडले आणि पुढे ते अविरतपणे चालू आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते व ख्यातनाम लेखक कै. नानासाहेब गोरे यांनी ‘‘तात्यासाहेबांनी मातीतून मयसभा निर्माण केली’’ अशा शब्दात वारणानगरचा गौरव केला होता. हाती घेतलेले प्रत्येक रचनात्मक कार्य अत्युत्कृष्ट झाले पाहिजे आणि त्यामध्ये सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असावयास हवा याबाबत तात्यासाहेबांचा फार कटाक्ष असे. त्यांचा हा दृष्टिकोन हाच वारणानगरने कीíतशिखर गाठण्यामागचे गमक आहे.
वारणानगरच्या उभारणीचा प्रारंभ तेथील सहकारी साखर कारखान्यापासून झाला. कोल्हापूर व सांगली या जिल्ह्य़ांच्या दरम्यानची हद्द वारणा नदीने ठरलेली असून तिच्या दोन्ही काठांवरची ६८ खेडी हे या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी व नंतरची काही वर्षे हा अशांत टापू होता. सरासरीने दर महिन्याला एक तरी खून पडत असे. ती मोठी भयसभाच होती. वारणानगरच्या उदयामुळे हे सारे बदलले. मोठे स्थित्यंतर झाले. या कार्यक्षेत्राला सामाजिक स्वास्थ्य प्राप्त झाले. तात्यासाहेबांनी मिळविलेल्या यशाचे हे पहिले माप ठरले.
दुसरे माप म्हणजे शेतकऱ्यांना उसाचा दर देण्याच्या विक्रमाचे. नफ्यातून डिव्हिडंड द्यायचे आणि बाकीची रक्कम राखीव निधीमध्ये जमा करायची अशी खासगी साखर कारखान्यांची हिशोबाची पद्धत असते. सहकारी कारखान्यांमध्ये ती पूर्णपणे वेगळी असते. साखर, मळी, चिपाड, प्रेसमड आदींच्या विक्रीपासून आलेल्या पैशांतून ऊस वगळता सर्व खर्च वजा करायचा आणि उरलेल्या रकमेचे उसाचा दर म्हणून वाटप करायचे असे सहकारी कारखान्यांचे सूत्र असते. यानुसार हिशोब करताना ४० वर्षांपूर्वी मोठे अजब घडले. साखरेच्या १९६८-६९ या वर्षांच्या हंगामासाठी वारणा सहकारी कारखान्याने टनास २०८ रुपये असा उसाला विक्री दर दिला. सबंध देशात त्यापूर्वी कोणाही कारखान्याने एवढा दर दिला नव्हता. त्या वर्षी उत्तरेत व दक्षिणेत १०० रुपयांहून कमी दर होता, तर महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक यामधील सहकारी साखर कारखाने १२५ रुपयांच्या आसपास दर देत होते. वारणा कारखान्याच्या विक्रमी दराने भारताच्या साखर उद्योगात मोठा ‘भूकंप’ झाला आणि त्याचा परिणाम म्हणून या कारखान्याची प्रकर्षत्वाने कायम दखल घेणे इतर कारखान्यांना भाग पडले.
भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० साली अहमदनगर जिल्ह्य़ात प्रवरानगर येथे सुरू झाला. त्याचे प्रवर्तक पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील यांची तात्यासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेतली. त्याचदरम्यान गुळाला फार मंदी होती. त्यामुळे उसाचे शेत पेटवून देण्यापर्यंत शेतकऱ्यांवर पाळी आली होती. खुद्द तात्यासाहेबही त्यापैकी एक शेतकरी होते. वारणेच्या तीरावर साखर कारखाना उभा केल्याविना आता पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सहकारी साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांकडून शेअर भांडवल गोळा करण्यास सुरुवात केली. यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह ते गावोगाव फिरत होते. तथापि, किमान आवश्यक एवढे भांडवल गोळा होत नव्हते. मग त्यांनी हा नाद सोडून दिला आणि ज्या शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले होते ते त्यांच्या गावी जाऊन त्यांना परत केले!
असे झाले तरी लवकरच तात्यासाहेबांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतात साखरेची आयात चालू होती. त्या वेळी खासगी क्षेत्राला साखर उद्योगात स्वारस्य उरले नव्हते. त्यामुळे सहकार क्षेत्राला प्राधान्य देऊन सर्वतोपरी मदत देण्याचे केंद्र सरकारने ठरविले. साहजिकच तात्यासाहेबांनी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि शेअर भांडवल गोळा करण्यासाठी ते संकल्पित कार्यक्षेत्राच्या खेडय़ातून आपल्या सहकाऱ्यांसह फिरू लागले. ही ‘साखरेमहाराजांची दिंडी आहे’ असे संबोधून त्यांची हेटाळणी होऊ लागली. तथापि, पूर्वीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी पैसे परत केले होते, यामुळे चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. दुसरे म्हणजे सरकारने आधीच पाठिंबा जाहीर केला होता. वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड या संस्थेची १९५५ साली नोंदणी झाली आणि नंतर रीतसर उभारणी होऊन १९५९ साली उत्पादनाला प्रारंभ झाला. (भारतातून १९५७ साली साखरेची निर्यात सुरू झाली त्याचे श्रेय सहकारी क्षेत्रालाच जाते.)
तात्यासाहेबांची पिढीजात श्रीमंती नव्हती. आजोबा नरसप्पा अगदीच सामान्य परिस्थितीचे होते. त्यांची थोडीशी शेती होती. बाळाप्पा व अण्णाप्पा असे त्यांना दोन मुलगे होते. अण्णाप्पा हे तात्यासाहेबांचे वडील. हे दोघे भाऊ व्यापारात शिरले. त्यांनी प्रथम किराणा मालाचे दुकान सुरू केले. नंतर कापड दुकान स्थापन केले. मग सराफी दुकान उघडले. याचबरोबर शेतीही वाढवली. या सर्वाच्या जोडीला सावकारी सुरू केली. कोरेमंडळी मोठी नावारुपाला आली. एवढय़ात बाळाप्पांचे कर्करोगाने निधन झाले. आणि मग अण्णाप्पांच्या मनाचा तोल ढळला. त्यामुळे या सर्व धंद्याची व शेतीची जबाबदारी अगदी लहान वयात तात्यासाहेबांवर येऊन पडली. त्यावेळी ते सांगलीला मॅट्रिकच्या वर्गात होते. शिक्षण सोडून ते हा सर्व व्यवहार पाहू लागले. माणुसकीला धरून ते सावकारी चालवत होते. पुढे सार्वजनिक जीवनात शिरल्यावर त्यांनी सावकारी बंद करून टाकली. तथापि, मुळात सावकार असलेल्या व्यक्तीला सहकारात मुळीच स्थान नाही अशी भूमिका घेणारे काही महाभाग होते. तात्यासाहेबांनी बंद केलेल्या सावकारीवर ते बोट ठेवत असत. ती सावकारी चालू होती त्यावेळी त्या ग्रामीण भागात बँकांच्या शाखा सोडाच, पण पतसंस्थाही नव्हत्या. अशा प्रकारे मोठय़ा आर्थिक व्यवहाराचा दीर्घ अनुभव तात्यासाहेबांकडे होता आणि वारणानगरच्या उभारणीत तो मोठा उपयोगाचा ठरला.
वारणा कारखाना स्थापन झाला त्यावेळी त्याची स्थापित क्षमता दर दिवशी १२५० टन ऊस गाळण्याची होती. त्यानंतर चारदा विस्तार होत आता ती ७५०० टनांची आहे. याहून अधिक क्षमतेचे भारतात अन्य राज्यांमध्ये सात-आठ कारखाने असले तरी महाराष्ट्रात मात्र नाहीत. वारणेच्या आकाराचे या राज्यात आणखी चार-पाच कारखाने आहेत. तथापि, साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्रात वारणा कारखान्याचा क्रमांक सातत्याने पहिला राहिलेला आहे. साखर उद्योगातील कार्यक्षमतेचे विविध मापदंड आहेत. त्यानुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून वारणा कारखान्याला वेळोवेळी पहिल्या क्रमांकाची पारितोषिके मिळालेली आहेत. यंदा साखरेची निर्यात बंद होण्यापूर्वीच्या तीन वर्षांमध्ये वारणा कारखाना प्रत्येक वर्षी देशातील सर्वात मोठा निर्यातदार कारखाना होता. सुमारे २७ देशांमध्ये ही निर्यात झाली.
उपपदार्थावर आधारित उद्योग स्थापन करण्यात वारणा कारखाना मागे राहिलेला नाही. डिस्टीलरी व कागद कारखाना यांची उभारणी केव्हाच होऊन गेली. तथापि, दारू तयार करायची नाही असे तात्यासाहेबांनी पक्के ठरविले होते. महाराष्ट्रातील कित्येक सहकारी साखर कारखान्यांनी दारूचे उत्पादन सुरू केले. त्यांचे धुरिण काँग्रेसचे पुढारी होते. दारूबंदी हे राज्य घटनेतील एक मार्गदर्शक तत्त्व आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांने दारूला स्पर्श करता कामा नये असा त्या पक्षाच्या घटनेमध्ये दंडक आहे. मग ही मंडळी या क्षेत्रात कशी काय शिरली? जगात अन्यत्र साखर उद्योगामध्ये उपपदार्थावर आधारित उद्योग हाच खरा उद्योग असून त्यामुळे तेथे साखर फार स्वस्त आहे, असा युक्तिवाद ही काँग्रेसवाली मंडळी त्यांच्या दारूच्या धंद्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून करीत असत. खरी गोष्टी अशी की, जगात कोठेही उपपदार्थ हा मुख्य उद्योग अशी साखर उद्योगाची स्थिती नाही. तसेच लोकवस्तीने मोठय़ा अशा एकाही राष्ट्रामध्ये त्यावेळी भारताएवढी स्वस्त साखर मिळत नव्हती. ही थाप लोकांच्या लक्षात येईपर्यंत दारूबंदीचा अंमल शिथिल झाला होता आणि पुढे तर दारूबंदी कागदावरच राहिली. त्यामुळे काँग्रेस पुढाऱ्यांची ही आक्षेपार्ह भूमिका लोकांनी कधी मनावर घेतली नाही. उसाचा रस फ्रुटीसारखा टेट्रापॅकमधून पुरविण्याचे वारणा कारखान्याने योजले असून लवकरच तो बाजारात उपलब्ध होणार आहे. दारूची तहान उसाच्या रसावर भागवून घ्यावी असा या संकल्पामागे उद्देश नाही.
वारणा कारखान्याने चिपाडाचा वापर करून सहवीजनिर्मिती करणारा प्रकल्प हाती घेतला आहे. तो ४७ मेगाव्ॉटचा म्हणजे ताशी ४७ हजार युनिट विजेचे उत्पादन करणारा असेल. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प राहील. कच्च्या साखरेपासून पक्की साखर तयार करणारी रिफायनरी वारणानगरला लवकरच उभारली जाणार आहे. संपन्न  राष्ट्रांमध्ये रिफाइंड शुगरचा वापर होतो आणि तिच्यामध्ये गंघक अजिबात नसते. तशीच साखर या रिफायनरीमध्ये तयार होणार आहे.
वारणानगरला साखर कारखान्याव्यतिरिक्त मोठा उद्योग दुधाचा आहे. त्यासाठी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड ही संस्था तात्यासाहेबांनी ४० वर्षांपूर्वी स्थापन केली. त्याच्या आधीच भारतातील दूध व्यवसायात गुजरातमधील आणंदचे व्ही. कुरियन यांचे नाव गाजू लागले होते. त्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) ही संस्था स्थापन केली होती. अमूल या ब्रँडने आपली उत्पादने ती संस्था विकत होती. तात्यासाहेब तिकडे जाऊन भेट देऊन आले. देशात सहकारी क्षेत्रातच दूध व्यवसायाची वाढ व्हावी या दिशेने केंद्र व राज्य सरकारांनी धोरणे आखावीत असा यशस्वी प्रयत्न कुरियनसाहेबांनी केला होता. यासाठी त्यांनी साचाही ठरवून दिला होता. दूध उत्पादकांची खेडय़ाच्या पातळीवर सहकारी संस्था असावी, या संस्थांचा तालुक्यासाठी संघ, तालुक्याच्या संघाचा मिळून जिल्ह्य़ासाठी संघ आणि जिल्ह्य़ांच्या संघाचा राज्य संघ असा तो साचा होता. त्यामध्ये वारणा दूध संघ बसणारा नव्हता. यास्तव त्याला एनडीडीबीची मदत मिळणार नाही हे कुरियनसाहेबांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी अमूलचा कारभार कसा चालतो हे तात्यासाहेबांनी पाहिले. दूध उत्पादक शेतकऱ्यांऐवजी हे संघ भक्कम झाले पाहिजेत याकडेच अमूलचा भर आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणून त्या दिशेने जायचे नाही असे त्यांनी ठरवले. सध्या वारणा दूध संघाला दूध देणाऱ्या सभासद शेतकऱ्याला सबंध देशात एकुणात सर्वात जास्त दर मिळतो याचे मुख्य कारण अमूलहून वेगळी रचना आहे हे होय.
हा दूध संघ दिवसाला पाच लाख  लिटरांहून अधिक दूध गोळा करतो. त्यातील काही दुधाची मुंबई-पुण्यात प्लॅस्टिकच्या बंद पिशवीतून विक्री होते. बाकीच्या दुधाचे विविध पदार्थ तयार केले जातात. तूप, श्रीखंड, दूध भुकटी, लोणी, लस्सी, टेबल बटर, चीज, दही, पनीर, आइस्क्रिम, डेअरी व्हाइटनर, फ्रोजन क्रीम, टेट्रा पॅक आदी हे पदार्थ आहेत. वारणा व अमृत छापांचे ते  आहेत. या दूध संघाची वर्षांकाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक विक्री होते. यांपैकी ५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालाची पश्चिम आशिया, तुर्कस्थान, दक्षिण आफ्रिका आदी ठिकाणी निर्यात होते. कॅडबरी ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची कंपनी आपल्या विविध पदार्थापैकी बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकोलेट, फ्लेवर्ड कोको, बाइटस् आदींचे उत्पादन या वारणा दूध संघाकडून करून घेते आणि त्यापैकी काही मालाची निर्यातही करते. रामदेवबाबा आयुर्वेदिक औषधे तयार करतात त्यासाठी लागणारे गाईचे तूप याच संघाकडून खरेदी करतात. संरक्षण दलांना लागणारी दूध भुकटी या संघाकडून घेतली जाते. वारणा दूध संघाच्या उत्पादनांना त्यांच्या उत्कृष्ट दर्जाबद्दल कशी मान्यता आहे हे यावरून लक्षात येते. ‘वारणा श्रीखंड’ हा तर भारतात सर्वात जास्त खपाचा ब्रॅण्ड आहे.
आपल्या देशात मॉल्स यायच्या अगोदर सुपर बाझार किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्स होते. तात्यासाहेबांनी ‘वारणा बझार’ या नावाने तसा एक १९७८ साली सुरू केला. भारताच्या ग्रामीण भागातील तो पहिला सुपर बझार होय. त्यामध्ये टाचणीपासून ट्रॅक्टपर्यंत सर्व काही मिळते. त्याचे असे झाले की, वारणानगरमधील अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी, कामगार आदी अधूनमधून गैरहजर राहत असत. तात्यासाहेबांनी त्याची कारणे शोधली तेव्हा सर्वात मोठी बाब आढळली म्हणजे आवश्यक वस्तू किंवा पदार्थ यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरला जावे लागत असल्यामुळे हे घडत होते. त्या सर्व वस्तू तात्यासाहेबांनी वारणा बाझारमध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यासुद्धा चांगल्या दर्जाच्या व कोल्हापुरहून कमी किमतीत! साहजिकच गैरहजेरी बव्हंशी संपुष्टात आली. श्री वारणा विभाग सहकारी ग्राहक मंडळ लिमिटेड ही संस्था अशी सुविधा निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. वारणा परिसरातील सर्वानाच ती मोठय़ा सोयीची झाली. कुटुंबाला लागणाऱ्या सर्व वस्तू वारणा बाझारमध्ये मिळतात. त्यांच्याशी मुख्यत्वे स्त्रियांचा संबंध येत असल्यामुळे ही संस्था महिलाप्रधान राहावी असा तात्यासाहेबांनी मुळात निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे साचा निश्चित केला. संस्थेच्या सभासदांमध्ये सुमारे ८० टक्के महिला असतात. तसेच, संचालक मंडळावर निम्म्या अधिक स्त्रियाच असतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ांमध्ये वारण बाझारच्या पन्नास शाखा असून वार्षिक विक्री आता शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. वारणानगरचा समावेश असलेल्या पन्हाळा तालुक्यात १००० पुरुषांमागे ८१८ स्त्रिया असे प्रमाण आहे. ते सम व्हावे यासाठी मुलगी वाचवा मोहीम वारणा बझारने कायमची हाती घेतलेली आहे. मुलगी झालेल्या मातांचा या संस्थेतर्फे सत्कार करण्यात येतो.
वारणा सहकारी साखर कारखाना व्यवस्थितपणे चालू राहिल्यानंतर तात्यासाहेबांचे लक्ष परिसराच्या विकासाकडे वळले. या भागात प्रथम महाविद्यालयाची गरज आहे असे त्यांना आढळून आले. त्यासाठी १९६४ साली वारणा विभाग शिक्षण  मंडळ  या संस्थेची नोंदणी झाली. तिने त्याच वर्षी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय सुरू केले.
शिक्षण मंडळाने नंतर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या आणि गुरुकुल पद्धतीची अशा तीन माध्यमिक शाळा सुरू केल्या. पुढे तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या सध्या दीड हजार आहे. याचबरोबर आय. टी. आय. ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटर आदी शैक्षणिक  सोयी उपलब्ध करण्यात आल्या. वारणा बाल वाद्यवृंदाला तर आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. त्याबाबत ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर म्हणाल्या, ‘वारणानगर हे प्रत्यक्षात नादब्रह्मनगर’ आहे.
तात्यासाहेबांचे वृद्धापकाळाने १९९४ साली निधन झाले. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांचे पुत्र विलासराव आकस्मिकपणे निवर्तले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विनय यांच्यावर वारणानगरची जबाबदारी पडली. ती ते तेवढय़ाच समर्थपणे पेलून विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करीत आहेत. फार्मसी कॉलेज व सैनिक स्कूल (तात्यासाहेब कोरे मिलिटरी अ‍ॅकॅडमी) यांची उभारणी विनयरावांनीच पुढाकार घेऊन पुरी केली. प्रत्येक रचनात्मक कार्य अत्युत्कृष्ट झाले पाहिजे हा
तात्यासाहेबांनी घालून दिलेला शिरस्ता येथेही अंमलात आलेला आहे. केंद्र सरकारचा वायर्ड व्हिलेज प्रोजेक्ट प्रथम वारणा परिसरात प्रत्यक्षात आला. ते काम शिक्षण मंडळानेच पुरे केले. त्यामुळे प्रत्येक खेडय़ापर्यंत कॉम्प्युटरच्या सुविधा उपलब्ध झाल्या. सबंध देशात सर्व खेडी ब्रॉडबँडने जोडली गेली आहेत असे गुजरात हे एकमेव राज्य  आहे असा दावा त्यांचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी करीत असतात. वारणा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही सर्व खेडी ब्रॉडब्रँडने जोडण्यात आलेली आहेत याचे श्रेय श्री. विनय कोरे यांना जाते.

कोरे भगिनी मंडळ
वारणा भगिनी मंडळाचा आणखीही एक विशेष आहे. एस.एस.सी. नापास झालेल्या मुलीचा लगेच विवाह करायचा असा विचार तिचे पालक करतात. ही गोष्ट लांबणीवर पडावी हे यंदापासून चालू केलेल्या एटीकेटीमागे एक कारण आहे असे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. या भगिनी मंडळाने दहा वर्षांपूर्वीच हा विचार केला. अशा मुलींचा स्वतंत्रपणे अर्थार्जन करणे शक्य व्हावे यासाठी त्यांच्याकरिता विविध बाबींचे प्रशिक्षण वर्ग हे भगिनी मंडळ अत्यल्प फी घेऊन चालवत असते. ब्लाऊज व ड्रेस डिझायनिंग, मेहंदी, मशीन एम्ब्रॉयडरी, ब्युटी पार्लर, क्लॉथ पेंटिंग आदी २७ बाबींचे हे प्रशिक्षण वर्ग आहेत सन १९९८ पासून ते चालू आहेत. आतापर्यंत शेकडो मुलींनी त्यांचा लाभ घेऊन त्या स्वावलंबी बनल्या आहेत.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.