मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> विशेष संपादकीय
 

गाथा

 



लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’
स्पर्धेसाठी अटी व शर्ती

 

फोटो गॅलेरी

विशेष संपादकीय Bookmark and Share Print E-mail
दांडगाईचा निषेध
आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मुंबई आणि पुण्यात शुक्रवारी दुपारी शिवसेना समर्थकांनी एकाच सुमारास केलेल्या हल्ल्यांचा सर्वच माध्यमांनी भक्कम एकजुटीने निषेध केला आहे. वागळे यांना असे हल्ले नवे नाहीत. त्यांच्या संघर्षशील पत्रकारितेला अशा प्रवृत्तींकडून आजवर अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर झालेला आजचा हल्ला नुसताच प्रतिसूडाच्या भावनेतून झालेला हल्ला म्हणता येण्यासारखी स्थिती नाही. एखाद्या माध्यमाने बातमी देताना एखादा गैरशब्द उच्चारला आणि भावना भडकून त्या बातमीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी वा त्यांच्या समर्थकांनी परस्पर त्या माध्यमावर हल्ला केला असा हा वरकरणी साधासरळ वाटणारा प्रकार देखील नाही. किंबहुना ‘असे छोटेमोठे प्रकार होतच असतात’, असे म्हणून दुर्लक्षित करण्याजोगा वा कमी गांभीर्याने घेण्याजोगा तर हा प्रकार मुळीच नाही. हे हल्ले ज्या पद्धतीने झाले, हल्लेखोरांनी ज्या प्रकारे घोषणा दिल्या, कार्यालयातील सामानाची ज्याप्रकारे नासधूस केली, वाहिनीच्या प्रमुखांवर ज्याप्रकारे खुर्ची फेकून मारत, प्रत्यक्षात त्यांच्या श्रीमुखात भडकविण्यापर्यंत मजल मारली आणि त्याच्यावर कडी म्हणजे शिवसेनेच्या खासदाराने झाल्या प्रकाराचे समर्थन करणारी भाषा वापरली ते पाहता लोकशाहीच्या मुख्य स्तंभावर योजनापूर्वक केलेल्या हल्ल्याचे आणि माध्यमांचा आवाज दडपून टाकण्याचे ते निंद्य व अश्लाघ्य कृत्य होते, असेच म्हणावे लागेल. वृत्तवाहिन्यांवर वा वृत्तपत्र कार्यालयांवर हल्ला होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे. गेल्या पाच वर्षांत असे हल्ले अनेकदा झाले, आणि प्रत्येक वेळेस एकतर ते पुरेशा कारवाईअभावी दडपले गेले, किंवा त्यावरील कारवाई बासनात तरी बांधली गेली. ‘झी’वाहिनीवर झालेला हल्ला, ‘स्टार माझा’वर झालेला हल्ला, ‘महानगर’च्या संपादकपदी असताना स्वत: निखिल वागळेंवर झालेला हल्ला, ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांवर एकाच सुमारास झालेले हल्ले, ते कमी पडले म्हणून की काय, पण आमच्या घरावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्याही आधी ब्राह्मण संमेलनात लेखी भाषण ऐकून न घेताच आमच्यावर घातले गेलेले मारेकरी अशी ही हल्ल्यांची यादी संपणारी नाही. या साऱ्या प्रकारांमागे एक निश्चित शक्ती नाही, एकचएक संघटना नाही, एकचएक राजकीय विचारधारा नाही, हे खरे असले तरी त्यात हिंदुत्ववादी शक्ती जशा आहेत, तसेच विशिष्ट राजकीय पक्षाचे, जातीचे कार्यकर्तेही आहेत वा समर्थकही आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतका प्रदीर्घ कालावधी उलटूनही कुणा हल्लेखोराला साधी अटकदेखील होऊ शकलेली नाही, किंवा कुणावर खटला भरून त्यांना शिक्षाही ठोठावली गेलेली नाही. आजवरच्या अशा काही प्रसंगांनंतर कठोर कारवाई करण्याची आश्वासने सरकारतर्फे दिली गेली, अशी कारवाई होते आहे की नाही हे पाहण्यासाठी, त्यावर वचक ठेवण्यासाठी पत्रकार संघटनांच्या समित्याही स्थापल्या गेल्या. एकदा तर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आणि एकदा आर.आर. आबा पाटलांना मंत्रीपदाला मुकावे लागले. पण योगायोगाची गोष्ट अशी की तेच भुजबळ आणि तेच आर. आर. पाटील आज पुन्हा त्याच पदांवर आहेत, आणि हल्ले सुरूच आहेत. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यामागचे खरे सूत्र आहे ते संवेदनशीलता गमावलेल्या, सहनशीलवृत्ती नसलेल्या, विचारांचा मुकाबला विचाराने करण्याऐवजी त्याला ठोकशाहीने जबाब देण्याच्या प्रवृत्तीचे. आम्ही या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध तर करतो आहोतच, पण लवकरात लवकर हल्लेखोरांवर आणि त्यामागच्या सूत्रधारांवर शासनाने कठोर कारवाई करावी यासाठी  मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपापसातील स्पर्धा-हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येत शासनावर दडपण आणावे असा आग्रहही धरतो आहोत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे यंदा ५० वे वर्ष आहे, निदान पुढल्या ५० वर्षांत तरी महाराष्ट्रात कोणती संस्कृती रूजावी, हे राजकीय पक्षांनी, नागरी संघटनांनी, माध्यमांनी मनोमन निश्चित केले नाही, तर महाराष्ट्राचा ऱ्हास असाच पुढेही सुरू असलेला दुर्दैवाने पहावा लागेल. त्यामुळेच सरकारकडून जशी जबाबदार प्रशासनाची, तशीच राजकीय पक्षांकडून लोकशाहीनुकूल संयत वर्तणुकीची अपेक्षा आम्ही करतो आहोत. पण त्यासाठीचे आवश्यक भान, विवेक, पात्रता सारेच राजकीय पक्ष गमावून बसलेले आहेत असे दुर्दैवी आणि दु:खद चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या

दिनदर्शिका

मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी.
मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल.
शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.