मुखपृष्ठ >> ग्रंथविश्व >> हिंमतबाज पत्रकारितेपुढील आव्हान
 


स्पर्धेचे नियम व अटी




हिंमतबाज पत्रकारितेपुढील आव्हान Bookmark and Share Print E-mail
शनिवार, १९ डिसेंबर २००९
वृत्तपत्रे म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ; पण हे बहुपरिचित विधान म्हणजे एखादे कालबाह्य सुभाषित वाटावे, इतकी आज वृत्तपत्रांची विश्वासार्हता खालावलेली आहे. वृत्तपत्रांच्या बाबतीत आहे तेच आज अन्य सर्व माध्यमांच्या बाबतीत आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या माध्यमांच्या स्खलनाने अगदी खालची पातळी गाठली. बातम्यांची जागा ही चक्क जाहिरातींप्रमाणे विकली गेली. अधिक पैसे देईल त्याला अधिक प्रसिद्धी असा बाजारू व्यवहार होता. ‘मीडिया मॅनेज करण्याचा’ हा प्रकार केवळ राजकीय पक्षांच्या पातळीवरच नाही, तर व्यक्तिगत उमेदवारांच्या पातळीवरही झाला आणि ग्रामीण भागात तर तो खूपच झाला. आश्चर्य म्हणजे हा आरोप माध्यमांची विश्वासार्हता धुळीला मिळविणारा आहे आणि म्हणून त्याचे लगेच निराकरण केले पाहिजे, असे कोणालाही वाटले नाही. उलट खासगीमध्ये या गैरप्रकाराचे असेही समर्थन केले गेले, की पूर्वी पत्रकार व्यक्तिश: पैसे खात असत; त्याऐवजी आता व्यवस्थापनानेच थेट पैसे घेतले तर बिघडले कुठे! माध्यमांमधला तुच्छतावाद (सीनिसिझम) कुठल्या पातळीवर गेला आहे, याचे हे द्योतक आहे. उकळत्या पाण्यात आपण एखादा बेडूक सोडला तर तो टुणदिशी उडी मारून बाहेर येईल. पण त्याऐवजी बेडकाच्या भोवतीच्या पाण्याचे तापमान हळूहळू एकेक अंशाने वाढवत गेले, तर तो बेडूक बाहेर वगैरे येणार नाही, तर स्वत:च त्या तापमानवाढीशी जुळवून घेईल, असे म्हणतात! आजच्या माध्यम व्यावसायिकांची आणि एकूणच समाजाची स्थिती ही त्या बेडकासारखी निबर झाली आहे.
या सर्व पाश्र्वभूमीवर मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये प्रकाशित झालेला  ैरं८्रल्लॠ ्र३ ६्र३ँ ू४१ंॠी: ३ँी ऌ्रें३ २३१८- 1964 ३ 1981' हा ग्रंथ म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. कारण अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत (म्हणजे तसे काल-परवापर्यंत) तत्त्वांसाठी झगडणारे, निर्भयपणे मते मांडणारे, त्या तत्त्वनिष्ठेची किंमत चुकविणारे हिंमतबाज पत्रकार आपल्याकडे होते, याची साक्ष पटवणारा हा ग्रंथ आहे. मुंबईहून सतरा वर्षे प्रकाशित होत राहिलेल्या ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकातील सुमारे ८० लेखांचे यात संकलन आहे. १९७५-७६-७७ हा आणीबाणीचा व त्यानंतरच्या अभूतपूर्व निवडणुकीचा कालखंड म्हणजे ‘हिंमत’च्या अल्पायुष्यातील सर्वात गौरवशाली कालखंड. साहजिकच यातले बरेचसे लेख त्या कालखंडातील आहेत. यात आपल्याला राजमोहन गांधी व रुसी लाला या संपादकद्वयांबरोबरच राजगोपालाचारी, जनरल करिअप्पा, सी. आर. इराणी, बी. जी. व्हर्गिस, अजित भट्टाचारजी, निस्सिम एझेकिल, जे. बी. कृपलानी, दुर्गा भागवत, सॅम माणेकशॉ इत्यादी अनेक विचारवंत भेटतात. ‘हिंमत’ने प्रथमपासूनच जागतिक आवाका ठेवलेला असल्याने अलेक्झांडर सोल्झेनित्स्यनसारखेही येथे भेटतात आणि ‘सर्व राजकीय कैद्यांची सुटका झालेली आहे’ असे जाहीर करणाऱ्या सरकारला, ‘माझे जॉर्ज, लॉरेन्स आणि मायकेल हे तीन मुलगे पोलिसांनी धरून नेले आहेत, आज ते कुठे आहेत?’ असा प्रश्न टाहो फोडून विचारणारे बंगलोरच्या एलिस फर्नाडिस या मातेचे ४ मार्च १९७७ चे हृदयद्रावक पत्रही इथे वाचायला मिळते. मुंबईतील कुठलाही छापखाना ‘हिंमत’ छापायला तयार होईना, तेव्हा संपादकांनी आपल्या पाच-एक हजार वाचकांना मदतीचे आवाहन कसे केले आणि त्यातून स्वत:चा एक छोटासा लेटरप्रेस कसा विकत घेतला, याचीही रोमहर्षक कहाणी येथे आहे. ‘हिंमत’चे आणखी एक वेगळेपण म्हणजे माध्यमांच्या मुख्य प्रवाहात ज्यांना त्या वेळी अजिबातच स्थान नव्हते, त्यांचीही दखल ‘हिंमत’ने आवर्जून घेतली. उदाहरणार्थ, ईशान्य-पूर्व भारत, तेथील सरकारी दडपशाही आणि तेथील जनतेच्या आशा-आकांक्षा याविषयीचे जी. जी. स्वेल, निकेतू इरालू, बी. के. नेहरू वगैरेंचे लेख.
दुर्दैवाने १९८१ मध्ये ‘हिंमत’ साप्ताहिक वाढत्या आर्थिक तोटय़ामुळे बंद पडले. रंगीत छपाई वा सनसनाटी मजकूर नसल्याने स्टॉलवाले अंक ठेवायला उत्सुक नव्हते; तर बऱ्याच वेळा सरकारविरोधी मते मांडत राहिल्यामुळे जाहिरातदारांनीही हात आखडता घेतला. शेवटच्या अंकात मुख्य संपादक राजमोहन गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सेन्सॉरची निळी पेन्सिल जे साधू शकली नाही ते अकाऊंटंटच्या लाल पेन्सिलीने साधले, साखळदंडांपेक्षा आर्थिक चणचण अधिक मुस्कटदाबी करून गेली.’ पण काही मूठभर तरुणांनी जिद्दीने चालविलेले एखादे छोटे साप्ताहिकही किती प्रभाव पाडू शकते, याचा एक वस्तुपाठ भावी पत्रकारितेसाठी ‘हिंमत’ने घालून दिला.
जवळजवळ दोन वर्षे मी ‘हिंमत’चे पूर्णवेळ काम केले. महिना २५० रुपये मानधनावर. पुढे डिसेंबर १९७८ मध्ये माझे लग्न झाल्यावर सर्वानुमते ते महिना ३५० रुपये इतके वाढविण्यात आले! त्या वेळची ‘हिंमत’ची टीम अगदी दृष्ट लागावी अशी होती. ताडदेवला अरुण चेम्बर्समध्ये भाडय़ाचे ऑफीस होते आणि साप्ताहिकाशी संबंधित पडेल ते कुठचेही काम कोणीही करावे, असा शिरस्ता होता. त्यामुळे लेखनाबरोबरच मुद्रितशोधन, पृष्ठरचना, छपाई, विक्री, जाहिराती या सगळ्याच बाबींशी सगळे परिचित होते, एखाद्या कुटुंबाप्रमाणेच सगळा कारभार होता, सगळे एकमेकांना पहिल्या नावानेच हाक मारीत. तेव्हा गिरविलेले धडे आजही कामी येतात.
पुढे काळाच्या ओघात हे सर्वच सहकारी विखुरले. रूसी सर दोराब टाटा ट्रस्टचा डायरेक्टर व लेखक बनला, कल्पना शर्मा ‘हिंदू’त गेली, रुपा चिनाय ‘टाइम्स ऑफ इंडिया’त, तर नीरजा चौधरी दिल्लीला ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये गेली. संजोय हझारिका ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये केला. विजिथा यापा आज श्रीलंकेतील सर्वात मोठा पुस्तकविक्रेता आहे. शहनाझ अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यरबरोबर लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली तर डेव्हिड डेव्हिदार पेंग्विनचा युरोप व अमेरिका वगळता अन्य जगासाठी सी. ई. ओ. आहे; पण या सर्वाचीच व्यावसायिक सुरुवात ‘हिंमत’मध्येच झाली; यातल्या एकानेही पूर्वी कधीही कुठेही नोकरी केली नव्हती.
नेहरू सेंटरमधल्या त्या प्रकाशन समारंभात ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, ‘हिंमतची ताकद ही विचारांची ताकद होती. कमी खपाची मर्यादा महत्त्वाची नव्हती. गांधीजींच्या ‘हरिजन’चा खपही कमीच होता. विचारांच्या विश्वात आजच्या माध्यमांना जराही रुची नाही. बातमी हीसुद्धा आज एक करमणूक बनली आहे. प्रचंड तांत्रिक प्रगती होऊनसुद्धा आज माध्यमांमध्ये जागतिक आवाका क्वचितच आढळतो. आमची एकूण दृष्टीच संकुचित व कप्पेबंद झाली आहे. अमेरिकेसारख्या देशात आजही अनेक छोटी नियतकालिके महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसतात. हे आपल्याकडे का घडू नये?’
खरेच, हे आपल्याकडे का घडू नये? आज मागे वळून ‘हिंमत’चे दिवस आठवताना हाच प्रश्न सलायला लागतो. असे एखादे तत्त्वनिष्ठ, दर्जेदार, जागतिक आवाका असलेले, निर्भय नियतकालिक आपल्यापैकी काही जण सुरू करू शकतील का? ती अर्थातच ‘हिंमत’ची पुनरावृत्ती नसेल. आजच्या काळाशी ते सुसंगत असेल. मुद्रित स्वरूपाप्रमाणे वेबवरही उपलब्ध असेल- पण अशा एखाद्या व्यासपीठाची आज गरज आहे. आजही सेन्सॉरशिप आहे; सरकारची नसेल; पण झुंडशाहीची आहे. विचार करण्याचे इंद्रिय आजही खिसा हेच आहे. आजही गावकुसाबाहेरचे समाजघटक आहेत, दारिद्रय़ आहे, विषमता आहे, रकमेपुढे काही शून्यांची भर पडलेला भ्रष्टाचार आहे. शस्त्रे बदलली असतील, लढणारे बदलले असतील, पण लढायांचे मूलभूत मुद्दे आजही तेच आहेत.
भानू काळे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सेइंग इट विथ करेज : द हिम्मत स्टोरी; संपादक आणि प्रकाशक : भानू काळे;
हिम्मत पब्लिकेशन्स ट्रस्ट;  
पाने : १८०;
किंमत : ३०० रुपये.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.