|
|
गुरुवार, १४ जानेवारी २०१० तो कार्यकर्ता होता, पण मंत्र्यांच्या किंवा नेतेमंडळींच्या पुढे पुढे करणाऱ्यांमध्ये तो नसे. तो कुणाचीही पत्रास ठेवत नसे. तो लढवय्या होता, पण त्याच्या हाती शस्त्र नव्हते. होता तो अधिकार. याच अधिकाराच्या जोरावर अनेकांची धुंदी त्याने उतरवली होती. दुर्दैव असे, की या अधिकारानेच मंगळवारी सकाळी त्याचा बळी घेतला.
सतीश शेट्टी हे नाव उच्चारले, तर एखाद्या उडुपी हॉटेलात गल्ल्यावर हात ठेवून बसलेल्या एखाद्या व्यक्तीचे चित्र आपल्या डोळय़ांसमोर येईल. सतीश शेट्टींचेही तळेगावात हॉटेल होते आणि तो त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. दुसऱ्याच्या कवडीलाही मिंधे नसणाऱ्या सतीश यांचा काल तळेगावातच काही नराधमांनी खून केला. त्या अर्थाने ते अनामिक होते आणि नाव असूनही तसे राहण्यातच त्यांनी भूषण मानले होते. कुणावरही अन्याय झाला, की ते आपले पुढे व्हायचे. एखाद्याची तपश्चर्या वयाच्या चाळिशीच्या आतच सिद्ध होते असे म्हणतात. त्यांच्या बाबतीत तेही खरे ठरले. आजकाल गावोगाव भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली निर्माण झालेल्या समित्या आणि त्यावर विराजमान झालेले गणंग, यांचे वर्तन संशयाला कारणीभूत ठरावे, असे असते. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली गैरव्यवहार करणारे तर आपल्याला जागोजागी पाहायला मिळत असतात. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात सतीश शेट्टी होते आणि माहितीच्या अधिकाराचे ते तर खंदे पाईकच होते. माहितीच्या अधिकाराचा कायदा हाती येताच त्याचा सर्वप्रथम उपयोग करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. सतीश शेट्टींकडे आपण गेलो, की आपले काम निश्चित होणार, ही सामान्य माणसाला असलेली खात्री होती. तळेगावचे ते मंजुनाथ षण्मुगम किंवा सत्येंद्रनाथ दुबे होते. कुणी सरकारी जमिनी गिळंकृत केल्या, कुणी बेकायदा बांधकाम केले, कुणी कुणावर अन्याय केला, की हे एकांडे शिलेदार त्याविरुद्ध लढायला तयार व्हायचे. असंख्य तक्रारी आणि खटले, यांना सामोरे जावे लागल्यानंतरही ते कधी डगमगले नाहीत. दांडगी चिकाटी आणि जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांच्यासमोर उभे राहायचे मानसिक धैर्य या त्यांच्या गुणवैशिष्टय़ांना होती साधेपणाची झालर. हातात एक साधी कापडी पिशवी आणि त्यात माहितीच्या अधिकारात मिळवलेली कागदपत्रे एवढीच त्यांची खरीखुरी संपत्ती होती. एखाद्या प्रकरणात कुणाला शरण गेलो, तर आपण आपली जिगर गमावू ही त्यांची भीती होती, म्हणून त्यांनी कुणालाही भीक घातली नाही. त्यांच्या अंगी असणारी ताकद ही त्यांच्या जवळच्या कागदपत्रांमध्ये असे. आज समाजात अनेकजण असेही आहेत, की जे आपल्या अधिकारांनाच काय, स्वत:च्या प्रतिष्ठेला आणि अगदी स्वत:लाही विकायला तयार असतात. काहींनी तर आपल्या अधिकारांच्या शस्त्राला किमतीचा चिठोरा चिकटवलेला असतो. किंमत चुकती झाली, की त्यांचे ते शस्त्र म्यान झालेच म्हणून समजा. या मंडळींना सत्ताधाऱ्यांची आणि तथाकथित लब्धप्रतिष्ठितांची मर्जी सांभाळण्याची ओढ असते. कधीकाळी आपण समाजसेवेचे व्रत घेतले होते, याचाही त्यात ते विसर पडू देतात. त्यांची सेवा ही मेव्यावर डोळा ठेवून होत असते. सतीश शेट्टी यांचा मात्र त्यास अपवाद होता. हॉटेलात साधा चहासुद्धा ते दुसऱ्यांच्या पैशाने कधी प्यायले नसतील. माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला आणि त्यांनी त्याची सर्व कलमे अभ्यासली. त्याचा त्यांनी सर्वसामान्यांसाठी उपयोग केला. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये माहिती देण्यापेक्षा ती दडवण्यातच कर्मचाऱ्यांना जास्त रस असतो. एखादी गोष्ट आपण मुकाटपणे दिली, तर आपले वरिष्ठ किंवा ज्यांचे हात त्यात बरबटलेले आहेत, त्यांना काय वाटेल, याचीच त्यांना चिंता असते. माहिती विचारली गेल्यानंतर ती दिली नाही, तर त्या प्रमादाबद्दल दंड केला जातो, याची माहिती असूनही हा अधिकारीवर्ग सरळ मार्गाने जायला कधी तयार होत नाही. तुम्ही स्वत:पुढे काय वाढून ठेवता आहात, हे त्यांना सुनवायची धमक सतीश शेट्टींकडे होती. एका महामंडळाच्या संचालकांनी आपल्या जन्मतारखेत केलेला घोटाळा त्यांनी उघडकीस आणला आणि सरकारला चौकशीचे आदेश द्यायला त्यांनी भाग पाडले. एका नगराध्यक्षाने केलेले बेकायदा बांधकाम उघडकीस आणून त्यांनी त्याचे नगरसेवकपद रद्द करायला भाग पाडले. नगरसेवकपदच नाही तर नगराध्यक्षपद कसे राहणार? बेकायदा बांधलेला हा बंगला पाडण्यात आला हे विशेष! शासनाकडे खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करून लाभार्थी ठरलेल्या काहींना त्यांनी उघडे पाडले. बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देणाऱ्यांना त्यांनी कायद्याचा हिसका दाखवला. सरकारी जमिनींवर बांधकामे उभारणाऱ्यांना त्यांनी धडा दिला. अशी एक ना अनेक प्रकरणे त्यांच्या नावावर जमा होती. सरकारी यंत्रणा किती निगरगट्ट असते, हेही त्यांनी आल्पावधीत सिद्ध केले. शिधापत्रिकेवर गरिबांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्यांनाही त्यांनी नमवले आहे. माहितीच्या अधिकाराचा या महाराष्ट्रात सर्वाधिक वापर करणारा सेवाभावी कार्यकर्ता ही त्यांची ओळख होती. भ्रष्टाचार, मग तो कोणत्याही पातळीवर असो, त्याला समूळ उखडून टाकण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यांचा खून करणाऱ्यांनी भ्रष्टाचार विरोधकांवर दहशत बसवायचा हा डाव टाकला आहे. आमचा भ्रष्टाचार तुम्ही काढता काय, तुम्हाला आम्ही संपवूनच टाकतो, मग तुम्ही काय कराल, हा सर्व समाजाला उद्देशून त्यांनी टाकलेला पेच आहे. तो या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना आहे. मंजुनाथ षण्मुगम किंवा सत्येंद्रनाथ दुबे ही नावे मोठी, त्यांनी उघडकीस आणलेला भ्रष्टाचार हाही मोठय़ा पातळीवरचा. षण्मुगम यांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या भ्रष्टाचाराला देशासमोर आणले. त्याच सुमारास दुबे यांनी महामार्ग बनवायच्या कार्यातला प्रचंड रकमेचा भ्रष्टाचार उघड केला. पेट्रोलियम पदार्थामध्ये आणि अगदी सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरात असणाऱ्या रॉकेलमध्ये भेसळ करून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या अधिकाऱ्यांना षण्मुगम यांनी २००६ मध्ये जाब विचारला होता, तर त्याच वर्षी दुबे यांनी महामार्ग बनवणारे ठेकेदार आणि तो विषय ज्यांच्या अखत्यारित येतो ती सरकारी कार्यालये यांच्यात असणारे साटेलोटे उघडकीस आणले होते. या दोघांचाही खून झाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दुबे प्रकरण ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून धसाला लावताच दुबे खूनप्रकरण केंद्रीय गुप्तचर खात्याकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले. केंद्रीय गुप्तचर खात्याची आजची नेमकी ओळख काय आहे, ते आपण जाणतोच. केंद्रीय गुप्तचर खात्याने दुबे यांच्या खुनाशी कंत्राटदार कंपन्या वा त्यांचे प्रतिनिधी यांचा संबंध नाही, असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. मग संबंध होता तरी कुणाचा? देशात गाजलेल्या सर्वात मोठय़ा भ्रष्टाचाराला वेशीवर टांगणाऱ्याच्या खुनाची वासलात कशी लागली, ते आपण पाहिले, तिथे सतीश शेट्टींच्या खुनाचे काय? खून करणाऱ्यांनी कुणाचा स्वार्थ पाहिला, कुणाच्या सुपारीवरून त्यांचा खून केला, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते झाले नाही, तर समाजाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडून जायची शक्यता आहे. गैरकृत्यांना पाठिशी घालणारेही अशाने सोकावतील. सरकारी पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवायची हिंमत हरवणारा हा प्रकार आहे. शेट्टी अनामिक म्हणून वावरले असले, तरी त्यांच्या कार्याने नावरूप पाहिले होते. खुनासारख्या भेकड कृत्याने ते पुसून टाकले जाणार नाही. त्यांच्याविषयी ‘तळेगावचे शिलेदार’ या पुस्तकात कवितेच्या दोन ओळी आहेत. त्यांची ओळख द्यायला त्या पुरेशा आहेत. ‘उसळत्या रक्तात मला, ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती पण, भान ध्येयाचे असू दे!’ अशा या जिद्दी ध्येयवेडय़ाला ही आदरांजली!
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|