|
|
|
अद्भुताच्या भिंगातून वास्तव
|
|
|
|
|
निखिलेश चित्रे, रविवार, ३१ जानेवारी २०१० साहित्य, संगीत, चित्रकला अशा सर्वच कलाक्षेत्रांची मुशाफिरी!
 फेदरिको फेलिनी या विख्यात इटालियन दिग्दर्शकाच्या ‘अॅमारकॉर्ड’ (Amarcord) या सिनेमात एक प्रसंग आहे. इटलीमधलं एक छोटं गाव. हिवाळ्यातला पहिला बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. रस्ते, घरं, बागा ही सगळी ठिकाणं पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या थराखाली झाकली गेली आहेत. मोठी माणसंही मुलांसह बर्फामध्ये खेळतायत. एवढय़ात कुठून तरी एका पक्ष्याच्या ओरडण्याचा आवाज येतो. सगळे आवाजाच्या दिशेनं बघतात, पण पक्षी दिसत नाही. काही क्षण असेच जातात आणि अचानक एक मोर चौकातल्या चबुतऱ्यावर हलकेच उतरून पिसारा फुलवतो.
या चित्रपटातील अनेक अविस्मरणीय दृश्यांपैकी हे दृश्य आहे. ‘अॅमारकॉर्ड’ बघताना ब्रुनो शुल्त्झ (Bruno schulz) या पोलिश लेखकाची वारंवार आठवण होते. या चित्रपटाप्रमाणेच शुल्त्झनं त्याच्या द्रोहोबिच (Drohobycz) या गावाची त्याच्या खास संवेदनशील शैलीत आकारलेली प्रतिकृती आपल्या स्ट्रीट ऑफ क्रोकोडाईल्स (street of crocodiles) या कादंबरीत निर्माण केलेली आहे. या गावाचा अवकाश आणि अनामिक कुमारवयीन निवेदकाचं कुटुंब हा ‘स्ट्रीट ऑफ क्रोकोडाईल्स’चा केंद्रबिंदू आहे. ही कादंबरी म्हणजे एकूण तेरा स्वतंत्र प्रकरणांची मालिका आहे. निवेदकाच्या संवेदनशील स्वभावावर खोल ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती, घटना, अवकाश, वेळा या प्रकरणांच्या गाभ्याशी आहेत. गावातला रणरणता उन्हाळा, निवेदकाचे विक्षिप्त, वेडसर वडील, त्यांनी पाळलेले पक्षी, गावातल्या गुंतागुंतीच्या गल्ल्या अशा गोष्टींची अत्यंत तपशीलवार वर्णनं कादंबरीत आहेत. पण हे या कादंबरीचं वैशिष्टय़ नव्हे. तिचं विलक्षण वेगळेपण आहे, ते या वर्णनांना लाभलेल्या एका अतिवास्तव, अद्भुत परिमाणात. कादंबरीच्या नावात असलेला ‘स्ट्रीट ऑफ क्रोकोडाईल्स’ हा गावातला एक अद्भुत भाग आहे. त्याचा मगरींशी काहीच संबंध नाही. तिथल्या इमारती, माणसं आणि गल्लीबोळ यांच्याबद्दल निवेदकानं सांगितलेली माहिती वाचून हा भाग खरंच अस्तित्वात असेल का? असा संभ्रम निर्माण होतो. वाळत घातलेले कपडे, झुरळं, रस्त्यावर एका विशिष्ट कोनातून पडलेली उन्हाची तिरीप अशा साध्यासुध्या तपशिलांमागचे वास्तवाचे अनेक स्तर शुल्त्झनं उलगडून दाखवले आहेत. वास्तवातल्या अत्यंत सामान्य वस्तूंवरचं निवेदिकाचं चिंतन इथे उत्कृष्ट कवितेच्या पातळीवर गेलेलं आहे. वाक्यातला प्रत्येक शब्द इथे मागच्या-पुढच्या शब्दाला जोडून येताना अर्थाचे अनेक तरंग निर्माण करतो. या उदाहरणावरून त्याची कल्पना येईल. कुटुंबीय आणि वडिलांच्या कापडाच्या दुकानातले कर्मचारी यांच्यासह निवेदकानं घेतलेल्या दुपारच्या जेवणाचा हा प्रसंग आहे. त्याचं वर्णन करताना निवेदक म्हणतो : ‘‘बशीतून जेव्हा तळलेले मासे समोर आले, त्या वेळी अगदी मीन राशीच्या चिन्हाची आठवण झाली. त्यामुळे दिवसाला स्वत:ची अशी ओळख लाभली याचा आम्हाला आनंद झाला.’’ कादंबरीतल्या सर्वच प्रसंगांवर अद्भुताचा प्रकाश पसरलेला आहे. मात्र हे अद्भुत वास्तवापासून दूर नेणारं नसून, त्याचे त्रासदायक पैलू उजळ करणारं आहे. एवढं असूनही कादंबरीतलं प्रत्येक पात्र अस्सल, जिवंत आणि व्यामिश्र वाटतं. निवेदकाच्या वडिलांचं पात्र हा तर या कादंबरीचा कणाच आहे. कापडविक्रीचा व्यवसाय करणारा हा माणूस अत्यंत विक्षिप्त आहे. त्यानं घराच्या माडीवर पाळलेले असंख्य प्रकारचे पक्षी आणि त्यातही ‘डोडो’ हा दुर्मिळ पक्षी हे त्यांच्या नादिष्टपणाचं उदाहरण. हे पक्षी पिंजऱ्यात न ठेवता थेट मोकळेच सोडलेले आहेत. एके दिवशी अपघातानं यातले अनेक पक्षी मरतात. उरलेले उडून जातात. हा धक्का निवेदकाचे वडील पचवू शकत नाहीत. त्यांचा वास्तवावरचा ताबा हळूहळू सुटत जातो. कपडय़ांची चाचणी घेण्यासाठी दुकानात ठेवलेल्या पुतळ्यांना ते ‘द्रव्याचं स्वरूप’ या विषयावर लांबलचक भाषण देतात. वेडाच्या भरातलं हे स्वगतवजा भाषण हा आधुनिक साहित्यातल्या सवरेत्कृष्ट गद्याचा नमुनाच आहे. कादंबरीतलं एक संपूर्ण प्रकरण व्यापणारं हे भाषण शुल्त्झच्या कादंबरीकार म्हणून मोठेपणाचा ठोस पुरावा आहे. स्वत:च्या बायकोला अजिबात न जुमानणारे निवेदकाचे वडील, घरातल्या ‘आदेला’ या मोलकरणीला मात्र पूर्ण शरण आलेले असतात. तिच्यासमोर ते एखाद्या आज्ञाधारक मुलासारखे वागतात. अशातच एके दिवशी ते कुणालाही न सांगता घरातून नाहीसे होतात. काही महिन्यांनी ते परत येतात; तेव्हा त्यांच्यातली जगण्याची ऊर्मीच नष्ट झालेली असते. निवेदकानं निर्माण केलेलं हे विश्व त्याच्या तीव्र संवेदनशीलतेच्या भिंगातून आपल्याला दिसतं. आपल्या दैनंदिन आयुष्याला घट्ट बिलगून असलेले, पण कधीच न जाणवलेले सूक्ष्मातिसूक्ष्म संदर्भ इथं लेखकानं जिवंत केलेले आहेत. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या खोलीत गाद्यांवर आणि उशांवर उगवलेली रंगीबेरंगी बुरशी पाहून ती ‘बुरशीची बाग’च आहे, असं निवेदकाला वाटतं. यावरून कादंबरीतल्या काव्यात्मतेची अत्यंत वैयक्तिक, पण झपाटून टाकणारी जातकुळी ध्यानात येते. लेखकानं आयुष्यातल्या लहानसहान घटनांकडे अशा निराळ्याच कोनातून पाहिल्यानं त्या घटनांना पुराणकथा किंवा ‘मिथ’चा दर्जा प्राप्त होतो. ब्रुनो शुल्त्झची तुलना अनेकांनी काफ्काशी केलेली आहे. या दोन्ही प्रतिभावंतांच्या विश्वांमध्ये साम्य नक्कीच आहे, पण शुल्त्झची संवेदनशीलता ही खास त्याची आहे. १८९२ मध्ये ऑस्ट्रिया आणि हंगेरीच्या संयुक्त साम्राज्याचा भाग असलेल्या द्रोहोविच गावात जन्मलेला ब्रुनो शुल्त्झ हा आज विसाव्या शतकातल्या थोर पोलिश लेखकांपैकी एक मानला जातो. दुर्दैवानं त्याची ‘स्ट्रीट ऑफ क्रोकोडाईल्स’ आणि ‘सॅनाटोरियम अंडर द साईन ऑफ अवर ग्लास’ (Sanatorium under the sign of hourglass) ही दोनच पुस्तकं आज उपलब्ध आहेत. काफ्काच्या ‘द ट्रायल’चा पहिला पोलिश अनुवाद करण्याचं श्रेयही शुल्त्झकडे जातं. शुल्त्झची चित्रंसुद्धा त्याच्या साहित्याइतकीच दर्जेदार असून ती पुस्तकरूपात उपलब्ध आहेत. ‘स्ट्रीट ऑफ क्रोकोडाईल्स’ ही त्याची इंग्रजीत अनुवादित झालेली पहिली कादंबरी. पेंग्विन प्रकाशनानं आपल्या ‘मॉडर्न क्लासिक्स’ या मालिकेत हे दीडशे पानांचं पुस्तक प्रकाशित केलंय. सेलिना विनिव्स्का (Celina Wieniwska) यांनी केलेल्या या अनुवादाला शुल्त्झचे चरित्रकार आणि पोलिश वाङ्मयाचे अभ्यासक जेरी फीकोव्स्की (Jery Ficowski) यांची प्रस्तावना लाभली आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|