|
व्हॅटचा तडाखा; महागाई भडकणार
|
|
|
|
|
अन्नधान्यासह ९७ वस्तू व्हॅटच्या कक्षेत; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी नागपूर, १७ मार्च/प्रतिनिधी
वाढत्या महागाईला रोखण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे एकीकडे सांगत असतानाच राज्य सरकारने अर्थसंकल्पापूर्वीच मूल्यवर्धित कर (व्हॅट)मध्ये १ टक्क्याची वाढ केल्याने महागाईत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे यंदा व्हॅटची व्याप्ती वाढवून त्यात अन्नधान्यासह ९७ वस्तूंचाही समावेश केल्याने आता धान्याच्या किमती या किंमतीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत.
राज्यशासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक अध्यादेश काढून शासनाने राज्यात ४ टक्के असलेला व्हॅट १ टक्क्याने वाढवून ५ टक्के केला आहे. विशेष म्हणजे ही वाढ करताना शासनाने अन्नधान्य, कापड उद्योगांवरही व्हॅट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेवरील बोजा वाढणार आहे. व्हॅट वाढविल्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारच्या महाराष्ट्र व्हॅट कायद्यातील कलम ९ अंतर्गत १ एप्रिल २००७ नंतर व्हॅटच्या दरात बदल करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एक नवा अध्यादेश जारी करून हे कलम मागे घेतले आणि व्हॅटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. अन्नधान्यासोबत विविध कर लावण्यात येत असलेल्या ११४ विभागातील वस्तूंपैकी ९७ विभागातील वस्तूंवर व्हॅट लावण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत खाद्यपदार्थ, कृषी उत्पादने, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर व्हॅट लागू होता. मात्र, आता प्रथमच अन्नधान्यांनाही लागू करण्यात आला आहे. राज्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात अन्नधान्यांवर व्हॅट लावण्याची पहिलीच वेळ असून यामुळे अन्नधान्यांच्या किंमतीत बरीच वाढ होणार असल्याचे नागपूर होलसेल ग्रेन मर्चटस असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले. व्हॅटच्या दरात वाढ केल्याने आताच किंमती किती वाढतील हे सांगता येणार नाही, मात्र या वाढीव व्हॅटचा फटका शेवटी नागरिकांनाच बसणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अन्नधान्य व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या निर्णयाला विरोध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
|