|
|
|
बेळगावात मराठी भाषकांच्या मोर्चावर लाठीमार
|
|
|
|
|
राजेंद्र जोशी ,बेळगाव, १२ जुलै
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाने सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय करणारी भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या महामोर्चाला सोमवारी बेळगाव येथे मराठी भाषकांनी उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला.या मोर्चादरम्यान मराठी तरुणांनी काही ठिकाणी केलेली दगडफेक आणि कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार, यामुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. तथापि, काही कालावधीतच कर्नाटक पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने दुपारनंतर बेळगावातील जनजीवन पूर्वपदावर आले.
दरम्यान, सीमा चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या या दंडेलीचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, दंडुक्याच्या जोरावर कर्नाटक सरकारने मराठी भाषकांची कितीही गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तरी ताठ बाण्याचा मराठी माणूस या दडपशाहीला भीक घालणार नाही, असा इशारा या वेळी दिला. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाने १९ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी घेऊन वादग्रस्त प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात केंद्राने बेळगाव आणि कारवार हे दोन जिल्हे कर्नाटकात समाविष्ट करताना राज्य पुनर्रचना आयोगाने सर्व बाबींचा विचार केला होता, अशा आशयाची भूमिका मांडल्यामुळे गेले चार दिवस दक्षिण महाराष्ट्र आणि सीमा भागात असंतोष खदखदतो आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामोर्चावेळी मराठी भाषक युवा पिढीने या असंतोषाला वाट करून दिली. मोर्चाच्या मार्गावर विशेषत: राणी चन्नम्मा चौकात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वादग्रस्त प्रतिज्ञापत्रातील आक्षेप फेटाळून महाराष्ट्र शासनाचा अंतरिम अर्ज मंजूर केल्याचे वृत्त थडकल्यानंतर या तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला आणि या वेळीच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या कन्नडरक्षक वेदिकेच्या सदस्यांना पाहून मराठी भाषकांची माथी भडकली. यातून दगडफेकीला सुरुवात झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांचे डिजिटल पोस्टर फाडण्यात आले आणि बेळगाव शहर एका तणावाच्या छायेखाली गेले. बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौकातून या मोर्चाला दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. सीमा चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, बेळगावचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर संभाजी पाटील, माजी खासदार दीपक दळवी, अर्जुनराव हिशोबकर, मानोजी अष्टेकर यांच्यासह सीमा चळवळीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात सुमारे १५ हजारांहून अधिक मराठी भाषक सहभागी होते. या मोर्चामध्ये तरुण आणि महिलांचा सहभाग मोठा होता. कॉलेज रोडवरून केंद्र शासनाचा धिक्कार आणि मराठी भाषकांच्या एकजुटीच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला, तेव्हा या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेला प्रा. एन. डी. पाटील मार्गदर्शन करीत असताना सभेतील काही मराठी तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या विभागीय आयुक्तालयाच्या आवारातील कर्नाटकचा ध्वज काढून तेथे भगवा ध्वज लावला. यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडण्यास सुरुवात झाली. कर्नाटक शासनाचा ध्वज खाली उतरवल्यामुळे तेथे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी तातडीने तेथील भगवा ध्वज काढून पुन्हा कर्नाटक शासनाचा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नावेळी मराठी भाषक तरुणांनी स्वैर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस जखमी झाल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी लाठीमाराचा आधार घेतला आणि दिसताक्षणीच लाठीने झोडपून काढण्यास सुरुवात केली. सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. सभा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला लाठीमारामुळे नागरिकांची पळापळ अशा अवस्थेत रस्त्यावर चपलांचा खच पडल्याचे चित्र होते. या घटनेचे वृत्त समजताच बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुख सोनिया नारंग घटनास्थळी हजर झाल्या. त्यांनी पोलिसांची जादा कुमक पाचारण करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली. या सभेत प्रा. एन. डी. पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या जुलमी प्रवृत्तीवर कठोर टीका केली. सुमारे ५५ वर्षे लोकशाही मार्गाने जगाच्या नकाशावर प्रदीर्घ काळ चाललेला हा लढा कर्नाटक सरकार दंडुक्याच्या जोरावर मोडू पाहते आहे. मराठी माणसांच्या तीन पिढय़ा या गळचेपीची शिकार बनल्या असल्या तरी अशा दंडुकेशाहीला मराठी माणूस भीक घालणार नाही, असा इशारा देत प्रा. एन. डी. पाटील यांनी केंद्र शासनाच्या मराठी भाषकांविषयी असलेल्या आकसवृत्तीकडे सभेचे लक्ष वेधले होते. राज्यांच्या सीमेचा वाद मिटविण्याचे अधिकार केंद्राला घटनेने बहाल केले असताना असे वाद वेळीच न मिटवता केंद्र सरकारने मराठी माणसांना पन्नास वर्षे कर्नाटकाच्या तुरुंगात डांबून ठेवण्याचे काम केले आहे. या प्रश्नावर केंद्र सरकार निर्णय घेत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला तर तेथे म्हणणे मांडण्यास टाळाटाळ केली जाते आणि प्रत्यक्ष म्हणणे मांडताना वस्तुस्थितीचा विपर्यास केला जातो, असे स्पष्ट करताना प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, आज केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वादग्रस्त प्रतिज्ञापत्रातील आक्षेपही फेटाळून लावण्यात आले आहेत. केंद्राचा या प्रश्नी असलेला एकूण व्यवहार मराठी भाषकांवर अन्याय करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने मागे घेणे हाच मुळी मराठी माणसांचा पहिला विषय असून, न्यायालयात आपली भूमिका प्रभावीपणे मांडून मराठी भाषक न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाही. या वेळी माजी महापौर संभाजी पाटील यांचेही भाषण झाले. संभाजी पाटील यांनी मध्यंतरीच्या काळात कानडी गटाबरोबर हातमिळवणी केल्यामुळे त्यांना समितीच्या परिघाबाहेर काढण्यात आले होते. सोमवारी एकीकरण समितीच्या नेत्यांबरोबर संभाजी पाटील एकाच गाडीतून मोर्चाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या भाषणात सर्व मतभेद विसरून मराठी भाषकांना अंतिम न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या सभेनंतर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषकांच्या एका व्यापक शिष्टमंडळाने बेळगावच्या सहायक जिल्हाधिकारी एकरूप कौर यांना निवेदन सादर केले. निवेदनात सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषकांना न्याय द्यावा, सेवा भागातील मराठी भाषकांना भाषक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळावेत, सर्व शासकीय व्यवहार मराठीतून व्हावा आणि बेळगावातील मराठी भाषकांच्या आरोग्याच्या मुळावर आलेला तूरमुरी येथील कचरा डेपो त्वरित हलवावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|