|
|
|
हेमलकसामधील आदिवासींनी सहनशक्ती शिकविली - डॉ.प्रकाश आमटे
|
|
|
|
|
विकास महाडिक, स्वित्र्झलड (झुरिच), २५ जुलै अमेरिकेतील बृहन्महाराष्ट मंडळाने आयोजित केलेल्या संमेलनासाठी जाताना डॉ. प्रकाश आमटे यांना अमेरिकन दूतावासाने व्हिसा नाकरला होता. त्यावेळी लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी तो विषय लावून धरला.
भारतात असे खूप समाजसेवक आहेत पण त्यांच्या बॅक खात्यात काहीही जमा नाही त्यामुळे त्यांचे कार्य छोटे होत नाही. ही बाब केतकर यांनी अमेरिकन दूतावासाला पटवून दिली तेव्हा अमेरिकन दूतावासाने दिलगिरी व्यक्त केल्याचा किस्सा खेडकर यांनी मुलाखती दरम्यान सांगितला. या संमेलनाला येतानाही तिच समस्या निर्माण झाली होती. पण यावेळी गिरीष ठाकूर या हॉलंडवासिय मराठी बांधवाने सोडविली त्यामुळे आमटे दांपत्याचे स्वित्र्झलडला येणे झाले. लोकबिरादरीचे कार्य जगात पोहचले आहे. याची एक चुणूक या संमेलनाच्या निमित्ताने आली. जर्मनीतील एक शिक्षिका मारियाना आपल्या दोन्ही मुलीसह या संमेलनात आमटे दांपत्याला भेटायला आली होती. तिने मुलाखत संपल्यानंतर सुंदर मराठीत मनोगत व्यक्त केले. त्या १७ वर्ष हेमलकसाला जात आहेत विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुली फेलिसिटीज आणि बेनादेताही लोकबिरादारीच्या कामाच्या फॅन आहेत. आईवरोबर त्यांनी अनेक वेळा हेमलकसाला भेट दिली आहे.
जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका आदिवासीचा संपूर्ण चेहरा अस्वलाने रक्तबंबाल केला. दोन डोळे, नाक, कपाळ, काहीही राहिले नव्हते. केवळ श्वास होता. तशा स्थितीत तो ६० किलोमीटर चालत हेमलकसाला आला. गुंगी देण्याची सोय नसल्यामुळे गुंगी न देता त्याच्या चेहऱ्यावर १०० टाके घातले गेले. त्याने त्या सर्व वेदना सहन केल्या. अंगात १०६ डिग्री ताप असताना चांगो १२ किलो मीटर चालत दवाखान्यात आला. संकट आल्यावर दुख: करीत बसणं, रडत बसणं, आदिवासी करीत नाहीत. आपण बारीक सारीक गोष्टींचा किती बाऊ करतो. हेमलकसा भागातील आदिवासींना आम्ही शिक्षण, आरोग्य किंवा जीवनशैली शिकविली असेल पण त्यांनी आम्हाला सहनशक्ती शिकविली, अशी प्रांजळ कबुली मॅगसेसे पुरस्कार विजेत जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वित्र्झलडमधील युरोपीय मराठी संमेलनात हरहुन्नरी अभिनेते सचिन खेडकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत दिली. युरोप मधील बारा देशात रोजीरोटीसाठी आलेल्या मराठी बांधवांच्या आठव्या मराठी संमेलनाचे शानदार उदघाटन शुक्रवारी झाले. शनिवारी दुपारच्या सत्रात डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमटे दांपत्यांने आपल्या ४० वर्षांतील अनेक बरे वाईट अनुभव युरोप मधील मराठीवासियांना ऐकविले. मुलाखतीच्या सुरवातीला आमटे कुटुंबाने हेमलकसा मध्ये हाती घेतलेल्या कार्याचे सादरीकरण दाखविण्यात आले. त्यावेळी संमेलनात बहुतांशी पेशाने डॉक्टर असणाऱ्या मराठी बांधवांच्या डोळ्यात पाणी तरळले. मॅगेसेसे पुरस्कार मिळाला तेव्हा खूप आनंद झाला. एकाच कुटुंबातील दोघांना एकाच कार्याबद्दल पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. बाबांच्या कार्याचा सुंगध जगात पसरला आहे असे या पुरस्कारांवरुन वाटू लागले आहे. हे पुरस्कार कुठेही न जाता मिळाले याचे जास्त आश्र्चय वाटते. आंतरराष्ट्रीय पुरस्कार देणारी मंडळी कागदोपत्री विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्य बघतात. पुरस्कारांच्या निमित्ताने मिळालेली रक्कम ही लोकबिरादारीच्या प्रकल्पासाठी कामाला येत असल्याचा आनंद हा वेगळाच आहे. बाबांनी हेमलकसा मध्ये केलेले कार्य त्यांना प्रारंभी मिळालेल्या कार्यकर्त्यांमुळे वाढू शकले ते कार्यकर्ते मिळणे हे आमचे भाग्य आहे. रस्ते, वीज, पाणी, वाहतूक, संवादाची साधने नाहीत त्यावेळी काही कार्यकर्ते बाबांबरोबर येऊन राहिले. तो त्यांचा मोठा त्याग होता. रस्ते वीज पाण्याशिवाय असणाऱ्या परस्थितीशी कसे झगडावे हे आम्ही आदिवासींकडे बघून शिकलो पण एकांतवासाशी कसे झगडावे याचा अनुभव नव्हता असे आमटे यांनी सांगितल्यावर सभागृहात काहीक्षण निरव शांतता पसरली. आरोग्य क्षेत्रात प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर असतात. हे आदिवासींना माहित नसते. एकाच डॉक्टरने सर्व केले पाहिजे असा त्यांचा समज आहे. त्यात गैर ते काही नाही. शिक्षणाच्या अभावामुळे हे त्यांना महित नाही पण त्यांच्या याच विश्वासामुळे आम्ही पुस्तके वाचून प्रसुती आडलेल्या बाईला सोडवू शकलो.पण या शस्त्रक्रियेत त्या बाईच्या मुलाला वाचवू शकलो नाही. आईच्या उदरातच मृत पावलेल्या त्या नवजात शिशूला कापावे लागले याचे सर्वात जास्त दुख: वाटले पण दोनच वर्षांने त्या बाईने दुसऱ्या बालकाला जन्म दिला त्याचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही. त्यावेळी दुखाचे परिमार्जन झाल्यासारखे वाटले, असे डॉ.मंदाकिनी आमटे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. आदिवासींना काही मिळत नाही म्हणून अंगावर बनियान आणि चड्डी हा गणवेष चढविणाऱ्या ‘सच्चा माणसा’ची मुलाखत खेडकर यांनी संपविल्यानंतर अख्खे सभागृह आमटे दांपत्याला अभिवादन करण्यासाठी टाळयांच्या गजरात उठून उभे राहिले आणि या टाळ्या चार मिनिटे सतत वाजत होत्या. त्यावेळी स्वित्र्झलडमधील सूर्याची किरणे कार्यक्रम चाललेल्या सभागृहावर पडली होती. जणूकाही या नंदनवनातील सूर्यानेही डॉ.आमटे यांच्या कार्याला ‘सॅल्यूट’ ठोकला होता.
पुढील युरोपीय मराठी संमेलन वेल्समध्ये : पसायदानाने सांगता आबीर गुलाल, काकड आरती आणि अंभग या वातावरणात भालचंद्र पटवर्धन यांचे किर्तन, दिलीप थत्ते यांचे हिंदुत्वाचे सप्तर्षी आणि प्रशांत दामले व मकरंद अनासपुरे यांच्या गाठ आहे सत्याशी या बहारदार कार्यक्रमानंतर आज स्वित्र्झलडमधील आठव्या युरोपीय मराठी संमेलनाची बिलवा अभ्यंकर या चिमुरडीच्या पसायदानाने सांगता झाली. यावेळी पुढील संमेलन (२०१२) वेल्स मध्ये तर त्यापुढील संमेलन (२०१४) मॉस्को-रशिया येथे घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता सुरु झालेले आठवे युरोपीय संमेलनाची सांगता आज (रविवारी) दुपारी दोन वाजता झाली. यावेळी महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल नेने यांनी पुढील संमेलनाचे यजमानपद वेल्स स्विकारत असल्याचे जाहीर केले. त्याला डॉ.निनाद ठाकरे यांनी अनुमोदन दिले. तर रशियातील २०१४ च्या संमेलनाची जबाबदारी आम्ही पार पाडण्यास उत्सुक असल्याचे नरेंद्र आपटे यांनी सांगितले. त्यानंतर वेल्स मध्ये ‘पुन्हा भेटू’ अशी प्रॉमिस करीत सर्व युरोपीय मराठी बांधवांनी निरोप घेतला. संमेलनाचे संयोजक प्रमुख अशिष अरोंदेकर व चिटणीस वैभव अभ्यंकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
नाटय़रसिक म्हणाले, वाह गुरू! दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला विशेष दाद चार मराठी माणसे एकत्र आली की नाटक बघतात. युरोपीय संमेलनही त्यास अपवाद नव्हते. दुर्धर आजाराने त्रस्त प्राध्यापक सप्रे आणि त्यांना दर गुरुवारी भेटणारा त्यांचा विद्यार्थी विद्याधर पै यांच्यातील भावबंध हळुवारपणे उलगडून दाखविणाऱ्या वाह गुरू! या मराठी नाटकाचा शुभारंभ युरोपातील मराठी बांधवांच्या संमेलनात झाला. प्रेमाचे महत्त्व पटवून देताना ‘प्रेम हे हातचे राखून ठेवण्याची गोष्ट नाही, ती तर उधळपट्टी करण्याची गोष्ट आहे. जितके उधळाल तितके वाढणारा तो एकमेव ‘नॅचरल रिसोर्स’ आहे’ यासारख्या नाटकांमधील संवादांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. ‘वाह गुरू’ या मराठी नाटकाचा युरोपमधील पहिला प्रयोग शनिवारी युरोपीय मराठी संमेलनात झाला. दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेस विशेष दाद मिळाली. संमेलनाचे संयोजन प्रमुख आशिष अरोंदेकर यांनी पुण्यातील लेखक डॉ.चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित वाह गुरू! या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग शनिवारी घडवून आणला. दिलीप प्रभावळकर आणि अतुल परचुरे यांच्या अभिनयाचा कस लागणाऱ्या या नाटकात डॉ. फणसळकर यांनी केलेल्या संवादाच्या पेरणीला प्रेक्षकांनी तितकीच भरभरून दाद दिली. ‘च्युसडे विथ मोरी’ या गाजलेल्या इंग्रजी कांदबरीवर हे नाटक आधारित असले तरी ते अस्सल मराठी बाजाचे वाटते. आजारपणामुळे वडापाव खाता येत नाही म्हणून आता ‘वडापाव पाव’ त नाही अशा कोटीबाज संवादांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. असाध्य आजारामुळे मृत्यू समोर दिसत असतानाही हसत-खेळत जगणारे प्राध्यापक दत्ता सप्रे आणि कामामुळे साधे प्रेम करायलाही सवड नसलेल्या शिष्याच्या संबंधातील वीण या नाटकात उलगडण्यात आली आहे. नेहमीपेक्षा वेगळी, पण आव्हानात्मक भूमिका असल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता'शी बोलताना सांगितले.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|
When late great BABA was Awarded this Honour, I thought, why our Maharashtra Govt.did not Honour him as our Maharashtra's "Brand Ambassador" like Shri Ramdev Baba is Brand Ambassador of Bhihar state at Cabinet Minister's Rank.
As recognition of this great family tradition the Govt.of Maharashtra should honour these Biradari Doctors as our Brand Ambassadors.