मुखपृष्ठ >> लेख >> ग्लोबल वॉर्मिंग - गैरसमज आणि वस्तुस्थिती
 


स्पर्धेचे नियम व अटी




ग्लोबल वॉर्मिंग - गैरसमज आणि वस्तुस्थिती Bookmark and Share Print E-mail
रविवार, २० सप्टेंबर २००९
औरंगाबाद येथे सुरू असलेल्या ‘वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आज (२० सप्टेंबर) ‘ग्लोबल वॉर्मिग’ या अभिजीत घोरपडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. विजय दिवाण यांच्या हस्ते होत आहे. या  निमित्ताने पुस्तकाची प्रस्तावना आणि ‘आजचे वेगळेपण’ हे प्रकरण  यांतील संपादित अंश-
‘येत्या वीस-पंचवीस वर्षांत मुंबईचा बराचसा भाग पाण्याखाली जाणार.’ ‘दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर साचून असलेले बर्फाचे थर वितळून जगभर समुद्राची पातळी वाढणार.’ ‘शेतीचे उत्पादन कमी होऊन जगभर अन्नटंचाईची भयंकर समस्या निर्माण होणार.’ ‘जगाच्या सर्व भागांत अतिवृष्टी आणि दुष्काळांची तीव्रता वाढणार.’ ‘हिमालयातील बर्फ वितळून तिथे आता असलेल्या बर्फापैकी केवळ वीस टक्के बर्फ उरणार, मग उत्तर भारतातील नद्यांना सुरुवातीला पूर येणार- पाठोपाठ त्या आटणार.’ ‘सर्वच भागांत रोगराईचे प्रमाण वाढणार.’..
    ग्लोबल वॉर्मिग, अर्थात जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे जगावर कोणती संकटे येऊ घातली आहेत, याबाबत रोज वर्तमानपत्रे आणि चॅनेल्सवर भरभरून माहिती दिली जाते. त्याचबरोबर सध्या जगाच्या पाठीवर सर्वत्र पूर, वादळे, दुष्काळ या घटना म्हणजे येऊ घातलेल्या संकटांचे संकेत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे हा माहितीचा भडिमार सुरू असताना मध्येच कोणीतरी ‘ग्लोबल वॉर्मिग’ हा बागुलबुवा असल्याचे सांगतो आणि या सर्व घटना नैसर्गिक असल्याचा दावा करतो. रोज नवनवे संशोधन, निरीक्षणे, त्याबाबतचे निष्कर्ष येतात आणि आधी असलेल्या माहितीत भर घालतात.
‘ग्लोबल वॉर्मिग’बाबत इतकी प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असूनही सध्या या विषयाबाबत सामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यातच रोज नवी माहिती येऊन आदळत असल्याने गोंधळ वाढला आहे. त्यामुळे या विषयातील खूप माहिती असूनही त्यातून काहीच बोध होत नाही, असे चित्र आहे. या समस्येचे नेमके वास्तव काय आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा तातडीने उपाययोजना करण्याची किती गरज आहे, हे सर्व कशामुळे घडत आहे, गेल्या पाच-सात वर्षांतच त्याबाबत आपल्याकडे इतकी का चर्चा होते आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र रोज येणाऱ्या माहितीतून मिळत नाहीत. त्यामुळे या समस्येशी आपला संबंध काय, हेही सामान्य माणसाला समजत नाही.
ग्लोबल वॉर्मिग हा सध्याचा ‘हॉट’ विषय बनला आहे. त्यामुळे खरे तर जनसामान्यांमध्ये या विषयाबाबत जागरूकता वाढणे अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात मात्र गोंधळच वाढत आहे. त्याला संशोधक आणि प्रसारमाध्यमेसुद्धा तितकीच जबाबदार आहेत. यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा संबंध ग्लोबल वॉर्मिगशी जोडला जातो. मुंबईत २००५ साली झालेली अतिवृष्टी, त्याच वर्षी महाराष्ट्रात आलेले पूर, त्याच्या पुढच्याच वर्षी राजस्थानच्या वाळवंटात आलेला पूर, युरोपातील उष्णतेची लाट, अमेरिकेला तडाखा देणारी कॅटरिना-रीटा यासारखी वादळे, ऑस्ट्रेलियात पडलेला दुष्काळ.. अशा घटनांमागे लागलीच ग्लोबल वॉर्मिग हे कारण असल्याचे बोलले जाते. असा एकाकी संबंध लावताना अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत का? यावर कोणी फारसे बोलत नाही. आंध्र प्रदेशात दरवर्षी येणारी उष्णतेची लाट आणि गंगा-यमुना, ब्रह्मपुत्रेला दरवर्षी येणारे पूर यांचा संबंधही ‘ग्लोबल वॉर्मिग’शी जोडला जातो, याला काय म्हणायचे? एकीकडे असा ‘बादरायण’ संबंध जोडला जात असताना काही जण ग्लोबल वॉर्मिग ही समस्या असल्याचेच नाकारतात व या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. यातून आपण वास्तवापासून दूर जातो. परिणामी या समस्येचे गांभीर्यच कमी होत जाते.
या समस्येबाबत गोंधळ वाढण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यामागच्या शास्त्रीय संकल्पनांची माहिती नसणे. हे सर्व कशामुळे घडत आहे, त्यामागे कोणती कारणे आहेत, जागतिक तापमानात सध्या होत असलेली वाढ पहिल्यांदाच होत आहे का याबाबत पृथ्वीचा इतिहास काय सांगतो, या घटनांमागे नैसर्गिक कारणांचा किती वाटा आहे, माणसाच्या उद्योगांचा किती हात आहे या गोष्टी माहीत झाल्याशिवाय ‘ग्लोबल वॉर्मिग’चे वास्तव समजणार नाही आणि याबाबतचा गोंधळही दूर होणार नाही. वास्तव समजल्यावरच या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत विचार होईल. एकदा का मूळ समस्या व तिचे स्वरूप माहीत झाले की, याबाबत रोज प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचाही अर्थ समजेल. त्यातील वस्तुस्थिती आणि अतिरंजितता यात फरक करण्याची क्षमताही निर्माण होण्यास मदत होईल!
हे काम सोपे व्हावे म्हणून ‘ग्लोबल वॉर्मिग’च्या मूलभूत विज्ञानापासून त्याच्या विविध संकल्पना, त्याची वस्तुस्थिती, भविष्यात होऊ घातलेले धोके, इतिहासात अशा घडलेल्या घटना, त्यांचा जीवसृष्टीवर झालेला परिणाम, आता याबाबत जगापुढे असलेली आव्हाने, ती पेलण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, त्याला आपण काय हातभार लावू शकतो, असे अनेक पैलू जाणून घेणे आवश्यक ठरेल. असे केले तरच हा विषय, या विषयाचा आवाका लक्षात येईल आणि त्याचे गांभीर्यसुद्धा समजेल.
आजचे वेगळेपण
हवामानाच्या आतापर्यंतच्या इतिहासावर जो प्रकाश टाकण्यात आला आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हवामानातील अनेक तीव्र घटना या नैसर्गिकरीत्या घडू शकतात. चक्रीवादळे, दुष्काळ, महापूर, उष्णतेच्या लाटा या घटना नैसर्गिक चक्राचाच भाग असतो. त्यात चढ-उतार होणे, हाही निसर्गाचाच भाग असल्याचे पुरावेदेखील आहेत. ज्वालामुखीचे प्रचंड उद्रेक, उल्का व अशनींचा वर्षांव, भूखंडांची हालचाल व त्यांचे एकमेकांपासून दुभंगणे, सूर्यापासून मिळणारी उष्णता कमी-जास्त होणे, पृथ्वीच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेत फरक पडणे अशा अचाट घटनाही घडल्या आहेत. पृथ्वीच्या वातावरणात, प्रचंड बदल घडवून आणण्यास या घटना कारणीभूत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे विशिष्ट चक्रसुद्धा आहे. त्यानुसार या घटनांमध्ये चढ-उतारही होतात. त्याचा परिणाम म्हणूनच पृथ्वीवर कोटय़वधी वर्षांपासून अतिशय थंड हिमयुगे आणि जास्त तापमानाचे उबदार कालखंड आलटून पालटून अवतरले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावर असेच वाटेल की, पृथ्वीच्या वातावरणात जे काही बदल होत आहेत, त्यांचा माणसाशी संबंध नाहीच. हे सर्व बदल आणि सध्या चर्चेत असलेली तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिग) हे सर्व नैसर्गिक चक्राचेच परिणाम आहेत.
पण या इतिहासातील घटना आणि सध्याची परिस्थिती यात काही फरक असेल तर मात्र या घटनांशी माणसाचा संबंध असल्याचा निष्कर्ष काढता येईल. विशेष म्हणजे असा फरक पाहायला मिळतो. त्यामुळेच आता घडत असलेल्या घटनांमध्ये, माणसाचा काही ना काही हात असल्याचे ठामपणे म्हणता येते.
 पृथ्वीवरील कार्बन वायूचे प्रमाण आजच्या काळात लक्षणीय वाढले आहे. पृथ्वीच्या आपल्याला माहीत असलेल्या इतिहासात, या वायूंचे इतके जास्त प्रमाण कधीही नव्हते. ‘कार्बन वायू’ म्हणजे कार्बन-डाय-ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारखे वायू, जे वातावरणाचे तापमान वाढविण्यास कारणीभूत ठरतात. या वायूंचे वातावरणातील प्रमाण किती होते, याची गेल्या आठ लाख वर्षांची माहिती सध्या उपलब्ध आहे. या संपूर्ण आठ लाख वर्षांच्या काळात या कार्बन वायूंचे वातावरणातील प्रमाण प्रति दहा लाख घटकांमध्ये ३०० घटकांहूनही कमी होते. ते गेल्या दोनशे वर्षांमध्ये पहिल्यांदाच तीनशेच्यावर गेले. २००५ सालच्या आकडेवाडीनुसार, हे प्रमाण सुमारे ३७९ घटकांपर्यंत वाढले होते. त्यात अजूनही वेगाने वाढ होत आहे. या  वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढण्यास कारखाने औष्णिक वीजकेंद्रे, वाहने, जंगलतोड, जमिनीचा असंतुलित पद्धतीने वापर, शेतीत रासायनिक खतांचा अधिक वापर ही कारणे आहेत. अर्थातच ही माणसाचीच ‘देण’ आहे. या वायूंचे प्रमाण वाढेल तशी जागतिक तापमानात वाढ होते. कार्बन वायूंचे वाढलेले प्रमाण, ही पृथ्वीच्या दृष्टीने अपवादात्मक स्थिती आहे. आणि त्यामागे माणसाचाच हात आहे.
पृथ्वीने इतिहासात अनेक हिमयुगे पाहिली, तसेच उबदार कालखंडसुद्धा पाहिले आहेत. या काळात तिच्या तापमानात लक्षणीय बदल झाला. हिमयुगं व उबदार कालखंडामधील तापमानात तब्बल आठ ते दहा अंश सेल्सिअस इतकी जास्त तफावत होती. या तुलनेत आधुनिक काळात, म्हणजे गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये जागतिक तापमानात ०.७४ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. इतिहासातील आठ- दहा अंशांच्या तुलनेत ही वाढ किरकोळ म्हणायची, तरीही हेसुद्धा पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. यातील वेगळेपण असे की, तापमानवाढीचा हा वेग पृथ्वीने कधीच अनुभवला नव्हता. ०.७४ अंश हा आकडा कमी वाटला तरी केवळ सव्वाशे वर्षांमध्ये जागतिक तापमानात इतकी वाढ होणे हे वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण पृथ्वीचे तापमान आतापर्यंत अनेकदा आठ-दहा अंशांनी वाढले असले तरी, त्यासाठी काही लाख किंवा काही कोटी वर्षे जावी लागली आहेत. पण अलिकडे झालेला बदल केवळ सव्वाशे वर्षांमध्ये झालेला आहे. सव्वाशे वर्षांचा कालावधी माणसासाठी मोठा वाटेल, पण पृथ्वीच्या सुमारे चारशे साठ कोटी वर्षांच्या इतिहासात तो एखाद्या मिनिटाएवढा किंवा सेकंदाएवढाच भरेल. त्यामुळे सव्वाशे वर्षांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान इतके जास्त वाढणे, ही लक्षणीय बाब आहे. आणि ते माणसाच्या उपस्थितीत घडले आहे. यातून हवामानबदलाशी माणसाचा संबंध स्पष्ट होतोच.
याचबरोबर आणखीही काही गोष्टी हवामानातील बदलांशी माणसाचा संबंध असल्याचे स्पष्ट करतात. माणसाच्या निसर्गाला ओरबाडण्याच्या वेगानेही मर्यादा ओलांडल्या आहेत. जंगले, खनिज तेलाचे साठे, खनिजे, माती, सुपीक जमीन अशी विविध प्रकारची नैसर्गिक संपत्ती निर्माण करण्याची पृथ्वीची विशिष्ट क्षमता असते. त्या क्षमतेच्या तुलनेत माणसाचा ही संपत्ती वापरण्याचा वेग खूपच वाढला आहे. पृथ्वी विशिष्ट काळात शंभर एकक इतक्या वेगाने संपत्ती निर्माण करते, असे मानले तर माणूस तितक्याच वेळात सव्वाशे एकक संपत्ती वापरत आहे. या असंतुलित वापरामुळे कधी ना कधी पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती अपुरी पडायला लागेल आणि कदाचित संपेलसुद्धा. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या माहितीनुसार, पृथ्वीवर हा बोजा पहिल्यांदाच पडत आहे. त्यालासुद्धा माणूसच कारणीभूत आहे. माणसाची ही हाव हासुद्धा हवामानातील बदलांसाठी माणूस कसा जबाबदार आहे हे दाखवून देणारा पुरावाच म्हणावा लागेल.
त्यामुळेच पृथ्वीवर प्राचीन काळापासून काही बदल घडले असले तरी, आताची परिस्थिती वेगळी व अपवादात्मक असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणूनच आताच्या जागतिक तापमानवाढीच्या समस्येशी माणसाचा संबंधही जोडावा लागतो.   
  • subhash Khake  - Global warming
    This is realistic and knowledgeble artical. its our pleaser, to get chance to read this aricle .

    Thank you very much
  • s.h.kamat  - global warming.
    this article really adds our knowledge.it's a warning to us.it is very good artical.
  • shrirang bhutada  - Global warming
    Its global WARNING for us. With the help of SO Called 'DEVELOPMENT', we r definitely developing towards END. THIS IS OUR GREED TO EXPLOIT NATURE. We have to understand, stop this 'human centric - self centric' development & take necessary collective measures as described by DEELIP KULKARNI in his book NISARGAYAN. Not money but This MOTHER NATURE is the only thing we can GIFT to our future generations.
  • mahesh  - future life
    good for future knowleage
  • sandip  - global warming
    nice article global warming
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.