|
|
अस्मिता मनापासून हवी रवींद्र वाघ यांच्या पत्रातील (१६ नोव्हेंबर) पहिले वाक्य विचार करायला लाावणारे आहे. महाराष्ट्र विधानसभेत ‘मराठीतून शपथ’ हा एवढा मोठा मुद्दा का आणि कसा झाला? हा एवढा मोठा मुद्दा होण्याची गरज नव्हती. असेच कर्नाटकात कानडी येत नसल्यामुळे एका भाजप आमदाराचे मंत्रीपद काढून घेण्यात आले. ही गोष्ट तेव्हा आपल्या कोणाच्याही कानावरही आली नाही. पण महाराष्ट्र विधानसभेच्या पवित्र्याचा प्रश्न मात्र राष्ट्रीय वाहिन्यांवरून दर दोन मिनिटांनी उपस्थित केला जात होता. पण कर्नाटकाच्या बाबतीत असे झालेले कधी ऐकिवात नाही. माझ्या मते त्यामागील प्रमुख कारण म्हणजे कन्नड राजकारण्यांच्या मनात कानडीबद्दल असणारा ‘ज्वलंत’ अभिमान! कानडी येत नाही म्हटल्यावर सर्व पक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन विरोध केला. या विरोधाच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची इच्छाही झाली नाही. कारण तिथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात ‘कानडी’बद्दल तेवढाच ज्वलंत अभिमान होता. आता कर्नाटक विधानसभेत संविधानाने भाषास्वातंत्र्य दिलेले नाही का? तरीसुद्धा सर्व राजकारण्यांच्या एकीच्या भूमिकेमुळे आणि त्याच्या मनातील भावनेमुळे हे शक्य झाले; पण इकडे तशी परिस्थिती नाही. इथे मराठीतून शपथ घेण्याच्या आवाहनालाही विरोध झाला. त्या विरोधकांच्या चेहऱ्यावर मराठीबद्दल फक्त ‘दिखाऊ’ अभिमान होता; ना त्यांच्या मनात ज्वलंत अभिमान ना मातृभाषेची अस्मिता! माझ्या मते वाघांच्या पहिल्या प्रश्नाचे हेच उत्तर असावे. त्यांनी म्हटलंय, ‘आझमी हे वास्तविक त्याच्या इथल्या प्रदीर्घ वास्तव्याने इथले म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी झाले आहेत. आता महाराष्ट्राचे रहिवासी जर मराठीला विरोध करीत असतील तर काय होणार या महाराष्ट्राचे?’ त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या राजभाषेविषयी, मराठीविषयी जराही अभिमान, प्रेम वाटत नाही? एक वेळ अभिमान नाही हेसुद्धा समजून घेऊ शकतो; पण मराठीलाच विरोध करण्याएवढा तिरस्कार महाराष्ट्राचे रहिवासी करूच कसा शकतात? खरंच मातृभाषा मराठी असणारा कोणताही माणूस मराठीबद्दल एवढा उदासीन विधान करूच कसा शकतो? मराठीत शपथ घेण्या-न घेण्याने विधानसभेच्या कामकाजात काही फरक पडत असेल नसेल; पण लोकशाहीचा पाया असणाऱ्या जनतेमध्ये बराच फरक पडू शकतो. याविषयी गिरधर पाटील यांच्या ‘विधानसभा पवित्र गाय’ या लेखातील विचार पटणाारे आहेत. ही जर महाराष्ट्राची विधानसभा आहे तर त्यात महाराष्ट्राचे प्रतिबिंब नको? प्रत्येक सामान्य मराठी माणसाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नको? महाराष्ट्राचा खरा रहिवासी हा नेहमी मराठीचाच पुरस्कार करेल. तेजस पाटकर -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>
|
|
Page 12 of 46 |