|
कायमस्वरुपी आरोग्याधिकारी नेमण्याची मागणी |
|
धुळे / वार्ताहर जिल्ह्य़ातील चारही तालुक्यांमध्ये कायमस्वरुपी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मोराणे-लळींग गटाचे सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी निवेदनातून केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना सूर्यवंशी यांनी हे निवेदन दिले.
सर्वच जिल्ह्य़ात तालुक्यांमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून प्रशिक्षित आणि कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असा शासनाचा आदेश आहे. परंतु धुळे जिल्ह्य़ात मात्र या आदेशाचे पालन झालेले दिसून येत नाही. २४ मे २००७ च्या परिपत्रकानुसार तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे स्वतंत्र पद असून त्यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २००८-०९ च्या नव्या परिपत्रकानुसार तर तालुका आरोग्य अधिकारी हा एम. बी. बी. एस. असणे गरजेचे असून तो शवविच्छेदन करणारा आणि सामाजिक औषध शास्त्रात निपूण असावा असे राज्यपालांनी म्हटले आहे. धुळे जिल्हा परिषदेत मात्र या आदेशाची अमलबजावणी झालेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक व्हावे, योजना ग्रामीण भागात तळगाळात पोहोचावी, यासाठी ही पदे कायम करणे गरजेचे आहे. साथीच्या काळात व नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियंत्रण कक्ष स्थापन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावून रक्तदाब, हिमोग्लोबीन, कुपोषित बालके यांची दैनंदिन माहिती घेणे, विविध समित्यांच्या बैठकांना उपस्थित रुग्णांशी संवाद साधणे, अशा अत्यावश्यक बाबींसाठी ही पदे महत्वाची आहेत. यामुळे ही पदे कायमस्वरुपी भरणे गरजेचे असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
|