शरीरामध्ये ‘फॉल्ट टॉलरन्स’ व ‘सेल्फ करेक्शन’ ही फीचर्स आहेत, पण आपण त्यांचा आदर न करता त्यांना वेठीला धरतो. आरोग्य संपदा टिकवून ठेवण्यासाठी सेल्सच्या (पेशींच्या) आरोग्याचा आदर राखून आणि त्याला योग्य असे वर्तन करून आपण ही संपदा टिकवू या आणि खऱ्या अर्थानं ‘सेले’ब्रेशन करू या.

आपलं दिसणारं सौंदर्य, असणारं आरोग्य आणि आतला आनंद यांचा परस्पर संबंध आपण पाहिला. या तीन स्वतंत्र गोष्टी नसून जणू एकाच समभुज त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. आनंद हा त्या त्रिकोणाचा पाया आहे. आपलं रंग-रूप हे आपल्याला निसर्गाकडूनच मिळतं आणि ज्याचं त्याला शोभूनही दिसतं. पण सौंदर्य या सापेक्ष कल्पनेला सौंदर्य प्रसाधन उत्पादक आणि जाहिरातदारांनी मात्र मॉडेल्सच्या माध्यमातून स्टॅण्डर्ड बनवलं. सगळं जग ते मापदंड मिळवण्याच्या मागे लागलंय, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरच्या जाहिराती आणि गल्लोगल्ली उघडलेल्या ब्युटी पार्लर्सच्या टपऱ्या याचीच साक्ष देतात. समभुज त्रिकोणाचा समतोल आपण बिघडवलाय.
आरोग्याची गोष्ट मात्र वेगळी आहे. रोगांची व्याख्या किंवा लक्षणं आपल्याला ऐकून / पाहून माहिती आहेत, पण आरोग्याची व्याख्या काय, असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय सांगू शकू? मेडिकल कॉलेजातही रोगांबद्दलच शिकवलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या ‘रोग नसणं’ अशी नकारात्मक न करता ‘आपल्या शरीराचं, मनाचं आणि आपल्या सामाजिक संबंधांचं संपूर्ण स्वास्थ्य म्हणजे आरोग्य’ अशी होलिस्टिक व्याख्या केली आहे. आपणही आरोग्य ही निसर्गाने दिलेली ‘संपदा’ म्हणून तिचा गौरव करतो. (ती टिकवणं किंवा उधळून लावणं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे) केवळ हृदय, यकृत, मूत्रपिंड इत्यादी अवयव नीट काम करत असतील (व त्यात काही रोग नसेल) तर ती व्यक्ती आरोग्यवान आहे असे न समजता आपल्या शरीरात अखंड चालू असलेल्या क्रिया-प्रक्रिया ही नीट चालल्या पाहिजेत. आपल्याला माहिती असणारं हृदय, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हात, पाय वगैरे अवयवांना जरी आपण शरीर म्हणत असलो तरी होलिस्टिकदृष्टय़ा आरोग्याचा विचार करायचा असेल तर या शरीराकडे त्याहून सूक्ष्म दृष्टीने पाहिलं पाहिजे. मग आपल्याला समजेल की हा देह संपूर्णपणे पेशींचा (सेल्सचा) बनलेला आहे. जर आपल्या शरीरातल्या सर्व पेशी काढून टाकल्या तर एकही अवयव उरणार नाही. खरंतर आपणच उरणार नाही.
एक स्त्रीबीज आणि एक शुक्रजंतू यांच्या मीलनाने तयार झालेली एक पेशी (ेॅडळए), या पेशीपासून मानवाचा (प्राण्याचा) जीवनप्रवास सुरू होतो. गरोदरकाळात या पेशीचे विशिष्ट प्रकारे विभाजन होऊन पुढे अनेक प्रकारच्या पेशी तयार होतात. (या निसर्गाच्या चमत्काराला तोड नाही.). एकेका प्रकारच्या पेशी एकत्र येऊन त्यांच्या उती (टिश्यू) बनतात. अशा वेगवेगळ्या उतींपासून वेगवेगळे अवयव बनतात. असे अनेक अवयव एकत्र येऊन त्याच्या संस्था (सिस्टीम्स) बनतात. आपल्या शरीरात अशा जवळजवळ बारा संस्था कार्यरत असतात. त्यांची नावे – स्केलेटल, इंटेग्युमेंटरी, मस्क्युलर, इम्यून, लिम्फॅटिक, कार्डिओव्हॅस्क्युलर, युरिनरी, डायजेस्टिव्ह (पचन), रेस्पिरेटरी (श्वसन), नव्र्हस, एंडोक्राइन आणि रिप्रॉडक्टिव्ह (पुनरुत्पादन). या सर्व संस्था वेगवेगळे कार्य करत असल्या तरी त्या एकमेकांशी निगडित आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत व एकमेकांवर परिणामही करत असतात.
हे सगळं जरी असं असलं तरी मूळ मुद्दा हा की या सर्व शरीराचा, यातील संस्थांची, अवयवांची आणि उतींची निर्माती (बिल्डिंग ब्लॉक) आहे पेशी. तेव्हा आरोग्य टिकवायचं असेल तर आपल्याला मुळाशी जायला हवं. आपल्या नेहमीच्या अनुभवावरूनही ही गोष्ट कुणालाही पटेल. आपल्याला / आरोग्यासंबंधी कुठलीही तक्रार (रोग) असली की पहिली गोष्ट डॉक्टर सांगतात ती रक्ततपासणी करायला. त्या तपासणीमध्ये तांबडय़ा पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ही नावे सर्वाच्या परिचयाची झाली आहेत. पांढऱ्या पेशींमध्येही न्यूट्रोफिल्स, बेझोफिल्स, इओसिनोफिल्स, लिम्फोसाइटस्, मोनोसाइटस्, मॅक्रोफाजेस वगैरे पेशींचे वर्गीकरण आहे.

शरीरातील प्रत्येक पेशी ही एक ‘युनिट ऑफ लाइफ’ आहे. प्रत्येक पेशीला जिवंत अस्तित्व आहे व या पेशींमार्फत शरीरातल्या सर्व रासायनिक क्रिया चालतात. मग सहजच प्रश्न पडतो की आपल्या शरीरात पेशी असतात तरी किती? याचं उत्तर प्रश्नानेच देता येईल ते म्हणजे किती तारे असावेत आकाशात? किंवा किती वाळूचे कण असावेत वाळवंटात? थोडक्यात सांगायचं तर मानवी शरीर हा पेशींचा एक प्रचंड समूह आहे. पण काही मोजमाप द्यायचंच म्हटलं तर शास्त्रज्ञ म्हणतात की मानवी शरीरात असंख्य ट्रिलियन (पद्म) पेशी आहेत. मेडिकल सायन्सच्या मते आपल्या शरीरात या पेशींचे साधारण दोनशे
प्रकार आहेत.
सर्वसाधारपणे पेशीमध्ये केंद्रक (न्यूक्लियस) असून त्यामध्ये मुख्यत: जेनेटिक मटेरियल असते. त्याच्या बाजूला आकृतीत दाखवल्याप्रमाणं अनेक भाग असतात. आणि प्रत्येकाचं विशिष्ट कार्य असतं. उदाहरणार्थ, मायटोकॉण्ड्रीचा या भागाला पेशीचं पॉवर हाऊस म्हणतात. कारण शोषून घेतलेल्या ग्लुकोजचं रूपांतर अनेक रासायनिक प्रक्रियानंतर ऊर्जेमध्ये केलं जातं. पण मला आश्चर्य वाटतं, ते पेशीच्या बाह्य़ आवरणाचं. याला सेल- मेम्ब्रेन म्हणतात. यामध्ये अनेक रिसेप्टर्स असतात. साध्या भाषेत सांगायचं तर हे रिसेप्टर्स गेटवरच्या वॉचमनप्रमाणं असतात. ओळख पटली की मगच गेट उघडतात. उदाहरणार्थ, रक्तामधल्या ग्लुकोजचा कण घेऊन इन्सुलिनचा परमाणू जेव्हा या गेटपाशी येतो तेव्हा त्याची ओळख यातील ठरावीक रिसेप्टरला पटते व ग्लुकोजला आत घेतलं जाते. याप्रमाणंच सोडियम, पोटॅशियम, मॅनेशियम वगैरेंसारख्या अत्यावश्यक खनिजांची आत-बाहेर, ने-आण करण्यासाठीही काही दरवाजे असतात. खरं तर या खूप गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया आहेत. आपण अगदी वरवरचं आणि थोडक्यात पाहिलं. पण एवढं वाचूनही कमाल वाटते ना? बघा ना, आपण अन्न खातो. पचनसंस्थेमध्ये त्याचं पचन केलं जातं. पचलेलं अन्न रक्तात शोषून घेतलं जातं आणि रक्ताभिसरणाद्वारे ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. पेशीमध्ये ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेत होतं. ही ऊर्जा आपल्याला कार्य करण्यासाठी उपयोगी पडते. शिवाय ऊर्जेबरोबरच उष्णताही निर्माण होते, जिच्यामुळे शरीराचं तापमान बाहेरच्या हवामानाप्रमाणे योग्य असं राखलं जातं.
म्हणजेच आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि जगात वावरताना कार्य करण्यासाठी प्रत्येक पेशीचा सहभाग असतो. असं जर आहे तर याची जाणीव आपण ठेवायला हवी ना? ज्या पेशी आपल्यासाठी जन्मल्यापासून, रात्रंदिवस, एक क्षणही विश्रांती न घेता काम करत आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर वाटायला हवा ना? हृदयाचंच उदाहरण घ्या. एक सेकंदही उसंत न घेणारा हा अवयव. प्रेम किंवा भीती व्यक्त करण्यासाठी याची धडधड कामी येते, परंतु पाच-दहा सेकंद जरी याचं काम बंद पडलं तर आपली काय अवस्था होईल? ‘पॅकेज डील’मार्फत डॉक्टरांच्या हातात त्याला सोपवलं जातं आणि मग खाण्यावर, उठण्या-बसण्यावर बरीच बंधनं घालून ‘त्याचं’ आरोग्य सांभाळणं सुरू होतं. ‘लाइफ’ची सगळी ‘स्टाइल’च बदलते. कारण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो ना?
येथे एक लक्षात घेतलं पाहिजे की हृदय हा अवयवदेखील इतर अवयवांसारखा विशिष्ट अशा पेशींचा समूह आहे. आपल्या लाइफस्टाइलमुळे (आहार, स्ट्रेस, वगैरे) त्यातल्या पेशींचे आरोग्य बिघडते. काही वेळा त्या पेशी त्यांच्या बिघडणाऱ्या आरोग्याची जाणीव देतात, पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ या न्यायाने आणि आधुनिक जीवनशैलीच्या झिंगेमध्ये मश्गूल असल्याने त्याकडे दुर्लक्ष होतं आणि अखेरीस त्या पेशींचा नाइलाज झाल्याने हृदयविकारात त्याचं पर्यवसान होतं.
निसर्गाच्या चांगुलपणाचा आपण नेहमीच गैरफायदा घेत आलो आहोत. त्याचे सर्व नियम पायदळी तुडवत आहोत. बाहेरचं पर्यावरण तर आपण बिघडवलं आहेच, पण आपल्या लाइफ ‘स्टाइल’ने आपण आतल्या निसर्गाचा म्हणजे आरोग्याचा नाश करत आहोत. निसर्ग सहनशील आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत.
शरीरामध्ये ‘फॉल्ट टॉलरन्स’ व ‘सेल्फ करेक्शन’ ही फीचर्स आहेत पण आपण त्यांचा आदर न करता त्यांना वेठीला धरून आहार-विहाराच्या नावाखाली मनमानी करून त्यांच्याकडून वाटेल ती कामं करवून घेत राहिलो तर आरोग्य ही ‘संपदा’ कशी राहील? तेव्हा सेल्सच्या (पेशींच्या) आरोग्याचा आदर राखून आणि त्याला योग्य असं वर्तन करून आपण ही संपदा टिकवू या आणि खऱ्या अर्थानं ‘सेले’ब्रेशन करू या.
health.myright@gmail.com