आपल्या आयुष्यात आपण आनंदाकडे वाटचाल करत आहोत असंच प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. तसा तिचा प्रामाणिक प्रयत्नही असतो; पण आनंद शून्य कि.मी.ही पाटी जर अजून दिसत नसेल तर आपण कोणत्या गाडीत बसलो आहोत ते तपासायला लागेल. तिकीट आपल्या सर्वाकडेच आहे. होलिस्टिक प्लॅटफॉर्मवरून आनंदरथ सुटतो. प्रत्येक क्षणाला ही गाडी सुटत असते. त्यामुळे आपण म्हणू त्या क्षणी हा प्रवास आपल्याला सुरू करता येतो..

कॅरल ड्वेक या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसरचं ‘माइंडसेट – न्यू सायकॉलॉजी ऑफ सक्सेस’ नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. कॅरल हिने अभ्यासात यश न मिळणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांवर प्रयोग करून त्यांना यशाचा मार्ग दाखविला आणि त्याचं वर्णन या पुस्तकात आहे; परंतु कॅरल शिक्षणाबद्दल न बोलता मुलाच्या/माणसाच्या मनाबद्दल बोलते. ती म्हणते की, प्रत्येक माणसाचा एक माइंडसेट असतो. माइंडसेट म्हणजे आपल्या मनातल्या धारणा/कल्पना. या कल्पनांना/धारणांना एखादी व्यक्ती अगदी चिकटून असेल आणि त्यात कधीही बदल न करणारी असेल तर अशा माइंडसेटला कॅरल ‘फिक्स्ड माइंडसेट’ म्हणते. याउलट प्रसंगानुरूप योग्य असा विचार करून आपल्या पूर्वीच्या धारणांमध्ये बदल करणाऱ्या व्यक्तीच्या माइंडसेटला कॅरल ‘ग्रोथ माइंडसेट’ (विकसनशील मन) म्हणते. आता प्रश्न पडेल की ‘जगू आनंदे’चा आणि या सर्वाचा काय संबंध? उत्तर असं की, संबंध मनाशी आहे आणि मनाचा संबंध आनंदाशी आहे. ‘मन चंगा तो कटोतीमें गंगा’ म्हणतात ना! या लेखमालेद्वारे आपण तोच तर अनुभवण्याचा प्रयत्न केला.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..

गेलं वर्षभर आपण ‘आनंदरथा’तून प्रवास करत आहोत आणि प्रत्येक लेख हे आनंदाकडे घेऊन जाणारे स्टेशन होते. प्रत्येक स्टेशन वेगळं असलं तरी काही प्रमाणात अंतर्मुख करणारं. काही काळ तिथे उतरून तिथला आनंद घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यासाठी समग्र (होलिस्टिक) दृष्टिकोन ठेवणं गरजेचं होतं. (माझ्या मते शरीर-मन-बुद्धी आणि संस्कार (मूल्य) यांचा एकत्रित व समतोल विचार करणं म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन). हा दृष्टिकोन असणं महत्त्वाचा, का तर आपल्या जगण्याच्या या चार पातळ्यांत जर सुसंवाद नसेल तर आपल्याला निखळ आनंद भोगता येत नाही; कोठे तरी कमतरता जाणवते. म्हणूनच आनंदरथात बसल्याबरोबर ‘शरीरयंत्र’ या पहिल्या स्टेशनवर आपण उतरलो. अंतर्मुख होऊन, असंख्य पेशींनी बनलेल्या आपल्या शरीराकडे (शरीरयंत्राकडे) आपण पाहिलं. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला जिवंत अस्तित्व असतं आणि म्हणून या पेशीमार्फत शरीरातल्या सर्व रासायनिक क्रिया चालतात. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि जगात वावरताना कार्य करण्यासाठी प्रत्येक पेशीचं सहभाग असतो असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. याची जाणीव ठेवून त्या पेशीबद्दल आदर वाटणं हा आपल्याला शारीरिक आरोग्यातून आनंदाकडे घेऊन जाणारा राजमार्ग आपण पाहिला.

त्यानंतर आनंदरथात आपल्याला मानसिक पातळीवरची एकापाठोपाठ एक अशी बरीच स्टेशन्स लागली. प्रत्येक वाचक हा एक उतारू होता. प्रत्येकाची मानसिक जडणघडण वेगळी असल्याने प्रत्येकाची आवडीची स्टेशन्ससुद्धा वेगळी ..पण आनंदाचा अनुभव मात्र सर्वाचा एकच.. असं सांगणारी अनेक पत्रं आली. या पत्रांमध्ये तरुणवर्गाचा समावेश मुख्यत: होता हे सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे. ‘आपली आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली’ असे काही जणांनी सांगितले. काही जणांनी सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला. काही पुरुषांनी स्वयंपाकघरात पत्नीला मदत करायला सुरुवात केल्याचे प्रत्यक्ष भेटून सांगितले. ‘मुलांवर ‘रिअ‍ॅक्शन’ने न रागावता ‘रिस्पॉन्स’ द्यायला सुरुवात करेन’ हा एका आईने लिहिलेला अभिप्राय मला खूपच आवडला. तसेच ‘आपल्या दहावीतल्या मुलाला लेख वाचायला सांगणार आहे’ हाही एका आईचा अभिप्राय खूप काही सांगून गेला. या सर्वातून मला एक जाणवलं ते म्हणजे तरुण मंडळी जे काही अभिप्राय लिहितात ते मनापासून असतात. म्हणूनच काहींनी लेखातली एखादी गोष्ट कळली नाही तर त्याबद्दल मनमोकळेपणाने प्रश्न विचारले. अशा प्रकारे ‘चतुरंग’मधील ‘जगू आनंदे’ नावाने सुरू झालेल्या या आनंदयात्रेत अनेक जण सामील झालेले दिसले, कारण आनंदाने जगणे हा सर्वाचाच निसर्गाने बहाल केलेला जन्मसिद्ध हक्क आहे.

बहुतेक प्रत्येक लेखात समग्रता (होलिस्टिक/होलिझम) हा शब्द येत होता. समग्रतेसंबंधी वाचकांनी काही प्रश्न विचारले होते. प्रश्नांचे स्वरूप पाहिल्यावर त्याविषयी स्पष्टीकरण देताना थोडीशी वैयक्तिक माहिती देणे क्रमप्राप्त आहे असे मला वाटते. समग्रता हा नुसता शब्द नाही, तर ती एक संकल्पना (कॉन्सेप्ट) आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात समग्रतेचं स्थान खूपच महत्त्वाचं आहे. एका अत्यंत दु:खदायक घटनेचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. मनाचा परिणाम शरीरावर होऊन शारीरिक व्याधी मागे लागल्या. त्यातून बाहेर पडण्यासाठी वाट दिसेना. मूळचा अंतर्मुख होण्याचा स्वभाव असल्याने आपणच आपल्यासाठी काही करू शकतो का, याचा मनामध्ये विचार सुरू झाला. त्या वेळी ऑस्ट्रेलियात राहात असल्याने त्या दृष्टीने शोध घेताना पर्यायी वैद्यकीय उपचाराचा (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) एक कोर्स पाहण्यात आला. या साडेचार वर्षांच्या कोर्समधून संपूर्ण शरीरशास्त्र/संबंधित रोग आणि त्यावरचे उपचार, हर्बल मेडिसिन, न्यूट्रिशन, होमिओपॅथी, मसाज थेरपी, कौन्सेलिंग, इरीडॉलोजी, बाख फ्लॉवर्स आणि इतर किती तरी विषय शिकायला मिळाले. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, ‘प्रत्येक व्यक्ती ही एकमेव (युनिक) असते, त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने सर्वाना एकच ट्रीटमेंट देऊन चालत नाही. त्या त्या प्रसंगानुसार ट्रीटमेंट बदलावी लागते’ हा दृष्टिकोन मिळाला. मुख्य म्हणजे शरीर आणि मनाचा अगदी जवळचा संबंध समजला. कित्येक रोगांचं मूळ मनाच्या अस्वस्थतेत असतं. शरीरातला समतोल समजायला मदत झाली व हा समतोल साधण्यासाठी प्रत्येक पेशीचं सहकार्य असतं, हा समग्रतेचा मोलाचा धडा मिळाला, कारण या पेशीपासून टिश्यू, अवयव आणि वेगवेगळ्या संस्था बनतात. उदाहरणार्थ पचनसंस्था, श्वसनसंस्था वगैरे. या सर्व संस्था एकत्र येऊन आपण आणि आपले व्यक्तिमत्त्व बनते. सर्व संस्थांचे कार्य एकमेकांच्या साहाय्याने चाललेले असते व शरीराचे आणि मनाचे आरोग्य/समतोल राखणे हेच त्यांचे एकमेव ध्येय असते. वैयक्तिक पातळीवर यालाच समग्रता म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे समग्रतेत परिपूर्णता असते. या परिपूर्णतेच्या आकलनामुळे माझी मन:स्थिती आणि प्रकृती सुधारली आणि त्या वेळेपासून माझा ‘आतून बाहेर’ म्हणजेच ‘मनातून शरीराकडे’ हा आनंदाचा प्रवास सुरू झाला. याच आनंदाची एक झलक म्हणजे ‘जगू आनंदे’ या आनंदरथातून चाललेला आपला प्रवास.

तर आता वळू या आपल्या प्रवासाकडे.. हा जो आनंदरथातला प्रवास आपण करत आहोत त्यामध्ये आणि आपण नेहमी जो (वाहनाने) प्रवास करतो यात एक फरक आहे. आपला रोजचा किंवा काही कारणपरत्वे होणारा प्रवास हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शरीराने घेऊन जातो. त्यात अंतर काटायचे असते. ते कधी काही किलोमीटर असते, तर कधी शेकडो किलोमीटर असते. प्रवासाच्या अखेरीस आपले ठिकाण बदललेले असते; पण आपण तेच असतो, बदललेले नसतो; परंतु आनंदरथातला प्रवास हा बाहेरचा प्रवास नाही. तो शरीरानेही करायचा नाही. त्याला कोणतेही वाहन वा तिकीट लागत नाही, कारण हा आपल्याच आतला प्रवास आहे आणि तो प्रवास आहे मनाने विशाल होण्याचा, बुद्धीने निष्पक्ष होण्याचा. कॅरल ड्वेक म्हणते त्याप्रमाणे फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्याचा. आपण एक उदाहरण घेऊ. महाभारतात, कुरुक्षेत्रावर शूरवीर अर्जुनाने ऐन युद्धाच्या वेळी धनुष्यबाण खाली टाकून, रथामधून खाली उतरून सारथी असलेल्या श्रीकृष्णाला सांगितले की, ‘मी आता लढणार नाही. एक वेळ भीक मागेन, पण द्रोणाचार्य किंवा भीष्माचार्य यांच्यावर बाण चालवणार नाही.’ त्या वेळी श्रीकृष्णांनी उपदेश (भगवद्गीता) केल्यावर अर्जुनाने बसल्या जागीच हा मोठा प्रवास आनंदरथातून केला. त्याचा परिणाम म्हणून अर्जुन त्याच्या (युद्धभूमीवरच्या) रथावर पुन्हा आरूढ झाला. पुढे युद्ध झाले वगैरे आपल्याला माहितीच आहे. यावरून आपल्याला असे दिसते की, कुरुक्षेत्रावरची परिस्थिती बदलली नाही; पण आतल्या प्रवासामुळे अर्जुनाच्या मनाची स्थिती मात्र बदलली. ‘स्वजनांशी किंवा गुरूंशी लढणे हे पाप आहे’ असा त्याचा फिक्स्ड माइंडसेट होता आणि तो प्रत्यक्ष श्रीकृष्णालाच पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, तो बदलून ‘अन्यायाविरुद्ध लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे’ अशा ग्रोथ माइंडसेटपर्यंत त्याच्या मनाचा प्रवास झाला. आपणही यातून बरेच काही शिकू शकतो.

योगी अरविंद यांचा एक विचार इथे सांगावासा वाटतो. ते म्हणतात ‘जीवनाचे सगळे प्रश्न हे विसंवादातून येतात.’(All Problems of Existence are Problems of Harmony.) जीवनातल्या या विसंवादाचे रूपांतर सुसंवादात करायचे असेल तर सुरुवात आपल्याला आतून (सूक्ष्म पातळीवर) करायला हवी. आपल्या आयुष्यात आपण आनंदाकडे वाटचाल करत आहोत असंच प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. तसा तिचा प्रामाणिक प्रयत्नही असतो; पण ‘आनंद शून्य कि.मी.’ ही पाटी जर अजून दिसत नसेल तर आपण कोणत्या गाडीत बसलो आहोत ते तपासायला लागेल. तिकीट आपल्या सर्वाकडेच आहे. ‘होलिस्टिक प्लॅटफॉर्म’वरून आनंदरथ सुटतो. प्रत्येक क्षणाला ही गाडी सुटत असते. त्यामुळे आपण म्हणू त्या क्षणी हा प्रवास आपल्याला सुरू करता येतो. तेव्हा आनंदाने जगण्याच्या प्रवासासाठी आपल्या सर्वाना मनापासून शुभेच्छा देते. हॅप्पी जर्नी!

health.myright@gmail.com

(सदर समाप्त)