इंद्रधनुष्यावरची ही सफर सर्वाना खूप आवडायची. यामध्ये १५ ते ७० वयोगटातल्या सर्वाना झालेला आनंद पाहायला मिळायचा. यावरून एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायची ती म्हणजे आनंदाकरिता कोणतीही बाहेरची वस्तू लागत नाही; पण आपण मनाला अशी सवय लावून ठेवलीय की, काही तरी मिळालं, घडलं तरच आपल्याला आनंद मिळतो. खरं तर आनंदाला ‘अटी लागू’ होत नाहीत. उलट अटींच्या ओझ्यातून आपण मुक्त झालो तरच मनाला आनंदाचं इंद्रधनुष्य दिसू शकेल..

उत्तरेत होळी आणि आपल्या महाराष्ट्रात रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी जिकडेतिकडे रंगांची उधळण होते. चित्रपटांमध्येही ही उधळण गीतांच्या स्वरूपात पाहायला मिळते. ती उठून दिसण्याकरिता नायक-नायिका पांढरे स्वच्छ कपडे परिधान करून एन्ट्री घेतात! ते असो, पण निसर्गात रोजच सगळीकडे रंगांची खैरात दिसते. प्रत्येक दिवसाची सुरुवात (पहाट) पूर्वेकडून सूर्याचे आगमन सांगणाऱ्या केशरी रंगाने होते. आकाशाच्या काळ्या-निळ्या बॅकड्रॉपवर हा केशरी-लाल रंग किती खुलून दिसतो. संध्याकाळीही तसंच. तीच रंगसंगती, पण आता विरुद्ध दिशेला- पश्चिमेला. सकाळच्या झुंजूमुंजू प्रकाशात किंवा संध्याकाळच्या संधिप्रकाशात शांतपणे उभं राहून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहणे हा स्वत:लाच शांत करणारा समय असतो. म्हणूनच की काय, प्रत्येक गावात जसं मारुतीचं देऊळ असतंच, तसं प्रत्येक हिल स्टेशनवर सनराइज आणि सनसेट पॉइंट असतातच.

दिवसा आकाश निळे आणि निरभ्र असले तरी सुंदर दिसते आणि त्यावर कापसासारख्या ढगांचे पॅचवर्क असले तरीसुद्धा सुंदरच दिसते. हे झाले आकाशाचे; पण झाडे, वेली, पाने, फुले, फळे, पक्षी, प्राणी या सर्वामुळे ही पृथ्वी- हा निसर्ग किती रंगीत दिसतो ना! ऋतुमानाप्रमाणे बदलणारे, पण त्या ऋतुला उचलून धरणारे रंग पाहणे हा माझा एक आवडता छंद आहे. वसंत ऋतुत सगळीकडे नवी पालवी, नवा मोहोर, सुगंधी फुलांचा नवा बहर! पावसाळ्यात जिकडेतिकडे हिरवीगार झाडं आणि जमिनीवर खुलून दिसणारा केशरी-पांढऱ्या प्राजक्ताचा सडा. हिवाळ्यात झाडांच्या पानगळतीचा एक वेगळाच रंग आणि बाज.. क्या बात है!

सृष्टीच्या या सौंदर्यामध्ये मधूनच केव्हा तरी डोकावणारी अजून एक गोष्ट मला मंत्रमुग्ध करते, ती म्हणजे इंद्रधनुष्य. ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कोण जिंकतंय हे कळायलाच मार्ग नाही. अशा वेळी अंपायरच्या खुर्चीत बसून चोख काम बजावणारं इंद्रधनुष्य! लहानपणी ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला, की पहिल्यांदा आम्ही आकाशाकडे बघून या अंपायरचा शोध घेणार. (अजूनही ही सवय गेलेली नाही.) कोणाला प्रथम ते शोधता येतं ही शर्यत असायची. कधीकधी तर एकामागोमाग एक अशी दोन इंद्रधनू दिसायची. त्यातले ते सप्तसुरांप्रमाणे भासणारे सप्तरंग. कुणीही कसल्याही मन:स्थितीत असला तरी इंद्रधनुष्याकडे पाहिल्यावर आनंदतोच. यामध्ये लहान-मोठं, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष हा भेद नाही. हो, कारण आपल्या कविकल्पनेनुसार स्वर्गातल्या इंद्राचं, पंचमहाभूतांवर ज्यांची सत्ता चालते अशा देवांच्या राजाचं ते धनुष्य आहे ना! ते साधंसुधं कसं असेल बरं?

या इंद्रधनुष्याच्या संदर्भात माझ्या काही सुंदर आठवणी आहेत. पहिली आठवण आहे ती एका गाण्याची. गाण्याचे शब्द आहेत- ‘मी इंद्रधनूचे बाळ आहे.’ मूळ गाणं जॉर्ज गुरुमुल युनुपिंगु या गायकाने गायलेलं आहे. हे नाव खूपच लांबलचक असलं तरी ते ‘गुरुमुल’ या नावानेच प्रसिद्ध आहेत. पंचेचाळीस वर्षांच्या गुरुमुल यांची बरीच वैशिष्टय़े आहेत. ते ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी असलेल्या (अ‍ॅबओरिजिनल) जमातीतील आहेत. या अ‍ॅबओरिजिनल माणसांचे अस्तित्व ऑस्ट्रेलियात चाळीस हजार वर्षांपासून असून त्या लोकांचे सर्व आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यातच गेले. निसर्गातील फळे, फुले, ऊन, पाऊस, दऱ्या, डोंगर यांच्यामध्येच वावर असल्याने त्यांची गाणीही निसर्गाशीच निगडित असतात. (आपल्या वारली पेंटिंगप्रमाणे त्यांचीही पेंटिंगची एक विशिष्ट शैली आहे.) गुरुमुल अ‍ॅबओरिजिनल असले तरी त्यांच्या आवाजातली गाणी जगभर ऐकली जातात. मला आश्चर्य वाटतं ते एका गोष्टीचं. जन्मापासून अंध असलेल्या गुरुमुल यांना इंद्रधनूचे रंग कसे दिसले असतील? त्यांना ते स्वत: इंद्रधनूचे बाळ असल्याचं कसं जाणवलं असेल? खरंच, कवितेत आणि तिचं व्यक्त रूप दाखवणाऱ्या गाण्यात हळुवारपणा असूनही हृदयाला भिडण्याचं केवढं सामथ्र्य असतं नाही का? हे गाणं पहिल्यांदा ऐकल्याला आता आठ-नऊ  र्वष झाली, परंतु ते सतत माझ्या स्मरणात असतं. विशेष म्हणजे हे गीत गाताना गुरुमुल, स्टेजवर एका खुर्चीवर, त्यांचं आवडतं गिटार वाजवत होते. स्टेजवर सर्वत्र अंधार असून केवळ त्यांच्यावरच मंद असा स्पॉटलाइट होता आणि गुरुमुल शांत पण अत्यंत भावुकपणे आळवत होते.. ‘विटीज ही माझी आई आहेच, पण मी खरं तर इंद्रधनुष्याचे बाळ आहे’

गुरुमुल नेहमी (इंग्रजी येत असूनही) अ‍ॅबओरिजिनल भाषेतच बोलतात. त्यांची सर्व गीते अ‍ॅबओरिजिनल भाषेतलीच आहेत. अ‍ॅबओरिजिनी भाषा कळायला अत्यंत अवघड आहे. त्या भाषेत इंद्रधनुष्याला जारीमिरी म्हणतात. आपल्याला प्राण्यांचं, पक्ष्यांचं, माणसांचं.. कोणाचंही बाळ पाहताना आनंदच वाटतो. निरागसतेचं प्रतीक असतं ना ते! पण इंद्रधनूचं बाळ? किती सुंदर कल्पना. माझ्या डोळ्यासमोर गाय-वासराप्रमाणे, आकाशात एक मोठं इंद्रधनुष्य आणि त्याच्याच कुशीत (कमानीत) सुरक्षित असलेलं दुसरं छोटं इंद्रधनुष्य उभं राहिलं. सप्तरंगांच्या सौंदर्याबरोबरच वात्सल्यप्रेमाचा आविष्कार दर्शविणारं असं इंद्रधनू मला फार आनंद देऊन गेलं आणि म्हणून आवडलं.

इंद्रधनूच्या संदर्भात अजून एक आठवण सांगाविशी वाटते. सिडनीत आमचा योगासनाचा वर्ग चालायचा. या वर्गात ऑस्ट्रेलियन, इटालियन, स्पॅनिश, ब्रिटिश, भारतीय असे विद्यार्थी होते. वर्ग आठवडय़ातून एकदाच असायचा. शनिवारी सकाळी साधारणपणे दोन तास चालायचा. पहिला दीड तास योगासन, प्राणायाम आणि ध्यान व्हायचं. या सर्वाचा परिणाम उत्साहाच्या रूपात प्रत्येकात दिसायचा; पण सगळे जण वाट पाहायचे ते यानंतरच्या पंधरा-वीस मिनिटांच्या निखळ आनंदाच्या संधीची. या काळात सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी (वय वर्षे १५ ते ७०) एकत्र येऊन काही गोष्टी (कॉन्शस अ‍ॅक्टिव्हिटी) करत असत. त्यातली एक म्हणजे इंद्रधनुष्यावर स्वार होऊन आकाशमार्गाने सफर करणे. याला रेनबो-राइड म्हटले जाई. यामध्ये प्रत्येक जण आपल्यासमोर सुंदर अशा इंद्रधनुष्याची कल्पना करून त्यावर आपण घोडय़ावर बसतो तशी पोझ घेऊन त्या काल्पनिक इंद्रधनुष्याला घट्ट धरून ठेवायचा. त्यानंतर एक, दोन, तीन म्हटल्याबरोबर प्रत्येक जण सरळ रेषेत पळत सुटायचा (काही जण मुद्दाम सावकाश चालायचे!) पण कल्पना मात्र इंद्रधनुष्यावर आरूढ होऊन आकाशमार्गाने (खालची सर्व सृष्टी पाहत) वर चाललोय अशी करायची. (त्या हॉलची लांबी जवळजवळ ऐंशी फूट असल्याने पळताना खूप मजा यायची!) शेवटी, इंद्रधनुष्याचं दुसरं टोक जमिनीला लागलंय अशी कल्पना करून खाली उतरायचं (अभिनय करायचो).  एवढंच करून थांबायचं नाही. (पाश्चिमात्य देशात अशी कल्पना असते की, इंद्रधनुष्याच्या टोकाशी सोन्याचा हंडा- पॉट ऑफ गोल्ड-असतो.) तिथे मिळालेला सोन्याचा हंडा हातामध्ये घ्यायचा, त्याकडे समाधानाने पाहायचं आणि तो हंडा घेऊन इंद्रधनुष्यावर स्वार होऊन परत होतो त्या जागेवर पळत जायचं. त्यानंतर इंद्रधनुष्यावरून खाली उतरायचं, त्याचे मनापासून आभार मानायचे आणि सर्वानी आपापला हंडा इतरांना अगदी खरा खरा असल्यासारखा कौतुकाने दाखवायचा. ही सफर सर्वाना खूप आवडायची. यामध्ये १५ ते ७० वयोगटातल्या सर्वाना झालेला आनंद पाहायला मिळायचा. यावरून एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायची ती म्हणजे आनंदाकरिता कोणतीही बाहेरची वस्तू लागत नाही. आपण ठरवलं की, आता मला केवळ आनंद हवाय, तर मन आतलाच आनंद आपल्याला देतो; पण आपण मनाला अशी सवय लावून ठेवलीय की, काही तरी मिळालं, घडलं तरच आपल्याला आनंद मिळतो. मग आपण आपल्याच सापळ्यात अडकतो. शांत झोपेत आनंद मिळतो तो कोणत्या गोष्टींमुळे? तेव्हा, आनंदाला ‘अटी लागू’ होत नाहीत. उलट ‘अटी लागू’च्या ओझ्यातून आपण मुक्त झालो, की आपल्याला हलकं वाटेल. असं वाटलं तरच मनाला आनंदाचं इंद्रधनुष्य दिसू शकेल. नाही तर मनाला सतत कसला तरी नकारार्थी विचार करायची सवय लागते. बघा ना, जरा कुणाला घरी यायला उशीर झाला, की प्रथम अशुभ शंकाच मनात येतात. का? तशी सवयच आपण मनाला लावली. मन हे पाळीव प्राण्याप्रमाणे असते. त्याला ज्या सवयी लावू त्या लागतात. एकदा चांगल्या विचारांची सवय लागली तर ते कशाला वाईट विचार करेल? इंद्रधनुष्यासारख्या कल्पना सुचणे ही काही फक्त कवींचीच मक्तेदारी नाही; परंतु कवी निसर्गातली कोणतीही गोष्ट पाहिली किंवा त्याला दिसली की तिथे क्षणभर थांबतात (गाण्यामध्ये एखादा पॉज असतो किंवा संवादात एखादा प्रेग्नंट पॉज असतो तसे). त्या थांबण्यात आनंद आहे. आपण एक फूल पाहिले, की दुसऱ्या फुलाची आठवण काढत तुलना सुरू करतो, चर्चा करतो, फोटो काढतो (आजकाल फोटोला सेल्फी म्हणतात), तो फॉरवर्ड करतो आणि लाइकची अपेक्षा करत बसतो. इकडे बिचारं फूल म्हणत असतं, ‘अरे माणसा, जरा क्षणभर थांब. माझ्याकडे नीट पहा!’ निसर्गाशी असं नातं बालकवींनी जोडलं आणि म्हणूनच त्यांच्या तोंडून

 

‘वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे’

 

या उत्स्फूर्त ओळी बाहेर पडल्या. अर्थात, या उत्कृष्ट मराठमोळ्या कवितेबद्दल शेवटी लिहिले, कारण नाटकाच्या जाहिरातीत नाही का सगळ्या कलाकारांची नावे येतात, पण शेवटी ‘आणि.. अमुक अमुक भूमिकेत..’ असं म्हणून मुख्य किंवा लोकप्रिय कलाकाराचं नाव लिहितात. त्याचप्रमाणे या कवितेबद्दल माझ्या भावना आहेत.

पण मूळ मुद्दा असा की, निसर्गाशी असं नातं जोडलं, तर आपणही निसर्गाचाच भाग आहोत

हे जाणवेल. निसर्गासारखेच आपले जीवनही

‘सहज’ होईल. मनावर कसलाही ‘ओढून घेतलेला ताण’ राहणार नाही. आपले बरेचसे आजार हे मनातून येतात हे कित्येक वैद्यकीय संशोधनांमधून दाखवून दिलं गेलं आहे. तेव्हा आरोग्य आणि आनंद ही

‘विन-विन सिच्युएशन’ आपल्याच चॉइसवर अवलंबून आहे.

-अंजली श्रोत्रिय
health.myright@gmail.com