डॉ. रामचंद्रन हे मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली..

गेल्या लेखात आपण डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांच्या कामाला, अभ्यासाला समजून घेण्यास सुरुवात केली. रामचंद्रन मेंदूचा अभ्यास करतात. त्याकरिता ते असंख्य प्रकारच्या पेशंट्सवर उपचार करतात, त्यांच्या अवस्था (आजार) समजून घेतात. या पेशंट्समध्ये काही कारणाने हात-पाय आदी अवयव कापावे लागलेले, परिणामी कापलेल्या अवयवांमध्ये असह्य़ वेदना अनुभवणारे किंवा मेंदूच्या ठरावीक भागाला इजा पोहोचल्याने वाचू, बोलू, लिहू शकणारे पण स्वत:ची किंवा स्वत:चे मित्र, नातेवाईक आदी कोणालाही न ओळखू शकणारे किंवा असे पेशंट्स ज्यांच्या मेंदूला समोरचं दृश्यं हे व्हिडीओ क्लीपप्रमाणे काळाच्या ओघात दिसत नाही. म्हणजे ही व्यक्ती ग्लासमध्ये पाणी भरत असेल तर या व्यक्तीचा मेंदू या कृतीच्या सुरुवातीचं दृश्य कॅमेऱ्याप्रमाणे टिपतं पण त्यापलीकडे काही नोंदवत नाही. टीव्ही, फोन, संगणक हँग झाल्यावर एकच दृश्यक्षण फार काळ दिसत राहतो तसं होतं. परिणामी पाणी भरणं कधी थांबवायचं ते कळत नाही. काहींना अक्षरं, आकडे यांच्या चिन्हांमध्ये ठरावीक रंग दिसतात. काहींचा मेंदू साधं शर्टाचं बटण लावणं इतकं साधं कार्य करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करू शकत नाही, पण त्याच वेळेला हे पेशंट लिओनार्दो-दा-विन्सीच्या तोडीस तोड चित्रं रेखाटू शकतात.
अशा विविध प्रकारच्या पेशंट्सची जी अवस्था (आजार) असते, त्यांचा मेंदू ज्या प्रकारे कार्य करत असतो किंवा करत नसतो, त्या कार्यप्रणालींचा रामचंद्रन अभ्यास करतात. याखेरीज मानवी मेंदूच्या प्रक्रिया ज्यामुळे आपण जीवनातील अनेक गोष्टी करत असतो. उदा. वस्तू पाहणं, ओळखणं, त्याचा अर्थ लावणं, त्यामुळे भावनारूपी प्रतिसाद निर्माण होणं, त्या भावनेआधारे शारीरिक कृती करणं, दुसऱ्यांच्या भावना, वेदना समजणं, अनुभवणं, अंतर्मुख होणं अशा प्रक्रियांचाही रामचंद्रन अभ्यास करत असतात. आजारी, अपघात झालेल्या व निरोगी, नैसर्गिक मेंदू एकाच मानवी कृतीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्याचं स्वरूप कधी कधी परस्परविरोधीही असू शकतं. या परस्परविरोधी प्रतिसादांचा अभ्यास करत रामचंद्रन मेंदूची रचना, त्यातील विविध भाग, त्यांचे कार्य या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवतात, तर्क मांडतात, शक्यतांची चर्चा करतात. यातूनच त्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी काही कल्पक उपचारपद्धती तसंच शास्त्राच्या पातळीवर काही संकल्पना मांडतात. ‘कॅपग्रस’ आभास, मीरर न्यूरॉन्स, मीरर न्यूरॉन्सचा ऑटिझम या आजारातील सहभाग, सिनेस्थेशिया (विविध संवेदनानुभवांचं मिश्रण, संबंध) व त्यातून सुचणाऱ्या ‘लवचीक प्रतिमा’ ज्यांना आपण साहित्यिक व्याकरणात ‘उपमा’ असं म्हणतो त्याबाबतीतील त्यांची थेअरी, मिरर बॉक्स आदी रामचंद्रन यांची निर्मिती आहे.

कुठच्याही विषयाचा इतिहास हा मानवी इतिहासाशी, उत्क्रांतीशी जोडला जातो. मेंदूचा अभ्यासही मानवी उत्क्रांतीशी जोडला जातो. आपण मेंदूच्या उत्क्रांती संदर्भात जेवढा विचार करतो तेवढा तो किती अद्भुत आहे हे आपल्याला कळतं, कळू शकतं. बघा ना, एका गोष्टीवर नजर स्थिर करणं, डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, नाकाने वास घेणं यांचा एकमेकांशी संबंध जोडणं, एखाद्या गोष्टीवरची हाताची पकड घट्ट-सैल करणं, आपल्या शारीरिक कृतीचा वेग मर्यादित करणं वाढवणं, भावना अनुभवणं, स्मृती तयार करणं, चेहऱ्यांचे विविध हावभाव करणं, नाचणं, सौंदर्यानुभव जाणणं, संख्याभाव, अंतर्मुख होणं, विचार करून कृती करणं, दुसऱ्याच्या भावना-संवेदना (अनुकंपा) यांना अनुभवणं, त्यांची वेदना समजणं अशा कित्येक गोष्टी आपण आपला मेंदू उत्क्रांतीच्या टप्प्यात शिकलाय. यातूनच आपण बोलीभाषा, लिखित भाषा, चित्र-दृश्यभाषा तयार केल्या.विविध संस्कृती विकसित झाल्या. जगभरात सांस्कृतिक पातळीवर धर्म, भाषा, कला, सवयी, आचार-विचार आदींबाबतीत कितीही विविधता असली तरीही त्यांच्यामागे जागतिक पातळीवर एक समान गोष्ट आहे ती म्हणजे मानवी मेंदू, त्याची उत्क्रांती, त्यातून विकसित झालेल्या कार्यप्रणाली व त्यातून भाषा, गणित, कला, शास्त्र, नियम, समाजजीवनातील व व्यक्तिजीवनात विकसित झालेल्या अनेक गोष्टींच्या निर्मितीची क्षमता! असा मेंदूचा अभ्यास आपल्याला याही अर्थी ‘आत्मभान’ देईल!
रामचंद्रन मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट कार्यप्रणाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आठ कार्यप्रणाली रामचंद्रन यांना उमगण्यानं त्यांना आशियाई-भारतीय शिल्पकलेकडे पाहण्याची ‘खरी’, ‘अर्थपूर्ण’ दृष्टी प्राप्त झाली. रामचंद्रन यांना ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून भारतीय प्राचीन शिल्पकला आवडते असं नाही. वास्तविक मेंदूच्या कार्यप्रणाली व प्राचीन भारतीय शिल्पकला हा संबंध कळण्याअगोदर, ते प्राचीन भारतीय शिल्पांकडे युरोपियन, ब्रिटिश दृष्टिकोनातून पाहायचे, ज्या दृष्टिकोनाने या अद्वितीय शिल्पांना चक्क आदिम, आदिवासी कला म्हणून म्हटले होते. कल्पना करा, वेरुळ, खजुराहो, चोल वंशातील नटराज मूर्ती यांना आदिम-आदिवासी कला म्हणायचे! मेंदूचा अभ्यास केल्याने, त्यांची स्वत:ची पूर्वग्रहदूषित दृष्टी कशी नाहीशी झाली व त्यांना भारतीय प्राचीन शिल्पांच्या निर्मितीमागील शिल्पकाराची दृष्टी, त्याची कलाभाषा, दृश्यभाषासमज कळली. हे यूटय़ूबवर Biology, Psychology & Art हा व्हिडीओ पाहिल्यास हे सर्व रामचंद्रन यांच्या शब्दांत ऐकण्यात जास्तच मजा येईल. चित्रकलेच्या क्षेत्रात निर्मितीप्रक्रियेचा विचार हा अभिव्यक्तीच्या अंगानेच जास्त होतो. त्या विचाराची सुरुवात व शेवट चित्रकाराच्या, ‘मला असं वाटतं की..’ या विधानात होते. मेंदूचा अभ्यास चित्रकाराच्या या वाटण्याकडे पाहण्यासाठी अजून एक पर्यायी दृष्टी देते. कारण चित्रकारांचे ‘वाटणे’ हे सवयी, संस्कार, पूर्वग्रह, अंधश्रद्धा आदी कारणांतूनही असू शकते.

मेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे, उदा. वस्तूंच्या कडांमध्ये प्रत्यक्षात नसलेली रेषा दिसणं, सभोवतालच्या वास्तवाला हवं तेव्हा सपाट व हवं तेव्हा घन, त्रिमित पाहता येणं, रंगाने भरलेल्या प्रत्येक दृश्याला काळ्या व पांढऱ्या रंगाच्या छटांमध्ये रूपांतरित करून कोळसा, पेन्सिल यांच्या साहाय्याने शेडिंग करून चित्रं काढणं, दोन वेगवेगळ्या स्रोतांपासून प्राप्त झालेल्या आकार, रंग, पोत, हालचाली आदींमध्ये साम्य दिसणं, या साम्याचा भावना-विचार आदींशी संबंध जोडून अर्थवाही, लवचीक प्रतिमा ‘उपमा’ म्हणून वापरणे इत्यादी.. या गोष्टी इतक्या नित्याच्या वापराच्या झाल्यात, की त्यांमागील मेंदूच्या क्षमतेविषयी आश्चर्य वाटणं बंद झालंय.

परंतु अशा मेंदूंच्या प्रक्रियांतूनच आपल्यामध्ये ‘दृश्यभाषासमज’ विकसित होते. ही ‘समज’ आपल्या चित्रात प्रतिबिंबित होते. इतकंच काय, अशा दृश्यजाणिवांच्या भाषेच्या समज, भानातून स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा, मांडणी व रंगसंगती आधारित, क्रमयुक्त आकर्षक दृश्यानुभव, आकारसौंदर्य, अनेक संवेदनानुभव एकत्र होऊन तयार झालेला एक सुखानुभव जो शारीरिक व वैचारिक पातळीवरही आनंद देतो, तो विकसित होतो. ज्याला आपण सौंदर्यानुभवही म्हणतो. सर्व चित्रकार स्वत:ची दृश्यभाषा व दृश्यभाषासमज याला समजण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मेंदूच्या अभ्यासाने ही ‘दृश्यभाषासमज’ कळण्यास मदत मिळू शकते. दृश्यभाषासमज आपल्याला नेहमीच्या शैली किंवा चित्ररूपाधारित चित्रविषयक विचारापलीकडे घेऊन जाऊ शकते. आपण वास्तववादी, अमूर्त, विवेचनवादी, आलंकारिक अशी विभागणी न करता आपण कलेचा भाषा म्हणून विचार करू, जो केवळ भाषेचा वापर, अभिव्यक्तीवर आधारित नसेल.
* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल
महेंद्र दामले – mahendradamle@gmail.com