माणसे असे का करतात हे कळत नाही, पण पाळीव कुत्र्यानंतर माणसाने कशाला आपला खरा मित्र मानले असेल तर ते पुस्तकांना! ‘पुस्तके हीच आपले खरे मित्र असतात..’ वगैरे वाक्ये आपल्याला जिथे-तिथे पाहायला मिळतात. अशी वाक्ये आयुष्यात कधीही पुस्तके वाचणारे लोकच लिहू शकतात, किंवा whats app वर सकाळी एकमेकांना पाठवू शकतात. मला अशी वायफळ वाक्ये पिकवून पसरवत बसणाऱ्या मध्यमवर्गीय जाणिवेच्या आणि सुविचारांना सतत भुकेलेल्या असलेल्या माणसांचा फार कंटाळा येत राहतो.

माझी फार जवळची आणि आवडती पुस्तके चोरीला गेली तेव्हा मला फार राग आला होता. ती कुणी नेली असतील याची मला अंधुकशी कल्पना होती. मी पुढच्या वेळी त्या व्यक्तीच्या घरी जेवायला गेलो असताना सरळ ती उचलून पिशवीत घातली आणि घरी परत आणली. पण मला त्या पुस्तकांसोबत राहवेना. ज्यांनी नेली होती त्या माणसांचा वास आणि त्यांच्या तेलकट खाण्याचे घाणेरडे बोटांचे डाग त्या पुस्तकांवर पडले होते. ज्यांनी ती नेली होती ते जोडपे होते. दोघेही अर्धे अर्धे संवेदनशील होते. गरज लागेल तिथे एकेकाची अर्धी किंवा फारच वेळ आली तर दोघांची गोळा करून पूर्ण अशी संवेदना दाखवत ते गावभर फिरायचे. त्यांनी ती पुस्तके सकाळी साबुदाणा खिचडी खाताना उलटली होती. मला त्यात एक कोरडा, जुना साबुदाणा सापडला होता. आपल्या कोवळ्या, देखण्या प्रियकराच्या शर्टाला आतून सिगरेटचा, पण बाहेरून गुलाबी मुलीचा वास आला तर आपल्याला जे वाटते तसे काहीसे मला वाटले आणि मी ती पुस्तके सरळ नदीत फेकून दिली. असे जरूर करावे मधे मधे. मी तर एकदा भैरप्पांचे पुस्तक वाचतानाच अचानक उठलो आहे आणि सरळ तरातरा पुलावर जाऊन ते नदीत भिरकावून आलो आहे. घराजवळ नदीवर लकडी पूल असल्याने मला अशी मौज अनेकदा करता आली आहे. तर मी त्या जोडप्याकडून पुस्तके आणली, पण नदीत फेकून दिली आणि दुकानात जाऊन त्यांच्या नवीन प्रती घेऊन आलो. कारण पुस्तक ही एक वस्तू आहे. एक खराब झाली तर दुसरी आणता येते. त्यात लिहिलेले आपण आत्मसात केले आहे ना, हे फार महत्त्वाचे असते. प्रत महत्त्वाची नसते, पुस्तक महत्त्वाचे असते. A good book is a well written, well edited and extremely well articulated idea. Printed Copy of that idea is not a book.

Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

पुस्तकांना आंजारून गोंजारून प्रमाणाबाहेर लाडावून ठेवायचे ठरवले आणि त्यातच आपले आयुष्य घालवायचे ठरवले तर त्यात तुमचा चांगला वेळ जाईल. पण वाचणारा माणूस असे कधी करणार नाही. वाचनाची आवड असलेला माणूस मनापासून पुस्तके आपल्या आत शोषून घेईल. आपण काय वाचतो आहोत, हे तो आवर्जून लोकांना सांगत राहील. माझे असे अनेक मित्र आहेत- जे आपण सध्या वाचत असलेले पुस्तक समाजमाध्यमांद्वारे लोकांसमोर आवर्जून आणतात. मी स्वत: #readingnow हा हॅशटॅग नीट वापरतो. लोकांना मी काय वाचतोय, हे सांगत राहतो. लोक काय वाचतात, हे पाहत राहतो.

पुस्तके हरवूसुद्धा शकतात. चोरली जाऊ  शकतात. वाचणारी माणसे आणि पुस्तके प्रतीच्या रूपात गोळा करत, त्या गोळा करण्याच्या रोचक कहाण्या सांगत बसणारी माणसे यांत फरक असतो. अशा रोचक कहाण्या सांगत बसणारी आणि घरच्या पुस्तकांचे प्रमाणाबाहेर प्रदर्शन करणारी माणसे पुस्तके खरेदी करतात; पण वाचतात कमी. म्हणजे वाचत बसलेली दिसली, तरी शोषून फार कमी घेऊ  शकतात. अशा माणसांना पुस्तक नावाच्या वस्तूचे भावूक आकर्षण असते. आपण वाचतो आहोत याची ते स्वत:ला खात्री देत वर्षे उलटवत बसलेले असतात. अशी माणसे घरी आलेल्या तरुण मुलांना नीट खायला-प्यायला घालून ‘मी हे पुस्तक कोणत्या फुटपाथवरून घेतले, आणि ते पुस्तक कसे रद्दीवाल्याकडून हुडकून काढले, या पुस्तकावर कशी अमक्या बाईची सही आहे..’ असल्या कहाण्या सांगून त्यांना बोअर करीत राहतात. दुर्दैवाने किंवा खरे तर सुदैवाने माझ्या आयुष्यात असे खूप गोड, पण कंटाळवाणे म्हातारे आहेत.

आपल्या पाठीत आपला हात पोहोचू शकणार नाही तिथे एक काटा रुतलेला असतो. लहानपणीपासून तो प्रचंड खुपत असतो. तो काटा आपले आई-वडील, मित्र कुणाकुणाला सापडलेला नसतो. तो काटा काढून देणारा लेखक आपला बनतो. मग तो लेखक प्रसिद्ध असो किंवा नसो. ब्रिटिश लेखक Alan Hollinghurst आणि नायजेरियन-अमेरिकन लेखक Teju Cole हे माझ्यासाठी असे दोन लेखक आहेत. त्यांनी माझा लहानपणीपासून पाठीत रुतलेला काटा काढून देऊन तिथे कापूस ठेवला आहे. प्रत्येकासाठी असे आपापले महत्त्वाचे लेखक असतात. Alan ¨¹FF kLine of beauty’मधील नायकाचे जगणे माझे आहे. मी केंसिंग्टन गार्डनला त्या कादंबरीतील घरासमोर जाऊन उभा राहून सगळ्यात वरच्या मजल्यावरील त्या खिडकीकडे शांतपणे पाहून आलो आहे. आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले हे लेखक कमी महत्त्वाचे होत जावोत आणि नव्या, ताज्या खूप उलाढाली घडून आपले आयुष्य पूर्णत: बदलून जावो  अशी मी नेहमी इच्छा करतो. माझी समृद्धीची कल्पना ही आहे. नवा काटा शरीरात तयार होणारच. आणि तो होताना तो अलगद काढणारा नवा लेखक कुठेतरी काहीतरी लिहीत बसलेला असणारच. आवडते लेखक किंवा आवडते संगीत ही फार कालसापेक्ष कल्पना ठरावी इतके बेभरवशाचे, सातत्याने बदलते आणि काळाचा मोठा परीघ पाहायला मिळणारे आयुष्य मला लाभले तर फार बरे होईल. या सगळ्यातून एखादा लेखक सातत्याने आपला म्हणून टिकेल.. आपण जगत असताना तो लिहीत असेल आणि आपल्याला जागे ठेवेल.

प्रत्येक भाषेतल्या वाचकाला त्याच्या पिढीचे आणि त्याच्या वयाचे ताकदवान लेखक असतात. मी मराठी असल्याने माझ्या कपाळी हे नशीब नसावे. त्यामुळे आपल्या आजच्या जगण्याचे पडसाद आणि प्रतिबिंबे पाहायला मला नेहमीच जगभरातून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या किंवा इंग्रजी भाषेत भारतात किंवा भारताबाहेर लिहिलेल्या लिखाणावर अवलंबून राहावे लागले आहे. मराठी साहित्य ही एक फार सुंदर जुनी आठवण बनत चालली आहे. आपण मोठे होत जातो आहोत आणि आपण यापुढे उरलेल्या आयुष्यात एकही मराठी पुस्तक वाचले नाही तरी आपले काहीही भावनिक किंवा बौद्धिक नुकसान होणार नाही याची मला खात्री पटत चालली आहे. असे असले तरीही माझा मेंदू फक्त आणि फक्त मराठी भाषेतच विचार करतो आणि करू शकतो. इतर कोणत्याही भाषेत लिहिताना किंवा बोलताना मी वेगाने भाषांतर करीत बसलेला असतो. पण मूळ विचार मराठी असतो. त्यामुळे मी मराठी लेखक आहे; पण मराठी वाचक उरलेलो नाही. याची कारणे पूर्णत: वैयक्तिक आहेत. कारण मला वर्तमानकाळाचे फार जास्त आकर्षण आहे आणि माझ्या मातृभाषेतील साहित्याला भूतकाळाचे आकर्षण आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी द्वैतात जगत असतो आणि काम करीत असतो, तसे हे माझ्या जगण्याचे आणि कामाचे द्वैत तयार झाले आहे असे मी मानतो.

‘The London Review of books’ आणि ‘The Paris Review’ या माझ्यासाठी पूर्वीच्या आणि आत्ताच्या जगभरातील साहित्याशी ओळख करून घ्यायच्या महत्त्वाच्या जागा आहेत. ‘The Paris Review’ ने दरवर्षी लिहिणाऱ्या लेखकांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संग्रह त्यांच्या वेबसाइटवर वाचायला मोकळेपणाने उपलब्ध केले आहेत. मला त्या नेटकेपणाने विचारबद्ध केलेल्या मुलाखती रोज वाचायला फारच आवडते. इंग्रजी भाषेला अभिमान सोडून इतर सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे. त्यामुळे ती भाषा जिवंत, प्रवाही आणि जगातील जवळजवळ सर्व बोलींमधील साहित्य भाषांतरित करून घ्यायला सक्षम भाषा  झाली आहे. त्या भाषेला लवचीकता आहे आणि ती ज्ञानाची भाषा आहे. Charles Dickens च्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज्’मधील पहिली दोन वाक्ये वाचली किंवा ओरहान पामुकच्या मूळ तुर्की भाषेत लिहिलेल्या आणि इंग्रजीत भाषांतरित केलेल्या ताज्या ‘A strangeness in my mind’ या कादंबरीतील इंग्रजी भाषा वाचली की फुकटचा अभिमान आणि आठवणीची जळमटे यांपासून लांब राहिल्याने साहित्याचे, भाषेचे आणि माणसाचे किती भले होते या गोष्टीचा जिवंत अनुभव आपल्याला येतो.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com