तात्पुरतेपण आणि अस्थिरतेचे वरदान लाभलेल्या इ. स. २००० सालानंतरच्या पिढीची डायरी..

परंपरेकडे मी अतिशय संशयाने बघत वाढलो आहे. माझे पोषण परंपरेला नाकारून नाही, तर सातत्याने परंपरेला प्रश्न विचारत काळानुसार वाकवून झाले आहे. मी आजपर्यंत अनेक गोष्टी शिकलो, पण कधीही कोणत्याही गुरूचे शंभर टक्के ऐकलेले नाही. घरच्या पूर्वजांची मते प्रमाण मानलेली नाहीत. कुणाचेही वय किंवा कुणाचाही अनुभव जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीला मी कधीही प्रमाणापेक्षा जास्त गांभीर्याने घेत नाही.

आमच्या घरात असलेली शास्त्रीय संगीताची आवड गेल्या दोन-तीन पिढय़ा एखादा झरा जमिनीत लुप्त व्हावा तशी नाहीशी झाली असताना माझ्या धाकटय़ा भावामुळे- सुयोगमुळे ती पुन्हा प्रवाही व जागती झाली. अतिशय लहान वयापासून त्याने आमच्या घरात संगीताचा अभ्यास सुरू केला आणि गाण्याचे अस्तित्व खेळते ठेवले. परंपरा कसोशीने पाळून ज्ञानार्जन करण्याच्या त्याच्या प्रक्रियेकडे मी नेहमीच संशयाने किंवा अनेक वेळा सख्खी भावंडे ज्या बेफिकीरीने एकमेकांची चेष्टा करतात त्या बेफिकीरीने पाहत आलो. माझे आयुष्य सिनेमात आणि सिनेमाच्या भोवती घडत असताना तो सर्व वेळ शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत राहिला. आणि मग फार सावकाशपणे मला हे लक्षात आले की, लिहिताना किंवा चित्रपट बनवताना जो अमूर्ततेचा ठाव आपल्याला घ्यावा लागतो, ती अमूर्तता आपल्याला संगीत ऐकल्याशिवाय उमगणार नाही. अमूर्ततेच्या ओढीने मी सावकाशपणे शास्त्रीय संगीत ऐकू लागलो. भारतीय आणि पाश्चात्त्य- दोन्ही प्रकारचे संगीत माझ्या मनातील तळघरे उपसू लागले, तशी मला गाणे ऐकण्याची गोडी लागली. मला त्यातले कोणतेही ज्ञान अजूनही नाही, पण गोडी आहे. ती वाढते आहे.

गाणे नव्याने ऐकू लागलेला माणूस कुमार गंधर्व यांचे गाणे आवडीने ऐकत राहतो, याचे कारण कुमारजी नव्या श्रोत्याला कधीही दाराबाहेर उभे करत नाहीत. गाणे कळत नाही यांचा न्यूनगंड ते देत नाहीत.

दुसऱ्या दिवशी मी पहाटे उठून हॉटेलवरून चालत चालत उजाडायच्या वेळी भानुकुलमध्ये पोचतो आणि कुमारजींच्या रियाजाच्या खोलीत बसून समोर सुरू असलेला कलापिनीचा रियाज ऐकतो. ती थोडय़ा वेळाने अंगणात गाणार आहे. गाणे संपताना ती हे म्हणणार आहे, कीमी तर कुमारजींची छोटी गिलहरी आहे. खार. शिष्या नाही. मुलगी नाही. एक खार. परंपरा पाळणे, त्या जोपासणे आणि काळानुसार आपल्यात बदल घडवत कलेची कालसापेक्ष मांडणी करत प्रयोगशील राहणे याचे भान ज्याला आहे तो कुमार गंधर्व यांचा चाहता आहे असे म्हणता येईल. मग तो कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असो. पुण्यात चित्रपटाचा रसास्वाद शिकवताना आमचे आवडते शिक्षक समर नखाते हे म्हणतात की, परंपरा आणि नियम जरूर मोडा; पण त्याआधी ते नीट समजून, आत्मसात करून घ्या; म्हणजे योग्य प्रकारे मोडणे सोपे जाईल. कलेच्या इतिहासाचा आणि राजकीय इतिहासाचा अभ्यासही याचसाठी करायचा. कालसापेक्ष वागण्यासाठी. इतिहासाचा अभ्यास हा परंपरा पाळण्यासाठी करायचा नसतो; तर त्या परंपरा प्रश्न विचारून काळासोबत वाकवून मोडण्यासाठी करायचा असतो.

इतर कोणत्याही क्षेत्रातील माणसांपेक्षा िहदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील माणसे जुनाट किस्से आणि आठवणी सांगण्यात दिवसच्या दिवस घालवू शकतात. त्यात भाबडेपणा असतो. त्याचप्रमाणे फार मोठय़ा प्रमाणात स्पर्धा आणि हेवेदावे असतात. आपापल्या घराण्यांच्या परंपरेचे अभिमान असतात. जुन्या पद्धतीच्या मानापमानाच्या परंपरा पाळणे किंवा त्या पाळल्यासारख्या दाखवणे आणि वयोवृद्ध कलाकारांचे इगो जपणे हे दर तासाला करत बसावे लागते. तरुण कलाकारांना तर एकमेकांचे काम मोकळेपणाने आवडायला बंदी असल्यासारखे वातावरण आहे. समकालीन कलाकारांनी वादविवाद घालण्याचे आणि एकमेकांच्या कामाची परीक्षा एकमेकांना न दुखावता करण्याचे वातावरण या क्षेत्रात अस्तित्वातच नाही. त्यामुळे सर्व माणसे सतत एकमेकांच्या पाया पडत असतात आणि पाठ वळली की कुरापती काढत बसतात. या सगळ्या परंपरागत जगण्याचा गाण्याच्या गुणवत्तेशी किंवा प्रयोगशीलतेशी संबंध असतोच असे नाही.

कलापिनीने तिच्या वडिलांकडून, गुरूंकडून आत्मसात केलेली सर्वात आकर्षक गोष्ट ही, की ती समाजातील अनेक प्रकारच्या माणसांशी गप्पा मारते, त्यांच्यात रमते. गाण्याप्रमाणेच गाण्यापलीकडे जगणाऱ्या अनेक क्षेत्रांतील माणसांशी मोकळेपणाने मत्री करायचा तिचा स्वभाव आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कुमारजींच्या पुण्यतिथीला देवासला एकत्र आलेली अनेक क्षेत्रांतील माणसे. तसेच पंडित सत्यशील देशपांडे यांच्यासारखे कुमारजींचे पट्टशिष्य. पंडित सत्यशील देशपांडे सकाळच्या सत्रात एका मोकळेपणाने कुमारजी आणि त्यांच्या गुरू-शिष्य नात्याची फोड करतात. ती करताना ते एक आकर्षक सप्रयोग व्याख्यान देतात; जे गाणे समजू बघणाऱ्या कुंपणावर बसलेल्या माणसाला सामावून घेईल. त्यांचे सत्र हे नुसत्या पोकळ आठवणींच्या पलीकडे जाऊन गुरू-शिष्य नात्याचे कारण आणि प्रयोजन सांगते. स्मरणरंजन करत नाही. त्या प्रत्येक आठवणीमागची भूमिका स्पष्ट करते.

माझ्या भावामुळे कलापिनी आमच्या घरी येऊ लागली तेव्हा माझ्याशी गप्पा मारताना आमची दोघांची स्वयंपाकाची आवड तिला उमजली. सकाळी घरात पोहे बनत होते तेव्हा तिने पुढाकार घेऊन माळव्यात बनवतात तसे विशिष्ट चवीचे पोहे बनवले.. ज्याची चव अफलातून होती. त्या पोह्य़ात तिने फोडणी देण्याआधी मीठ, हळद मिसळली आणि वरून डािळबाचे दाणे पेरले. ती अशी गायिका आहे- जी उगाच शास्त्रीय संगीताचे गांभीर्याने अवडंबर करीत नाही. मला ती आवडते याचे मुख्य कारण म्हणजे ती हसरी आहे. हा गुण हिंदुस्थानी शास्त्रीय गायन परंपरेला न शोभणारा आहे. या क्षेत्रातील अनेक माणसे सतत कुणाचे तरी श्राद्ध चालू असल्यासारखी वागत असतात. लहानपणीच अकाली प्रौढत्व आल्यासारखी जगतात. या वातावरणात कलापिनीची गाण्यासोबत गुरूंकडून आत्मसात केलेली आणि जोपासलेली नेटकेपणा व समाजप्रियता याची आवड माझ्यासारख्या गाणे न समजणाऱ्या माणसाच्या मनातील भीती आणि संकोच कमी करते. त्यामुळेच इतक्या विविध क्षेत्रांतील माणसे देवासला आली आहेत.

माझ्यासोबत सचिन खेडेकर, त्याची पत्नी जल्पा आणि मराठीत अतिशय चांगला फूड ब्लॉग लिहिणारी सायली राजाध्यक्ष असे माझे मित्रगण आहेत. आम्ही सर्वचजण गाण्यासोबत उत्तम चित्रपट, उत्तम जेवण आणि दुपारच्या गाढ झोपेचे भोक्ते आहोत. या दोन दिवसांत भुवनेश आणि कलापिनीने जो पाहुणचाराचा मेन्यू ठरवला आहे त्याचे वर्णन करणे फार आवश्यक आहे. कारण त्या दोन दिवसांत आजूबाजूला घडणारे गाणे, गप्पा आणि चर्चा या गोष्टी त्यांनी कुशलतेने बनवलेल्या जेवणातून ओवून घेतल्या होत्या. हिवाळा सुरू आहे. बाजरीची गरम खिचडी आणि तूप, गूळ, चविष्ट सार, इंदुरी पद्धतीचा मोकळा पुलाव- ज्यात मी सकाळपासून शोधत असलेले डािळबाचे दाणे, रबडी आणि गोड बुंदी. दुपारच्या जेवणाआधी प्यायला समोर आलेली शिकंजी, नाश्त्याला इंदुरी पद्धतीचे जिरवण आणि शेव घातलेले गरम पोहे आणि गरम गरम कचोरी. त्यानंतर सचिनने शोधून काढलेला एक पानवाला. या सगळ्यामुळे रविभया दाते लहानपणीच्या गोड आठवणी सांगायला लागताच आम्हा सगळ्यांना आलेली गोड पेंग. मोकळा वाहता वारा. सतत समोर येणारा वाफाळता चहा.

उत्सवप्रिय माणसांना आपलेसे वाटेल असे वातावरण अशा आपुलकीने आखलेल्या हिवाळ्यामधील खाजगी मफिलींमध्ये आपसूक तयार होते. पुण्या-मुंबईत होणाऱ्या भल्यामोठय़ा व्यावसायिक महोत्सवांमध्ये बसून गाणे ऐकायला अशी मजा येत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात पंडित योगेश सम्सी यांचे एकल तबलावादन आणि मग उस्ताद अमजदअली खानसाहेबांचे सरोदवादन.

काळ पुढे जाताना तो थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. तो थांबत नाही. पण त्या प्रयत्नांतून अशा काही अनुभवांची मेजवानी तयार होते. मानले तर माणूस आपल्यातून गेलेला असतो, आणि मानले तर तो आपल्यात असतो. तो माणूस जाताना मागे जी ऊर्जा ठेवून जातो त्या ऊर्जेने काय घडू शकते याचा प्रत्यय मला या दोन दिवसांत आला.

सर्व सोबतचे ओळखीचे आणि महत्त्वाचे लोक एकामागून एक निघून जाणार आहेत हे आपल्याला आतमध्ये माहिती असते. प्रत्येक पुढची पिढी मग ठरावीक काळाने जमून एकमेकांना आश्वासक वाटावे म्हणून असे काही चांगले छोटे कार्यक्रम घडवून आणत असते. विजय तेंडुलकर गेले तेव्हा दोन-तीन वष्रे आम्ही सगळे एकत्र जमायचो आणि गप्पा मारायचो. काहीतरी वाचायचो. दोन-तीन वर्षांनी माझ्यातल्या अश्रद्ध आणि आळशी माणसाने या सवयीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला जर काही आवडत नसेल तर ते- मागे राहिलेल्या माणसांनी एकत्र जमून कुणाचीतरी आठवण काढत बसायचे कार्यक्रम.

पण कलापिनीने माझ्या या अनुभवाला आणि समजुतीला वाकवल्यासारखे केले. त्यामुळे तिचे खूप आभार.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com