इ. स. २००० सालानंतरच्या पिढीने अनुभवलेल्या अस्थिरतेच्या भावनेवरचे सदर.. ज्यात व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, बदलते संगीत आणि सिनेमाचा ऊहापोह असेल. तसेच नवी पुस्तके, तंत्रज्ञान, कलेच्या नव्या बाजारपेठा, बदलती भाषाशैली इत्यादीची चर्चाही. थोडक्यात- तात्पुरतेपण आणि अस्थिरतेचे वरदान लाभलेल्या पिढीची ही डायरी आहे..

मी काल नेटफ्लिक्सवर ‘टॉप गन’ पाहत बसलो होतो. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा त्या सिनेमातली पात्रे काय बोलतायत हे कळले. कारण नेटफ्लिक्सचा फायदा हा, की अमेरिकन इंग्रजी चित्रपटांनासुद्धा इंग्रजी सबटायटल्स असतात. सिनेमा पाहता पाहता वाचून हे लक्षात येते, की समोरचे बापे आणि बाया काय बोलत आहेत. १९८६ साली ‘टॉप गन’ प्रदर्शित झाला आणि एका वर्षांत तो भारतात आला तेव्हा मी सहावीत होतो. इंग्रजी सिनेमे हे नव्याने शिकायला आलेल्या इंग्रजी भाषेचा सराव व्हावा म्हणून नेमाने पाहू लागलो होतो.

‘टॉप गन’ने आमच्या सर्व वर्गालाच काय, पण सर्व पिढीला खूप खर्चात टाकले. म्हणजे सहावी-सातवीत असताना खिशात चिंचेच्या आणि संत्र्याच्या गोळ्या घेण्याइतकेच पैसे असताना आम्ही पुढे आयुष्यात करायच्या गोष्टींची मोठी यादी सगळेच मनातल्या मनात करून बसलो. एकमेकांना सांगत सुटलो.

मी दर शुक्रवारी अलका चित्रपटगृहात जाऊन भाषा शिकायला मिळेल असा उदात्त आविर्भाव आणून इंग्रजी सिनेमे पाहत असे. ‘अलका’चे मालक आणि मॅनेजर या दोघांना उत्तम इंग्रजी चित्रपटांची जाण होती. ते बारकाईने निवडून उत्तम अमेरिकन चित्रपट तिथे लावत. माझे वडील मला तिकीट काढून आत बसवून देत आणि सिनेमा संपला की कोपऱ्यावरच्या ट्राफिक पोलिसाचा हात धरून चार मोठे रस्ते ओलांडून मी घरी परत येत असे. मनात सिनेमाची चव घेऊन. घरात जे कधीच होऊ शकत नाही असे सर्व लैंगिक, सामाजिक आणि भावनिक शिक्षण माझे अलका चित्रपटगृहाच्या चालकांनी केले.

‘टॉप गन’ने आमचे खालील खर्च वाढवले आणि अनेक आकांक्षा आमच्या सदाशिवपेठी शुद्ध देशी बालमनांत उत्पन्न केल्या. ‘टॉप गन’ ही आमची खरी मुंज होती. घरी पाहुणेरावळे बोलावून मुंडण करून मुंजीसारख्या कालबा संस्कारांवर जो पैसा आमच्या आई-वडिलांनी वाया घालवला त्याचे मला फार वाईट वाटते. तो पैसा आम्हा मुलांना सहावी-सातवीत दिला असता तर आम्ही खालील खर्च आणि कृती लगेच केली असती. आमचे भले झाले असते. हल्ली सिनेमा बघताना जो खाण्यापिण्यावर खर्च होतो तसा हा फालतू खर्च नव्हे. पूर्वी सिनेमा बघताना आपण या या गोष्टी करायच्या आहेत, इथे इथे जायचे आहे, या या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, असले कपडे घालायचे आहेत, हे मनसुबे मनात रचले जाऊन आमची आजूबाजूच्या त्याच त्या जगातून सुटका व्हायची.. असा तो खर्च. जो सध्या अनेक वर्षांनी माझ्या लाडक्या जोया अख्तरचे सिनेमे बघताना करावासा वाटतो.

‘टॉप गन’ने मनात निर्माण केलेले खालील खर्च आणि आकांक्षा.. काही करायची ऐपत नंतर आयुष्यात आली. काही केले नाहीत. उरलेले करायची इच्छा निघून गेली आहे.

१ ) रे बॅन कंपनीचे aviator गॉगल्स घेणे. (टॉम क्रूज हा नट त्या aviators  मध्ये जो काय सेक्सी दिसला आहे! हे गॉगल्स सहा हजारांपासून पुढे मिळतात, ही बातमी वर्गातील एका मुलाने काढल्यावर आम्ही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवायला आणि उद्योगधंदे करायला प्रेरित झालो. तोपर्यंत आम्हाला ‘पैसा नाही, तर कुटुंब आणि देश महत्त्वाचा!’ असे काहीतरी शाळेत शिकवत. ‘साधेपणा, अंथरूण पाहून पाय पसरणे,’  ‘गरिबी चांगली, श्रीमंती वाईट’ असे सगळे होते, ते संपले. ‘आधी aviator,, मग बाकीचे सगळे’ हे आमच्या मनावर कोरले गेले. जे गॉगल्स आमच्या पिढीच्या प्रत्येकाने पहिल्या दमदार कमाईतून घेतले. माझ्याकडे अजूनही माझ्या गॉगल्सच्या कप्प्यात एक तरी aviator असतोच.)

२ ) पायलट बनणे (वर्गातले सगळेजण हा सिनेमा पाहून पायलट बनणार होते. एकही कार्टा बनलेला नाही. सगळा वर्ग कॅलिफोर्नियात सॉफ्टवेअरसाठी गेला. आम्ही वर्गातील मोजून तीन मुले सिनेमासृष्टीत आलो. एकजण डॉक्टर झाला आहे. दोन मुले बिचारी इंजिनीअर पण झाली. कुणीही पायलट बनले नाही. पण ‘टॉप गन’ पाहून प्रत्येकाने जवळजवळ हे ठरवून टाकले होते, की माझे आता जमिनीवर काय काम? मी तर आकाशातला राजपुत्र. अनेक मुले वर्ग चालू असताना खिडकीबाहेरच्या आकाशाकडे पाहत बसत. पुण्यावरून तर एकही विमान जात नसे, तरी बिचारी गॉगल्स लावून विमाने उडवायची स्वप्ने पाहात.)

३ ) शर्ट काढून बीचवर व्हॉलीबॉल खेळणे. (न बोललेलेच बरे. आमच्या एकेकाचे रूप बघता कुणी हे केले नाही हेच बरे आहे. गोव्याला गेले की बनियन आणि अर्धी चड्डी घालून पोट सांभाळत काही मुले हे जुने स्वप्न पूर्ण करताना अजुनी दिसतात. अशा मुलांच्या बायका पंजाबी ड्रेस घालून समुद्रात पोहत असतात.)

४ ) वर्गात शिकवायला आलेल्या शिक्षिकेसोबत अफेयर करणे. (सातवी-आठवीतल्या सर्व मुलांची साधी, सोपी फँटसी. प्रत्येकजण वयात येताना असे काहीतरी करावेसे वाटणारच. ‘टॉप गन’मध्ये टॉम क्रूजला शिकवायला केली मॅकगिलिस ही अप्रतिम दिसणारी शिक्षिका येते. आणि चारच सीननंतर ते एकमेकांसोबत रात्र घालवतात. पुण्यात.. भावे स्कूल.. सदाशिव पेठ.. हातावर मारल्या जाणाऱ्या पट्टय़ा.. गृहपाठ.. पालकांना बोलावेन अशा धमक्या.. शिवाय शनिवारी मारुतीच्या मूर्तीला घालायचा पानांचा हार.. त्यामुळे हे स्वप्न थुंकी गिळावे तसे प्रत्येकाने गिळून टाकले असणार. नाहीच जमले या आयुष्यात.. अरेरे!)

५ ) रोज काम संपल्यावर संध्याकाळी मित्रांसोबत जवळच्या पबमध्ये जाणे आणि स्वत:चे गांभीर्य आणि पांडित्य बाजूला ठेवून थोडी नाचगाणी आणि मजा करणे. (हे नंतर भारतातही करता आले. सध्या तर नेहमीच करता येते. धन्य ते शहरीकरण.. धन्य ती खुली अर्थव्यवस्था.. आणि धन्य ती स्थलांतर करायची सवय. ९० साली ज्यांच्या शाळा संपल्या ते आम्ही सगळे अतिशय निरागसतेने आणि सहजपणे खुल्या अर्थव्यवस्थेत सामावून गेलो. मौजमजा करायची आम्हाला खंत वाटली नाही. आणि अपराधी तर कधीही वाटले नाही. नाहीतर आम्ही पुण्यातील मुले पिंपरीच्या पेनिसिलीन कारखान्यात काम करून संध्याकाळी दूरदर्शन पाहायला घरीबिरी आलो असतो.)

अमेरिकन सिनेमा आपल्याला जी ऊर्जा देतो त्याची तुलना इतर कशाशी होऊ शकत नाही. अमेरिकन सिनेमा, अमेरिकन साहित्य आणि अमेरिकन संगीताशी योग्य वयात संपर्क आल्याने आमची पिढी फार सुदैवी ठरली. आमच्यातील लाजरा, कुढत स्वप्ने बघणारा भारतीय तरुण या सिनेमाने खतम केला. आणि स्थलांतरण या अतिशय आवश्यक प्रक्रियेसाठी या अमेरिकन सिनेमाने आम्हाला तयार केले. नव्वद सालानंतर आमच्या आजूबाजूला जे महत्त्वाचे बदल झाले ते म्हणजे digitization  आणि मोकळी अर्थव्यवस्था, संपर्क क्षेत्रातील वेग. आम्ही जुने analog  जग अनुभवून या नव्या जगासाठी शांतपणे तयार  झालो. असे होण्यात अमेरिकन सिनेमाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आपली शहरे बदलणार आहेत, आपली भाषा मिश्र होणार आहे, आपल्या आजूबाजूला अनोळखी संस्कृतीतले लोक वावरणार आहेत याची तयारी अमेरिकन चित्रपट आमच्यासाठी लहानपणीपासून करीत होता. त्यामुळे आम्ही बदलत्या काळाकडे नाराजीने आणि संशयाने पाहत बसलो नाही. जग बदलेल तसे बदलत गेलो.

महत्त्वाची गोष्ट ही, की तेव्हा जे बदल घडायला सुरुवात झाली, ते बदल घडणे अजूनही थांबलेले नाही. पण मूलत: आपले जुने होते तेच कसे चांगले होते यावरचा आमचा विश्वास पुसून गेला असल्याने आम्हाला शांतपणे रोज नव्या बदलांना सामोरे जाता येते.

भाषा कळणे महत्त्वाचे नसते. भाषा जपणे हेसुद्धा महत्त्वाचे नसते. त्या भाषेमागून आपल्यावर काय सोडले जात आहे ती मूल्ये ओळखून आणि जोखून त्याची मजा घेता आली तर सिनेमा बनवण्याचे काम सफल झाले असे मी स्वत:ला सांगत गेलो. मी सिनेमा शिकलो, बनवू लागलो तेव्हा युरोपातून आलेला क्रंतिकारी बुद्धिवादी सिनेमा शिकवणारे शिक्षक आम्हाला हे सांगू लागले की, अमेरिकन सिनेमा छचोर आहे, वरवरचा आणि खोटा आहे. पण लहानपणीच ‘टॉप गन’ पाहिलेला असल्याने (तो खरंच सुमार सिनेमा आहे, हे मला संवाद कळल्यावर कालच लक्षात आले!) आणि त्याचा फार फायदा माझ्या स्वप्नांना झालेला असल्याने मी कधीही अमेरिकन सिनेमाची आणि संगीताची घाईने चेष्टा केली नाही.

सचिन कुंडलकर  kundalkar@gmail.com