भारतातील आणि जगातील समकालीन दृश्यकलेचे खरे प्रदर्शन जर पाहायचे असेल तर दृश्यकलेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने केरळमध्ये दर एका वर्षांआड होणाऱ्या ‘कोची मुझिरिस बिएनाले’ या कोचीन शहरभर पसरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सोहळ्याला आवर्जून जायला हवे.

दृश्यकलेचे भान, त्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सद्य:परिस्थितीत चालू असणारे प्रयोग आणि उमटणारे आवाज समजून घेणे माझ्यासारख्या चित्रपट बनवणाऱ्या आणि मातृभाषेत लिहिणाऱ्या माणसाला फार आवश्यक ठरते. याचे कारण वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, संगीत, चित्रपट आणि पुस्तके यांच्या पलीकडे जाऊन माहितीच्या पल्याडचे अनुभव घेण्याची सवय आणि क्षमता वाढवण्याचे काम या प्रवासात बघायला मिळालेली अनेक प्रदर्शने करतात. मी या अनुभवाचा फार लहानपणापासून भुकेला आहे. माझे मन अशा ठिकाणी आपोआप धाव घेते.

अशा ठिकाणी जाऊन तिथे मांडलेले काम समजून घेण्यासाठी कपाळावर कमी आठय़ा असायला हव्यात. किंबहुना, जर इच्छा असेल तर त्या पुसण्याचे काम अशी प्रदर्शने करतात. मला हे समजत नाही म्हणजे हे टाकाऊ आहे, हा बेगुमानपणा माझ्यातून घालवला तो मी जगातील अनेक शहरांत प्रवास करून आवर्जून पाहिलेल्या अमूर्त दृश्यकलेच्या प्रदर्शनांनी.

कोचीनला होणारे हे भारतातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दर दोन वर्षांतून एकदा होते. जगातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे दर दोन वर्षांनी दृश्यकलेचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून जगभरातील उत्तम कलाकारांना तिथे काम दाखविण्यासाठी आमंत्रित करायची परंपरा आहे. इटलीमधील व्हेनिस शहरात होणारे बिएनाले (दर दोन वर्षांनी होणारे) प्रदर्शन जगातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांपकी एक असे आहे. बिएनाले प्रदर्शन हा शहरभर सुरू असलेला दृश्यकलेचा सुंदर सोहळा असतो.

कोचीन शहराची दोन रूपे आहेत. भारतातील महत्त्वाच्या बंदरांपकी ते दक्षिणेतील एक प्रमुख बंदर आहे. तेल आणि वायू उत्पादन, मसाल्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार, केरळच्या उद्योगजगताची राजधानी आणि मल्याळी चित्रपटनिर्मितीचे प्रमुख केंद्र असा या शहराचा एक चेहरा आहे. स्थलांतरप्रिय आणि अतिशय कष्टाळू असणाऱ्या मल्याळी नागरिकांनी जगभरात कमावलेला पसा घरी पाठवून या शहराचे आधुनिक रूप साकारले आहे. या नव्या, गजबजलेल्या, ज्याला आपण रेल्वेच्या मार्गावरील एर्नाकुलम म्हणून ओळखतो त्या शहरापासून बेटाला जोडणारा खाडीचा पूल ओलांडून पश्चिमेला गेले की फोर्ट कोची हे सुंदर, शांत बेट आपल्याला गवसते. हा जुना पोर्तुगीज भाग अजूनही युरोपातील एखाद्या सुंदर जुन्या गावासारखा होता तसाच जपून ठेवलेला आहे. कोचीनचे बिएनाले या भागात होते. याचे कारण या भागाला लाभलेला शांत समुद्रकिनारा, हेरिटेज प्रभाग म्हणून इथे जपलेल्या शेकडो वष्रे जुन्या पोर्तुगीज वास्तू, हजारो जुने वृक्ष आणि मुख्य म्हणजे सर्व बेटावर विखुरलेली पोर्तुगीजांनी मसाल्याच्या व्यापारासाठी बांधलेली अतिप्रचंड जुनी लाकडी गोदामे. या गोदामांची लांबी-रुंदी त्यांच्या इतिहासाइतकीच मोठी आहे. या अनेक महाप्रचंड गोदामांचा कल्पक वापर या शहरातील प्रशासनाने बिएनाले या द्वैवार्षकि प्रदर्शनासाठी करून घेतला आहे. या सर्व प्रदर्शनावर जायफळ,   दालचिनी तसेच मिरीचा जुना गंध पसरला आहे.

फोर्ट कोचीला गेलं की नेहमी मला माझ्यातून आपोआप गायब झालेला जुना निष्पापपणाचा परफ्युम आठवतो. काळाने तो ओढून नेला. उत्सुकता नेली. ओढ नेली. एखाद्या व्यक्तीसाठी, अनुभवासाठी झुरण्याची शक्यता नेली. निवांतपणा गेला. काही गोष्टी हव्या असतील तर काही सोडाव्या लागतील, हे लहानपणी असणारे धाक गेले. आपल्यापाशी कमी गोष्टी असल्याने निवड करायची श्रीमंती आपल्याला नाही, ही पूर्वीची जाणीव गेली. फोर्ट कोची या बेटावर संध्याकाळी सात वाजता सामसूम झाली की शांतपणे पायी फिरताना मला निघून गेलेले सोपेपण आठवते. जुना काळ परत आणण्याची मला कधीच इच्छा नसते, पण हरवून गेलेले सोपेपण परत यावे असे मनाला वाटत राहते. इथली मदाने, जुने वृक्ष, जुनी वास्तुरचना, इथल्या स्थानिक बेकरीमध्ये म्हाताऱ्या बायकांनी भाजलेले पाव आणि रंगीत, मायाळू केक खाताना, जेवणाच्या टेबलावर केळीच्या पानावर हलकी मीठ-मिरी लावून पहुडलेले मासे पाहताना मला आपले काहीतरी चुकून निसटून गेले आहे, ही भावना दरवेळी येते. मी फोर्ट कोचीला या अनुभवासाठी जातो. सूर्य मावळताना येणारा तो खाजगी अनुभव मी वर्षांनुवष्रे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतो, पण मला तो मांडता येत नाही. नेमका यावेळी बिएनाले बघताना एव्हा माग्यारोजी या अतिशय तरुण हंगेरियन कवयित्रीच्या कविता माझ्यासमोर आल्या आणि मला जे अस्वस्थ वाटते, ते नक्की काय वाटते आहे याची पुसटशी जाणीव मला होऊ शकली. अशा काही क्षणी आपण रोजची कामेधामे टाकून लांबवर प्रवास करून काहीतरी पाहायला आलो ह्य़ाने फार बरे वाटत राहते.

२०१२ आणि २०१४ साली या प्रदर्शनाच्या दोन आवृत्त्या होऊन गेल्या. आणि या काळात कोचीनमधील या प्रदर्शनाने मोठे आणि महत्त्वाचे स्वरूप धारण केले. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपासोबत एक राष्ट्रीय स्वरूप आले. भारतात अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत, पण दुर्दैवाने त्या देशातील लोकांना आवडतील अशा स्वरूपाच्या नसतात, किंवा कुणाला त्याची माहितीच नसते. तसे या प्रदर्शनाचे झालेले नाही. भारतातील दृश्यकलेचे ते निर्वविादपणे महत्त्वाचे प्रदर्शन केंद्र बनले.

गेले तीन दिवस मी या शहरात अनेक उत्तम कामे पाहत पायी फिरताना मला देशभरातले अनेक विद्यार्थी, प्रवासी, मित्र रस्त्यात अचानक भेटले. आम्ही गप्पा मारल्या, एकत्र फिरून प्रदर्शने पाहिली. त्यात दृश्यकलेच्या क्षेत्रात काम करणारी माणसे होतीच; पण त्यासोबत अनेक वास्तुरचनाकार होते, चित्रपट दिग्दर्शक होते, कवी होते, केरळमध्ये फिरत असताना ‘हे बिएनाले म्हणजे काय रे भाऊ? जरा बघून येऊ..’ असे म्हणून आलेले तरुण प्रवासी होते. यावरून हे लक्षात येते की, या प्रदर्शनाची व्याप्ती आणि महती आता मोठी होत जाते आहे. सर्वात आश्वासक गोष्ट जर कोणती असेल, तर कोचीनमधील अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या प्रदर्शनाच्या सहली आखल्या आहेत.

२०१२ साली बोस कृष्णम्माचारी आणि रियाज कोमू हे या प्रदर्शनाचे निवडप्रमुख ( curator) होते. २०१४ साली जितिश काल्लात यांनी निवडप्रमुख म्हणून काम पाहिले. २०१६ सालच्या डिसेंबरपासून २०१७ सालच्या मार्चच्या शेवटापर्यंत चालणाऱ्या या तिसऱ्या आवृत्तीचे निवडप्रमुख सुदर्शन शेट्टी हे आहेत. अतिशय बारकाईने आणि सजगतेने वर्तमानाचा नेमका आढावा घेणे या सर्व व्यक्तींना फार चांगले जमले आहे. कारण हे चारही जण आज भारतातील प्रमुख दृश्यकलाकार आहेत.

दृश्यकला ही संज्ञा चित्रकलेपेक्षा विस्तृत आहे. फोटोग्राफी, शिल्पकला, चित्रकला, व्हिडीओ कला, हस्तकला, लाकूडकाम, भौतिकशास्त्राशी जवळचे नाते सांगणारी कायनेटिक आर्ट, भित्तीचित्रे आणि एकल कलाकाराने केलेले साभिनय सादरीकरण या सगळ्या माध्यमांचा अंतर्भाव ‘दृश्यकला’ या संज्ञेत होतो. इजलवर कागद लावून त्यावर रंगाने काम करणे, या आपल्याला ज्ञात असलेल्या कलासादरीकरणाच्या पारंपरिक स्वरूपाच्या लाखो मल पुढे जाऊन आज कलेचा साक्षात्कार जगातले अनेक लोक वेगवेगळी माध्यमे वापरून करतात. त्या सर्व कलांचा अंतर्भाव या दृश्यकलेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात केला जातो.

उमेश कुलकर्णी हा माझा मित्र या प्रदर्शनात असलेल्या लघुपटांच्या विभागाचा निवडप्रमुख आहे. भारतातील अनेक महत्त्वाच्या फिल्म स्कूल्समधील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत बनवलेल्या शॉर्ट फिल्म्स पाहून, त्यातल्या उत्तम फिल्म्स निवडून उमेशने इथे तीन दिवसांचा एक कार्यक्रम आखून दिला आहे. तो इथे असणार होता, आणि आम्हा दोघांची दरवर्षी घडणारी केरळवारी या वर्षी राहिली होती म्हणून मी अचानक उठून इथे निघून यायचा बेत ठरवला. प्रिया बापट ही माझी मत्रीण या हिवाळ्यात कोणताही नवीन सिनेमा साइन न करता एकटी भारतभर प्रवासाला निघाली होती. तामिळनाडू, मेघालय असे वेडेवाकडे प्रवास ती एकटय़ाने करत होती. तिने माझ्यासोबत अचानक केरळला यायचे ठरवले. मेघालयहून ती परत येताच आम्ही केरळला निघालो. (क्रमश 🙂

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com