चित्रपटसृष्टी हा एक खूप बांधीव आणि उंच मनोरे असलेला किल्ला आहे. बाहेरच्या माणसाला तिथे येणे सोपे नसते. बुरुजाच्या आत जर तुम्ही जन्मले असाल तर तुम्हाला थोडे सोपे जाते. पण बाहेरून आतमध्ये प्रवेश करणार असाल तर तुमच्यात प्रचंड प्रमाणात सहनशक्ती आणि वाट पाहण्याची क्षमता असावी लागते. चित्रपटसृष्टी म्हणजे टीव्हीचे जग नाही. ते फारच सोपे आहे. स्पर्धात्मक असले तरी सपाट आहे. चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त सिनेमाच आवडणाऱ्या आणि सिनेमाच बनवणाऱ्या माणसांचे जग आहे. भारतातला तो एक महत्त्वाचा आर्थिक उद्योग आहे. असे जग प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे आहे. तिथे रंगभूमीची सेवा करणारी माणसे कमी आहेत. आणि टीव्ही आणि सिनेमाचे कप्पे संपूर्णपणे निराळे आहेत. महाराष्ट्राप्रमाणे एकच तिकीट काढले की वाट्टेल त्या बसमधून जाता येते, तसे बाहेर होत नाही. चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करणारे दिग्दर्शक आणि कलाकार वेगवेगळे असतात. कारण दोन्ही आपापल्या परीने स्वतंत्र व अतिशय अवघड माध्यमे आहेत.

महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांत रंगभूमी आणि टीव्हीवरील माणसांनी येऊन मराठी चित्रपटसृष्टीचा आकार आणि आयाम त्यांच्या चलनाने घरगुती व सोपा करून टाकला आहे. तसे भारतात इतर ठिकाणी अजूनही  झालेले आपल्याला दिसत नाही. महाराष्ट्रात फार कमी माणसे अशी आहेत, जी फक्त चित्रपट बनवतात किंवा बनवू शकतात. बाकी बहुतांशी माणसे ही रंगभूमीची सेवा करतात, टीव्हीचा व्यवसाय करतात आणि मग मधे मधे जमतील तेव्हा आणि जमतील तसे सिनेमे बनवत बसतात.

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

महाराष्ट्रात चित्रपटाला जात आहे. ‘सैराट’नंतर मराठी चित्रपटाची जातव्यवस्था लोकांना कळू लागली असली तरी अगदी पूर्वी राजा परांजप्यांच्या चित्रपटापासून मराठीत ‘आमचा सिनेमा आणि तुमचा सिनेमा’ असे छुपे  वातावरण आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक नावाची एकगठ्ठा गोष्टच महाराष्ट्रात शिल्लक नाही. सिनेमा बनवणारी माणसे जातीपातीचे भेद विसरून काम करणारी असली तरी मराठी प्रेक्षक सिनेमाला जात देतात. हे फारसे भूषणावह चित्र अजिबातच नाही. महाराष्ट्रात जे चित्र आहे तेच आणि तसेच बंगालमध्ये आहे. तिथेही भद्रलोक नावाचा एक आळशी, सुसंस्कृत, शक्यतो घर न सोडणारा आणि बसून फक्त चर्चा करणारा वर्ग आहे. त्यामुळेच या दोन्ही राज्यांचा चित्रपटसृष्टीचा आलेख भूतकाळात खूपच उंच आणि वर्तमानकाळात फार बिचारा आहे.

आपण अजूनही एकाच टीव्ही वाहिनीच्या मालकीचे असणारे चित्रपट चालताना पाहतो तेव्हा आपल्याकडे कामाला गांभीर्याने घेणारी, वितरण व्यवस्था कष्टाने आणि सूचकपणे उभी करणारी किती मोजकी मंडळी आहेत, हे आपल्या ध्यानात येते. आजच्या काळात महाराष्ट्रात आपली चित्रपटसृष्टी नसून एका वाहिनीच्या आधाराने उभा असलेला छोटा उद्योग आहे.

आज जी भारतीय चित्रपटसृष्टी टिकून आहे ती हिंदी चित्रपटातील तरुण रक्ताच्या दिग्दर्शकांमुळे आणि तेलुगू, मल्याळम् व तमिळ जनतेच्या आपापल्या चित्रपटावरील प्रचंड प्रेमामुळे उभी आहे. आपल्या देशाचा चित्रपट अनुभवायचा असेल तर थोडे लांब जाऊन आपल्या सध्या बनणाऱ्या चित्रपटांकडे पाहिले तर आपल्याला लक्षात येईल, की हिंदी सिनेमाचे वय आपल्या कुणाच्याही वयापेक्षा नेहमीच जास्त तरुण राहिले आहे. कारण त्याच्या प्रेक्षकांचे वय ते आहे. कोणताही सिनेमा हा त्याच्या प्रेक्षकांच्या वयाइतकाच वयस्कर असतो. मराठी सिनेमाही त्यामुळे साठीतली ज्येष्ठ व्यक्ती आहे. दक्षिणेतला सर्व स्तरांतला प्रेक्षक त्यांच्या भाषेतला सिनेमा हावरटासारखा पाहतो. त्यामुळे तो चित्रपट जास्त प्रवाहशील आणि तरुण आहे. शिवाय आकाराने विस्तृत आहे.

चित्रपटसृष्टीला सहसा अनोळखी, परकी माणसे पटकन् रुचत नाहीत. सोय, ओळख आणि पत या तीन गोष्टींवर या जगातला कारभार अजूनही चालतो. गुणांचा क्रमांक त्यानंतर येतो. चित्रपटसृष्टी म्हणजे एकदा किंवा दोनदा सिनेमा करून मग उत्पन्नाचे इतर उद्योग सुरू केलेल्या लोकांचे जग नव्हे. ते सातत्याने तेच आणि तेच काम करीत राहिलेल्या माणसांचे जग आहे. यश, पराभव या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सातत्याने काम करणारी ही माणसे आहेत. त्यांना सिनेमा आवडतो हे जसे खरे आहे, तसेच दुसरे एक महत्त्वाचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे, ते म्हणजे त्यांना सिनेमा सोडून दुसरे काहीही करता येत नाही, आणि येणार नाही. त्या जगाची मानसिकता, नैतिकता आणि विचारसरणी बाहेर राहून त्या जगाकडे कुतूहलाने पाहणाऱ्या माणसाला सहजपणे समजणे सोपे नसते.

वर्तमानकाळातील सर्वात आश्वासक गोष्ट ही आहे, की परंपरेने चालू असलेली भारतीय चित्रपटाची स्टार सिस्टीम आता सावकाशपणे कोसळू लागली आहे. मध्यम आकाराच्या धाडसी आणि उत्तम चित्रपटांचा काळ भारतात उदयाला येऊ  लागला आहे. मोठा पडदा आणि हातातील टॅबवर तयार झालेला इंटरनेटने भारलेला वैयक्तिक पडदा यांच्यातील फरक आणि चुरशीमुळे आता जगभरात फार चांगले प्रयोग होतील आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या, विषयांच्या चित्रपटांना आपापली योग्य जागा आणि प्रेक्षकवर्ग मिळेल अशी चांगली परिस्थिती सावकाश तयार होते आहे. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन या जगातील सर्वात मोठय़ा दोन्ही वेब पोर्टल्समुळे येत्या पाच वर्षांत चित्रपटाची गुणवत्ता, आकार आणि विषय यांच्यात आमूलाग्र बदल होईल. कारण चित्रपट बघणे हा थिएटरमधील सामूहिक अनुभव न उरता आपल्या कॉम्प्युटरवरील वैयक्तिक अनुभवाचा भाग होईल.

उमेश कुलकर्णी, अविनाश अरुण, नागराज मंजुळे असे चांगले मराठी दिग्दर्शक आपला सिनेमा जगात घेऊन गेले आहेत. हे दिग्दर्शक स्थानिक नियमापलीकडे जाऊन आजचा, ताजा, सशक्त सिनेमा बनवत राहतील. त्या उदाहरणांनी अनेक नवीन मराठी तरुण मुले ताजा सिनेमा बनवून आपल्या सिनेमाचे वय जरा तरुण करतील. सिनेमाच्या कॅमेऱ्याची ताकद ओळखून काम करतील.

आजूबाजूला गावात सहजपणे वावरताना न दिसणारे नट मराठीत यापुढे तयार होतील. आपले नट फेसबुकवर कमी आणि सिनेमात जास्त दिसतील. लवकरच एक सुदिन येईल- जेव्हा आपले नट रंगमंचावर उभे राहून किंवा लोकनाटय़ाच्या रिंगणात उभे राहून केल्यासारखे हातवारे आणि हावभाव करणे थांबवतील आणि सिनेमाच्या लेन्ससाठी लागणारा अभिनय शिकतील. शेती, कर्जे, राजकारण, पाणी, लोणी, महिला आरक्षण, जातीयवाद, पोलिओचे डोस, मलेरिया यावर बोलत बसण्यापेक्षा आपले नट भरपूर काम करून शांत घरी बसतील आणि लोकांना त्यांची उत्सुकता वाढेल. हा काळ देवाच्या कृपेने महाराष्ट्रात लवकरच येईल. त्यामुळे मराठी सिनेमाला आलेला घरगुतीपणा कमी होईल.

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट येत्या दोन-तीन वर्षांत मराठी सिनेमाच्या नटाची पारंपरिक प्रतिमा बदलवून टाकणारे चित्रपट घेऊन येतील. या दोन्ही मुलींमध्ये नव्या काळाची ऊर्जा आहे आणि चांगली निवड करण्याची बुद्धी आहे. त्या सिनेमाच्या कॅमेऱ्यासाठी जन्मलेल्या मुली आहेत.

चित्रपटाचा पुस्तकी अभ्यास करणाऱ्या आणि वास्तवाशी कोणतेही नाते नसलेल्या, अतिगंभीर आणि अनावश्यक पांडित्याचे ओझे वाहणाऱ्या, स्वत:ला चित्रपटप्रेमी म्हणवून घेऊन वर्तमानाशी कोणतेही नाते नसलेल्या, विद्वत्तापूर्ण, जुन्या अभ्यासकांच्या काळाला जसा आता सुरुंग लागेल तसाच सुरुंग मोठय़ा व्यावसायिक स्टार्सच्या सुरक्षिततेलासुद्धा लागेल. भारतामध्ये चित्रपट क्षेत्रात जो प्रत्यक्ष काम करतो तोच टिकेल आणि उरेल. तरुण पिढीशी जो हातमिळवणी करेल त्याच्या कामाची शक्यता चांगली होईल. काम सोडून ज्या वर्षी तुम्ही घरी बसाल, त्या वर्षी तुम्ही लोकांच्या विस्मृतीत जाल. यापुढे कोणाचीही दीर्घकाळ आठवण तयार होणार नाही. हजारो-लाखो लोकांच्या मनावर कुणीही राज्य करू शकणार नाही. सर्व क्षेत्रांतील आयकॉन्स आणि सुपरस्टार्सचा शेवट हे या येणाऱ्या काळाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ असेल.

अनुराग कश्यप हा असा विषारी जिवाणू भारताला काही वर्षांपूर्वी सापडला- जो स्वत:च उतमात करून थांबला नाही, तर त्याने स्वत:पलीकडे जाऊन अनेक माणसांना कोडय़ात, प्रश्नात आणि गोंधळात टाकले आणि ढवळून काढले. नवीन छोटे, मोठे, बरोबर आणि चुकीचे काम करायला लोकांना सिनेमात ढकलून दिले. त्याचा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला फार मोठा फायदा झाला. आपण नेहमी चूक करतो ती केली. ते म्हणजे त्या माणसाचे दैवत करून टाकले. आजचा काळ हा अनुराग कश्यप आणि करण जोहर या संपूर्ण वेगळ्या ध्रुवांच्या पश्चात उगवलेला मध्यम आकाराच्या चांगल्या चित्रपटांचा काळ आहे. अनुराग आणि करण हे आता आयकॉन बनले आहेत आणि त्यामुळे ते लवकरच गोठले जातील. आणि त्यांच्यापुढचा स्टार सिस्टीम नाकारणारा सिनेमा सावकाश आकाराला येत राहील. पण तो येण्यासाठी या दोन्ही माणसांचे काम फार महत्त्वाचे ठरेल. कारण अजूनही ही दोन्ही माणसे फार दूरदृष्टी असलेली माणसे आहेत.

जोया अख्तर आणि इम्तियाज अली अजूनही बरीच वर्षे आपल्याला शांतपणे मोठय़ा पातळीवरील चांगली कामे दाखवत राहतील. स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रवासाच्या खुणांचा मागोवा घेणारी राधिका आपटेसारखी मुलगी भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडत खूप वेगळे आणि चांगले काम करत राहील. आणि दक्षिणेतील ताज्या दमाचा धारदार नवा तमिळ आणि मल्याळम् सिनेमा अजूनही काही वर्षे इतर प्रांतांतील चित्रपटांच्या पुढेच धावत राहील.

सचिन कुंडलकर  kundalkar@gmail.com