मी चित्रपट क्षेत्रात उमेदवारी करू लागलो ते पुण्यात स्वत:चा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याकडे. माझ्यासोबत माझा मित्र उमेश कुलकर्णीसुद्धा तिथे काम करायला रुजू झाला. त्या चित्रपटाचे नाव होते- ‘दोघी’!

या चित्रपटाच्या प्रक्रियेत असताना सुरुवातीला असलेली या माध्यमाविषयीची माझी आवड आणि उत्सुकता या चित्रपटाचे काम करताना जास्तच वाढत गेली. कारण आमच्या सेटवर आणि युनिटमध्ये मोकळे वातावरण होते आणि नव्या लोकांना काम करताना सामावून घेण्याची सवय सर्व विभागप्रमुखांना होती. मी विचारलेली कोणतीही शंका कितीही सोपी किंवा बाळबोध वाटली तरी मला त्याचे उत्तर मिळत असे. मी तेव्हा अठरा वर्षांचा होतो. मला कुणीही अपमान केला तरी पटकन् वाईट वाटत असे. आणि कुणी आपल्या कामाची चिकित्सा केली तर त्याचा लगेच गांभीर्याने विचार करावासा वाटत असे- अशा प्रकारचे ते वय होते. शूटिंग संपवून चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू झाले तेव्हा मी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांना त्यांच्यासोबत संकलन पाहायला परवानगी देण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आणि चित्रीकरणापासून सुरू झालेली त्या चित्रपटाची प्रक्रिया संकलन, ध्वनी आरेखन, संगीत, फिल्म लॅबमधील निगेटिव्हचे काम, ध्वनिमिश्रण हे सगळे टप्पे पाहत, अनुभवत एका खूप आनंददायी अनुभवापर्यंत पोहोचली. चित्रपटाची निवड १९९४ साली भारतीय पॅनोरमामध्ये झाली तेव्हा मला आणि उमेशला इतर सहकाऱ्यांसोबत दिल्लीला चित्रपट महोत्सव पाहायला नेले गेले. माझ्या आयुष्यातला हा फार मोठा टप्पा होता. कारण दर दिवसागणिक अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या आणि या क्षेत्रात काम करणारी अनेक चांगली माणसे भेटत होती. काही दिवस काम करून पाहू म्हणून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यासोबत काम करायला लागलेला मी सहा वष्रे सलग काम करत राहिलो.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मी या सुमारास फ्रेंच भाषा शिकायला घेतली. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जाऊन अनेक देशांचे, अनेक मोठय़ा दिग्दर्शकांचे चित्रपट पाहायला सुरुवात केली. माझी सर्व वाढ ही फक्तिहदी चित्रपट पाहून झाली असल्याने माझ्यासाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटाच्या इतिहासातील हा सिनेमा पाहणे आणि अनुभवणे ही फार महत्त्वाची गोष्ट ठरली. आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आणि सिनेमा पाहायची आमची जाणीव विस्तारित करायला सुनील सुकथनकरने या काळात आम्हाला खूप मदत केली. मी ‘आम्हाला’ हे जे इथे म्हणतो आहे ते मला आणि उमेश कुलकर्णीला. आमच्या दोघांचा समांतर आणि एकत्र असा प्रवास शाळेपासून सुरू होता, तो इथवर आला होता. आम्ही दोघांनी आता सिनेमा करायचे ठरवले होते. असे कुणी कुणाला काही बोलून दाखवले नाही, पण बारावीची परीक्षा संपल्यापासून आम्ही दोघे पूर्ण वेळ चित्रपटाच्या सेटवर काम करीत होतो, तेव्हा आपल्याला काय करायला आवडते आहे याची जाणीव आम्हाला होत होती. घरच्यांच्या आग्रहामुळे आम्ही दोघेही सीए आणि सीएसच्या परीक्षा देत होतो. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी आर्टकिलशिप करत होतो- जी सीएच्या दुसऱ्या वर्षांपासून सक्तीची असते; पण आमचे मन संपूर्णपणे चित्रपटात गुंतले होते.

अनेक वष्रे चित्रपटाच्या सेटवर काम करताना आम्हाला हे लक्षात आले होते, की चित्रपट हा मांजरीप्रमाणे कधीही हातातून सुटून जाऊ शकतो. तो बनवणे खूप अवघड काम आहे. चांगली पटकथा आणि चांगले कलाकार असले तरी चित्रपट चांगला तयार होत नाही. दिग्दर्शकाची या माध्यमावर असलेली पकड त्या चित्रपटाचे भविष्य ठरवते. आणि दिग्दर्शकाची जाणीव ही कालसुसंगत असायला हवी. दिग्दर्शन करणे हे सोपे काम नाही. ते स्वत:चा शोध घेण्याचे काम आहे. यश नि अपयश, लोकांना आपल्या कामाविषयी काय वाटते, याच्या पलीकडे जाऊन आपण कोण आहोत, आपले आणि आपल्या समाजाचे नाते काय आहे, आपली स्वप्ने, आपली आकांक्षा आपल्या कथेद्वारे कॅमेरा हातात घेऊन आपल्याला नीट मांडता यायला हवी. त्यासाठी वाट पाहायला हवी. पहिला चित्रपट करण्याची घाई करता उपयोगाचे नाही.

चित्रपट दिग्दर्शकाला अत्यंत आवश्यक असते ती म्हणजे गेंडय़ाची कातडी. चित्रपट बनवून जर तो खूप लोकांना आवडला तर तुम्हाला कुणी कसलेही सल्ले देत नाही. पण जर तो कमी लोकांना आवडला तर आजूबाजूची अनेक माणसे तुम्हाला अनेक सल्ले देऊ लागतात. त्यातले चांगले, मोजके ऐकणे आणि उरलेले हसून सोडून देणे यासाठी जी गेंडय़ाची कातडी तुम्हाला कमवावी लागते ती बनवायला कुणी शिकवतच नाही. त्यासाठी टक्केटोणपे खावे लागतात. त्याचा अंतर्भाव तुमच्या उमेदवारीच्या चित्रपट प्रशिक्षणात नसतो. राणी मुखर्जी आणि अनुराग कश्यप यांनी मला २०१२ साली प्रेमाने अशी एक गेंडय़ाची कातडी शिवून सप्रेम भेट देईपर्यंत मी फार सरळ मनाचा साधा मुलगा होतो आणि नव्या माणसांना व नव्या अनुभवांना प्रमाणाबाहेर आसुसलेला होतो. मी आज तितका साधा न उरल्याची खंत मनात बाळगतो, कारण तेव्हा मी कोणतीही भीती आणि जराही असुरक्षितता मनात न बाळगता अनोळखी लोकांना आयुष्यात लवकर येऊ देत होतो.

मी जितका सिनेमा प्रत्यक्ष सेटवर आणि स्टुडिओमध्ये काम करताना शिकलो, तितकाच सिनेमा मी पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपट पाहून शिकलो. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमा काय आहे, तो कसा बनला, समाज आपल्याकडून अप्रत्यक्षपणे सिनेमा बनवून घेतो म्हणजे काय, भारतीय आधुनिक चित्रपट चळवळ कशी सुरू झाली, या सगळ्याची जाणीव मला तिथे भरपूर चित्रपट अधाशासारखे पाहून झाली. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी तयार झाल्या, त्या बदलल्या, काही त्याच राहिल्या; पण आपल्याला जे काही आवडते आणि आपल्याला जे काही आवडत नाही त्याबद्दल ठाम राहण्याची सवय मला चित्रपटाच्या प्रशिक्षणाने दिली.

माझे मन या काळात एका द्विधा मन:स्थितीत गेले. ती ही की, दादरच्या केटिरग कॉलेजमध्ये जाऊन शेफ  व्हायचे की पुण्यात राहून चित्रपट शिकायचा! अनेक दिवस मी या गोष्टीचा विचार करत होतो. कारण माझी स्वयंपाकाची आवड मला स्वस्थ बसू देईना. मला काही दिवस फार तीव्रपणे उठून मुंबईला जाऊन केटिरग कॉलेजमध्ये शिकावे असे वाटे. सीए तर मला नक्की बनायचे नव्हते. मला इकॉनॉमिक्स शिकायला खूप आवडायचे, पण अकाऊंट्स या विषयाचा प्रमाणाबाहेर कंटाळा होता.

हिंदी सिनेमा माझ्या संपूर्ण आवाक्याबाहेर होता, कारण माझ्या मनात त्या पटावर सामावेल अशी गोष्ट कधीच नव्हती. माझी गोष्ट वैयक्तिक जाणिवेची होती. मला त्या जाणिवेने बनवलेला सिनेमा फार आवडत होता. शिवाय मला शहरी जाणिवेचा सिनेमा बनवायचा होता. माझ्या आजूबाजूच्या माणसांची गोष्ट सांगायची होती. मी सुस्थितीत, शहरात वाढलेल्या पांढरपेशा समाजात राहत होतो. आणि मराठी सिनेमात अशा गोष्टी पूर्वी सांगितल्या जात नव्हत्या. मराठी सिनेमा वाचाळ विनोदवीरांच्या करामती आणि ग्रामीण लावण्या, पाटील, शेतकरी अशा विषयांवर बनत होता. त्यामुळे मराठीत आपण सिनेमा करायचा तो कशा प्रकारचा करायचा, हे मला लक्षात येत नव्हते.

त्यावेळी अचानक मला पॅरिसला जाऊन सिनेमा शिकायची एक फेलोशिप मिळाली. बारा देशांमधून बारा मुले त्या कार्यशाळेत सहभागी होणार होती. मी भारतातून जाणार होतो. सर्व वर्ग फ्रेंचमध्ये असणार होते. माझ्या आयुष्याची पण पलटायची वेळ आली होती.

मी मराठी दिग्दर्शक संजय सूरकर यांच्या सेटवर काम करत होतो तेव्हा मला घरी लगेच बोलावले गेले. घरी फ्रान्सहून फोन आला होता. मी घरी नव्हतो, त्यामुळे ते दोन तासांनी पुन्हा फोन करणार होते. मी फोनवर एक मुलाखत दिली आणि माझी निवड झाल्याचे मला कळवण्यात आले. मी पुन्हा दुपारी सेटवर कामाला गेलो. मला अंगात ताप आल्यासारखे झाले होते आणि आत खूप मस्त वाटत होते.

ते १९९९ साल होते. मी माझे पहिले ई-मेल अकाऊंट उघडले होते. दोन महिन्यांनी मी पॅरिसमध्ये होतो. तिथल्या स्थानिक लोकांसारखा शहरात राहू लागलो होतो. भारतात कारगिलचे युद्ध सुरू होते- ज्याच्या फ्रेंच बातम्या रोज उत्सुकतेने ऐकत होतो. मला पुण्याहून आणि मुंबईहून अनेक लोक हाताने लिहून पत्र पाठवत होते आणि मीसुद्धा सगळ्यांना सारखी लांब लांब पत्रे लिहीत होतो. फोनवर होणारा खर्च टाळून त्या पशांत नवी पुस्तके घेण्याचे ते वय होते.

एकदा रस्त्यावरून जाता जाता मी विचार करत होतो. मी नकळत एका टेलिफोन बूथमध्ये शिरलो आणि भारतात घरी फोन केला. तो आईने घेतला. मी बाकी काही न बोलता तिला सांगितले की, मी सीए, सीएस हे दोन्ही कोस्रेस सोडतो आहे. मला आता बाकी काही करायचे नाही. मी परत भारतात आलो की फक्त सिनेमाच करणार आहे. आई-बाबा म्हणाले की, काहीही झाले तरी आम्ही तुझ्यामागे भक्कम उभे आहोत. तुला हवे तेच तू कर. आणि मग फोन ठेवण्याआधी आई म्हणाली, ‘‘खायचे-प्यायचे काय करतोयस रे? काय जेवतोस?’’ मी म्हणालो, ‘‘ससा, कोंबडी आणि गोगलगाई.’’ मी फोन ठेवून आनंदाने माझ्या कॉलेजकडे धावत सुटलो.

हा फोन करण्याच्या आदल्या दिवशी मी स्पॅनिश दिग्दर्शक पेद्रो अल्मोदोव्हार याचा ‘ऑल अबाऊट माय मदर’ हा चित्रपट पाहिला होता. मी रात्रभर झोपलोच नव्हतो. कुणीतरी माझ्या मनातील माझे वाटणे चोरून नेऊन त्यावर चित्रपट बनवला होता. वेगळ्याच देशात. त्या दिग्दर्शकाच्या कामाचा फार मोठा प्रभाव माझ्या विचारसरणीवर पुढे राहणार होता.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com