माझ्या घरातील दोन बाथरूमपैकी एक प्रशस्त बाथरूम नेहमी संपूर्ण कोरडी आणि थोडी अंधारी असते. माझ्या आवडत्या दालचिनी किंवा मोगऱ्याच्या सुवासाचा परफ्युम तिथे असतो. फुलांच्या ऋतूमध्ये काचेच्या बशीत मोगऱ्याची फुले पाण्यात घालून तिथे मी ठेवतो. मी त्या बाथरूमची फरशी निळ्या आणि पांढऱ्या अपारदर्शी काचांच्या तुकडय़ांमध्ये घडवून घेतली आहे. आणि तिथल्या सर्व उपकरणांची मी घासूनपुसून लखलखीत ठेवून काळजी घेतो. घराचे वय कितीही असले तरी या बाथरूमचे वय मी सोळा-सतरा ठेवले आहे. त्यामधील आरसे ताजे आहेत आणि तिथे पायाला कधीही कसलाही ओलावा लागत नाही. तिथला अंधार हा मनाला सुरक्षित वाटेल असा आहे. आणि ही बाथरूम माझ्या फ्लॅटमधील सर्वात गार, सुंदर आणि मोहक जागा आहे. मी अनेक वेळा माझे लिहायचे टेबल सोडून  त्या बाथरूमच्या फरशीवर आरामात पाय पसरून, भिंतीला टेकून, हातात वही घेऊन लिहीत बसतो. असे करताना एखाद्या पोहायच्या तलावाच्या तळाशी बसून आपण विचार करीत लिहीत बसलो आहोत असे मनाला वाटते. शिवाय त्याचा आकार खोलीएवढा नसल्याने तिथे बसून लिहिताना मनाला सुरक्षित वाटते आणि मनातले संकोच लिहिताना जवळ येत नाहीत. तिथे बाहेरचे शहर विसरून जायला होते.

लिहिताना आपल्या मनाच्या वयाची काळजी घ्यावी लागते. आपले वय, आपल्या शरीराचे वय आणि आपल्या मनाचे वय या तिन्ही संपूर्णपणे निराळ्या गोष्टी आहेत. सर्व माणसांच्या बाबतीत या तीनही वयांमध्ये एक तफावत असते. अनेक वेळा कसरतीचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे आपल्या शरीराचे वय आपल्या वयापेक्षा खूप जास्त झालेले असतेच; पण पारंपरिक आणि रूढीप्रिय समाजांमध्ये सामान्य माणसाच्या मनाचे वयसुद्धा त्या माणसापेक्षा खूपच जास्त होऊन बसलेले असते. माणसाची सांस्कृतिक जाणीव ही त्याच्यापेक्षा खूप वृद्ध असते.

mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

लिहिताना आपले मनाचे वय फिरते ठेवावे लागते. ते एक असून भागत नाही, हे मी फार सावकाशपणे गुलजारसाहेबांचे लिखाण वाचून आणि त्यांची गाणी ऐकून शिकलो. आज सतरा, उद्या ऐंशी, परवा नऊ, मग कधी परत सोळा. त्या- त्या वयाप्रमाणे शब्दकळा आणि त्यांची मोहिनी बदलते. त्या लिखाणाचा स्वाद बदलतो. कोणतेही बैठे वैचारिक काम करणाऱ्या माणसाला सकाळी अतिशय जोरकस शारीरिक कसरत करणे प्राप्त असते, नाही तर त्याच्या कल्पनाशक्तीला गंज चढतो. मग तो वादक असो, गायक असो किंवा लेखक असो. आपल्या नैसर्गिक वयापासून शरीर आणि मनाच्या वयांनी फारकत घेण्यास आपण वयात आल्यापासून आणि आपली लैंगिक जाणीव जागरूक झाल्यापासून सुरुवात होते. आपल्या वासनांचे दमन, आपली अंतर्गत स्वप्नपूर्ती आणि आपल्याला कुशीत घेऊन उबदार ठेवणारी माणसे आपल्या आजूबाजूला प्रवाही आहेत की नाहीत यावर ती फारकत अवलंबून असते. बहुतांशी रूढीप्रिय आणि जुन्या परंपरा पाळणाऱ्या समाजात माणसांची मने त्यांच्यापेक्षा फार लवकर म्हातारी होतात. मी अशा समाजात वावरतो, आणि त्यामुळे काम करताना माझे लक्ष सातत्याने माझ्या मनाच्या वयावर नेहमी नजर ठेवून असते.

उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी वृत्तपत्रांच्या पुरवणीसाठी लिहिताना आपल्या मनाची खूपच काळजी घ्यावी लागते. माझ्या घराजवळ माझे आवडते तीन सुरेख बार्स आहेत. मी आलटूनपालटून तिथे लिहायला जातो. एक बार मोकळे अंगण आणि झाडे असलेला आहे; जिथे माझी आवडती कीआन्ति ही वाइन मिळते. सडपातळ कंबर असलेल्या विविध आकर्षक व्यक्ती ती आपल्याला आणून देतात. दुसरा बार थोडासा ब्रिटिश धाटणीची जुनी रचना असलेला, वयाने मोठय़ा माणसाचा आहे. जुन्या लाकडी पोताची सजावट असलेला. या ठिकाणी जुनी आणि मुरलेली व्हिस्की ग्लासमध्ये घेऊन शांतपणे त्याचे घोट रिचवत दुपारी हवे ते लिखाण करता येते. इथे आपल्या लिहायच्या वह्यच नाही, तर लॅपटॉप घेऊनही बसता येते. आणि तिसरी जागा- जी माझी आवडती आहे, जिथे अतिशय मोठय़ा आवाजात संगीत वाजत असते आणि तिथल्या गोंगाटात आणि मुलामुलींच्या गप्पांच्या आवाजात, त्या गर्दी आणि अपरिमित उत्साहाच्या मधोमध हातात आपली वही आणि पेन घेऊन कागदावर लिहीत बसता येते. तिथे आपल्या एकाग्रतेच्या शक्तीची परिसीमा गाठावी लागते. पण मला तसे करायला काही वेळा फार म्हणजे फार आवडते. इथे विविध चेहरे आणि वेशभूषांच्या हजारो तऱ्हा दिसत राहतात. मी अनेक वेळा इथे बसून सिनेमाच्या पटकथा तयार करताना लागणारी व्यक्तिरेखांची स्केचेस करीत बसतो.

मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्या या वयाने पंच्याहत्तर किंवा एकशे सतरा या वयाच्या असतात. आणि शिवाय त्या प्राध्यापकी मनाच्या असतात. कारण सामान्य वाचकाला आपण आठवडाभर काहीही वाचत नाही, ऐकत नाही- यातून जी अपराधाची भावना तयार झालेली असते, ती काढून टाकून त्याला रविवारी सकाळी न्याहारी करताना बुद्धिमान, प्रगल्भ वाटवणे आणि पुणे विद्यापीठात एकोणीसशे साठच्या काळात प्राध्यापकी करून, मौज-सत्यकथेत लिहिताना जशी बौद्धिक उंची यायची, तशी काहीतरी उंची दहा मिनिटांत मिळवून देणे, हे रविवारच्या मराठी वृत्तपत्रीय पुरवण्यांचे काम असते. ती एक प्रकारची मसाज सव्‍‌र्हिस आहे. त्या पुरवण्या बसून वाचायचा पण एक तोरा असतो. मोठी ऐट असते. एक बैठक आणि एक ठेवण असते. साधे काम नाही बाबा ते! काही घरांमध्ये सोळा की अठरा मराठी पेपर रविवारी येतात असे मी ऐकतो. आणि ती सर्व माणसे सकाळी न्याहारी झाली की ताबडतोब प्राध्यापकी मन:स्थितीत शिरून गंभीर होऊन पुरवण्या वाचतात. या पुरवण्यांवर चर्चा करणारी काही फेसबुक महिला मंडळे आहेत. या सगळ्या वातावरणाच्या आणि प्राध्यापकी मानसिकतेच्या धाकाच्या वातावरणात ते बिचारे संपादक आणि पुरवण्या जुळवणारे कर्मचारी, प्रूफरीडर भीतीने थरथरत काम करीत असतात.

या पुरवण्यांमध्ये लिहायची एक शैली असते. ज्यापासून पळ काढणे हा माझा महत्त्वाचा व्यायाम असतो. रविवारी मी व्यायामशाळेत जातच नाही. या रविवारच्या पुरवण्या संपादक चालवतात असे वरवर वाटत असले तरी ते खरे नसते. या पुरवण्या प्राध्यापकी मनाची गरज असलेले वाचक चालवत असतात. आणि त्यासाठी असलेले लिहायचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ, भूतकाळ आणि वयोवृद्ध व्यक्तींचा आदर करणे, शिवाय आपले वडील, त्यांचे वडील, त्या वडिलांच्या वडिलांचे मामा, आपल्या आईच्या आत्याच्या मामीच्या गाणाऱ्या मुलीच्या आठवणी, आजोबांच्या कादंबरीचे कौतुक करणे. या पुरवण्यांत लिहिताना आपले पानसुपारी आणि तंबाखूचे डबे तक्क्याखाली लपवून बसावे लागते. असे सगळे आपल्याला फार पटकन् प्राध्यापकी वाटायला उपयुक्त असे लिखाण करायला मला जमेना. मराठी भाषेच्या व्याकरणाच्या प्रश्नांनी मला व्याकूळ की काय म्हणतात ते होता येईना. चितळ्यांच्या घरी दूधदुभत्याची अ‍ॅलर्जी असलेली सून आली तर तिच्याकडे जसे पाहतील तसे सगळे  रविवारी माझ्याकडे पाहू लागले. मागे एकदा श्याम बेनेगलांच्या सेटवर स्मिता पाटीलला भेटायला परवीन बाबी गेली होती, तेव्हा तिला साधे पाणीसुद्धा विचारले नव्हते म्हणे. दर रविवारी मला ट्रॅफिक पोलीस एकटय़ाला थांबवून ठेवू लागले आणि इतर गाडय़ा सोडू लागले. त्यामुळे मी भेदरून घरच काय, पण महाराष्ट्र सोडून जायची वेळ आली. मी बुकिंगही केले होते. पण सुदैवाने त्याचवेळी मला खंबीर आणि मोकळ्या मनाचे संपादक भेटत राहिले; जे आजवर मला मी आहे तसे लिहायची मोकळीक देतात.. सांभाळून घेतात. महाराष्ट्रात फार कमी संपादक असे आहेत, ज्यांना गोविंदराव तळवलकर व्हायचे नसते. मी ज्या संपादकांसोबत काम करतो त्यांना तसे व्हायचे नाहीये, हे माझे भाग्य. त्या संपादकांचे वय आणि दृष्टी माझ्या वयाशी जुळते. मग भीती उरते ती वाचकांची. आपण आपल्या वाचकासारखे प्रगल्भ आणि प्राध्यापकी वागत नाही ना, याची काळजी आपल्याला या पुरवण्यांत लिहिताना घ्यावी लागते. त्यामुळे मी विशेषत: असे लिखाण अशा जिवंत आणि गजबजलेल्या जागी जाऊन करतो. त्यामुळे आपल्या मनाचे वय अबाधित राहते. लिहिताना शांतता लागते हे खरे असले तरी अनेकदा ती नकोशी होते किंवा अंगावर येते. एकांत आणि शांततेमुळे मनावर एक एकसुरीपणा काही वेळाने येतो आणि आपण लिहीत असलेला मुद्दा गांभीर्याने घेऊ  लागतो. लिहिण्याच्या प्रक्रियेचे फाजील लाड केले की आपण आपल्या कामातली तटस्थता घालवून बसू शकतो. त्यामुळे सवयीची जागा मोडावी. सतत शांततेत बसून लिहिल्याने जडत्व येऊन मनाचे वय वाढले तर सरळ उठावे आणि एखाद्या सुंदर कॅफेमध्ये किंवा बारमध्ये उत्साही माणसांचे निरनिराळे चेहरे पाहत लिहीत बसावे. मग आपण कसरत करून आल्यावर शरीराला जसे ताजे वाटते, तसे काहीतरी मनाचे होते. आपल्याला जे दिसते, ज्याचा वास येतो, जे ऐकू येते तेच कागदावर उमटत असते. लिहिताना आणि वाचताना तुम्ही तुमचे अंतर्गत वय आणि जाणीव यांची गल्लत करू शकत नाही. करायचे ठरवले तरी तसे करणे आपल्या हातात नसते.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com