१९९९ सालच्या जून महिन्यात पॅरिसच्या रस्त्यांवर माझ्या मैत्रिणीसोबत मी संपूर्ण रात्र फिरत आहे. माझ्या आयुष्यात संपूर्ण रात्र जागे राहण्याची ती पहिली वेळ आहे..

कोणतेही शहर रात्री एक वेगळा चेहरा धारण करते. या शहराच्या अनेक भागांत दिवसाची ऊर्जा कधी मावळतच नाही. फक्त अंधार होतो. पण रात्रीची ग्लानी या शहराला येत नाही. तशी शांत ग्लानी यायला पहाट उजाडावी लागते. पहाटेचे एक-दोन तास पॅरिसच्या शरीराला तशी ग्लानी येते. मी ही रात्र कधी विसरू शकणार नाही, कारण माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात होते आहे असे मला आत खोलवर वाटते आहे. मला निर्मनुष्य गल्ल्यांमध्ये भटकायची आज भीती वाटत नाही. आयुष्यात पुन्हा कधी मी या सुंदर शहरात येईन हे मला माहीत नाही. मी कधी परत आलो तर तू इथे असणारेस का, असे मी माझ्या मैत्रिणीला विचारतो. ती रात्री एका चर्चच्या पायऱ्यांवर बसून माझे फोटो काढते. एका ठिकाणी रात्री उशिरा बसून वाइन पिताना मी त्या ब्रासरीच्या खुच्र्यावर सरळ झोपून जातो. ती मला गुदगुल्या करून उठवते, भरपूर पाणी पाजते आणि आम्ही परत चालायला बाहेर पडतो. एका घरातील खिडकीत आम्हाला एकमेकांशी कुत्र्यासारखे भांडणारे आणि एकमेकांना ओरबाडणारे एक स्त्री-पुरुषाचे जोडपे दिसते. आम्हाला त्यांचे फोटो काढावेसे वाटतात.

त्या रात्री तिने माझे काढलेले फोटो चार वर्षांनी मी तिच्या पॅरिसमधील एका खोलीच्या घरात भिंतीवर लावलेले बघणार आहे. पण मला आत्ता त्याची कल्पना नाही. तिलाही नाही. ती फार चांगली कॅमेरावुमन होणार आहे. अनेक देशांत प्रवास करून चांगल्या डॉक्युमेंट्रीज शूट करणार आहे. ती एका मुलाच्या प्रेमात पडणार आहे, त्यामुळे तिला हा देश सोडून लांब अरबी देशात जाऊन अपार कष्टांना आणि नव्या कणखर आयुष्याला तोंड द्यावे लागणार आहे. यातले काहीही तिला आत्ता माहिती नाही. माझे काय होणार आहे, हे मला माहिती नाही. या शहरातील माझी ही शेवटची रात्र आहे, असे मी भाबडेपणाने समजून चाललो आहे. ही रात्र मी जागून उघडय़ा डोळ्यांनी पाहिली, अनुभवली. माझे मन सूर्य उगवताना शांत आणि ओले झाले आहे. मला घरी परतून सामान आवरून लगेचच एअरपोर्टवर निघायचे आहे. माझा जो मित्र मला सोडायला येणार आहे तो मलाच काय पण इतर कुणालाही परत कधीही भेटणार नाही, या भयंकर वास्तवाची मला आत्ता कल्पना नाही. मी माझ्या मैत्रिणीसोबत संपूर्ण शहर भटकून सूर्योदयाच्या वेळी माझ्या घराकडे परत निघालो आहे..

मी संपूर्ण जागा राहून अनुभवलेल्या आणि मी कधीही विसणार नाही अशा दोन रात्रींपैकी दुसरी रात्र एका विस्तीर्ण जमिनीवर पसरलेल्या सोळाव्या शतकात बांधलेल्या एका गढीमधील आहे. फ्रान्सच्या दक्षिणेला बोर्दो या प्रांतातील द्राक्षांच्या मळ्यांमध्ये ही जुनी गढी उभी आहे. वर वर्णन केलेल्या रात्रीनंतर बारा वर्षांनी मी ही लक्षात राहील अशी रात्र अनुभवतो आहे. मी या सुंदर आणि विशाल गढीमध्ये पंधरा दिवसांसाठी एकटा राहतो आहे. वाइन कशी बनवतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि वाइन बनवणाऱ्या बोर्दोमधील जुन्या लोकांना भेटण्यासाठी मी इथे मुक्काम करून आहे. बोर्दोच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या या राजवाडय़ासारख्या गढीत माझी राहायची अगत्याने सोय केली आहे. इथे तीन शतके काहीही बदलले नाही. आतील फर्निचर, अंतर्गत सजावट, झुंबरे, जुनी लायब्ररी, मोठाली शयनगृहे, मोठाले भोजनगृह आणि मैदानाइतका   मुदपाकखाना.. कोणत्याही गोष्टीला काळाचा हात लागणार नाही याची या कुटुंबातील लोकांनी प्रेमाने आणि अपार कष्टाने काळजी घेतली आहे, हे दिसते आहे. वाइन बनवणाऱ्या फ्रान्समधील प्रख्यात कुटुंबांपैकी असे हे एक कुटुंब आहे. मला येऊन चार दिवस झाले आहेत. मी आलो तेव्हा काही अर्जेन्टिना देशातील पाहुणे माझ्यासोबत या गढीत राहात होते. राहत होते म्हणजे मला कधी दिसले नाहीत, इतके हे घर मोठे आहे. सकाळी न्याहारीच्या वेळी आम्ही एकमेकांना भेटत असू. ते आज सकाळी निघून जाताना मला दिसले. रोज सकाळी लवकर एक हसरा माळी, एक उद्धट स्वयंपाकीण आणि दोन सतत सिगारेटी फुंकणारे, लाल तांबारलेले डोळे असलेले सफाई कामगार येऊन आपापले काम करून जात. त्यानंतर संपूर्ण गढी पुन्हा निर्जन. मी रात्री काम संपवून माझी गाडी चालवत परत येताना, आज आपण या गढीत संपूर्ण एकटे असणार आहोत हा विचार मला कुरतडतो आहे. मुख्य गावापासून मी वळतो आणि रस्ता निर्जन होऊन जातो. आता चौफेर पसरलेले विस्तीर्ण द्राक्षाचे मळे. आजूबाजूला चिटपाखरू नाही. मी गाडी चालवत गढीच्या महाकाय दरवाजातून आत शिरतो आणि पार्किंगच्या शेडमध्ये जाऊन थांबतो. मला एकदा असे वाटते, की आत जाऊच नये. इथेच गाडीत हीटर लावावा आणि झोपून जावे.

मी मुख्य दरवाजापाशी येतो आणि अचानक एक झुंबर पेटते. मी ‘कोण आहे?’ असे घाबरून जोरात ओरडतो. चक्क मराठीत ओरडतो; फ्रान्समध्ये आपण आहोत हे विसरून! मी थरथरत उभा आहे. आतून कुणी झुंबर पेटवले याची वाट पाहत. पण बराच वेळ कुणीही येत नाही. इथे आसपास राहायला एकही हॉटेल नाही. मी घाबरून माझ्यासोबत दिवसभर काम करणाऱ्या आणि शहरात लांब राहणाऱ्या फोटोग्राफर मुलीला फोन करतो, ‘‘मी आज तुझ्याकडे राहायला येऊ  का?’’ असे विचारायला. ती उचलत नाही. मी सावकाश दरवाजापाशी जातो आणि हळूच किल्ली कुलपात सरकवतो. मी आतमध्ये एक पाऊल ठेवतो तोच आतले दुसरे झुंबर पेटते. मी पुन्हा जोरात ओरडतो. या वेळी फ्रेंचमध्ये. कोण आहे? कुणी आतमध्ये आहे का? हॅलो? गुड इविनिंग?.. कुणीही उत्तर देत नाही. मी आत जायला लागतो तसा मी जिथे जाईन तिथली झुंबरे आपोआप पेटत जातात. मागची विझत जातात. मी घाबरून रडकुंडीला आलेला, घामाने ओला झालेला, दुसऱ्या मजल्यावरील माझ्या शयनगृहाकडे जवळजवळ पळत सुटतो. जुन्या भिंतींवर, जिन्याच्या कठडय़ांवर माझी सावली माझ्यापुढे धावते आहे. मी मागे पाहतो तर अंधार आणि माझ्यापुढे प्रकाश. मी माझ्या खोलीत जातो आणि गच्च दार लावून घेतो. या महाकाय गढीत मी संपूर्ण एकटा आहे. माझा फोन वाजतो. मगाशी जिला केला होता त्या मुलीने परत उलटा केला आहे. मी तिला जे घडले ते सांगतो. ती हसायला लागते. सर्व झुंबरे संगणक चालू आणि बंद करतो; माणसाच्या पायाच्या आवाजाला जोडलेले सेन्सर्स गालिच्याखाली बसवले आहेत, असे ती सांगते. तू पुढे जाशील तसतसे मागील दिवे बंद होत जातील अन् पुढचे लागत जातील, अशी सोय केली आहे. न घाबरता बिनधास्त झोप, असे ती मला सांगते.

ती संपूर्ण रात्र मी एकटा जागून काढतो. मगाशी मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती त्याची मला आत्ता मजा वाटते. मी संपूर्ण गढीभर चालत फिरतो आणि माझ्यापुढील झुंबरे पेटून माझ्यामागील झुंबरे विझताना पाहात राहतो. लायब्ररीत बसून जुन्या चित्रांचे आणि जुन्या चिनीमातीच्या भांडय़ांचे संग्रह पाहतो. मुदपाकखान्यात एका खोलीएवढा फ्रीज आहे. त्यात जाऊन उत्तम चीज आणि वाइन आणून ग्रामोफोनवरती जुने संगीत लावून ऐकत बसतो. वरच्या मजल्यावरील एका कोपऱ्यात मुख्य शयनगृह आहे. त्यातील न्हाणीघराचे दृश्य अपूर्व असे आहे. माझ्या घराएवढे ते मुख्य मालकाचे न्हाणीघर आहे. जुना संगमरवरी टब. पितळ्याच्या चाव्या असलेले जुने नळ. कोरीव कामाची चौकट असलेले सुंदर आरसे.

रात्रीची आणि त्या जुन्या गढीची माझी भीती सावकाशपणे निघून जाते. अगदी सावकाशपणे. सकाळ उजाडेपर्यंत ती जातच राहते. या घरात अजून कुणीतरी आहे आणि कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे ही भावना शिल्लक राहते, पण त्याची मजा येऊ  लागते. संपूर्ण रात्र इतर कोणत्याही व्यक्तीशिवाय जागे राहून आनंदात काढण्याची माझ्यावर त्यानंतर वेळ आली नाही. त्या रात्रीला आता पाच वर्षे होतील. त्या रात्रीचा संपूर्ण वास माझ्या मनात अजुनी भरून राहिला आहे.

– सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com